"नेमेचि येतो" या उक्तीने आज पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा WhatsApp वर इकडून तिकडे पाठवल्या जातील. नेहमीच्या काही कविता, कुसुमाग्रजांच्या काही गाजलेल्या ओळी, मराठी अभिमान गीत, मराठी पोरी, मराठी अस्मिता, मराठी साहित्य, संस्कृती अश्या शब्दांची उजळणी होईल. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम, प्रमाण भाषा आणि बोली भाषा, शुद्ध आणि अशुद्ध असे सगळे गट आपापले नारे देतील. भाषांची सरमिसळ, इंग्रजीची भेसळ, प्रत्येकच शब्दाला मराठी प्रतिशब्द वापरण्याचा अट्टाहास, त्यातली व्यक्ती सापेक्षता असे सगळे विषय चर्चेला येतील.
हे सगळे विषय येत राहावेच, चर्चा, मत मतांतरे सुद्धा घडावीत, कारण भाषा प्रवाही आहे असं आपण म्हणतो. ती टिकवून ठेवायला हवी तशीच काळानुरूप काही बदल होत पुढे जायला हवी, त्यासाठी विविधांगी चर्चा अश्या दिनाच्या निमित्ताने होत राहाव्यात. पण आज, या लेखाचा विषय आहे देवनागरीतून टंकलेखन - अर्थात सोप्या भाषेत मराठी टायपिंग.
गेली अकरा वर्ष मी सातत्याने मराठी भाषेतून लिहीत आहे, मराठी भाषेतून चालणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आहे. या इतक्या वर्षांच्या अनुभवातून माझं एक निरीक्षण असं आहे, की माझ्या ओळखीतले अनेक ज्येष्ठ नागरिक फोन किंवा लॅपटॉपवरून सुद्धा देवनागरीत टंकलेखन करतात. यात अगदी ८०-८५ वयोगटातले सुद्धा लोक आहेत ज्यांचं मला खूप कौतुक वाटतं, आदर वाटतो. त्यानंतर माझ्या पिढीतले किंवा थोडे मोठे, असे लहान गावांमध्ये वाढलेले अनेक जण, देवनागरीत लिहून सगळीकडे संवाद साधताना दिसतात. पण तरीही, विविध माध्यमातून ज्या अनेक लोकांशी संपर्क येतो, त्यात देवनागरीत लिहू शकणारे, लिहिणारे लोक यांचं प्रमाण अजूनही अत्यंत कमी आहे. इथे लेख, कविता लिहिणे असा अर्थ नसून, जुजबी गप्पांमध्ये देवनागरीत लिहू शकणारे असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामागे नेमकी कारणमीमांसा काय असावी हा विचार अनेक वेळा मनात येतो.
आपल्यापैकी सगळ्यांच्या फोनवर सतराशे साठ ॲप असतात, नवनवीन फोनचे मॉडेल आले की ते सगळ्यांना लगेच वापरता येतात, घरातली उपकरणं ते ऑफिस मधलं प्रत्येक नवीन तंत्रज्ञान चढाओढीने सगळ्यांना शिकायचं असतं, शंभर - दोनशे बटन वापरून गाडी मधल्या विविध गोष्टी हॅण्डल करता येतात, मग मराठी/देवनागरी टंकलेखन, याबाबत मात्र हे सगळे इतके निरुत्साही का? हे रॉकेट सायन्स नाही. विशेषतः आता जेव्हा हातात स्मार्ट फोन आले आहेत, तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत आणि हाताळायला सोपं होतं आहे तेव्हा तर नक्कीच नाही.
हेच मराठी टंकलेखन LinkedIn वर एखादं सर्टिफिकेट म्हणून मिरवता येणार असेल तर लोक ते शिकून लगेच प्रोफाईल अपडेट करणार का? असाही प्रश्न मला बरेचदा पडतो.
प्रत्येक व्यक्तीची कलेतली आवड वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचेच भाषेवर उत्तम प्रभुत्व हवे, प्रत्येकानेच मराठी साहित्य वाचावे, मराठी कविता कराव्या, सगळे मराठी सिनेमे बघावे, रोज मराठी वाचन करावं असं मी म्हणणार नाही. हो जमेल तेव्हढा वाटा उचलावा, निदान आवड असेल तिथे तरी अवश्य सहभाग दाखवावा.
पण मराठी, अर्थात देवनागरी लिखाण याकडे केवळ संवाद भाषा म्हणून जर आपण बघितलं, त्यातला संवाद हा जरी आपण देवनागरीत केला, तर ही पहिली पायरी तर अगदीच सोपी आहे. आपण घरी रोज मराठी बोलतो, जे तुमच्या माझ्या रोजच्या जगण्यातले शब्द आहेत, निदान तेवढे तरी आपण देवनागरी मधून लिहू शकतो. किमान कुटुंबीय, मित्र यांच्यात होणारा मोजून काही शब्दांचा लेखी संवाद, "काय, कसे आहात?" आणि "मजेत चाललंय" हा देवनागरीत टाईप करणं अवघड नक्कीच नाही.
हे टाईप करताना, इंग्रजी कीबोर्ड वरूनच टाईप करुन मराठी अक्षर उमटतात अशी (सुद्धा) सोय आहे, त्यामुळे आपल्या नजरेला टाईप करताना खूप वेगळं काही दिसत नाही. सुरुवातीला वेळ लागेल कदाचित, पण दिवसभरात दोन मराठी शब्द लिहिले तरी सराव होईल. नंतर तर गुगल कीबोर्ड तुम्हाला आपोआप शब्द सुचवत जाईल. शिवाय सध्याचा सगळ्यांचा आवडता विषय, artificial intelligence यामध्ये अजून किती क्रांती घडवू शकेल हे आत्ता माहीत नाही.
माझा इंग्रजी भाषेला अजिबात विरोध नाही. मला ती भाषा सुद्धा आवडते. व्यवहारात जिथे गरज असेल तिथे, अगदी दोन मराठी लोकांनीही इंग्रजीतून संवाद साधणे यात मला काही चुकीचं वाटत नाही, तो व्यावसायिक भाग असू शकतो. मी जर्मनीत राहते, रोजचे व्यवहार ते ऑफिस मधलं काम या सगळ्या साठी इथे जर्मन ही माझी प्राथमिक भाषा आहे, तिथे मी तीच वापरते. पण मराठी ही माझी मातृभाषा आहे, त्या भाषेतून मी रोज माझ्या जवळच्या सगळ्यांशी संवाद साधते. ती भाषा माझ्यासाठी जवळची आहे. दुसरे लोक त्यांची भाषा सोडत नाहीत, मग आपण का आपली सोडायची? असा विचार माझ्या मनात येत नाही. त्यापेक्षा, माझी भाषा मराठी आहे, म्हणून मला ती यायलाच हवी आणि मी ती बोलायला हवी असं मला वाटतं. जगभर पसरलेल्या मराठी भाषिक लोकांसाठी, जेव्हा आता व्हॉट्सॲप, ईमेल मधून संवाद साधला जातो, त्यात मग शक्य तिथे, काही प्रमाणात तरी देवनागरी मधूनही लिहायला हवं असं मनापासून वाटतं.
पुढच्या मराठी भाषा गौरव दिना पर्यंत, किमान काही लोकांनी मराठी /देवनागरीतून टंकलेखन सुरू केले, मोजके शब्द ते काही वाक्य असं जरी जमलं, तरी तो दिन साजरा झाला असं वाटेल. अर्थात, प्रत्येकाला निवड स्वातंत्र्य आहे, पण लिखीत मराठी भाषा पुढे नेत राहण्यात, त्या निमित्ताने तुमचाही खारीचा वाटा त्यात असेल, आणि तो आनंद पूर्ण तुमचाच असेल.
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !!
मधुरा देशपांडे - शेंबेकर
२७-०२-२०२४