आफ्रिकन सफारी - धावते समालोचन
आज आमचा टांझानियातल्या ५ दिवसाच्या सफारीचा पहिला दिवस पार पडला, त्याचाच हे धावता अहवाल, रोज दिवसअखेरीस इथे त्या त्या दिवसाबददल लिहायचा विचार आहे. बघू कसं जमतंय
तर आठ दिवसाच्या किलीमांजारो ट्रेक नंतर एक दिवस विश्रांती घेऊन आज सकाळी तारांगिरे नावाच्या पार्क कडे सकाळी ८ वाजता निघालो.
निघताना भुरू भूरू पाऊस सुरूच होता त्यामुळं प्राणी दिसतील का अशी चौकशी आमच्या ड्रायवर कम गाईड कडे केली तर त्याने अगदीच संदिग्ध उत्तर दिलं. तसंही आठ दिवसाच्या खडतर ट्रेक नंतर अजून कुठे चालायला लागणार नाही नुसतं गाडीतच बसायचं आहे या विचारानेच आम्ही खूष होतो, आज काही प्राणी दिसले तर तो आमच्यासाठी बोनस असणार होता. एकस्पेकटेशन कमी असेल तर फारसा अपेक्षा भंग होत नाही. तसंही आम्ही पुढे सेरेंगेटी पार्कला जाणार आहोत तिथेच जास्त प्राणी बघायला मिळतात असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.
साधारण १० च्या सुमारास पार्कला पोचलो आणि एक छोटा ब्रेक घेऊन लगेच ड्रायव्हरने गेटच्या आत गाडी घातली. अगदी लगेचच समोर इंपला आणि वॉटर बकचा मोठा कळप दिसला आणि थोडे वॉर्थहॉग सुद्धा. फटाफट फोन आणि कॅमेरा दोन्हीत वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढून घेतले. बाकी ही बऱ्याच गाड्या आजूबाजूला होत्या, इंपाला एकाबाजूला मेलस् आणि दुसऱ्या बाजूला फिमेलस् असा कळप करून उभे होते. त्यांची काहीतरी स्ट्राटेजी असावी वॉटर बक मात्र एकाच ठिकाणी होते आणि बरेच निवांत वाटत होते. बाकीच्या गाड्या निघाल्या आणि आम्हीही पुढे सरकलो, चला बोहोनी तरी झाली.
आता अजून काही नाही दिसलं तरी चालेल असं म्हणे पर्यंत ड्रायव्हरच्या रेडीओवर फास्ट स्पिडमध्ये बोलणं ऐकू यायला लागलं, त्यानं आमाची गाडी परत फिरवून आलो त्या वाटेला पुन्हा जायला लागलो, त्याचं रेडीओवर बोलणं चालूच होतं म्हणून आम्ही काही विचारलं नाही पण सिंबा हा शब्द कानावर पडला आणि आम्ही उडालोच. कुणालातरी सिंह दिसला होता. बेनोने आम्हाला काही सांगायच्या आधी आम्हीच त्याला म्हटलं, लायन दिसला का कोणाला? तो हसत म्हणाला तुमच्या माउंटन गाईडनी तुम्हाला बरेच शब्द शिकवलेले दिसतायत, तर म्हणे हो लायन दिसला आहे पण इथे या पार्कमध्ये लायन दिसणं रेअर आहे, त्यामुळं खरं की काय ते माहीत नाही, पुन्हा एकदा लो एकस्पेक्टेशन. आमची पाच दिवसाची सफारी आहे त्यामुळं वाट वाकडी करून दुसरीकडे गेलो तरी आम्हाला काही फरक पडणार नव्हता. बघू तर काय आहे म्हणून बेनो जिथे सिंह दिसला तिकडे निघाला, तिथे आधीच दोन गाड्या पोचल्या होत्या आणि मोक्याची जागा पकडून उभ्या होत्या, तिथे फक्त सिंहच नव्हता तर सिंह आणि सिंहीण दोघेही होते. आम्हाला एक झलक देऊन ते तिथेच झुडुपात लपून बसले. बेनोने आमची गाडी थोडी पुढे नेली, इथून आम्हाला काहीही दिसत नव्हतं.
आपण थोडे थांबलो तर ते आपल्या बाजूला सरकतील असं तो म्हणाला, तशी कसली घाई नसल्यानं आम्ही पण थांबू म्हणालो, बघता बघता १५ गाड्या आजूबाजूला जमा झाल्या, राजे उठून अधून मधून प्रजेला दर्शन देत होते पण महाराणी एका जागेवर ढीम्म बसून होत्या, बसून म्हणजे ती अगदी बेमालूमपणे गवतात लपलेली होती, तिला तिथे जाताना आम्ही बघितलं होतं म्हणून ती तिथे आहे हे माहीत होतं नाहीतर तिचं नखसुद्धा दिसत नव्हतं. बेनो म्हणाला हा मेटींग सिजन आहे आणि सिंह - सिंहीण त्यांच्या कळपातून थोडे दिवस बाहेर पडून एकांत शोधतात. या बिचाऱ्यांच्या रोमँटिक डेटवर आम्ही सगळ्यांनी पारच पाणी फिरवलं होतं.
तो तिची मनधरणी करायला बरंच काही करत होता पण ती काही दाद देत नव्हती. जरा वेळाने ती बसली होती तिथे ऊन आलं आणि ती उठून आमच्या बाजूला आली, आम्हाला दोघांचंही अगदी १५-२० फुटांवरून चांगलं दर्शन झालं आणि आम्ही दुसऱ्यांसाठी जागा मोकळी करून पुढे निघालो.
त्यानंतर लगेचच शहामृग आणि त्यापाठोपाठ जिराफ दिसले.
मी मनातल्या मनात एक टुणकन उडी मारली, अर्ध्या दिवसात आपल्याला बरे दिसले की प्राणी आता उरलेल्या दिवसात काही दिसलं नाही तरी हरकत नव्हती.
एव्हाना दीड वाजून गेला होता, आम्ही ठरवून दिलेल्या पिकनिक स्पॉटला जाऊन लंच केलं. हा स्पॉट जरा उंचावर होता, खाली नदी आणि त्याच्यापलिकडे लांबवर पसरलेली हिरवीगार कुरणं दिसत होती. मला लांबवर काळे ठिपके हलताना दिसले आणि आपोआप माझ्या तोंडून हत्ती एवढाच शब्द बाहेर पडला.
आम्ही जेवून त्याच बाजूला जाणार होतो, आता तिकडे हत्ती आहेत हे खातरीशीर दिसल्यामुळं आम्ही पटापट लंच उरकून निघालो. पण या वेळी आमचं टायमिंग एवढं भारी नव्हतं. आम्ही पोचेपर्यंत तो कळप बराच आत आणि झुडुपात घुसला होता आणि आम्हाला त्यांचे सोंड, शेपूट, पाय असे फक्त काही काही अवयव दिसत होते. पुन्हा बनोने आमचा हुरूप वाढवला म्हणे हत्ती भरपूर आहेत दिसत राहतील आपल्याला.आणि तेव्हढ्यात पुन्हा रेडीओवर खळबळ सुरू झाली. या वेळी आम्हाला एकही शब्द कळला नाही. मी आणि लेक गाडीत उभ्या होतो, बेनो आम्हाला 'होल्ड टाईट' एवढंच म्हणाला आणि सुसाट गाडी पळवायला लागला.आम्ही या टीप मिळालेल्या पॉइंटला पोचणारी दुसरी गाडी होतो त्यामुळं आम्हाला प्राईम स्पॉट मिळाला, आता फक्त बघायचं काय आहे हाच प्रश्न होता.
बेनोनं दुर्बिणी हातात दिल्या आणि ४०-५० फुटावरच्या बाभळीकडे बोट केलं.बाभळीवर बघायचं आहे म्हणजे बिबट्या / लेपर्ड असणार म्हणून उत्सुकतेनं बघितलं आणि खरचं एक बिबट्या दोन फांद्यांच्या बेचक्यात मुटकुळ करून बसला होता.
दुर्बिणी शिवाय तर तो दिसूनच येत नव्हता. ज्या गाईडला तो पहिल्यांदा दिसला त्याला खरचं मानलं पाहिजे
आम्ही दोन दिवसापूर्वीच 'आय ऑफ द लेपर्ड ' ही डॉक्युमंटरी बघितली होती, त्यातले बरेच रेफ्रंसेस झरकन डोक्यातून सरकले.
लेपर्ड शक्यतो लपून राहण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं एवढ्या सगळ्या गाड्या असताना तो तिथून खाली उतरण शक्य नव्हतं, थोडा वेळ वाट बघून आम्ही तिथून निघालो. दुर्बिणीतून आम्हाला तो आम्हाला बऱ्यापैकी दिसला होताचं.
आम्हाला मगाशी हत्ती लांबून दिसले ते बेनोनं फारचं मनाला लावून घेतलं होतं. त्यामुळं तो रेडीओवर कोणी हत्तींबद्दल काही म्हणतंय का याच्यावर लक्ष ठेवून होता. कोणालातरी जवळचं एक कळप दिसला होता, बेनोनं पुन्हा यु टर्न घेतला आणि आम्ही नॉर्मल स्पीड मध्ये जायला लागलो. आम्हाला लांबूनच रस्त्याच्या कडेला असलेला तो कळप दिसला, चला आता जवळून हत्ती बघायला मिळणार म्हणून आम्ही खूष झालो. एवढ्यात एक मोठाच्या मोठा मेल हत्ती आमच्यासमोर काही फुटांवर रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला. बेनोनं स्पीड कमी केला आणि सावधपणे हत्ती पलीकडे गेल्याची खातरी करून गाडी पुढच्या कळपाकडे नेली. त्यात एक मोठ्ठी मेट्रीआर्क हत्तीण होती आणि बाकी छोटे मोठे मेल फिमेल आणि पिल्लू हत्ती. त्यांचे फटाफट फोटो काढून आम्ही परत जायला निघालो, तर तो मगाशी पळालेला मेल हत्ती आता अगदी रस्त्यालगत एका पाण्याच्या डबक्यातून अंगावर पाणी उडवत उभा होता. बेनोने गाडी तिथे समोर नेऊन बंद केली, या महाशयांनी वेगवेगळ्या पोझ देत पाणी अंगावर उडवून घेतलं आणि शेजारी एक मोठं अॅकेशीयाचं झाड होतं त्याला सोंड आणि सुळे घासायला लागला, आणि अचानक त्याने आपला मोर्चा आमच्याकडे वळवला, मी काही म्हणणार तेव्हढ्यात बेनो म्हणाला शांत बसा आवाज करू नका, हा बाबा चालत अगदी आमच्या गाडी समोर आला, त्याच्या मनात आलं तर तो एका झटक्यात आपल्या सुळ्यांनी गाडी उलथवून टाकेल हा विचार येऊन मी खरचं घाबरले. पण बेनो निवांत होता. हत्ती सुद्धा अर्धा मिनिट गाडीसमोर थांबून पुन्हा सुळे आणि सोंड घासायला झाडाकडे गेला, आता मात्र निघुया म्हणेपर्यंत तो गरकन वळाला आणि पुन्हा आमच्याकडे यायला लागला, बेनो तयारीत होताच त्याने झटकन गाडी सुरु केली आणि सुसाट निघाला. हत्तीने थोडं आमच्यामागे आल्यासारखं केलं पण त्यात काही दम नव्हता. आम्ही तोपर्यंत त्याच्या टप्प्याबाहेर पडलो होतो. बेनो म्हणाला पहिल्यांदा तो हत्ती गाडीसमोर आला तेव्हा तो फक्त वॉर्निंग द्यायला आला होता दुसऱ्यांदा त्याने चार्ज केलं असतं म्हणून बेनोनं गाडी पळवली. मी म्हटलं धन्य माणसा गाडी चालू नसती झाली तर, म्हणे तर काही नाही जोर जोरात हॉर्न वाजवला की ते पळून जातात. म्हणलं ते काही असो पुन्हा आता हत्ती जवळ जायला नको. त्यावर आपण ऐकलंच नाही असं दाखवत तो म्हणे आता आपण परत जाऊ. आजचा दिवस अपेक्षेपेक्षा फारच धमाकेदार गेला. आता उद्या गोरोंगोरो ते सेरेंगेटी बघू तिथे कोणी आम्हाला मुखदर्शन देतय की नाही. अशाप्रकारे दिवस पहिला वृत्तांत समाप्त!