सोपा, पटकन होणारा आणि गिल्ट फ्री (ग्लूटेन फ्री) चॉकोलेट मग केक

एक मिनिटात होणारे मायक्रोवेव्ह मग तसे जुने झालेत पण त्या जुन्या मग केकला दिलेला हा नवीन ट्विस्ट.

मला चवीचं खायला आवडतं, पण एक स्लाइस केकसाठी एक तास खपायचं नसतं. शिवाय विकतचा डेकेडन्ट 'डेथ बाय चॉकोलेट' खाल्ला की त्यातल्या साखरेचा विचार करून "चॉकोलेट नको, पण गिल्ट आवर" असा प्रकार होतो.
ह्या सगळ्या दुविधेला उत्तर म्हणून शोधलेला हा प्रकार.

साहित्यः
नाचणी पीठ - ३ चमचे
पौष्टिक पावडर - १ चमचा (टीप बघा)
ओट्स पावडर - १ चमचा
गुळाची पावडर - २ चमचे
कोको पावडर - १ चमचा (डार्क, अगोड)
बेकिंग सोडा - १/४ चमचा (एक चतुर्थांश)
तूप - १ चमचा (पातळ तूप)
दूध - ३ ते ४ चमचे
डार्क चॉकोलेट चिप्स - १ चमचा
पीकान/ अक्रोड - १ चमचा (आवडत असल्यास)

उपकरण:
मायक्रोवेव्ह सेफ मग / कप / छोटी वाटी वगैरे
ढवळण्यासाठी एक चमचा
मायक्रोवेव्ह ओव्हन
खाण्यासाठी एक चमचा.

कृती:

१. मायक्रोवेव सेफ कपात (वरच्या यादीतले नाचणी पीठ ते बेकिंग सोडा पर्यंतचे) सगळे कोरडे घटक पदार्थ एकत्र करून घेणे.
२. त्यात तूप आणि दूध घालून केक बॅटरची कन्सिस्टन्सी येईल अशा प्रकारे नीट एकजीव करून घेणे.
३. अर्धा चमचा चॉकोलेट चिप्स आणि सगळे पीकान ह्या तयार पीठात पेरणे.
४. कप मायक्रोवेव मध्ये एक मिनिट शिजवून घेणे.
५. उरलेले अर्धे चॉकोलेट चिप्स केकच्या वर पसरवून आणखी ३० सेकंद मायक्रोवेव्ह करून घेणे.
६. आता वरून शिंपडलेले चॉकोलेट चिप्स मेल्ट झाले असतील तर चमच्याने पसरवून घेणे.
७. तोच चमचा घेऊन मग केक खायला बसणे.

हा फोटो. पहिला घास खाईपर्यंत रेसिपी लिहावं असं डोक्यात नव्हतं. त्यामुळं नीटंस फोटो नाही.
3c93f9c1-d6b9-449e-a40a-e64cf73f1f02.jpeg

टीपाः
१. पौष्टिक पावडर - हलके भाजलेले बदाम, काजू, तीळ, खसखस, सुकं खोबरं, डाळं (फुटण्याची डाळ), फुलवलेले मखाणे आणि न भाजलेली खारीक पूड ह्यांची एकत्र केलेली पावडर. ही मी साधारण पंधरा दिवसांतून एकदा करून ठेवते. ओटमील किंवा पार्फे वर पटकन घालून खायला/द्यायला. आमच्याकडे लाडू-वड्या वगैरे प्रकार अजिबात खपत नाहीत. त्यामुळे त्यातल्यात्यात इंडियन सुपरफूड्स आहारात सामावण्यासाठी केलेला जुगाड.
२. ओट्स पावडर - एक्स्ट्रा फायबरसाठी. ह्या दोन्ही पावडरी वापरायच्या नसतील, तर दोन चमचे नाचणी पीठच जास्त घेऊ शकता. माझ्या प्रयोगांत फक्त नाचणी पिठाचा केलेला मग केक जरा डेन्स (गच्च) झाला. ह्या पावडरींमुळं जरा मोकळा (भगराळ) झाला.
३. हा केक शक्यतो गरमागरम खाल्ला तर जास्त चांगला लागतो.
४. साखर खाऊन अपराधीपणाची भावना येत नसेल तर आईस्क्रीम किंवा व्हिप्ड क्रीमसोबतही चांगलाच लागतो.
५. मिड-वीक 'पिक मी अप' म्हणून उत्कृष्ट.

हॅपी लीप डे!

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle