नारळाची बर्फी
गणपतीच्या प्रसादा साठी करायला एकदम सोपी , पट्कन होणारी आणि ही चवीला अप्रतिम अशी नारळाची बर्फी ...
साहित्य
डेसिकेटेड कोकोनट पाव किलो ( तीन मेजरिंग कप )
साखर दीड कप
दूध अंदाजे पाव लिटर
साय / क्रीम छोटे दोन तीन चमचे.
सुकामेवा, केशर रंग, चांदीचा वर्ख वैगेरे ऐच्छिक
क्रमवार पाककृती:
एका pan मध्ये दूध उकळत ठेवा. उकळल्यावर दोन तीन मिनिट ढवळत राहून थोड कमी करा. नंतर त्यात साखर घालून ढवळत रहा आणि निम्मं होय पर्यंत आटवा. नंतर त्यात डेसिकोटेड कोकोनट आणि क्रीम घालून पुन्हा ढवळत रहा. तो कीस कोरडा असल्याने दूध पटकन शोषून घेतो आणि मिश्रण पटकन आळतं. Pan पासुन सुटू लागल्यावर थोड मिश्रण हातात घेऊन त्याची गोळी वळत असेल तर गॅस बंद करा. तूप लावलेल्या थाळ्यात जाडसर थापा ( बर्फी आहे वड्या नाहीत ). वरून जो हवा तो सुकामेवा घाला, साधारण गार झाल्यावर वड्या कापा पूर्ण गार झाल्यावर खा. ( त्या आधीच काढून घेऊन खाल्ल्या जातात )
अधिक टिपा:
१) डेसिकेटेड कोकोनट असला तरी कोरडी होत नाही मस्त मॉईस्ट आणि क्रिमी होते. प्लस नारळ खोवण्याचा त्रास वाचतो ते वेगळच.
२) दोन रंगाचं मिश्रण केलं तर डबल डेकर बर्फी बनते आणि मस्त दिसते. नुसती पांढरी ही छानच दिसते. मी आंब्याचा आटवलेला रस घालून केली आहे. आणि बीट रूट चा रस घालून गुलाबी आणि पांढरी अशी लेअर्ड ही केली आहे.
ही आटवलेला आंब्याचा रस घालून केलेली.
आणि ही दुरंगी
३) ह्याची चव खरचं नारळाच्या बर्फी सारखी लागते. वड्यांसारखी लागत नाही.
४ ) कोणी चहाला येणार असेल तर गोड म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे. एक दिवस आधी ही करुन ठेवू शकतो.
बर्फी आणि वडीतला फरक स्पष्ट करायचा प्रयत्न करणारी ही ती फेसबुक लिंक अशी लिंक चालत नसेल तर डिलीट करीन.
https://m.facebook.com/groups/606730686147413/permalink/2777766349043825...