Hallo, wie gehts? म्हणजेच हॅलो, हाऊ आर यू? या वाक्याने इथे बहुतांशी कुणालाही भेटल्यावर सुरुवात होते. ठीक, मजेत, निवांत, बिझी अशी प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात, पण आमची शेजारची आजी भेटल्यावर जेव्हा तिच्याशी बोलणं होतं, तेव्हा आजीचं हमखास उत्तर येतं, मी समाधानी आहे. क्वचित कधीतरी 'माझा पाय दुखतो आहे, थकवा आहे' असंही म्हणते, पण नव्याणव टक्के तिचं उत्तर हे समाधानी आहे हेच असतं. काल भेटली तेव्हा "आता ८८व्या वर्षी अजून काय हवं, जे आहे त्या सगळ्यात मी समाधानी आहे" हे तिचं उत्तर आलं.
आजीच्या वयाचा जो अंदाज आम्ही बांधला होता, त्यापेक्षाही ती थोडी मोठीच आहे हे तेव्हा लक्षात आलं. आजीची आणि आमची पहिली भेट मला आठवत नाही, सगळेच जण नवीन इमारतीत एकेक करून शिफ्ट होत होते, त्यात आजी बरीच उशीराने आली, बहुतेक आम्ही गार्डन मध्ये काहीतरी काम करत होतो तेव्हा ती एकदा दिसली होती, तेव्हा कोरोना आणि लॉकडाऊनचे दिवस होते. दुरूनच फक्त हॅलो म्हणून बोलणं झालं हे एक आठवतं आहे. नंतर एकदा बेल ऐकू आली म्हणून मी पाहिलं, तर बाहेरचं इमारतीचं मुख्य दार आजी आणि तिच्यासोबत तिची असलेली मैत्रीण किंवा बहीण यांना उघडता येत नव्हतं, म्हणून मी जाऊन मदत केली. त्या नंतर काही दिवसांनी आजी राहायला आली. तिच्या मुलीचं घर असावं हे बहुतेक, कारण सोसायटी मिटिंगला तिची मुलगी भेटली होती. स्वतःहून आम्ही कधीही तिच्याबद्दलची अजून वेगळी माहिती विचारली नाही, इथे ते संयुक्तिक धरलं जात नाही हे आहेच, पण तशी आम्हाला गरजही वाटली नाही. हेच तिच्याबाबत, तिनेही जुजबी प्रश्नांपलीकडे काही विचारलं नाही. पण आमच्या भेटींमधून हळूहळू ओळख होत गेली.
मध्यम उंची, किडकिडीत बांधा, पांढरे कापसासारखे आणि कुरळे केस आणि चष्मा घातलेली ही आमची आजी. तिचं नाव आडनाव माहीत असलं तरी शेजारची आजी हीच तिची ओळख. ती राहायला आल्या नंतर बरेचदा गार्डन मध्ये आमची भेट व्हायची. तिच्याकडे एक गार्डनचं काम करायला माणूस पण यायचा, पण ती सुद्धा जमेल ते करताना दिसायची. ती इतक्या सहज पणे वाकून पानं उचलायची, कुंड्या हलवायची हे बघून आम्ही थक्क व्हायचो. मधूनच कधीतरी सृजन दिसला की त्याला घरातून काहीतरी एखादं चॉकलेट, बिस्किटांचा पुडा असं आणून द्यायची. एकदा गप्पांमध्ये सृजनचा वाढदिवस आहे आणि आम्ही तेव्हा ट्रिपला जाणार आहोत असं आमचं बोलणं झालं. तेव्हा तिने, मी लक्ष ठेवेन तुमच्या गार्डन कडे असं सांगितलं आणि आम्ही परत आल्यावर भेटली तेव्हा थांबा, काहीतरी आहे याच्या साठी म्हणून एक पाकीट घेऊन आली आणि सृजनला दिलं. त्यात वाढदिवसाचं म्हणून आईस्क्रीमच्या दुकानाचं कुपन होतं. आम्ही खूप वेळा तिला थँक्यू म्हणालो, एकूण जरा भारावूनच गेलो.
मग ख्रिसमस आला तेव्हा पुन्हा ती आवर्जून सृजन साठी गिफ्ट घेऊन आली. मग मागच्या वर्षी त्याची शाळा सुरु होणार म्हणून तिने एक आणि तिच्या मुलीने एक अशी दोन गिफ्ट्स आणून दिली. आता ईस्टर आणि ख्रिसमसला तिच्याकडून गिफ्ट येतंच हे आम्हाला माहिती झालं आहे, अगदी आम्ही इथे नव्हतो तरी तिने आणून ठेवलं होतं आणि आम्ही आल्यावर सृजनला दिलं. आम्ही सुद्धा सृजनच्या वाढदिवसाचा केक, दिवाळीचं काही गोड हे तिला नेऊन देतो आणि ती अश्या वेळी सृजनला आत बोलावून ड्रॉवर उघडून हवं ते घे असं सांगते. तो काहीही उचलेल, त्याला कुठे समजतं म्हणून आम्हालाच जरा कानकोंडं व्हायचं, पण आता तिच्याकडे काही नेऊन द्यायचं असेल तर 'ती नेहमी काय काय देते, नको मी येतच नाही त्यापेक्षा' असं सृजन म्हणतो. मुळात तिला सृजन ला काहीतरी देण्यात खूप आनंद मिळतो हेही समजतं, त्यामुळे आता एखाद्या वेळी तिने बोलावलं आता, तर आम्ही सुद्धा हक्काने त्याला घेऊन ये असं सांगतो. गमतीने आम्ही आमच्यात बोलताना 'आता दत्तक घ्यायला सांगू आजीला' असं अश्या वेळी म्हणतो.
एक हॉल, किचन आणि एक बेडरूम असं तिचं घर, जे (या वयात सुद्धा) तिने अतिशय टापटीप आणि नीटनेटकं ठेवलं आहे, नुसतं ठेवलं नाही तर सजवलं आहे. भिंतीवर छान तिच्या कुटुंबाच्या फ्रेम आहेत. मागच्या वर्षी तिच्या नातीच लग्न झालं, तेव्हा नात आणि नातजावई यांचा फोटो तिच्या टेबल वर ठेवला होता. रोज व्हॅक्युम क्लिनर फिरवून एकदा घर स्वच्छ करते. मी तिच्याकडे जाताना बाहेर बूट काढले तर मला 'असू द्या, मी रोज साफ करते' हे आवर्जून सांगते. बाहेर गार्डन मध्ये एक टेबल आहे, त्यावर कायमस्वरूपी एखादी फुलांची कुंडी किंवा फ्लॉवर पॉट ठेवलेला असतो. एकूणच वृद्धत्व, त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी हे इथे वेगळं आहे थोडं, ते तिच्याकडे बघून पुन्हा जाणवतं. आता काय किती उरलं आयुष्य वगैरे विचार न करता आहे ते भरभरून जगणारी ती आहे. तिची मुलगी गावातच राहते, ती अधून मधून येत जात असते. आठवड्यातून एकदा मुलीसोबत जाऊन आजी ग्रोसरी घेऊन येते. एरवी एकटीच राहते पण तिच्या बोलण्यात त्याबद्दल काही बिचारेपण जाणवत नाही. स्वतंत्र राहते, छान आनंदानी राहते. टीव्ही वर बहुतेक काहीतरी मोठ्या आवाजात लावून ठेवते रात्री, आमच्या घरात त्याचा बारीक आवाज येतो त्यावरून वाटतं. बरेचदा गार्डन मध्ये बसून पेपर वाचते, सुडोकू सोडवते, स्वतःला कशात तरी रमवून घेते. कपडे मशीन मधून धुणे, वाळत घालणे हे सगळं नीट करते. कचरा योग्य जागी फेकायला स्वतः जाते. तिची मैत्रीण जवळपास दररोज तिच्याकडे येते, दोघी मिळून काही बोर्ड गेम्स खेळतात. कधी कधी एकत्र जेवतात, कॉफी घेतात, मिळून आईस्कीम खायला जातात, मग कधी आजी मैत्रिणीला आधी घरी सोडून परत येते तर कधी मैत्रीण हिला सोडून मग परत जाते. देशात काय चाललं आहे, जगात काय चालू आहे याबाबत ते कुणाबद्दलचे गॉसिप असे अनेक विषय बोलत असतात असं आमच्या कानावर आपोआप येणाऱ्या गोष्टीतून जाणवतं.
एकदा असाच आमच्याशी बोलताना विषय निघाला तेव्हा तिचं लहानपण पूर्ण युद्धकाळात गेलं, तेव्हा किती गरिबी होती, तिला आणि तिच्या भावाला मिळून एक सायकल कशीबशी मिळाली होती असं बोलणं झालं. कदाचित तेव्हाचा काळ स्वतः अनुभवला असल्यामुळे, युद्धाचे चटके अनुभवले असल्यामुळे आताच्या रशिया युक्रेन युद्धाबाबत बोलताना ती भावुक झालेली वाटली, त्यातून लोकांचे खूप हाल होतात ते होऊ नये आणि युद्ध थांबावं असं सारखं म्हणत होती.
नातीच्या लग्नाला म्हणून ती बाहेरगावी जाणार होती, एरवी घरातच असते. तर जायच्या दोन दिवस आधी येऊन 'मी दोन दिवस नसेन, तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगायला आले' हे सांगून गेली, शिवाय अडी नडीला असावा म्हणून स्वतःचा आणि तिच्या मुलीचा फोन नंबर मला देऊन माझा नंबर पण लिहून घेतला. त्यासाठी तिच्याकडे एक लहानशी डायरी आहे, त्यात सगळ्या अश्या महत्वाच्या नोंदी आहेत, तिचं अक्षर बघून मला माझ्या आजोबांच्या डायऱ्या आठवतात. तिच्याकडे पंधरा दिवसातून एकदा साफसफाई करायला एक बाई येते, एकदा मी विचारायला गेले की ती माझ्याकडे पण येईल का, तर मला तिचा नंबर दिलाच, शिवाय इंटरनेट वर कुणावरही विश्वास ठेवू नका, ओळखीतली बाईच बरी असा खास आजीचा सल्ला दिला. तिच्याकडे येणाऱ्या कामवाल्या बाईसोबत भरपूर गप्पा मारते.
एकदा मी ऑफिस मध्ये जात असताना ती भेटली, जुजबी गप्पा झाल्या आणि तिने माझ्या पाठीवरून हात फिरवून मला बाय केलं. इथे अनेक मित्र मैत्रिणी आहेत, पण असं मोठ्या कुणी प्रेमाने आपल्याला जवळ घेतलं असं क्वचित होतं, त्यामुळे असेल मला तो प्रसंग अगदी जवळचा वाटतो. खरं तर सुरुवातीला तिला नेहमी सृजनला जवळ घ्यावं वाटायचं, पण करोना मुळे आम्ही दुरूनच बोलायचो आणि तिलाही तिची मुलगी सक्त ताकीद द्यायची, जे योग्यच होतं. तरी स्वाभाविकपणे सृजन दिसला की ती जवळ यायची आणि मग आम्हीच नको म्हणून सांगायचो किंवा तिच्याच लक्षात यायचं आणि थांबायची. वेळच्या वेळी स्वतः जाऊन ती सगळ्या लसी पण घेऊन आली होती.गेल्या एक वर्षात सगळे निर्बंध दूर झाल्यापासून आता सृजन दिसला तर हमखास त्याचा हात हातात घेऊन त्याला कसा आहेस विचारते.
मध्यंतरी सृजनला शाळेत आनंद मेळावा होता त्यासाठी न्यायला चिल्लर पैसे हवे होते, माझ्या कडे नेमकं हवी ती नाणी नव्हती, सुमेध परगावी होता. आता दुकानात जाण्यापेक्षा मी तिच्याकडे गेले आणि एक किंवा दोन युरो असतील तर ते देशील का, मी तेवढे पैसे तिला दिले. यावर, तुमच्या कडे नसते हे आता तरी प्रश्न नव्हता, तसेच घेऊन गेलात तरी चालले असते, त्याला माझ्याकडून असं म्हणाली. पानं साफ करायला एक झाडू मिळतो, आमचा नेमका तो तुटला, म्हणून मी तिला जाऊन थोडा वेळ तुझ्याकडचा वापरू का विचारलं आणि तिने घ्या की, मला न विचारता घेतलात पुढच्या वेळी तरी चालेल असं आम्हाला हक्काने सांगितलं.
मागच्या वर्षी तिला एका हाताचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे इमारतीचं मुख्य दार उघडता येत नव्हतं. मग ती आमची बेल वाजवून मी उघडून द्यायचे, मला हे काही मोठं काम नव्हतं पण तिला कानकोंडं तर व्हायचंच, शिवाय ते तिचं तिला जमायला हवं यासाठी तिची खूप धडपड चालू होती. एकदा एका लोकल व्हाट्सअँप ग्रुप वर बातमी आली की पाईपलाईन फुटली आहे कुठेतरी त्यामुळे पाणी खराब झालं आहे, त्यामुळे पिण्यायोग्य नाही, दोन दिवस विकतचे पाणी वापरा. मी आजीला विचारायला गेले की तुझ्या कडे प्यायचं पाणी नसेल तर आमच्या घरी आहे ते आणून देते, तर म्हणाली की मला सगळ्यांचे फोन आले होते हे सांगायला, तुम्ही सुद्धा त्यात विचारायला आला, किती छान वाटलं म्हणून आमचे दहा वेळा आभार मानले. असंच एकदा तिच्याकडे काहीतरी जड वस्तू उचलायला मदत हवी म्हणून सुमेध गेला, तर तिनी दुसऱ्या दिवशी आम्हाला फुलं आणून दिली. तिची गार्डन मधली मोठी छत्री उघडायला आम्ही गेलो, कधी कपड्यांचा स्टॅन्ड पडला आणि तो उचलून दिला तरी दर वेळी थँक्यू म्हणते. आम्ही या सगळ्यात काहीच विशेष केलं नसतं, पण ती दर वेळी त्याची नोंद घेते.
वयानुसार असेल, कधीतरी हॅलोच्या पुढे बोलण्याची गाडी जातच नाही.कधी कधी विशेषतः थंडीच्या दिवसात आमची भेटही कमी होते, पण होते तेव्हा सहसा तिच्या काहीतरी तब्येतीच्या तक्रारी पण सांगते, पण मग पुन्हा ते बाजूला ठेवून बाकी सुद्धा बोलते. कधी खूप अलिप्त वाटते. ठरवून एकमेकांच्या घरी आम्ही जात नाही, पण चार दिवस भेट झाली नाही तर वेगळं वाटत राहतं.
मागच्या आमच्या भारत वारी वेळी आम्ही चार आठवडे नसणार याचं तिला खूप वाईट वाटत होतं. आम्ही निघताना तिने परत या लवकर, मी वाट बघेन असं सांगून आम्हाला बाय केलं आणि आम्ही परत आल्यावर माझा हात घट्ट हातात धरून ठेवून आनंद व्यक्त केला.
असे कुणी लोक भेटतील हे मला कुणी पूर्वी सांगितलं असतं तर मी विश्वास ठेवला नसता, कारण त्या आधी शेजार्यांचे असे कोणतेच अनुभव नव्हते, उलट थोडे त्रासदायक होते. पण आजी आणि तिच्यासारख्या काही लोकांनी त्या आधीच्या अनुभवांना पूर्ण बाजूला सारून नवीन अनुभव दिले. तिच्याशी बोलताना 'तुम्ही' वापरत असलो, तरी तिच्याशी जुळलेले ऋणानुबंध असे आहेत की ती आपलीच वाटते. तिच्याकडे बघून प्रत्येक वेळी, या वयात आपल्याला यातलं थोडं तरी जमायला हवं असं वाटतं. तिचं मी समाधानी आहे हे वाक्य डोक्यात पुन्हा पुन्हा येतं.
आता एक होतं, आजी समोर दिसली की नकळत मी स्वतःलाच एकदा 'तू समाधानी आहेस का?' हे विचारते. त्या निमित्ताने खूप गोष्टींची उजळणी होते. त्यात अनेक गोष्टी आपोआप आठवतात. आणि मग वाटतं की माझ्या आई बाबांचा हात हातात घेऊन तिने, मला किती छान शेजारीण मिळाली आहे ही असं सांगितलं, तेव्हा त्यांना किती समाधान वाटलं असेल हे कसं सांगणार? तिच्या नुसत्या या असण्याने, प्रेमाने पाठीवरून हात फिरवते तेव्हा ती किती सहज आमचाच आधार होते हे शब्दात कसं व्यक्त करणार? दूरवर आपला देश सोडून आलेल्या आम्हाला, सृजनला एवढं हक्काने 'घे तुला हवं ते' असं म्हणणारं कुणी असणं याचं समाधान कसं मोजणार? असे अनेक प्रसंग, अनेक लोक कायमस्वरूपी स्मरणात राहतील हे सगळं आमच्या समाधानाच्या पोतडीत जमा होत राहील.