अधिकाचं वाण:
अधिक महिना तीन वर्षांनी एकदा येतो त्यामुळे त्याचं धार्मिक महत्त्व सुद्धा अधिक...त्या अधिकात आठवतात आपले आई बाबा...त्याना जमेल तसं कौतुकाने आपल्या जावयाचे लाड करणारे, आता नसले तरीही ज्यांचा आपल्यावर अधिक प्रभाव अशा व्यक्तीच्या अनेक गोष्टी घडत जातात आपल्या हातून आपल्याही नकळत!
माझ्या बाबांचा आईपेक्षा काकणभर अधिक प्रभाव माझ्यावर त्यामुळे मी ही त्यांच्यासारखीच... देवासमोर गेल्यावर हात जोडले जातात पण तेवढंच...कसली तक्रार करायची नसते किंवा मागणीही नसते त्याच्याकडे!
असलेच तर फक्त कृतार्थ भाव त्याच्यामुळे मिळालेल्या सुखासाठी.. माझ्या बाबांची स्वतःची परिस्थिती नव्हती तरीही गावातल्या निराधार बायकांना संजय गांधी निराधार योजनेतून पैसे चालू केले पंचायतीत काम करताना, त्यानी त्यावेळी जेव्हा कदाचित महिन्याच्या शेवटी त्यानाच कोणाकडे पैसे मागावे लागले असतील. आज परिस्थिती असलेली माणसं मिळाली सत्ता की असलेल्या खजिन्यात भर कशी पडेल हेच बघत असतात.
अशा अनेक गोष्टीतून बाबा उलगडत जाताना हे जाणवत गेलं की आपलं एखाद्याशी नाही पटलं मतभेद असले तरीही माणूस म्हणून कर्तव्यात चुकायचं नाही.
आज कोणी सतत माझ्याकडे बोट करत असेल की मी नास्तिक आहे, तर खरं आहे ते...देवाची पूजा नक्की करते मी अगदी मला जमेल तशी मनोभावे. मात्र त्यानंतर हातात पोथी किंवा जपमाळ येईलच असं नाही.
माझी आवड म्हणजे माझी विणकामाची सुई...तिलाच आज लहानपणापासून चालवतेय... तेव्हा माझी गरज म्हणून शिक्षणाचा आधार म्हणून आणि आज त्याच सुईने छोटीशी भेट त्या लहानग्या जीवांना जे निराधार आहेत त्याना मायेची ऊब देण्यासाठी!
अधिकाचं वाण द्यायला आज आई बाबा नसले तरीही त्यांच्या या माणुसकीच्या संस्कारांचं वाण दिलंय की आयुष्यभरासाठी! मी फक्त ते जपतेय...काही नाही तीस तीन टोपरी विणतेय...जशी होतील तशी माझ्या ऑर्डर सांभाळत थंडीच्या आधी एखाद्या आश्रमात देईन... कारण आश्रम हे माझ्यासाठी माझं आजोळ होतं... माझी आई सुद्धा एका आश्रमात वाढलीय...संकल्प तर केलाय अधिक महिन्यात... पूर्णत्वाला नेण्यासाठी बळ तो देईल परमेश्वर!माणसाच्या दृष्टीत मी नास्तिक असेनही पण देवाच्या दरबारी नक्की पोचेल माझं वाण... खात्रीने!
खरंतर मनात होतं आधी दोन वर्षांनी पन्नाशी येतेय तोपर्यंत करू पूर्ण 50 टोपरी आणि तेव्हाच देऊ पण आत्ता एवढी छान पर्वणी आहे अधिकाची तर साधून घेऊ कदाचित पन्नाशी पर्यंत अजून वेगळं काही सुचेल..हो ना?
अधिकाचं अधिक फळ मिळण्यासाठी बघा तुम्हाला पण असं काही सुचतय का ते!
मीनल सरदेशपांडे