उंधियो

उंधियो म्हणजे एकदम आवडता प्रकार. मला अश्या मिक्स भाज्या आवडतात. ऋषीची भाजी, पोपटी, भोगीची लेकुरवाळी भाजी तसाच उंधियो पण आवडीचा. ज्युनिअरशिप मध्ये एक गुजराती सिनियर मॅडम कडून रेसिपी डिटेल वार लिहून घेऊन केलेला पहिल्यांदा आणि नंतर दरवर्षी घडतच जातोय तेव्हापासून. कितीही कमी कमी भाज्या आणून केला तरी वेगवेगळ्या बऱ्याच भाज्या असल्याने जास्तच होतो. सगळ्यांना बोलावून नाहीतर डब्बे पोचवून मग खाल्ला की खरी चव लागते उंधियोला. दुसऱ्या दिवशी जास्त टेस्टी लागतो कारण भाज्यांमध्ये मसाले मस्त मुरतात.
साहित्य - सुरती पापडी - हिरो ऑफ द डिश, पापडी, दोन तीन प्रकारचे घेवडे, ओल्या तुरीच्या शेंगा,कच्ची केळी, रताळी, कोनफळ, लहान जांभळी वांगी, लहान बटाटे, लसूण पात, मेथी, कोथिंबीर, लिंबू, हिरव्या मिरच्या, गोडा मसाला, धना जिरा पावडर, तिखट, मीठ, साखर,नारळ,हिंग, तेल.
मी करताना सगळ्या भाज्या पाव पाव किलो घेतल्या तर लागणाऱ्या मिरच्यांच प्रमाण देतेय.
दोन दिवस आधीपासून तयारी सुरू केली की सहज होतो उंधियो.
पहिले सुरवात मेथी मुठीयाने करायची. मेथी निवडून, धुवून बारीक चिरून कणिक,बेसन, ज्वारी आणि बाजरीचे पीठ, लिंबूरस,तिखट,मीठ, किंचित साखर आणि धणा जीरा पावडर घालून मळून लांबट मुठीये मंद तेलावर कुरकुरीत तळून घ्यायचे. चांगले चार दिवस टिकतात हे मुठीये पण दोन दिवस उंधीयो होईपर्यंत लपवून ठेवत ठेवता नाकी नऊ येतात माझ्या.
मग उंधिओ करायच्या आदल्या संध्याकाळी सुरती पापडी, पापडी, 2-3 प्रकारचे घेवडे निवडून घ्यायचे.तुरीच्या ओल्या शेंगा सोलून दाणे काढून ठेवायचे.लसूण पात निवडून ठेवायची. ओला नारळ खवून ठेवायचा.
ऊंधियो करणार त्या दिवशी कोनफळ, रताळे, कच्ची केळी ह्याच्या जरा मोठ्या मोठ्या चौकोनी फोडी करून घ्यायच्या.
छोटी जांभळी वांगी, छोटे बटाटे धुवून भरल्या वांग्याच्या भाजीला करतो तश्या प्लस साइन चिरा द्यायच्या.
सगळे कंद, वांगे- बटाटे पाण्यात घालून ठेवायचे.
लसूण पात, त्याच्या डबल कोथिंबीर, दहा- बारा हि मि, मीठ, मोठी वाटीभर खवलेला नारळ, आणि एका लिंबाच्या रसाची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची, गरज पडली तरच थोडस पाणी घ्यायचं.
जाड बुडाच्या भांड्यात/कुकरमध्ये जरा जास्त तेल घेऊन तेल तापलं की त्यावर चमचाभर हिंग घालून सुरती पापडी आणि घेवडा( सगळ्या शेंगभाज्या) पाच मिनीट परतून मग केळी सोडून सगळ्या भाज्या घालून सात-आठ मिनिटं परतून घ्यायचं. पापडी नीट परतून घेणे इज मस्ट स्टेप.
आता भाज्या परतून होईतो लसूण पातीच वाटण, धनाजीरा पावडर, गोडा मसाला भाज्यांवर घालून छान भरपूर परतून तेल सुटायला लागलं की मीठ घालून थोडा पाण्याचा हबका मारून झाकण घालायचं. झाकणावर पाणी ठेवून बारीक गॅसवर उंधियो शिजू द्यायचा. अधून मधून हलवत रहायाचा, खालून लागतोय अस वाटलं तर झाकणावरच पाणी घालायचं आणि परत पाणी ठेवायचं झाकणावर.
भाज्या शिजल्या की वरती मेथी मुठीये रचून परत दणदणीत वाफ काढायची. ह्याच्या आधी उंधियो जरा रसदार दिसायला हवाय कारण मुठीये सगळं पाणी शोषून घेतात.
मुठीये ठेवल्यानंतर 10-15 मिनिटांनी उंधियो हलक्या हाताने खालीवर हलवून घ्यायचा आणि परत बारीक गॅसवर झाकण घालून ठेवायचा.
तिखट, आंबट, थोडासा गोडसर अशी चव हवीय उन्धियोची त्याहीशोबाने भाज्या शिजत आल्यावर चव घेऊन गरजेप्रमाणे तिखट, मीठ, लिंबूरस वाढवायचा.
काही जण भाज्यांमध्ये मसाला- लसूण पातीची पेस्ट भरतात
पण मी शॉर्टकट मास्टर म्हणून ती स्टेप टाळते.
मागच्या सिझनचा फोटो शोधून डकवते नंतर. ह्यावेळेस करताना भाज्यांचा, तयारीचा असे सगळे फोटो पण नंतर डकवेन.
आता इतरांचे व्हेरीएशन पण येऊ द्यात.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle