थंडीची वाट बघत आणि तरी जास्तीचे मिळालेले उन्हाचे दिवस एन्जॉय करत असतानाच, काल तापमान सर्र्कन खाली आलं. तोवर बाहेर पानगळीचे चित्र दिसले, तरी घरात Autumn फील येत नव्हता. लाल भोपळा आणि त्याचे अनेक प्रकार स्वयंपाकघरात दाखल होऊन महिना झाला, पण केक झाला नव्हता. आजच्या थंडीने मात्र अगदी तो दालचिनीचा वास आठवून लगेच केक केला. एक पाककृती बघून त्यात बदल करायचे ठरवले, बेकिंग मध्ये हे जरा धाडसच होतं, पण केक चांगला जमल्यामुळे एकदम आनंदी आनंद झाला.
तर साहित्य -
- Pumpkin Puree - ३०० gm (मी होक्काइदो Hokkaido नावाचा प्रकार वापरला. Puree करण्यासाठी ओव्हन किंवा कुकर कोणतीही पद्धत वापरता येईल. मी यावेळी चिरून कुकर मधून शिजवून त्याची प्युरे करून ठेवली होती, तीच वापरली. )
- बदाम पूड - २०० ग्रॅम
- Whole Wheat Flour / Spelt flour - २०० ग्रॅम (Spelt flour / Dinkel Wheat Flour इथे सहज उपलब्ध असतो आणि घरात होता म्हणून तो वापरला, कन्सिस्टन्सी होल व्हीट सारखीच असते त्यामुळे होल व्हीट / कणिक सुद्धा चालेल. मी बऱ्याच वेळा बेकिंग मध्ये आलटून पालटून हे दोन प्रकार वापरते. मैदा वापरायचा असेल तर प्रमाण बदलेल थोडं, पण ते नक्की सांगू शकत नाही)
- बेकिंग पावडर - ३ टी स्पून्स
- अंडी - ५ (लहान होती म्हणून मी ५ घेतली, मोठी असतील तर ४ चालतील)
- तेल - १८० ग्रॅम / १ मेजरींग कप
- साखर - २२० ग्रॅम / १ मेजरींग कप
- जिंजरब्रेड स्पाईस - ३ टेबल स्पून (याऐवजी पंपकीन स्पाईस मिळत असेल तर तोही चालेल, पण जिंजरब्रेड स्पाईस मध्ये इतरही काही मसाले असतात. दालचिनी पूडही चालेल)
याचं साहित्य - मी जो रेडीमेड मसाला वापरला त्यात दालचिनी, धणे, बडीशोप, जायफळ, जायपत्री, सुंठ, वेलदोडा, चक्रफूल, लवंग आणि संत्र्याची साल या सगळ्यांची पूड हे घटक आहेत. नेट वर रेसिपी शोधल्या तर यातले वेगवेगळे कॉम्बिनेशन दिसतात पण या वर दिलेल्या साहित्यातले बहुतांशी मसाले आपल्या भारतीय स्वयंपाकघरात असतात, त्यातले सहज उपलब्ध असणारे असे मुख्य जायफळ, दालचिनी, वेलदोडा आणि सुंठ हे हवेतच आणि बाकी असतील ते घेता येतील. पम्प्किन पाय स्पाइस म्हणून जो मसाला असतो त्यात दालचिनीचा मुख्य स्वाद असतो आणि इतर मसाले त्याच्यापेक्षा अगदी कमी प्रमाणात असतात. हा जनरल फरक.
या साहित्यात दोन लोफ केक होऊ शकतील. मी एक लोफ केक आणि उरलेल्या बॅटरचे मफिन्स केले. त्यात १० मफिन्स झाले.
कृती:
ओव्हन १८० डिग्रीसेंटीग्रेडला प्रीहीट करायला ठेवा. अंडी फेटून घ्या. त्यात साखर मिसळून फेटून घ्या. आता तेल घालून मिक्स करा. आता पंपकीन प्युरी घालून मिक्स करा. बदाम पूड, कणिक, बेकिंग पावडर आणि स्पाईसेस एकत्र करून चालून घ्या. हे कोरडे घटक आता थोडे थोडे करून फेटलेल्या मिश्रणात घाला आणि मिक्स करून घ्या. केकच्या भांड्यात / मफिन फॉर्म मध्ये साधारण ४५-५० मिनिट बेक करा. (मफिन्स साठी ३० मिनीटे पुरेशी आहेत)