गौरीपुजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात, (२५ लोकांसाठी) दोन भाज्या करायच्या होत्या. त्यासाठी कांदा-लसूण नसलेल्या कोणत्या भाज्या करता येतील हे शोधत होते. एक भाजी ठरली होती ती वैदर्भीय पद्धतीची लाल भोपळ्याची बाकरभाजी. त्यात खोबरं-खसखस वाटण असतं, त्यामुळे दुसरी भाजी थोडी वेगळी हवी होती. नेटवर शोधताना ही रेसिपी दिसली. तेव्हाच मलाही पहिल्यांदाच ही भाजी कळली. मला ही एक रेसिपी पहिली सापडली होती, मग याच नावाने सर्च करून इतरही ब्लॉग वर दिसली. पण मी मंजुळाची प्राथमिक रेसिपी घेऊन त्यात काही बदल केले, त्याची ही पाककृती. ही माइल्ड चवीची भाजी आहे, तिखट झणझणीत अशी नाही.
साहित्यः
हे प्रमाण साधारण २-३ लोकांसाठीचे आहे.
मखाणे - २ वाट्या
मखाणे भाजण्यासाठी १ चमचा तेल
मटार - १ वाटी (मी फ्रोझन मटार वापरलेत)
बटर - २ मोठे चमचे
टोमॅटो - २ मोठे (लहान असतील तर ३-४ लागतील)
टोमॅटो पेस्ट - २ मोठे चमचे (ही नसेल तर पुढे कृती लिहीताना पर्याय दिला आहे)
आलं - १ लहान तुकडा (पेरभर)
काजू - पाऊण वाटी
जिरे - १ लहान चमचा
हिरवी मिरची - २ (ही फक्त स्वादासाठी, त्यामुळे मी फक्त एक उभी चिर देऊन वापरली)
हळद - १/२ लहान चमचा
धणेपूड - १ लहान चमचा
कश्मिरी लाल तिखट - २ लहान चमचे
गरम मसाला - २ लहान चमचे
मीठ - चवीनुसार
साखर - १ चमचा
पाणी - गरजेनुसार (अंदाजे २-३ वाट्या)
कृती -
एका भांड्यात अगदी चमचाभर तेल घेऊन मिडियम गॅस वर मखाणे परतून घ्यायचे, ५ ते ७ मिनीटात ते क्रिस्पी झाले की गॅस बंद करायचा. ही एक पूर्वतयारी. मखाणे ओव्हन मध्येही भाजता येतात. ओव्हनच्या ट्रे मध्ये मखाणे पसरवून त्याला तेलाचा एक हात लावून घ्यायचा आणि प्री हीटेड ओव्हन मध्ये ५ ते ७ मिनीट ठेवायचे. मखाणे गार झाले की डब्यात भरून ठेवू शकता, ही स्टेप एक दिवस आधीही करून ठेवू शकतो.
आता ग्रेव्ही - मूळ रेसिपीत फक्त टोमॅटो आहेत, मी टोमॅटो आणि रेडीमेड टोमॅटो पेस्ट दोन्ही वापरले, पेस्ट मुख्य रंगासाठी. त्याऐवजी रेडीमेड प्युरी पण वापरता येईल आणि रंग कसा हवा त्यानुसार कश्मिरी लाल तिखट थोडे वाढवावे लागेल.
२ फ्रेश टोमॅटो, आल्याचा तुकडा आणि काजू हे मिक्सर मधून काढून घ्यायचे. कच्चेच.
आता बटर गरम करून त्यात जिरे घालायचे, ते तडतडले की हिरवी मिरची आणि मग ही मिक्सरवर केलेली पेस्ट आणि टोमॅटो पेस्ट घालायची आणि हे व्यवस्थीत परतायचे. मग त्यात हळद, धणे पूड, तिखट आणि गरम मसाला घालायचा. थोडीशी साखर घालायची कारण टोमॅटो आहेत. मीठ पण घाला. पेस्टचा कच्चेपणा गेला की त्यात पाणी घालून मटार घालायचे (मटार घालण्यापूर्वी मी हिरवी मिरची बाहेर काढून घेतली होती, कारण मलाच ती मिरची नंतर वाटीत घेताना नको असते म्हणून) आणि झाकण ठेवून उकळी आली की बंद करायचे. मी फ्रोझन मटार वापरले आहेत, इथे प्रत्येक ब्रँड प्रमाणे थोडा शिजण्याचा वेळ बदलतो असं लक्षात आलं आहे, त्याप्रमाणे हा अंदाज घ्यावा लागेल. ताजे मटार असतील तर त्याप्रमाणे शिजण्याचा वेळ बदलू शकेल.
सर्व्ह करण्यापूर्वी त्यात मखाणे घाला, मिक्स करून घ्या, वरून कोथिंबीरीने सजवा आणि सर्व्ह करा.