एका वर्षाच्या वर झालं मला डायरी लिहून. आज एका मैत्रिणीने आठवण काढली डायरीची आणि परत लिहायला घेतलं. ज्यांनी माझी डायरी वाचलेली नाहीये त्यांच्यासाठी माहिती. मी जर्मनीत एका सिनिअर केअर नर्सिंगहोममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून गेली साडेतीन वर्षं काम करते आहे आणि तेथील अनुभवांवर डायरी लिहिते आहे.
रोज इतके अनुभव येतात की किती लिहू, काय लिहू, कुठून सुरुवात करू असे झाले आहे. तर मग आजच्या दिवसाबद्दलच लिहावे म्हणते!
आजचा दिवस तसा युनिकच गेला म्हणायला हवं. एका भागात एका आजोबांविषयी लिहिलं होतं की ते बायको आयसोलेटेड विभागात असल्याने तिचा विरह सहन न झाल्याने त्यांनी हाताची नस कापून घेतली होती. त्या गोष्टीला आता एका वर्षापेक्षा जास्त झालंय.
त्यानंतर त्या आज्जी परत आजोबांच्या रूममध्ये परत आल्या आणि नंतर आजारपणात एक दिवस वारल्या. रात्रीची वेळ होती, त्या गेल्या तेंव्हा. ती पूर्ण रात्र पूर्णवेळ आजोबा आज्जींजवळ बसून होते. दुसऱ्या दिवशी दुपारी फ्युनरल सर्व्हिसचे लोक आज्जींना घेऊन गेले, त्या वेळपर्यंत ते आज्जींसोबत बसून होते. त्यांनी आज्जींच्या हातात एक फुलही ठेवलं होतं.
आज्जी आयसोलेटेड होत्या, त्यावेळी विरह सहन न झालेले आजोबा त्या गेल्यानंतर मात्र एकदम स्थितप्रज्ञ दिसत होते. हसून माझ्याशी बोलले. म्हणाले, आज्जींचे स्वेटर्स, जॅकेट्स, पुलोव्हर्स जे हवे ते घेऊन जा. माझ्या तर अंगावरच काटा आला ते ऐकतांना. मी हसून हो, नंतर बघते म्हणले. मग आजोबा सगळी कागदपत्रं नीट वाचून, अनावश्यक ती सगळी फाडून फेकायला लागले. आज्जी शेजारच्या सिंगल बेडवर आणि आजोबा शेजारी हे काम करत होते.
त्यांची मुलं नातवंडंही अजून आलेली नव्हती भेटायला. सकाळी नऊ-दहाची साधारण वेळ होती. त्यानंतर मी त्यांना थोडावेळ कंपनी देऊन परत काही काही वेळाच्या इंटर्व्हलने भेटत राहिले. मधल्या काळात त्यांची मुलं नातवंडं येऊन गेली असतील. मला माहिती नाही, पण आज्जींना न्यायला फ्युनरल सर्व्हिसची व्हॅन आली, तेंव्हा आजोबांसोबत मी होते. त्यांनी आज्जीच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांचा किस घेतला आणि हसतमुखाने त्यांना निरोप दिला.
त्यानंतर आजोबांना सिंगल रूममध्ये शिफ्ट केले. जसे डबल रूममध्ये त्यांचे सामान छान लावलेले होते तसेच सिंगलरूम मध्येही लावलेले होते. आजोबांना छान गार्डन फेसिंगची रुमही मिळाली ह्यावेळी. डबल रूम रोड फेसिंगची होती.
आजोबांकडे छान फर्निचर आहे. जुना पण भारी रेडिओ आहे, त्यावर ते ओल्ड क्लासिक्स लावून झोपतात. दिवसभर मस्त फॉर्मल शर्ट आणि पॅन्टस घालून वावरतात. स्वच्छ, ऑर्गनायझज्ड आणि हसरे असलेले हे आजोबा कोणाच्या अध्यात्माध्यात नसतात. कंपनीकडून घेतल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स वगैरे ऍक्टिवीटीजमध्ये भाग घेत नाहीत. जेवण, थोडे चालणे आणि रूममध्ये येऊन झोपणे. हा त्यांचा दिनक्रम. जास्त गप्पाही मारत नाहीत.
अधूनमधून त्यांना डिप्रेशनचे attacks येतात. मग खिडकीतून घड्याळ फेकले एकदा. स्वतःही उडी मारण्याची इच्छा स्टाफकडे व्यक्त केली, त्यामुळे भर उन्हाळ्यातही त्यांची खिडकी मात्र टिल्टेड स्वरूपातच थोडीशी ओपन होईल पण उडी मारण्याइतकी पूर्ण नाही, अशी लॉक करून ठेवली आहे.
हल्ली त्यांचे नवीन सुरू झाले आहे. पाय फारच दुखतात म्हणून ते कापून टाका अशी विनंती करत आहेत. बटर नाईफ, फ्रूट नाईफ ते जे काही हाताला लागेल त्याने पायाला इजा करत असतात. कितीही लपवा त्यांच्यापासून, ते मिळवतातच. परवा मलाही म्हणाले, काप ना माझे पाय. मी म्हणाले, ओके चला, मी आणते इन्स्ट्रुमेंट्स. तर क्षणभर चमकले आणि मग विनोद समजल्यावर भरपूर हसले. तुमच्याकडे भारतात करता का तुम्ही असं? करवत आणून कापता का माझा पाय? प्लिज कापा ना! मी हो हो म्हणत होते आणि हसत होते, तर माझ्यासोबतच तेही भरपूर हसले, गप्पा मारल्या. कारण बाकी कोणत्याही प्रकारचं काहीही कौंसेलिंग त्यांच्या बाबतीत शक्यच नव्हतं. विनोद केल्याने क्षणभर का होईना, त्यांना हसू तरी आलं.
आज सकाळी कोणास ठाऊक का पण पहिल्यांदा त्यांनाच भेटायची इच्छा झाली. सगळे पडदे बंद करून आणि रूम डार्क करून झोपलेले होते गाणी ऐकत. पायाच्या एका बोटाला प्लॅस्टर लावलेलं होतं. ते बोट एकदम काळं दिसत होतं. तिथेच स्पेशलायझज्ड नर्स होता. मी काय झालं यांना म्हणून विचारण्याच्या आधीच त्यानेच सांगितलं. ह्यांनी कुठून तरी पकड मिळवली आणि बोट जोरात खेचायचा रात्रीतून बराच वेळ प्रयत्न केलेला दिसतोय. आता त्या बोटाच्या नर्व्हस मेलेल्या दिसतायत. ऍम्ब्युलन्स बोलावली आहे. आत्ता येईलच त्यांना घेऊन जायला. त्यांची बॅग, डॉक्युमेंट्स पॅक करून झालेली आहेत.
आजोबा जागेच होते पण डोळे मिटून पडलेले होते.त्यांना काही कोणाशी बोलायची इच्छा नव्हती.
ती पकड त्यांनी आमच्या हाऊस टेक्निशियन्स कडून मिळविली असेल, असं वाटून त्यांना विचारलं. तर ते नाही म्हणाले, याचा अर्थ, त्यांनी विकत आणली असू शकते. वॉकर रोल करत जाऊन लांबून वस्तू विकत आणण्याइतके त्यांचे पाय फिट आहेत.
जरावेळाने इमेल आली की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे पुढील ट्रिटमेंटसाठी. आता बाकी अपडेट्स वेळोवेळी कळतीलच.
सकीना वागदरीकर/ जयचंदर
२१.०९.२०२३
आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com