भाजणीच्या चकल्या - काही टिपा

मी चकली एक्सपर्ट नाही. वर्षातून एकदाच - दिवाळीच्या वेळी भाजणी विकत आणून चकल्या करते. गेली सलग ४-५ वर्ष माझ्या चकल्या चांगल्या झाल्या म्हणून टिपा लिहिण्याचं धाडस करते आहे. त्यात बाकीच्या अनुभवी सुगरण मैत्रिणींनी भर घालावी.

१. १ मेजरिंग कप भाजणी - चमच्याने दाबून भरून शीग लावून घेतली असेल तर १ मेजरिंग कप पाणी, १ टीस्पून तेल असं आमचं माप ठरलेलं आहे.
मोहनाचं तेल जास्त झालं तर चकल्या हसतील, तळताना तुटतील विरघळतील. तेल कमी झालं तर दाततोड्या चकल्या होतील.

२. मापाप्रमाणे पाणी उकळायला ठेवल्यावर त्यात मापाप्रमाणे तेल आणि चवीप्रमाणे तिखट, मीठ, पांढरे तीळ, ओवा, हिंग आणि हळद (हो, मी घालते, तळताना जळत नाही, चकल्यांचा रंग अजिबात बिघडत नाही.) घालायचं. पाणी खळखळून उकळलं की गॅस बंद करून त्यात भाजणी घालायची, नीट ढवळून झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं.

३. साधारण अर्ध्या पाऊण तासाने भाजणी पाण्याचा हात लावून मस्तपैकी मळून गुळगुळीत करायची. मळायच्या आधी सगळं एकत्र करून जरा चव बघून मीठ तिखट हवं असल्यास वाढवायचं.

४. तळणीची सगळी तयारी - झारा कढई तेल टिश्यू पेपर दोन रिकाम्या प्लेट - करून घ्यायची.

५. तेल तापत ठेवायचं. गॅस खूप बारीक नको, खूप मोठाही नको. मध्यम पेक्षा कमी आणि सिमपेक्षा थोडा मोठा असा ठेवायचा.

६. मग चकल्या पाडायला घ्यायच्या. त्याआधी तुम्ही चकलीचा सोऱ्या शोधून स्वच्छ धुवून कोरडा करून ठेवलेला असेलच.
चांगल्या मळलेल्या भाजणीचे छोटे भाग करून एका भागाचा लंबगोल करून घ्यायचा. सोऱ्याला आतून तेलाचं बोट फिरवून त्यात तो लंबगोल बसवायचा आणि चकल्या पाडायला घ्यायच्या.
मी ताटातच पाडते, त्यातून उचलायला सोपं पडतं. तुम्ही बटर पेपर किंवा इतर कम्फर्टेबल वस्तू वापरू शकता पण कृपा करून वर्तमानपत्र किंवा गुळगुळीत मासिकाचे किंवा कॅलेंडरचे कागद वापरू नका. तळलेल्या चकल्या काढायलाही ह्यातील कशाचाही वापर करू नका, छपाईची सहज ट्रान्सफरेबल असते आणि पोटात गेल्यास धोकादायक असते.
चकली पाडताना आधी छोटा गोल हाताने नीट वळवून नीट बसवून घ्या, मग बाकीचे वळसे पाडून शेवटचं टोक तोडून चकलीला चिकटवून घ्या. मधला गोल खूप मोठा झाला किंवा नीट बसला नाही, शेवटचं टोक चिकटवलं नाही तर तळताना चकली सुटेल.

७. तेल तापायला लागतं तेव्हा निरखून पाहिल्यास त्यात सूक्ष्म लाटा दिसतात. तश्या लाटा यायला लागल्या की चकल्या एकेक करून तळायला सोडायच्या. चकली कढईच्या कडेने सोडायची, ती लगेच तरंगून वर येते. कढईत चकल्यांची गर्दी होऊ देऊ नका, नाहीतर त्या तुटतात, शिवाय तेलाचं तापमान कमी होतं, ज्याचा चकलीवर परीणाम होतो.

८. चकली कढईत सोडल्या सोडल्या लगेच परतू नका, एखाद मिनिटभराने परता. चकलीतून येणारे बुडबुडे पूर्ण थांबेपर्यंत चकली तळायची आहे. तरच चकली चांगली कुरकरीत होईल. हा चकली तळणाचा usp आहे. भाजणीतल्या पाण्याची वाफ येते म्हणून तेलात बुडबुडे येतात, त्यामुळे ते पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत चकली तळणे आवश्यक आहे. पाण्याचा राहिलेला एक थेंबही चकली मऊ करतो, आणि एक मऊ चकली इतर सगळ्या चकल्या मऊ करू शकते, म्हणून चकलीचं तळण काळजीपूर्वक करायचं असतं.

९. ह्या पूर्ण तळणात गॅसचं तापमान एकसंध ठेवणं महत्त्वाचं आहे. तरच सगळ्या चकल्यांचा रंग एकसारखा येतो. चकल्या तळताना वापरलं गेलेलं तापमान चकल्या तळणीतून निथळून काढेपर्यंत रिस्टोअर होत असतं. त्यामुळे एकदा तेल नीट तापवून घेतल्यावर गॅसला हात न लावलेला बरा.

१०. तळणीतून चकल्या काढल्यावर एका प्लेटमध्ये किचन टिश्यूवर काढून घ्या. तो घाणा गार झाल्यावर दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवा. त्यानंतर डब्यात ठेवा, पण डब्याचं झाकण लावू नका, तिरकं ठेवा. डब्यात एखादा टिश्यू टाकून ठेवा. खोलीचं वाढलेलं तापमान नॉर्मल झाल्यावर मग डब्याचं झाकण लावायला हरकत नाही.

११. भाजणी विकत आणल्यावर त्यातल्या थोड्या भाजणीच्या (उदा. पाव कप मापाच्या) चकल्या करून बघाव्यात, म्हणजे एकदम अर्धा पाऊण किलो भाजणीच्या चकल्या करताना तारांबळ उडत नाही.

१२. चकलीची भाजणी कशी आहे, किती जाड किती बारीक किती खमंग भाजलेली आहे, किती जुनी आहे त्यावर चकल्यांची क्वालिटी अवलंबून असते. त्यामुळे आधी ट्रायल आवश्यक आहे. एकाच ब्रँडची भाजणी कायम वापरत असाल आणि ती हुकमी जमत असेल तर ट्रायलची आवश्यकता नाही.

आत्ता दिवाळीत केलेल्या चकल्यांच्या भाजणीचं पाकिट मी एप्रिल'२३ ला घेतलेलं होतं. आज करू, उद्या करू, जाऊदे थालिपीठच करू, मोकळ भाजणी करू, नकोच मरू दे पीठ पेरून भाजी करू म्हणता म्हणता शेवटी त्याच्या चकल्याच घडल्या न बिघडता. पण मनात धाकधुक होतीच करताना.

अर्धा किलो तयार भाजणीच्या जवळपास ६५ चकल्या झाल्या माझ्या, आणि जवळपास दोन तास तळत होते. शेवटचा घाणा झाल्यावर जास्तीचं तेल काढून घेऊन त्या कढईत मिसळ केली. जास्तीचं काढलेलं तेल बाई घेऊन गेली.
आता चकल्यांचा घाट बहुतेक तरी पुढच्याच दिवाळीला.

img_20231113_074952.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle