चाळीशी ते साठीच्या दरम्यान आयुष्य निरर्थक वाटणं, ध्येय किंवा उद्दिष्टांबाबत गोंधळ होणं किंवा ती नाहीत असं वाटणं, आपल्या अपेक्षेनुसार एखादं नातं उंचीवर गेलं नाही ह्याची तळमळ वाटणं, आपण आता जे करत आहोत त्याची पाळंमुळं आपल्या बालपणात शोधत बसणं. आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना न स्वीकारता आल्याने दिशाहीन वाटणं, धड तरुणही नाही आणि धड म्हातारंही नाही अशी शरीराची सुद्धा चढावरून उताराला लागायची सुरुवात नकोशी वाटणं. वरवरच्या कलकलाटात आतून रिक्त वाटत रहाणं - याला ढोबळपणे Mid life मधली तगमग म्हणता येईल. पण हे याच वयात अशाच पद्धतीने व्हायला हवं याला काही आधार नाही. शंभर वर्षे आयुष्य गृहीत धरून मध्यावर जे स्थैर्य मिळते किंवा ज्या स्थैर्यासाठी अथक झगडलो ते मिळाल्यावर त्याला काही विशेष अर्थ नव्हताच असं लक्षात आल्याने अडकल्यासारखे वाटून जी घुसमट होते त्या प्रकारातील मानसिक द्वंद्वाला- संभ्रमावस्थेला हेच वय असायचं कारणही नाही.
हे जन्मभर अधुनमधून वाटूच शकतं. कुठलंही 'वाटणं' अगदी निराधारही नसतं. विचारपूर्वक घेतलेले निर्णय एवढे चूक निघाले, इतरांनी माझ्यासाठी घेतलेले निर्णयांनी तर बरेचसे मार्ग खुंटले. त्यामुळे जे काही थोडेबहुत चांगले निर्णय घेतले गेले ते सुद्धा अपघाताने झाले असावेत आणि आपलं श्रेय काडीमात्र नाही. आत्मविश्वास सुद्धा काचेचा आणि सकारात्मकता सुद्धा कचकड्याची. वय वाढतंय तसं तसं शक्यतांचे एकेक दरवाजे बंद व्हायला लागले आहेत. स्वतंत्र व्यक्ती म्हणून विशेष पाऊलखुणा उमटवता आल्या नाहीत, सगळी शक्ती संघर्षात पणाला लागतेय.
हल्लींच्या नात्यांबद्दल काय बोलावे, एवढं 'वरवरचं' आयुष्य कुठल्याही पिढीला बघावं लागलं नसेल. सगळा सोशल मीडिया, संवाद, छोट्याछोट्या गोष्टी, अगदी आस्थेवाईकपणे केलेल्या चौकशा वगैरे सुद्धा अतिशय कृत्रिम आणि यांत्रिक वाटतात. जणू हे कालचेच शब्द आज वापरले आहेत आणि उद्या आपणही हेच वापरू किंवा फेकून मारू. सखोल-अर्थपूर्ण बोलायला गेलं तर लोक घाबरून पळायला लागतात. 'आहेत पण आणि नाहीत पण' नात्यांत आपणही 'सेलेक्टिव्हली' वागायला शिकतोच हळूहळू. इकडचं कॉपी-पेस्ट तिकडं करू, वर केक-फुगा चिकटवून टाकू. हाकानाका. जितकं पोकळ तितकं शब्दबंबाळ. जिवंतपणाच नाही कुठे..! तू माझं लक्षात ठेव तरच मी तुझं लक्षात ठेवेन. तेही जर असं भावहीन -कृत्रिम असेल तर विसरलेले उत्तमच नाही का ?!
या सगळ्या गोंधळात आंतरिक ओलावाच किंवा अकृत्रिम ओढच नसण्याने एकतर आपल्यालाही 'यंत्रमानव' व्हावं लागतं, नाहीतर माणसात असूनही प्रचंड एकाकीपणा अनुभवावा लागतो. कधीकधी यंत्रमानवाचा अभिनय जमतोही, कधीकधी we are just too tired to care. दुसऱ्या गटातच बहुतेक वेळा असणाऱ्यांचं वर्तुळ इतकं लहान होत जातं की एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच लोक हृदयात उरतात. बाकीच्यांना का 'मेन्टेन' करायचं जे कुठलीही सोबत करत नाहीत, कुठलीही भर घालत नाहीत. मग आपण मात्र त्यांच्यासाठी मूळ स्वभावाप्रमाणे 'इमोशनली अव्हेलेबल' रहावे की नाही कळत नाही. हातचं राखून ठेवायचा स्वभाव नाही आणि ही बेगडी नाती ओढण्याची मानसिक ताकदही ..!
कुठल्यातरी अनोळखी गर्दीत मनाला बरं वाटावं म्हणून जायचं तर 'फिट इन'च्या प्रयत्नांत 'रोबॉटिक इंटरॅक्शन' करत पार थकून जावं आणि पुन्हा आपल्याच 'लाईफ चॉईसेसचा' पूनर्विचार करावा. आपण नॉर्मल का ॲबनॉर्मल? नॉर्मल म्हणजे नेमकं कसं? सगळे वेडे आणि मीच एकटी-टा शहाणी -ते - ज्याअर्थी मला हे जे वाटतंय, त्याअर्थी सगळे शहाणेच मीच महामूर्ख असले-लो पाहिजे इतके वेगवेगळे निष्कर्ष आणि पुन्हा प्रश्न. उत्तर मिळतच नाही अर्थात..!
आपापल्या भावनांशी प्रामाणिक रहाणं सकारात्मक रहाण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सगळंच 'ओके' ठरवावं आपल्यापुरतं. Pseudo positivity चं तणाव घेण्यात अर्थ नाही. हल्ली तर हा दबाव सर्वांवर नकळतपणे असतोच. फ्रॉईड म्हणतो तसं अशा अनैसर्गिकपणे दाबलेल्या भावना कधीतरी कुरूप होऊन बाहेर पडतातच. मानसिक द्वंद्वाचा लंब या टोकापासून त्या टोकापर्यंत नेण्याऐवजी सगळ्याला 'जे आहे ते आहे' ह्या मध्यावर उभा करत रहाणं मानसिक आरोग्यासाठी - मनःशांतीसाठी योग्य वाटतं आणि हळूहळू त्यातूनच स्वीकार येतो.
त्यासाठी स्वतः सोबत/ एकांतात वेळ घालवून याचा पुनःपुन्हा निचरा करणं फार आवश्यक. एकदा निचरा केला म्हणजे ते विचार पुन्हा येणार नाहीत ही अपेक्षाही अवास्तव. ते पुन्हा दार ठोठावणारच सरळ एक दार उघडून दुसऱ्या दाराने त्यांना घालवून दिल्याशिवाय त्यांच्या प्रदक्षिणा कमी होत नाहीत. कमीच करायचं आहे- बंद करणं अशक्य आहे. अशक्य गोष्टींचा पाठपुरावा करण्यापेक्षा ध्येयच सोपं ठेवणं नैसर्गिक आणि साध्य वाटतं. आपले विचार म्हणजे आपण नाही. आपली परिस्थिती म्हणजे सुद्धा आपण नाही. अशा प्रकारे चिंतन करीत राहिलो तर त्यांच्यापासून दूर जाता येते. मग ते येत राहिले तरी त्यांची तीव्रता तितकी रहात नाही, बोथट व्हायला लागतात. रस्ता ओळखीचा होतो आणि ह्या चक्रव्यूहातून लवकर बाहेर पडता येतं. आपण सहजासहजी सुखी होऊ शकत नाही, कारण ते मानण्यावर असतं म्हणे. जेव्हा मानता येत नसेल तेव्हा यामार्गाने त्यातल्या त्यात सुखकर जीवन मात्र जगू शकतो.
व्यक्तिसापेक्ष असलं तरी सगळ्यांनाच नेहमीच कमीअधिक प्रमाणात यातून जावे लागते. वयाचं सुद्धा तितकं खरं नाही. असे ठोकताळे माणसाच्या मनाला बांधता येत नाहीत. आपल्या मनात आपल्या शरीरात स्थिर वाटतच नाही आपल्याला कधी. दूरगामी परिणाम वगैरे होत असतील-नसतील पण हा गोंधळ कमी व्हावा यासाठी 'या' क्षणात जगून घेतलं पाहिजे नाही तर आपण कधीच जगू शकत नाही. मला वाटत नाही कुणी ऐंशी वर्षांची व्यक्ती सुद्धा माझा गोंधळ संपून मला आयुष्याचा अर्थ कळला आहे असं प्रामाणिकपणे सांगू शकेल. मग आपण चाळीस वर्षे वाट बघण्यात काय अर्थ आहे , आणि तेवढं जगलोच नाही तर तेही गेलं. त्यापेक्षा आहे त्यातच 'वेचता' आलं पाहिजे.
कदाचित हे सगळं निरर्थक असेलही पण आपापल्या छोट्याशा परीघात त्याला अर्थपूर्ण समजल्याशिवाय- निदान तसा आभास निर्माण केल्याशिवाय आपण समर्पित राहूच शकत नाही- तृप्तता अनुभवू शकत नाही. As Osho once said "Human mind is a great slave but a terrible master..! "
अर्थ शोधण्यापेक्षा समर्पण- कर्मनिष्ठता जास्त मोलाची आहे, किमान जीव जाताना पस्तावा राहणार नाही. तेव्हा ताठ मानेने जाता आलं पाहिजे... नाही का ?! कारण ज्या एकसंधतेची आपण प्रतिक्षा करत असू ती अस्तित्वातच नसेल आणि 'सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डित:' उक्तीप्रमाणे थोडं फार सातत्याने 'जाऊ दिले' तरीही तुकड्यातुकड्यांतच काही तरी भरीव मिळत जाईल. या सगळ्या सांसारिक महासागरात बहुतेक नाती 'यथा काष्ठम् च काष्ठम् च' ठरतात आणि म्हणूनच शेवटी आपलं स्वतःशी असलेलं नातच आपल्याला सगळ्यातून तारून नेतं. ते आरस्पानी रहायला हवं...!
------------
**तळटीप: आता हे सगळं मला जमलंय का - कधीकधी जमतं. पण शब्दात मांडून ठेवलंय कारण त्याने कुणालातरी सोबत होईल. आयुष्यातील स्थित्यंतरांप्रमाणे हे विचार बदलतही रहातील, कोण सांगावे..!
( शीर्षक:
सपनों से भरे नैना , तो नींद है ना चैना -
Luck by chance - शंकर महादेवन
https://youtu.be/4Q9Ul9PwmxA?si=NEWBoKtntQPHdO98
विश्वास ठेवा या गाण्याइतकं चपखल शीर्षक या भावनांना दुसरं काही असूच शकत नाही असं या क्षणी तरी वाटतंय. ऐकून बघाच. )