सफारी म्हणजे पहाटे लवकर उठायचं किंवा रात्री उशिरा पाणवठ्यावर जाऊन प्राणी बघायचे अशीच माझी कल्पना होती. बेनोला विचारलं तर तो म्हणे काही गरज नाही सध्या वेट सीजन आहे आणि भरपूर खाद्य आहे तर सगळीकडे प्राणी दिसतील.
तसंही आज आमचा प्रवासाचा दिवस होता, आम्ही गोराँगोरो क्रेटर रीम वरून प्रवास करत पुढे सेरेंगिटीला जाणार होतो. पूर्वी सेरेंगीटी मध्ये मासाईमारा जमातीचे लोक राहत असतं, तसे ते भटकेच असतात पण आता त्यांना सरकारने गोरंगोरो भागात स्थलांतरित केलं आहे. सेरेंगेटीचा अर्थसुद्धा मसाई भाषेत एन्डलेस प्लेन, अथांग पसरलेला गवताळ प्रदेश असा आहे. आज प्रवासाचा दिवस आहे आणि जेव्हा सेरेंगियटीला पोचू तेव्हा खूप प्राणी दिसतील. त्यामुळं जरा निवांत बसलो होतो, तेवढयात रस्त्याच्या कडेला झेब्रा दिसायला लागले, लांब लांब पर्यंत त्यांचे कळप पसरलेले होते, पुढे त्यांचे कळप थोडे विरळ झाले तर विल्डबिस्टचे कळप दिसायला लागले.
हे तेच विल्डेबिस्ट आहेत जे मोठ्या प्रमाणात मायग्रेट होतात आणि बरेच लोक हे मायग्रेशन बघायला आफ्रिकेत जातात. आत्ता ते जिथे आहेत तिथे सगळीकडे हिरवळ असल्यामुळं ते इतक्यात कुठे जाणार नाहीत. जवळ जवळ दोन लाख विल्डबिस्ट या एरियात विखुरलेले असतात आणि टांझानिया तल्या सीरेंगेटी मधून केनयातल्या मसाईमारा आणि पुन्हा परत असे चक्राकार फिरत राहतात. लायन किंगमध्ये याच मायग्रेशनचा वापर करून स्कार मुफासाला मारतो.
दोन्ही बाजूला माळरानावर सगळीकडे काळे काळे ठिपके पसरले होते. त्यातच मग अधून मधून झेब्रा, गझेल, इंपाला दिसत होते. अचानक समोर लांबवर भरपूर धुळीचे लोट उठलेले दिसले. जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा तिथे जिरफांचा एक मोठा तांडा रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जात होता, जवळपास पन्नास साठ तरी जिराफ त्या कळपात असतील, बेनो म्हणाला त्याच्या आठरावर्षांच्या सफारीमध्ये एवढा मोठा जिराफांचा कळप त्याला तिसऱ्यांदाच दिसला होता. सगळे जिराफ एकत्र पुढे पुढे जाताना बघून ज्युरसिक पार्कमधले डायनासोर आठवले.
जवळपास पाच तास प्रवास केल्यावर सेरेंगेटीच्या गेटला पोचलो. अगदी पाच मिनिटसुद्धा गेलो नसू की समोर एक जीप थांबलेली दिसली आणि रस्त्याच्या अगदी कडेला एका मातीच्या ढिगाऱ्यावर दोन सिंहीणी आणि दोन बछडे आरामात पहुडलेले होते. जवळचं दोन मोठ्या सिमेंटच्या पाईप मध्ये अजून चार पिल्लं लोळत होती. काल प्रेमी युगुल दिसलं तर आज लेकुरवाळ्या सिंहिणी, थोडं पुढे गेलो तर अगदी रस्त्याकडेला झुडुपात अजून सिंहीनी आणि बछडे, म्हटलं अरे चल क्या रहा है! एवढ्या सहज आणि जवळून सिंह पहायचं भाग्य आपल्याला मिळतय म्हणजे नक्कीच आपण काहीतरी पुण्यकर्म केलेलं दिसतय. बेनो म्हणाला सेरेंगिटीच्या १४,७०० sq किलोमिटर जागेत अडीचशे लायन प्राइड आहेत म्हणजे साधारण तीन हजार सिंह.
जसे जसे पुढे जात राहिलो तसे पुन्हा, विल्डबिस्ट, झेब्रा, गझेल दिसत राहिले. कधी चुकून आम्ही गवतात असलेल्या वारुळानाच सिंह समजत होतो, बेनो अधून मधून रेडीओवर बोलत होता, आम्ही काल आणि आज मिळून आम्हाला किती प्राणी दिसले ते मोजत होतो आठरा वेगवेगळे प्राणी आत्तापर्यंत दिसले होते. आता पुढे काय असा विचार करतच होतो तर पुढे काही जीप थांबलेल्या होत्या तिथे बेनोने आमची जीप नेऊन थांबवली. एका दगडावर दोन छोटे छावे बसले होते,
ओह अजून लायन्स असं म्हणे पर्यंत त्याने डावीकडे बोट दाखवलं, गवतात दोन सिंहिणी लपून बसल्या होत्या त्याच्यापालिकडे चार विखुरलेले झेब्रा होते. ' द हंट वॉज ऑन' , आम्हाला दोन सिंहीणी गवतात लपलेल्या दिसत होत्या आणि आम्ही जिथे होतो तिथून एक सिंह पुढे पुढे सरकत होता, आता पुढे काय होणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती, मेल सिंह दोन्हीपैकी एका फीमेल पर्यंत पोचला आणि ती आपलं कवर सोडून उठूनच उभी राहिली, झेब्रा त्यांच्याकडे सरकले आणि आव्हान दिल्यासारखे त्यांच्याकडे बघू लागले. मेल लायनने फीमेल लायनची पोझिशन उघड केली होती आणि त्यामुळं तिने आपला विचार बदलला होता. द हंट वॉज कॉल्ड ऑफ. प्रत्यक्ष हंट जरी बघायला मिळालं नाही तरी ती उत्सुकता आणि थरार थोडातरी अनुभवता आला. बेनो म्हणाला फिमेल लायनला झेब्रानी बघितल्यामुळ सरप्राइज असं काही राहिलं नाही, त्यामुळं त्यांनी हंट न करायचं ठरवलं. आज नाही तर उद्या आपल्याला हंट दिसेल कदाचित असा विचार करत तिथून पुढे निघालो.
आज बरेच नवीन प्राणी दिसले त्यांची मोजदाद करत होतो , बेनो त्या सगळीकडे सारख्याच दिसणाऱ्या गवताळ प्रदेशात कुठे आणि कसा जात होता काही कळतं नव्हतं. तो आता अजून एका ठिकाणी चालला होता काहीतरी आहे म्हणे.
तिथे पोचलो तेव्हा एक गाडी ऑलरेडी ऑफ रोड गेली होती आणि दुसरी त्याच्या विरुद्ध बाजूने गवतात घुसत होती, आम्ही तिथे पोचून थांबलो तोपर्यंत एक बिबट्या चपळाईने आमच्या गाडी समोरून दुसऱ्या बाजूला गवतात गेला. पुन्हा त्या दोन्ही जीप फिरून गवतात घुसल्या, असं ऑफरोड जाऊन प्राण्यांना त्यांच्या लपलेल्या ठिकाणाहून बाहेर काढणं इल्लिगल आहे आणि जिथे तिथे कोणी असं करत असेल तर त्यांना रिपोर्ट करा असे बोर्ड लावले आहेत. मी आणि शशी त्याबद्दल चर्चा करत होतो तर बेनो लगेच म्हणाला प्लीज त्यांना रिपोर्ट नका करू ते नंतर मला त्रास देतील, मग आम्ही तिथून निघूनच गेलो. खरचं असे कितीतरी लोक येऊन प्राण्यांना त्रास देतच असतील. आम्ही एवढे पैसे दिलेत तर आम्हाला काहीही करून प्राणी दिसलेच पाहिजेत असा बऱ्याच जणांचा आग्रह असतो आणि गाईडसुद्धा त्यांना नाही म्हणू शकत नाहीत.
आत्तपर्यंत बराच वेळ झाला होता, आम्ही आमच्या आजच्या राहण्याच्या ठिकाणी जायला निघालो, आमच्या लॉजच्या रस्त्यावरच काही गाड्या थांबल्या होत्या, आम्हीही शिरस्त्याप्रमाणे त्यांच्यामागे जाऊन थांबलो. गेसिंग गेम सुरू करायच्या आधीच कोणीतरी म्हटलं चित्ता, आमच्या पासून साधारण तीस फुटांवर एका छोट्या दगडावर एक चित्ता म्हणजे चित्तीण रुबाबात बसली होती, माझ्या कल्पनेतल्या चित्त्यापेक्षा ती फारच लहान आणि मातकट रंगाची होती. सगळ्यांना दर्शन देऊन झाल्यावर ती एक दोन मिनिटात पुन्हा गवतात गायब झाली. वा दिवसाचा शेवट छान झाला म्हणत होतोच तोपर्यंत बेनोने एका डबक्यात पहुडलेले हिप्पो दाखवले, नुसत्या पाठी पाण्यातून वर दिसत होत्या त्यामुळं ते पाण्यातले मोठे खडकच वाटत होते. त्यातल्या एकाने जरा डोकं वर काढून आम्हाला ते हिप्पोच आहेत याची खातरी पटवून दिली.
तिथून पुढे काही न होता अर्ध्या तासात आम्ही आमच्या राहण्याच्या जागी पोचलो, राहायची जागा अगदी जंगलाच्या पोटात असूनही सर्व सोयींनी सुसज्ज आहे. रात्र झाल्यावर मात्र बाहेर पडू नका अशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत कारण इथे आजूबाजूला सिंह फिरत असतात. काल रात्री तरी आम्हाला काही सिंह दिसले नाही, बघू आज रात्री दिसतात का, चला अशी या दुसऱ्या दिवसाची ही सांगता झाली.