मला लोणची विशेष आवडत नाहीत फक्त लिंबाचं गोड लोणचं आणि ही मिरची सोडून. भाजीवाल्याकडे ह्या पोपटी, लांबोडक्या, जाड मिरच्या खूप ताज्या दिसत होत्या म्हणून उत्साहात घेतल्या पण त्याचं काय करतात ते माहीत नव्हतं. (तो भावनगरी म्हणाला पण ह्या मिडीयम तिखट आहेत. काय माहित कुठली जात ते!) रेसिपी शोधल्या तर एक मिरच्यांची भाजी दिसत होती पण आमच्याकडे कुणाचाच तेवढ्या मिरच्या खाण्याचा स्टॅमिना नाही म्हणून शेवटी लोणचंच करायचं ठरवलं. बऱ्याच रेसिपी बघून, मिक्स करून शेवटी अशी मिरची झाली!
साहित्य :
मोठ्या जाड भावनगरी मिरच्या - पाव किलो
मोहरी डाळ - अर्धी वाटी
मेथी दाणे - पंधरा वीस
हिंग - अर्धा टेबलस्पून
मीठ - तीन टेबलस्पून किंवा थोडं जास्त आपल्या आवडीनुसार
बडीशेप - अर्धा टेबलस्पून
फोडणीसाठी:
तेल अर्धा कप
मोहोरी, हिंग, हळद सगळं चिमुटभर
मुरल्यानंतर:
दोन ते तीन लिंबाचा रस
कृती:
१. मिरच्यांचे साधारण एक सेमी जाडीचे तुकडे करून त्यांना मीठ आणि हिंग व्यवस्थित लावून अर्धा तास मुरत ठेवले.
२. दोन चमचे मोहोरी डाळ शिल्लक ठेऊन बाकीची डाळ आणि बडीशेप मिक्सरला लावून पूड तयार केली. (आधी कोरडे परतू शकता, मी करायला विसरले.)
३. मेथीदाणे तेलावर परतून स्टीलच्या खलबत्त्यात ठेचून ओबड धोबड पूड केली. ही पूड मिरच्यांमध्ये मिसळली.
४. तडका पॅनमध्ये अर्धा कप तेल गरम केलं. त्यात मोहरी, थोडी मोहरी डाळ, हिंग आणि हळद घालून फोडणी केली. गॅस बंद करून फोडणी अर्धा तास गार करत ठेवली.
५. मोहरी डाळ पूड आणि गार झालेली फोडणी मिरचीवर ओतून व्यवस्थित ढवळली.
एका पूर्णपणे कोरड्या काचेच्या बरणीत फोडणीची मिरची भरून ठेवली. अर्ध्या किलोच्या बरणीत दाबून दाबून बसली. मी जॅमची बरणी re-use केली, बऱ्याचदा बरणी छान आहे म्हणून मी जॅम घेते. :p बरणी दोन दिवस बाहेर मुरू द्यायची नंतर फ्रिजमध्ये ठेवायची. ह्या सगळ्या कामात कुठेही पाण्याचा स्पर्श होता कामा नये. ओले हात नो नो.
आठ दहा दिवसांनी मिरची व्यवस्थित मुरल्यानंतर खायला काढायची वेळ येईल तेव्हा बरणीत चार ते पाच टेबलस्पून लिंबाचा रस मिसळायचा आहे.
ही मिरची पोळी, पराठा, थालीपीठ, मऊ भात कशाही बरोबर टॉक्क लागते. त्यात थोडं दही कालवलं की मस्त डिप तयार होतं.