शिरसी, उत्तर कन्नडा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेलं पर्यटनाचा एक ठिकाण. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आणि मलनाड प्रांतामध्ये मोडणार हे ठिकाण.सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळे निसर्ग सौंदर्य, घनदाट जंगले , भरपूर पाऊस यांचा जणू वरदहस्त या ठिकाणावर. शेती हा प्रामुख्याने या भागातला मुख्य व्यवसाय. ऐतिहासिक वारसाबरोबरच , निसर्गाच्या मिळालेल्या वरदहस्तमुळे पर्यटक आणि ट्रेकर्सचे हे एक आकर्षण केंद्र आहे.
मंगळूर पासून जवळपास अडीचशे किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण. गेल्याच आठवड्यात युथ हॉस्टेल मंगळूर युनिट बरोबर शिरसी पाहण्याचा पुन्हा एकदा योग आला . जवळपास 50 लोकांच्या बरोबर सूर्योदयाच्या आधीच शिरसीकडे रवाना झालो. नेहमीप्रमाणेच कोटा गावातील लता हॉटेलमध्ये नाष्टा केला, श्री अमृतेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासास निघालो. मध्ये मध्ये पावसाची रिमझिम चालूच होती त्यामुळे वातावरण अगदी छान होते. मंगळूर-उडपी- कुंदापूर- मुर्डेश्वर - कुमठा - शिरसी असा राष्ट्रीय महामार्ग १७ वरचा प्रवास त्यामुळे जाताना मरवंते बीच लागतो . या समुद्रकिनाऱ्याचं एक विशेष आकर्षण म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला धीरगंभीर असा अरबी समुद्र आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तितक्याच संथगतीने वाहणारी सौपर्णिका नदी.
गाडी जशी पुढे जात होती झाडे अजूनच मागे जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्गाने जणू हिरव्या रंगाची चादर पसरवली होती . शिरसी भागामध्ये सुपारी वेलदोडा मिरी खाऊची पानं ही मुख्यतः नगदी पिके . शिरसीच्या जवळपास जाऊ लागलो तशी सर्वत्र सुपारीची झाडे दिसायला लागली . सुपारीच्या व्यापारासाठी शिरसी एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते .
जवळपास बाराच्या सुमारास अंकोला तालुक्यातील अचवे गावातील विभूती या वॉटर फॉल्स जवळ पोहोचलो . असं म्हणतात की या वॉटर फॉल्स मध्ये पडणार पाणी हे याना गावच्या चुनखडीच्या खडकांमधून येत आणि त्यामुळे त्याला विभूती म्हणून संबोधलं जातं. मुख्य गेट पासून हा वॉटर फॉल्स जवळपास पंधरा-वीस मिनिट झाल्यानंतर दिसू लागतो . त्यासाठी प्रवेश फी दहा रुपये आहे आणि पाहण्याचा कालावधी याला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत आहे . सप्टेंबर चा महिना असल्यामुळे पाण्याला प्रचंड जोर होता. जवळपास अर्धा तास पाण्यात डुंबल्यावर, पुढील प्रवास लक्षात घेता वॉटर फॉल्स मधून लवकरच बाहेर पडायला लागलं. थोडी फोटोग्राफी केली, मुख्य रोडवर असणाऱ्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये दुपारचे जेवण केलं.
जेवण झाल्यानंतर यानाच्या दिशेने कुच केली. मोठ्या बसेस यांना पर्यंत जात नसल्यामुळे दोन बॅचेस मध्ये टेम्पो मधून याना पर्यंत गेलो. खुल्या पिकअप टेम्पो मधून जंगलातून जाण्याचा अनुभव सुखद होता आणि उभा राहून जात असल्यामुळे बॅलन्सिंग चा प्रश्न होता. झाडावरून लटकणाऱ्या फांद्या डोक्याला अलगद थाप मारून जात होत्या, त्यामुळे फांद्या दिसल्या की डोक्याचा बचाव करावा लागत होता.पाऊस हलकाच पडत होता,आणि त्याचबरोबर येणारी वाऱ्याची झुळूक मनाला सुखावून जात होती आणि मग अशावेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं की स्वर्ग यापेक्षा वेगळा असेल का?
यानाला पोहोचण्यासाठी कुमठा-शिरसी आणि अंकोला- शिरसी असे दोन मार्ग आहेत. याना हे ट्रेकर्स आणि पर्यटक हे दोघांचंही आकर्षण केंद्र आहे. यासाठी प्रवेश ही पाच रुपये आहे आणि सकाळी नऊ ते सहा पर्यंत हे ठिकाण पाहता येत. प्रवेशद्वारापासून जवळपास एक दोन किलोमीटरचा ट्रेक करून मुख्य शिखरांजवळ पोहोचलो. हे दोन्ही शिखर अनुक्रमे भैरवेश्वरा आणि मोहिनी शिखर म्हणून संबोधले जातात ज्यांची उंची ही अनुक्रमे 390 फूट आणि 300 फूट आहे.
भैरवेश्वरा शिखराच्यामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे ज्याच्या वरती वरून आपोआप पाणी पडत असते असं भासतं की जणू निसर्गच या शिवलिंगाची पूजा करत आहे. महाशिवरात्रीच्या वेळी इथे दहा दिवसांचा उत्सव चालतो. हिंदू पुराणानुसार अशी आख्यायिका आहे की असुर राजा भस्मासुर याला संपूर्ण विश्वावर राज्य करायचं होतं त्यासाठी त्याने शिव आराधना केली, त्याच्या तपस्ये वर प्रसन्न होऊन भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले. भगवान शिव नी भस्मासुराला वरदान मागायला सांगितला तेव्हा भस्मासुराने अमर होण्याचे वरदान मागितले. भगवान शिव नी या वरदानस नकार देत त्याला आणखी काही वर मागण्यास सांगितला तेव्हा भस्मासुराने वर मागितला की तो जो कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल ती व्यक्ती भस्म होईल.
हे वरदान मिळाल्यानंतर भस्मासुर हा शिव ना भस्म करण्यास त्याच्या पाठीमागे लागला तेव्हा भगवान विष्णू नी भस्मासुरला मारण्यासाठी मोहिनीचे रूप घेतले. मोहिनीने युक्तीने भस्मासुरास स्वतःच्या डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडले आणि तेव्हा भस्मासुर हा भस्म झाला आणि त्याच्या भस्मापासून ही शिखरे तयार झाली . यानाच्या घनदाट जंगलांमध्ये चुनखडी पासून बनलेली काळा रंगाची बरीच अशी लहान मोठी शिखरे किंवा पाषाण आहेत पण ही दोन शिखरे त्यांच्या महाकाय रूपामुळे बरीच भाव खाऊन जातात. त्या महाकाय शिखरांचे रूप डोळ्यात साठवत आम्ही मग सोदे किंवा सोंडा मठाच्या दिशेने बस वळवली. जवळपास 75 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सोदे वाडीराजा मठात पोहोचलो. संत माधवाचार्य यांनी स्थापन केलेल्या अष्टमठापैकी त्याचबरोबर मुख्यालय असलेलं सोदे मठ. जवळपास मंगळूर पासून 280 किलोमीटरवर असलेले हे ठिकाण.
या मठाची स्थापना संत श्री वाडीराजा यांनी केली आणि वयाच्या 120 वर्षी त्यांनी या मठांमध्ये जिवंत समाधी घेतली . हायग्रीव्ह नावाचे तळे मठाच्या बाहेरच्या बाजूला आहे. या मठाचा परिसर बराच मोठा आहे त्यामुळे त्याचे मुख्यत्व तीन भाग करता येतील. पहिल्या भागामध्ये त्रिविक्रमा मंदिर आहे. त्याचबरोबर भक्तांना राहण्याची सोय ही याच भागामध्ये आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर भक्तांना राहण्यास खोल्या मिळतात. मठाच्या आवारात मठाचे काही विशेष नियम पाळावे लागतात, शक्यतो कपडे हे भारतीय परंपरेनुसार घालावे. मठाच्या दुसऱ्या भागामध्ये मठाचे ऑफिस आहे त्याचबरोबर अंतरगंगा आणि शितल गंगा नावाच्या विहिरी देखील आहेत. मठाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या भागांमध्ये धवलगंगा आणि शितल गंगा नावाचे दोन तळे आहेत. इथे छोटी छोटी बरीच मंदिरे या तळ्याच्या भोवताली आहेत. ब्रम्हा, विष्णू, शिवा, वायू आणि बरोबर मध्ये श्री वाडीराजातीर्थ यांचे वृंदावन आहे. या मठाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे भूतराजा मंदिर. त्याच्याशी संबंधित आख्यायिका अशी की श्री वाडीराजाचा, शिष्य नारायण आचार्य एक हुशार पण वाईट बुद्धीचा होता. एक दिवस वाडीराजानी त्याला ब्रह्म पिशाच्च होण्याचा शाप दिला. मग हे पिशाच्च जंगलातून येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना शाब्दिक कोडी घालून त्रास देत असे. एक दिवस श्री वाडीराजा जेव्हा जंगलातून जात होते तेव्हा त्यांनाही कोडे घातले गेले. श्री वाडीराजानाही या कोड्याचे अचूक उत्तर दिले तेव्हापासून नारायण आचार्य आयुष्यभर त्यांची सेवा करू लागला. या मंदिराच्या प्रथेप्रमाणे जेव्हा भाविक या मंदिरास भेट देतात तेव्हा ते नारळ अर्पण करतात. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि तितकाच भव्य आहे. मंदिरात सायंकाळी विशेष आरती असते . आरती वेगवेगळ्या मंदिरात एका मागून एक होते, त्यानंतर प्रसाद दिला जातो. मठामध्ये दुपारी आणि संध्याकाळी जेवण मिळते. आम्ही संध्याकाळचे जेवण मठातच केले, मग मंदिराच्या परिसरातच थोडी शतपावली केली आणि आम्हाला दिलेल्या खोल्यांमध्ये विश्रांतीसाठी निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पुढच्या प्रवासासाठी निघायचे असल्यामुळे रात्री लवकरच झोपलो. क्रमशः