आयुष्यातून पावभाजी जायचीच वेळ आली होती या शुगरमुळे. पण थोडक्यात वाचली :).
साहित्य
दूधीभोपळा - २ मोठे
फ़्लॉवर - १/२ गड्डी
गाजर - १ मोठे
बटाटा - २ मध्यम
बीट - १ लहान तुकडा
मटार - १/२ वाटी (हे वेगळे शिजवून बाजूला ठेवणे)
ढब्बू मिरची -३
टोमॅटो -३
कांदे - ३
लसूण सोलून- १ गड्डा अति बारीक चिरणे.
आलं- हे मी अंदाजे लसणाच्या बरोबर येईल एवढं घेते किसून
पाभा मसाला, तिखट, हळद, तेल, मीठ, बटर वगैरे नेहमीचे यशस्वी साहित्य.
कृती
मटाराच्या वरचे सगळे पदार्थ चिरणे. जरा पाणी घालून कूकरला व्यवस्थित शिजवून घेणे. पाणी काढून छान स्मॅश करणे. (पाणी फेकू नये)
ढ्ब्बू मिरचीपासून खालचे पदार्थ बारीक चिरून घेणे.
तेलामध्ये पहिल्यांदा आलं लसूण घालून परतणे. त्यावर कांदा मग शिजला की टोमॅटो, थोडं मीठ, मग ढब्बू घालून छान शिजेपर्यंत परतून घेणे. मग हळद, तिखट, पाभा मसाला, मीठ घालणे, त्यावर वर शिजवलेल्या भाज्या घालणे. सगळं एकजीव करणे. मघाशी ठेवलेलं भाज्यांचं पाणी घालणे. गरजेप्रमाणे पाणी घालणे. झाकण ठेऊन शिजवून घेणे. वर शिजवलेले मटार घालणे. मला ते स्मॅश करण्यापेक्षा तोंडात आलेले आवडतात. आता बटर घालणे. कोथिंबीर घालणे. कांदा, लिंबू आणि गरमगरम पावाबरोबर भाजी खाणे.
- पावभाजी मसाला नेहमीच्या चवीपेक्षा १/४ चमचा जास्त घालायचा.
- गाजर आणि बीट शिजवले की शुगर वाढते. त्यामुळे तेवढचं घातलंय.
- घरच्यांना जरा जादा बटर घालून दिली की आजपर्यंत कळलेलं नाही की यात काय काय आहे. भाजी करताना भाजीत खूप बटर घालत नाही मी.
- जेवणात १ पाव खाल्ला तर माझी शुगर वाढत नाही पण २ खाल्ले तरी वाढते. त्यामुळे शक्यतो मी एकच खाते. भाजी २ बाऊलभरून खाल्ली की पोट आणि आत्मा तृप्त होतो.
माहितीचा स्रोत- माझी मैत्रीण अरुंधती मुळे एकदा म्हणालेली की ती पाभा करताना दुधी घालते. त्यानंतर मी करून बघितली तर पाणचट झाली. मग जरा प्रयोग करत या रेसिपी आणि प्रमाणावर आले.