गोवा म्हटलं की डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी येतात निळसर समुद्रकिनारे, भव्य अशी प्राचीन मंदिरे आणि गिरीजा घर, दूरवर पसरलेले माड, पोफळी , आंबा , काजू, फणस आणि रातांबे. पोर्तुगीज संस्कृतीचा बराचसा ठसा उमटलेलं व हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेचा सरमिसळ असलेलं ,क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटस भारतातलं एक राज्य. आयुष्यात बरीच वर्ष गोवा पाहण्याचा योग नाही आला, पण माझ्या मनात कॉलेजमध्ये वाचलेल्या माधवी देसाई यांच्या प्रार्थना कादंबरीने बऱ्याच गोव्याचे दर्शन घडवलं होतं. कादंबरी वाचून जवळपास दीड एक दशक झाली पण त्यातली बरीच पात्र आजही मनात घर करून आहेत
पुढे बऱ्याच वर्षांनी युथ होस्टेलच्या निमित्ताने गोवा पाहण्याचा योग आला आणि मग हॅट्रिक केल्यासारखं सलग तीन वर्ष गोव्याला जाण्याचा योग आला. पहिल्या वर्षी नुसतच गोवा बघायला आणि मग पुढची दोन वर्ष सायकलिंग आणि ट्रेकिंगला गेले. चौथ्या वर्षी मात्र कोरोना नावाच्या महा संकटान दगा दिला, आणि मग गोवा मान्सून ट्रेक पुढे दोन वर्ष लांबवलं गेलं पण यावर्षी पुनश्च गोव्याला जाण्याचा योग आला . मान्सून ट्रेकच्या बऱ्याच बॅचेस होत्या, जुलै च्या पहिल्याच आठवड्यातील बॅच मिळाली. मंगलोर- मडगाव पॅसेंजर असा ट्रेन प्रवास झाला. जुलै चा पहिलाच आठवडा आणि पावसाचा प्रचंड महाप्रलय चालू होता कर्नाटक सहित गोव्यातही अतिदक्षतेचा इशारा होता . खरंतर मंगलोर मडगाव चा ट्रेन प्रवास म्हणजे निसर्गाचा मनसोक्त उपभोग घेता येणारा प्रवास, त्यात जर पावसाळी दिवस असतील तर मग दुग्ध शर्करा योगच.
पहाटे पाच वाजताची पॅसेंजर स्टेशनवर वाट पाहतच उभी होती . पावसाचा जोर बराच असल्यामुळे , ट्रेनमध्ये चढेपर्यंत बरीचशी मी आणि सामान भिजले होते. पहिलेच स्टेशन असल्यामुळे, अर्थातच ट्रेन वेळेवर सुरू झाली . अति पावसामुळे बराच वेळ ट्रेनचा दरवाजा आणि खिडक्या बंद ठेवाव्या लागल्या. जवळपास 11 नंतर पाऊस थोडा फार उतरू लागला आणि मग डोळ्यांना तृप्त करणारी अशी हिरवळ दिसू लागली. भात शेती, माड आंबा ,काजू अशी बरीचशी झाड दिसू लागली . भाताचे वाफे बघून, हा खेळ सावल्यांचा चित्रपटातील आला आला वारा संगे पावसाच्या धारा या गाण्याची थोडीफार आठवण झाली . पावसामुळे ट्रेन जवळपास दोन तास उशिरा झाली त्यामुळे पणजीला पोहोचायला जवळपास दुपारचे तीन वाजले . पुढे बसचा जवळपास दोन तासाचा प्रवास करून डोंगुर्लीला पोहोचले .
डोंगुर्ली, सत्तरी तालुक्यामधील जवळपास पणजी पासून पन्नास किलोमीटरवर असलेलं एक लहानस गाव. हे गाव म्हणजे आमच्या पुढच्या चार दिवसाच्या ट्रेक साठी असलेले बेस कॅम्प ठिकाण. पंचायत कार्यालयाच्या एका भागामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन वेगवेगळे हॉल देण्यात आले होते . जवळच्या इमारतीत जेवणाची ही व्यवस्था केली होती . ट्रेक च्या प्राथमिक नोंदणी नंतर प्लेट मग बिछाना या वस्तू देण्यात आल्या. खरंतर प्रत्येक ट्रेकिंग साठी ट्रेकरला या वस्तू स्वतःच आणायच्या असतात . आमच्या बॅचमध्ये जवळपास 60 ट्रॅकर्स होते. बहुतांशी ट्रेकर्स मराठी, गुजराती आणि कानडी भाषिक होते त्यामुळे भाषेचा असा अडसर नव्हता.
2013 मध्ये एका बॅचपासून सुरू झालेला हा ट्रेक आता प्रत्येक वर्षी जवळपास सात आठ बॅचेस मध्ये होत असतो कारण ही तसंच रोज फक्त एक पाण्याची बॉटल आणि जेवणाचा डबा घेऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटायचा . पाण्यामध्ये मनसोक्त डुंबायचं. ज्याला पाण्याची आणि पावसाची आवड आहे अशा ट्रेकरनी जरूर करावा असा एक ट्रेक.
संध्याकाळी जेवणानंतर ट्रेकचा चार दिवसांचा दिनक्रम सांगितला गेला. लोकल गाईड आणि कॅम्प लीडरची ओळख झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सहा वाजता चहा आणि साडेसात वाजता न्याहारी मिळाली . पाठोपाठ सोबत न्यायचा जेवण ही पॅक केलं. या चार-पाच दिवसांमध्ये गोव्याचे बरेच पारंपारिक खाद्यपदार्थ चाखता आले. पाव हा इथल्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रोज सकाळी संध्याकाळी , पाववाले, दारोदारी पाव विकत असतात. आम्हाला ही पाव, मनगणे - गोवन पद्धतीची खीर, उड्डा मेथी - कच्चा आंब्याच्या भाजीचा प्रकार चाखायची संधी मिळाली . प्रत्येक खाद्यपदार्थांमध्ये नारळाचा वापर बऱ्याच प्रमाणात केला गेला होता.
पहिल्या दिवशीचा ट्रेक हिवरेम बुद्रुकला होता. या ट्रेकसाठी चढाई बऱ्याच प्रमाणात होती . जवळपास दहा एक किलोमीटरचा ट्रेक होता . त्यादिवशी आमच्या ग्रुप लीडर बरोबर एक स्थानिक गाईड ही आले होते. ते मराठी भाषिक असल्यामुळे भाषेचा प्रश्न नव्हता. प्रश्नांची सरबत्ती करत बराच संवाद साधला, बरीच स्थानिक माहिती मिळावी . इथे आम्ही जरीच्या धबधब्याला भेट दिली. तिथे दोन मोठे मोठे धबधबे होते . धबधब्याखाली भिजायला आणि पाठीला पाण्याचा मसाज करायला बरीच मजा आली. ट्रेक करून जवळपास चारच्या सुमारास कॅम्पला परतलो. गरमागरम वडापाव आणि चहा जणू काही आमची वाटच बघत होता. पावसात भिजल्यावर असा गरम वडापाव आणि चहा मिळणं त्याला मी खरच भाग्य समजते. विशेष म्हणजे गोवा युथ हॉस्टेल ट्रेक युनिटचे स्वयंसेवक आग्रह करून जेवण वाढत होते, त्यामुळे ट्रेकिंग करून जेवढ्या कॅलरीज खर्च केल्या जात होत्या तेवढ्याच कॅलरीज परत शरीरात जात होत्या.
पहिल्या दिवशीच्या ट्रेक नंतर बरेच ट्रेकर्स ओळखीचे झाले, त्यामुळे आता स्मितहास्याची जागा शब्दांनी घेतली . ट्रेकर्स जरी वेगवेगळ्या वयोगटातले असले तरी काहीच फरक पडत नव्हता कारण एका गोष्टीमुळे आम्ही एकत्र आलो होतो ते म्हणजे निसर्गाबद्दल असलेली ओढ. रात्रीच्या जेवणानंतर दिवसभराचा आढावा आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम हा दिनक्रमाचा भाग होता . काही जणांनी कॅरीओके वर गाणी म्हटली. आमच्या ग्रुपमध्ये एक बासरी वादक होते त्यामुळे बासरीवर काही गाणी ऐकण्यास मिळाली, काही जणांनी गाण्यावर नृत्यही केले. पत्ते आणि कॅरम चे डाव ही बऱ्याच वेळेपर्यंत रंगले.
दुसऱ्या दिवशी आम्ही न्याहारीनंतर पाली धबधब्याला गेलो . हा धबधबा शिवलिंग धबधबा म्हणूनही ओळखला जातो. इथे शिवलिंग आकाराचा एक मोठा खडक आहे यावरती धबधब्यावरून पाणी पडत असते . या धबधब्याला जाताना आम्हाला दोन मोठे ओढे पार करावे लागले, पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे आम्ही मानव साखळी तयार करून हे ओढे पार केले . आमच्याबरोबर कौस्तुभ हा युथ हॉस्टेलचा स्वयंसेवक व आप्पा हा स्थानिक गाईड बरोबर होता. अधून मधून पावसाचा जोर ही वाढत होता. रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रानटी करवंदे चाखता आली आणि ती चाखताना मला लाल मुंग्यांचा प्रसाद ही मिळाला . पाली धबधब्याला आम्ही रविवारी भेट दिल्यामुळे त्यादिवशी बरेच पर्यटक ही रस्त्यामध्ये भेटले. बऱ्याच धबधब्यावरती पर्यटक प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा कचरा टाकून गेले होते .आमच्या ग्रुपची पर्यावरण लीडर अदिती होती. या चार दिवसांमध्ये तिने इतर ट्रेकर्सच्या सहाय्याने, पर्यटकांनी केलेला कचरा उचलून तो योग्य व्यक्तींना विल्हेवाट करण्यासाठी सुपूर्त केला. या चारही दिवसांमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या टाकळ रानभाजीचे बरेच दर्शन झाले. पाली धबधब्यावरून परत येताना एका घरामध्ये गणपतीच्या मूर्ती घडवण्याचे काम निदर्शनास आले, इथेही मूर्तिकाराबरोबर थोड्याफार गप्पा टप्पा केल्या . जवळपास चारच्या सुमारास बारा किलोमीटरचा ट्रेक करून परत बेस कॅम्प वर पोहोचलो.
तिसऱ्या दिवशी शेरपे आणि नाणेली गावामध्ये आणखी चार धबधब्यांना भेटी दिल्या. हे चारही धबधबे सुळसुळे म्हणून प्रसिद्ध आहेत कारण इथले खडक भरपूर निसरडे आहेत आणि इथे घसरून पडण्याचे भरपूर प्रसंग घडतात , त्यामुळे आदल्या दिवशी विशेष सूचना देण्यात आल्या होत्या पण तरीही दगड खूपच निसरडे असल्यामुळे थोड्या लोकांना घसरून पडण्याचा अनुभव आला. या दिवशी जवळपास 16 किलोमीटरचा ट्रेक होता आणि आमच्यासारख्या थोडासा रस्ता चुकलेला लोकांनी तो 18 किलोमीटर मध्ये पूर्ण केला.कॅम्पवर परतलो तेव्हा भेळ वाट बघत होती, मग भेळ आणि गरमागरम कॉफी यावर मस्त ताव मारला.
शेवटच्या आणि चौथा दिवशी शिरवणे गावांमधील धबधब्यांना भेट दिली. त्या चार एक दिवसांमध्ये जवळपास दहापेक्षा जास्त धबधब्यांना भेटी दिल्या पण प्रत्येक धबधबा आणि तिथे जाणारी वाट ही अद्वितीय होती. प्रत्येक दिवशी एक वेगळा असा अनुभव होता . या प्रत्येक धबधब्यांनी मनमोहक आणि तितक्याच चित्त थरारक पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा आणि हिरव्या गर्द अशा जंगलांचा अद्वितीय असा संगम घडून आणला होता. या प्रत्येक धबधब्यावर खूपच मजा आली . चार दिवस बघता बघता निघून गेले आणि मग परतीच्या प्रवासाची ओढ लागली त्याचबरोबर मग या चार दिवसात काढलेल्या फोटोंची देवाणघेवाण सुरू झाली. या चार दिवसात बरेच नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले अगदी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे हे नवीन मित्र मैत्रीण तुमच्या वयाचे असायला पाहिजेत असं काही नाही . खास करून ट्रेकर्स हे वेगवेगळ्या व्यवसाय किंवा नोकरदार वर्गाचे असल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभवाची शिदोरी आपल्या ज्ञानात भर टाकून जाते. सगळेजण परतीच्या प्रवासाला लागले, आणि काही माझ्यासारखे कुठेतरी मनात पुढच्या प्रवासाचे दिवा स्वप्न बघत, पुढच्या सुट्ट्यांचे गणित मांडू लागले.
******
Keywords:
ImageUpload:






