माझी शाळा - एक नोंद

आमच्या गावातली प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षी अधिकृतपणे बंद झाल्याचं मला काही दिवसांपूर्वी कळलं. जिल्हा परिषदेची, मराठी माध्यमाची एका खेडेगावातली ही छोटीशी शाळा. गेली काही वर्षे ती बंद पडण्याच्या दिशेने जात असल्याचं लक्षात येत होतंच. तरीही, ती खरोखरच बंद झाल्यावर खूप वाईट वाटलं. मी शाळेत असताना साधारणपणे साठ ते पासष्ट विद्यार्थी शाळेत असायचे. पहिली ते चौथी, हे चारही वर्ग मिळून ही संख्या होती. ही संख्या त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे स्थिर होती. नंतर मात्र सावकाश, पण निश्चित ओहोटी सुरू झालेली होती.

माझ्या लहानपणी आणि त्याआधी कित्येक वर्षे, कोकणातल्या बहुतेक सगळ्या खेडेगावांप्रमाणे आमच्या गावातलेही बरेचसे पुरुष हे मुंबईला नोकरी करायचे, पण कुटुंबं गावात असायची. प्रत्येक कुटुंबाची थोडीफार शेती, थोडीफार गाईगुरं होती. हा सगळा संसार बायका सांभाळायच्या. पावसाळ्यात जेव्हा शेतात नांगर धरावा लागतो, तेव्हा बरेचसे पुरुष गावी येत आणि शेतीची कामं उरकून परत जात. एरवी मग गणपती, होळी अशा सणांच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत मुंबईकर गावाला येत. हा क्रम कित्येक वर्षांपासून साधारण वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत अव्याहत चालू होता.
तेव्हाची पिढी, म्हणजे माझ्या बरोबरीच्या मुलामुलींच्या आईवडिलांची पिढी कमी शिकलेली होती. त्यांचं उत्पन्नही कमी असायचं. इतर गावांचं मला माहिती नाही, पण आमच्या गावाची मुंबईला ’गावकीची खोली’ होती. प्रत्येकाला स्वतंत्र खोली घेऊन राहणं परवडत नसल्यामुळे ही कॉमन मोठी खोली असायची. सगळेजण मिळून भाडं भरायचे. पुढची पिढी शिकलेली आणि त्यामुळे जास्त उत्पन्न मिळवणारी झाली. आर्थिक स्थिती सुधारली, तसे पुढच्या पिढीतले पुरुष आपल्या बायका-मुलांना मुंबईलाच राहण्यासाठी घेऊन जाऊ लागले. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालू लागले. हळूहळू गाव रिकामं होऊ लागलं. बरीचशी घरं वर्षातला बराच काळ बंद दिसू लागली. गावाला सुट्टीत थोडे दिवस येऊन राहणं अशीच पद्धत पडली.
पूर्वी, म्हणजे माझ्या लहानपणी गावात भातशेती व्हायची. शिवाय थोड्याफार प्रमाणात नाचणी, वरी अशी धान्यंही पिकवली जायची. दिवाळीच्या सुमारास भात घरात आलं की रब्बी हंगामासाठी वाल लावले जायचे. हळूहळू हेही सगळं बंद झालं. जवळजवळ सगळी शेती ओसाड राहू लागली. कारण शेती कसायला गावात कुणी कायमस्वरूपी रहातच नाही. गावात कायमस्वरूपी राहणार्‍यांची संख्या अतिशय कमी आहे.
समांतरपणे शाळेतल्या मुलांची संख्याही घटत घटत एक आकडी संख्येवर येऊन ठेपली. पण गाडीत तीन प्रवासी जरी असतील तरी एसटी धावतेच, तशी या सात-आठ विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची ही शाळा काही वर्षं दोन शिक्षकांसह चालत होती. यावर्षी मात्र जिल्हा परिषदेने गावाशी विचारविनिमय करून शाळा अधिकृतपणे बंद केली. कारण दोन विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र शिक्षक, त्यांना दुपारचं जेवण बनवण्यासाठी कर्मचारी, या दोघांचा पगार, वीजबिल वगैरे खर्च खरोखरच परवडण्यासारखा नाही. जे दोन विद्यार्थी शाळेत शिल्लक होते, ते आता दोन किलोमीटरवरच्या गावातल्या प्राथमिक शाळेत जातात.

हे लिहिताना माझा ’गेले ते दिन गेले’ असा सूर लागला असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. कारण माझ्या लहानपणी मी जे माझं गजबजलेलं, नांदतं गाव अनुभवलं, ते आता मला दिसत नाही. शेताडीत गेलं, तर सगळीकडे उंच गवत वाढलेलं दिसतं. मे महिन्याव्यतिरिक्त एरवी गावाला गेलं, तर गाव उजाड वाटतं.
पण असा गतकालविव्हल सूर लावण्याची माझी इच्छा नाही. शिवाय माझ्यासारख्या, स्वतः महानगरात राहणार्‍या, दिवसभर सावलीत बसून काम करणार्‍या, रेस्टॉरंटपासून हॉस्पिटलपर्यंतच्या सर्व सोयी-सुविधा सहज उपलब्ध असणार्‍या व्यक्तीने असा सूर लावणं योग्य नाही, हेही मला १००% मान्य आहे. खेडेगावात कायमस्वरूपी राहण्यातल्या अडचणी मला चांगल्याच माहिती आहेत. हा लेख लिहिण्यामागचा माझा उद्देश माझ्या शाळेच्या छोट्याशा इतिहासाची जमेल तशी नोंद करणं आणि शाळा बंद झाल्याचं समजल्यावर जे वाईट वाटलं, ते व्यक्त करणं असाच आहे, दुसरा काहीही नाही.

आमची ही शाळा १ फेब्रुवारी १९५३ रोजी सुरू झाली. त्यापूर्वी शेजारच्या गावात प्राथमिक शाळा होती. गावातली काही मुलं तिथे जाऊन थोडी शिकायची. जरा मोठं झाल्यावर मुलगे मुंबईला जाऊन कामाला लागायचे. मुली शिकायच्याच नाहीत. आपल्याही गावात शाळा असावी, असं हळूहळू गावातल्या जाणत्या माणसांना वाटू लागलं आणि त्यासाठी प्रयत्न चालू झाले. गाव लहान असलं, तरी एक सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्या काळी शिक्षक होण्यासाठी जी पात्रता लागत असे, ती पूर्ण केलेली व्यक्ती गावात होती. माझी आजी व्हर्नाक्युलर फायनल पास झालेली होती. ती शाळेत शिकवायला तयार झाली. सरकारकडून मान्यता मिळाली आणि ’खाजगी शाळा’ म्हणजे त्या वेळी ’व्हॉलंटरी शाळा’ म्हणत असत तशी शाळा १९५३ मध्ये सुरू झाली. योगायोगाची आणि भाग्याची गोष्ट म्हणजे शाळेच्या उद्घाटनासाठी त्यावेळी गो. नी. दांडेकर लाभले होते. ते दिवेआगरला त्यांच्या नातेवाईकांकडे आलेले असताना माझ्या आजोबांनी त्यांना उद्घाटनासाठी येण्याची विनंती केली आणि तेही सहज आले. सुरुवातीला शाळेला स्वतःची इमारतही नसल्यामुळे गावातल्या देवळात शाळा भरत असे. काही वर्षांमध्ये मुंबईकर गावकर्‍यांनी मनावर घेतलं आणि श्रमदानाने शाळेची इमारत बांधली गेली. आर्थिक मदतीसाठी शाहीर साबळे यांचा ’यमराज्यात एक रात्र’ हा प्रयोगही त्यावेळी मुंबईत आयोजित केला होता. अशा तर्‍हेने शाळा स्वतःच्या इमारतीत सुरळीत सुरू झाली. (सध्याची इमारत जिल्हा परिषदेची आहे.) ’खाजगी शाळा’ याचा अर्थ असा, की पटसंख्येवर आधारित अनुदान दरवर्षी शासनाकडून मिळत असे. शिक्षकाचा पगार आणि शाळेचा इतर खर्च हा या अनुदानातून आणि लोकवर्गणीतून भागवणं अपेक्षित असे. गावातल्या माणसांची आर्थिक स्थिती गरिबीची असल्यामुळे लोकवर्गणी वगैरे न काढता या अनुदानातूनच सगळे खर्च भागवले जात. माझी मोठी आत्या ही या शाळेच्या पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी एक. तिच्या आठवणीनुसार वर्षाला एकूण तीनशे रुपये सुरुवातीस मिळत असत. म्हणजे महिन्याचे पंचवीस रुपये! शेतीभाती असली, तरी आमच्या कुटुंबासाठीही ’आर्थिक उत्पन्न’ म्हणण्यासारखं हे एवढंच होतं. त्यातही शाळेचा इतर खर्च अर्थात असायचाच. त्यामुळे त्या लहान वयातही तिच्या लक्षात हा आकडा राहिला असावा. असो. शाळा अशीच सुरळीत सुरू राहिली, ती थेट १९७६ पर्यंत. (तेव्हा अनुदान तीनशेवरून सातशेपर्यंत गेलं होतं.) तेवीस वर्षं शाळेत नोकरी केल्यावर माझी आजी थकली होती. प्रकृतीमुळे तिला दिवसभर शाळेत जाऊन चारही वर्गांना एकटीने शिकवणं कठीण जायला लागलं होतं. शेवटी गावकर्‍यांशी विचारविनिमय करून ही शाळा जिल्हा परिषदेकडे सोपवावी, असा निर्णय झाला. अशा प्रकारे, आजी निवृत्त झाली आणि शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू राहिली. तेव्हापासून ते अगदी गेल्या वर्षीपर्यंत दोन शिक्षक या शाळेत नेहमीच होते. शाळेचा पट साधारणत: साठ ते सत्तरच्या दरम्यान कायम असायचा. पुढे काही वर्षांनी माझी आई या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून आली. तिनेही खूप वर्षे या शाळेत शिकवलं.
आमच्या खेडेगावात एकोणीसशे पन्नासच्या दशकात शाळा सुरू होणं या घटनेचे अनेक दूरगामी परिणाम झाले. पूर्वी मोजकीच मुलं बाहेरगावी जाऊन शिकत असत, त्याऐवजी गावातली सगळी मुलं-मुली किमान चौथीपर्यंत शिकू लागली. त्यांना शिक्षणाची गोडी लागल्यामुळे माध्यमिक शिक्षण घेण्याचं प्रमाणही त्यांच्यात वाढलं. मुख्य म्हणजे मुलीही किमान प्राथमिक शिक्षण घेऊ लागल्या. पूर्वी जेमतेम लिहावाचण्यापुरतं शिकून, किंवा तेवढंही न शिकता मुंबईला जाऊन मिळेल ते काम करणार्‍या माणसांची पुढची प्रत्येक पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त शिकलेली होऊ लागली.
मला आठवतं, नव्वदच्या दशकात सगळीकडे अंगणवाड्या सुरू झाल्या. तेव्हा अंगणवाडीत ’मदतनीस’ म्हणून काम करण्यासाठी सातवी पास असणं ही किमान अट होती. आमच्या गावातल्या ज्या मुली साठ-सत्तरच्या दशकात आजीच्या हाताखाली शिकल्या होत्या आणि नंतरही शेजारच्या गावी जाऊन सातवीपर्यंत शिकल्या, त्यापैकी काही जणींना आता आपापल्या सासरच्या गावांमधे ही ’मदतनिसाची’ नोकरी मिळाली. जो काही तुटपुंजा पगार (याला ’मानधन’ म्हणत.) मिळे, त्यातून मिळणारं, थोडं का असेना, पण एक आर्थिक स्थैर्य त्यांच्या गरिबीच्या संसारासाठी खूप मोलाचं होतं. त्या बायका माहेरी आल्यावर जेव्हा माझ्या आजीला भेटायला येत तेव्हा कृतज्ञतेने म्हणत की तुम्ही तेव्हा आम्हाला शिकवलंत, म्हणून आज आम्हाला नोकरी मिळाली! गृहस्वामिनी शिकलेली असणं आणि कमावती असणं याचा बराच सकारात्मक परिणाम घरावर होतो! तसा तो त्यांच्या घरांवर झाला असणार.
१९७६ पासून शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन शिक्षकांसह सुरू होती. गावाचं पूर्ण सहकार्य कायमच शाळेला आणि शिक्षकांना मिळालं. कधी कसलाच संघर्षाचा प्रसंग उद्भवला नाही. विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण शाळेत देण्याची शासनाची योजना सुरू झाली, तेव्हा पोटभर चविष्ट अन्न मुलांच्या पोटात जाईल, याची गावानेही काळजी घेतली. शिक्षकही चांगले लाभले. २००३ साली जेव्हा शाळेला पन्नास वर्षं पूर्ण झाली, तेव्हा मोठा समारंभ झाला होता. माजी शिक्षकांना आवर्जून आमंत्रणं केली होती. माझ्या आजीचाही तेव्हा सत्कार झाला होता. मात्र, यानंतर वीस वर्षांमध्येच शाळा पूर्ण बंद पडेल असं तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं!
एक मोठा योगायोग म्हणजे शाळेच्या या शेवटच्या दोन विद्यार्थ्यांपैकी एक मुलगा हा शाळेच्या पहिल्या, म्हणजे १९५३ च्या विद्यार्थ्यांपैकी एकाचा नातू आहे!
आमचीच शाळा नव्हे, तर आजूबाजूच्या काही गावांमधल्याही शाळा बंद झाल्या आहेत, काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण मुंबईला स्थलांतर सगळ्याच गावांमधून सुरू आहे. याचा परिणाम म्हणजे मी ज्या माध्यमिक शाळेत शिकले, त्या शाळेची विद्यार्थिसंख्याही घटत जाऊन आता दीडशेवर आली आहे. मी शाळेत असताना ती चारशे होती आणि मधल्या काळात ती यापेक्षा जास्तही होती. आता यापुढे मात्र ती घटतच जाणार हे भविष्य स्पष्ट आहे.
माझी प्राथमिक शाळा काय किंवा माध्यमिक शाळा काय, दर्जाच्या दृष्टीने या दोन्ही शाळा अजिबात कमी नाहीत. शहरांमधल्या इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये हजारो-लाखो रुपये शुल्क देऊन आपण मुलांना घालतो. या शाळांच्या मानाने गावातल्या सरकारी/अनुदानित शाळा साध्या असतात, मराठी माध्यमाच्या असतात, मात्र ’शिक्षण’ देण्यामध्ये त्या कुठे कमी पडत नाहीत, असा माझा तरी अनुभव आहे. पण खेडेगावांमधल्या शाळा बंद पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
(हे लिहीत असताना मला कुणालाही किंवा कशालाही दोष द्यायचा नाही. काळाची गती जशी असते, त्याप्रमाणे घटना घडत असतात. सत्तर वर्षांचं आयुष्य मिळालेल्या माझ्या शाळेच्या इतिहासाची एक नोंद व्हावी, याच प्रेरणेने मी हे लिहिलं आहे.)

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle