माऊंट फ्रेंडशीप हा पीर पंजाल रेंजेसमध्ये कुलू भागात येतो.. फ्रेंडशीप पीक हे एक्सपिडीशन आहे, म्हणजे सोप्या शब्दात टेक्निकल ट्रेक. ट्रेकींग गिअर्स वापरुन करायचा ट्रेक. पीक ची ऊंची ५,२९० मीटर्स म्हणजे १७,३५३ फूट. ऊंची एक्सपिडीशन्सच्या मानाने फार नसली तरी हा 'कठीण' कॅटेगरीत येणारा आहे कारण जवळजवळ वर्षभर शिखरावर असणारं बर्फ.
आम्ही पहीलं केलं ते स्टोक कांगरी पण एक्सपिडीशनच होतं., पण तेव्हा तसं काही असतं असं काहीच माहिती नव्हतं. मागच्या वर्षी बाली पास केल्यावर आता दरवर्षी एक तरी ट्रेक करायचा प्रयत्न करायचाच असं पक्कं ठरवून ठेवलं आहे.
फ्रेंडशीप पीक माझ्या ट्रेकींग विशलिस्टमध्ये होतंच. पण ते करण्यात मी फार उत्साही नव्हते कारण त्याचा बेस. मनाली. शिमला किंवा मनालीहून सुरु होणारे ट्रेक्स करण्याबाबतीत मी जरा, 'बघू नंतर' ह्या विचाराची होते. अजूनही आहेच. एकतर दोन्ही ठिकाणी सहजपणे पोहोचता येत नाही. चंदीगढ/ दिल्ली विमानानी आणि चंदीगढहून ( ऑफीशीयली ) ८ तासांचा किंवा दिल्लीहून ( परत ऑफीशीयली ) ११ तासांचा. त्यापेक्षा डेहराडून र्हिषिकेश बरं. सरळपणे जाता येतं. अर्थात असं केलं तर निम्म्याहून जास्त ट्रेक्स रद्द करावे लागणार. मग ह्याभागातला पहीला ट्रेकतरी निदान सोबतीने करावा असा विचार केला. कारण बस प्रवास कितपत सुरक्षीत आहे ह्याची अजिबात कल्पना नव्हती.
मागच्या बाली पासनंतर महेश आणि मी दोघांनी शक्यतो एकत्र ट्रेक करायचा नाही असं ठरवलं आहे. घरचं मॅनेज करुन आठ दहा
दिवस नो रेंज झोनमध्ये जाणं कठीण होतं. त्यामुळे ज्याला जेव्हा जमेल तो ट्रेक करुन घ्यायचा, अगदीच सहज शक्य झालं तर एकत्र जाऊ असा आता प्लॅन आहे. त्याप्रमाणे महेशनी मे महीन्यात केदारतालला जायचं पक्कं केलं. केदारताल गंगोत्रीपासून सुरु होतो, मागच्या तसं आमचं वर्षी यमुनोत्री झालं होतंच. त्यामुळे ह्या निमित्ताने गंगोत्री पण होऊन जाईल असा विचार होता.
केदारनी ( माझा मुलगा ) आधी केदारकांथा केलाय, तोही डिसेंबरमध्ये. त्याला जून आणि डिसेंबर कॉलेजला सुट्टी असते. त्यामुळे जून महीन्यात ह्यावर्षी त्याला एकतरी कठीण ट्रेक करवायचाच असा पक्का विचार होता.
बाली पास चा वॉट्सअॅप ग्रुप अजून बर्यापैकी अॅक्टीव्ह आहे. त्यातल्या २/३ जणांशी व्यवस्थित कॉन्टॅक्ट होता. पुन्हा जाऊ तेव्हा एकत्रच जाऊ असंही ठरत होतं. त्यात फ्रेंडशीप पीक करुया असं निघालं. हे एक्स्पिडीशन आहे त्यामुळे कठीण असणारच ह्याची पूर्ण कल्पना होती. पण केदारची सोबत आहे तर करुया असा विचार करुन आणि गेलो म्हणजे जमलंच पाहीजे असा (आमचा) अट्टहास नसल्याने बाकीच्या चार जणांबरोबर मी, केदार आणि माझं बुकींग करुन टाकलं. पाठोपाठ फ्लाईट बुकींग पण केलं.
तो साधारण मार्च महीन्याचा शेवटचा आठवडा होता. माझ्याकडे पूर्ण दोन महीने होते तयारी करायला. पण आपण ठरवतो ते नेहमी सरळपणे होतंच असं नाही ना ! फेब्रुवारी ते मे, चारही महीने महेश हार्डली काही दिवसच पुण्यात होता. त्याच्या मागे सतत फिरती लागली होती. त्यामुळे त्यालाही तयारीला वेळ मिळाला नाही आणि मी पण सिंहगड आज जाऊ, उद्या जाऊ करत लांबणीवर टाकत गेले.
एप्रिलमध्ये सुरुवातीला मला डाव्या गुडघ्यात दुखतंय की काय असं वाटू लागलं. दोन आठवड्यांनंतर रविवारी लाँग रन करुन आल्यावर तर असह्य ठणका लागला. सहनच होईना. ताबडतोप ऑर्थो गाठले. एक्सरे वगैरे झाल्यावर ते म्हणाले, तुम्हाला रनिंग, ट्रेकींग जे काही करताय ते थांबवावं लागेल. कायमच. त्याक्षणी माझ्या मनात उत्स्फुर्तपणे, वॉट द ******* असे शब्द उमटले. म्हणजे जर ते म्हणाले असते, ब्रेक घेऊन, आराम करुन सुरु करा तर ठी़क होतं. एकदम बंद ? कायमचं ? मी बरं म्हणून, औषधं घेऊन परत आले आणि दुसर्या दिवशी ज्या रनिंग ग्रुपमध्ये मी जाते त्या कोचना फोन केला. त्यांनी मला डॉ सुनील मापारींना भेटायला सांगितलं. त्यांना भेटले., त्यांनी एक्सरे बघितला आणि हे नॉर्मल आहे, रिहॅबने होईल बरं असं सांगून एक ओझं उतरवलं.
पण मला काही दिवस पायाचे व्यायाम करायला बंदी घातली. जिने चढायचे नाहीत. रनिंग पण दोन आठवड्यांनी सुरु करु दिलं, तेही ३ मि + १ मि चालणं ह्या फॉर्म मध्ये. जास्तीत जास्त ४५ मिनीटे.
एकीकडे पायाच्या मसल्सचे स्ट्रेंदनिंग व्यायाम सुरु होते.
ह्या सगळ्यात माझे महत्त्वाचे दोन्ही महीने गेले आणि मे अखेरीस मी अश्या कंडीशनमध्ये होते की ट्रेक करायला लागेल तेवढा जनरल फिटनेस होता पण तो एक्सपिडीशीनला पुरेसा आहे का ह्याचा अंदाज येत नव्हता. मी बालीपास कदाचित पुन्हा चढून गेले असते, मेहेशनी केला तो केदारतालही केला असता पण ह्या एक्स्पिडीशिनसाठी मी कितपत तयार आहे हे कळत नव्हतं. ( अवांतर - केदारताल अतीशय सुंदर ट्रेक आहे. आणि कठीणही. सरळ उभा चढ आहे आणि शेवटचा, केदारताल तर अप्रतिम सुरेख. )
मधल्या काळात HRTC (Himachal Road Transport Corporation) च्या बसेसचं जाता येतांनाचं तिकीट काढून ठेवलं. सरकारी बसेस केव्हाही बर्या.
जून सुरु झाल्यावर सावकाश सामानाची जमवाजमव केली. मुख्य लागणारं सगळं सामान होतंच. बारीकसारीक खरेदी केली. ह्यावेळी लाडू वड्यांना काट मारुन फक्त काजू बदाम, थोडे अंजीर, snickers chocolate, चिक्की आणि मुख्य म्हणजे रनिंगला मी वापरते त्या जेल्स ह्यावर भिस्त ठेवली. (पुढल्या वेळी हे ही सामान कमी करणार आहे.) ट्रेकचे कपडे कमी घेऊन (फक्त २ च सेट) थोडे जास्त गरम कपडे घेतले. आमच्या ट्रेकींग बॅग्ज भरल्या. मुळच्या मोठ्या, ८० लि च्या होत्या, त्याजागी छोट्या, ५० लि च्या घेतल्या. आणि त्या एकदम आटोपशीर, उचलायला सोप्या झाल्या
ह्यावेळी सगळी तयारी माझी मलाच करायची होती कारण महेश प्रवासातच होता. माझ्या मदतीला केदार होता पण काम सोडून आमचे खटके उडण्याची शक्यता होती.
१५ जूनला संध्याकाळी ५ पर्यंत मनालीला रिपोर्टींग होतं आमची फ्लाईट पहाटे ४.३० ची होती. तिथून ९ वाजता चंदीगढ मनाली बसचं बुकींग होतं. आम्ही दिलेल्या वेळेपेक्षा थोडेच उशीरा पोहोचणार होतो पण दुसरी कोणतीच सोयीस्कर फ्लाईट नाहीये पुण्याहून जायला. किंवा मग दिल्लीला जाऊन जाणे. पण हिशोब तोच होत होता.
वॉट्सअॅप ग्रुप तयार झाला. एक एक्सेल शीट भरायची होती, ज्यात कोण कधी पोहोचणार, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माहिती द्यायची होती. जन्मतारखा होत्या. त्यावरुन कळलं, मी सगळ्यात मोठी होते आणि केदार सगळ्यात लहान. मोठी म्हणजे किती ? तर माझ्याहून लहान त्यातल्या त्यात असणारी व्यक्ति तब्बल ८ वर्ष लहान होती आणि बाकीचे सगळे (केदार सोडल्यास) २५ ते २८/२९ वयोगटातले. हा वयातला फरक नंतर खूप जास्त जाणवला.
निघायच्या ३ दिवस आधी मनालीतल्या हॉटेलचं बुकींग केलं. जातांना TTH च हॉटेल होतं पण परत आल्यावरसाठी हवं होतं. आमचा ट्रेक ६ दिवसांचा होता आणि एक दिवस बफर. ( रविवार ते शनिवार ) तो लागेल असं धरुन शनिवारचं बुकींग केलं आणि रविवारी परत.
१४ तारखेला संध्याकाळी बॅगा एकदाच्या भरुन झाल्या. आणि पहाटे दोन वाजता निघालो. चंदीगढला पोहोचलो. वेळ होता म्हणून एअरपोर्टवर जरा वेळ टाईमपास केला. मस्त प्रशस्त आहे चंदीगढचा एअरपोर्ट. पुढे बस स्टँडवर गेलो. मॅपमध्ये दाखवलं त्याच्या थोडं आधीच ड्रायव्हरनी उतरवलं. , मनालीच्या व्हॉल्व्हो बसेस इकडेच येतात ना हे चार वेळा विचारुन उतरलो. आत प्रचंड गर्दी, असंख्य बसेस होत्या. त्यात काही समजेना कुठे जायचं ते. तोवर बस नंबर, कंडक्टरचा फोन नंबर असा मेसेज आलेला होता. ( हे एक आश्चर्यच आहे ). शेवटी एन्क्वायरी काऊंटर शोधून ( जो पार मागे, कोपर्यात टोकाला होता ), त्यांना तो मेसेज दाखवला तर म्हणे १९ नंबर ( फलाटावर ) येईल बस.
बाहेर आलो तर १९ नंबरच दिसेना. म्हणजे १६ होता, १७ होता, १८ होता आणि डायरेक्ट २०. म्हणजे हा platform no 9 3/4 तर नाहीये ना असं आम्ही दोघंही एकाच वेळी म्हणालो. नी$$$ट बघितलं तर १८ नंबर खांबावर, १९ आकडा लिहीलेला बारका कागद चिकटवला होता. तेवढ्यात तिथे एक व्हॉल्व्हो आली. विचारलं तर ती चंदीगढ रोड ट्रान्स्पोर्टची होती. आमची तिथेच नंतर येईल असं कळलं.
तेवढ्यात आधीची बस जाऊन आमची आली. बघितल्यावर, ही बस? असं झालं कारण आधीची अगदी चकाचक होती. ह्यात एसी होता, पण पडदे नाहीत. बसही जुनाट होती. दिलेल्या वेळेला बरोबर निघाली तेव्हा मॅपवर मनाली साडेसात तास दिसत होतं. आम्हाला दिलेलं हॉटेलही स्टँडपासून दोनच किमी होतं.. त्यामुळे जेवणखाणाचा वेळ धरला तर जास्तीत जास्त नऊ तासात म्हणजे सहा पर्यंत पोहोचू असा अंदाज होता
प्रवास सुरु झाला. साडेअकराला बस बिलासपूरच्या आगेमागे एका बर्याश्या हॉटेलजवळ थांबली. मला वाटलं चहा ब्रेक घेत असतील कारण जेवायला साधारण मंडीच्या आसपास थांबू असा अंदाज होता. तर ड्रायव्हर म्हणे २५ मिनीटात परत या. मी विचारलं तर म्हणाला हाच लंच ब्रेक. बरोबर म्हणजे बरोबर २५ मिनिटानी हॉर्न वाजवून सगळ्यांना बोलावलं आणि प्रवास सुरु झाला. मधून मधून डुलकी लागत होती.
एक दिडच्या दरम्यान मंडीला पोहोचलो आणि तिथपासून जे वाईट्ट ट्रॅफिक लागलं की अर्धा अर्धा तास एकाच जागी उभे. कंटाळा येईपर्यंत. शेवटी अगदी कण कण करत सहाच्या दरम्यान कुलू बस स्टँडला बस आली आणि आम्हाला उतरुन, सामान घेऊन दुसर्या बस मध्ये बसाय्ला सांगितलं ! वैताग आला पण करणार काय ! डिकीतून बॅगा काढून दुसर्या बसमध्ये चढवून ( नशिबाने ) लगेचच बस बाहेर पडली. हायवेला लागली तर इंजिनमधून आवाज यायला लागला. तीन चार वेळा कडेला घेऊन, काहीतरी करुन ड्रायव्हरने ते ठिक केलं आणि मरतमरत शेवटी आठ वाजता मनालीला पोहोचलो. काय ती गर्दी !!! एव्हाना तिकडे ब्रिफींग झालेलं होतं. फक्त आमची दोस्तमंडळी असल्याने मला सगळे अपडेटस मिळत होते. मागच्या ट्रेकला आमचा जो ट्रेक लिडर होता, नविन राणा, तोच ह्यावेळीही होता, त्याला आम्ही खास मागून घेतलं होतं. शिवाय महेशच्या केदारतललाही तोच होता.
धक्के देत, खात स्टँडमधून बाहेर पडलो तर कॅब/ रिक्षाच मिळेना. चहा घेऊ आणि काय ते बघू म्हणून एका टपरीवर चहा घेतला आणि अगदी सहज त्या बाईंना केदारनी विचारलं की रिक्षा कुठे मिळेल तर शेजारीच उभा असणारा माणूस म्हणला, कुठे जायचंय ? त्याचीच रिक्षा होती आणि तो सोडायला तयार झाला. ५०० रुपये ! अंतर फक्त २ किमी. पण एवढे थकलो आणि कंटाळलो होतो की चल बाबा एकदाचं म्हणून बसलो रिक्षात. दोनच किमी जायचं असलं तरी वाहनांच्या रांगाच रांगा होत्या. अख्खं जगचं मनालीत आलं होतं की काय कोणास ठाऊक !. फायनली साडेआठला हॉटेलला पोहोचलो आणि कळलं की तिथे किचन नाहीये !! मग सामान खोलीत टाकलं जेमतेम आणि लगेच शेजारी असलेल्या खानावळ टाईप ठिकाणी गेलो. अगदीच घरगुती होतं पण मस्त गरम गरम फुलके आणि आलूमटर खाल्लं. परत आल्यावर तोवर बाहेर गेलेले आमचे जुने ग्रुप मेंबर्स भेटले. आमचा १६ जणांचा जम्बो ग्रुप होता, त्यातले ७ जण आम्ही बालीपासचे तर इतर ९ जण असेच एव्हरेस्ट बेस कँपला ओळख झालेले होते.
उद्या ९ वाजता निघायचं आहे आणि मुख्य म्हणजे एकही दिवस पॅक्ड लंच नाही म्हणून डबे घेऊ नका हे महत्तवाचे निरोप मिळाले आणि बाय बाय करुन आम्ही झोपलो.
सकाळी सवयीनी आणी एकूणच लवकर उजाडलं म्हणून जाग आली. साडेसात वाजता केदारला उठवलं आणि कालसारख्याच एका छोट्या ठिकाणी ब्रेकफास्ट करुन आलो. आंघोळ करुन ( आता आठवडाभर आंघोळीची गोळी ) बॅग्ज अॅडजेस्ट केल्या. एक छोटी आम्ही (सगळेच) तिथेच ठेवणार होतो. ती सोडून प्रत्येकी २ बॅग्ज होत्या.
बरोबर ८.५५ ला खोली रिकामी करुन रिसेप्शन गाठलं तर कोणाचाच पत्ता नाही. वाट बघून सव्वा नऊला ग्रुपवर मेसेज टाकला की आम्ही आलो आहोत तर एकेकाने लिहीलं, आम्ही आत्ताच ब्रेफाला आलो आहोत/ निघालो आहोत/ येतोच आहोत.. शेवटी पावणेदहाला मंडळी जमली. जुजबी ओळखी झाल्या आणि दहाला बस निघाली. पुन्हा एकदा ट्रॅफिकचा खेळ खेळत अर्धातासाच्या रस्त्याला सव्वा तास लागून आम्ही धुंडी ह्या आमच्या पहील्या टप्प्यावर पोहोचलो. इथून फोनची रेंज गेली. सव्वा अकरा वाजले होते. घोडे अजून आले नव्हते. सावकाश घोडे, इतर गाईड्स, टेंट्स वगैरे सामान आलं. गाईड्सनी ओळखी करुन दिल्या. एक मुख्य आणि ५ इतर असे एकूण ६ गाईड्स होते. पावणेबाराच्या सुमारास चालायला सुरुवात केली.
आज तीन तास चालायचं होतं. खरं तर आज पॅक्ड लंच द्यायला हवं होतं. ह्यावेळी मला TTH च्या जेवणाच्या प्लॅनिंगमध्ये सुसूत्रता जाणवली नाही. आमच्या मनात बाली पास ला मिळालेली मस्त आणि विविध जेवणं हा मापदंड होता.
रस्ता ठिक होता. चढ होता, अरुंद , दगडांचा होता पण ठिक होता. सावकाश चालत, अनोळखी लोकांशी ओऴख करुन घेत पुढे जात राहीले. एक आई आणि मुलगा असे दोघे एकत्र येतात ह्याचं केवढं अप्रुप वाटलं सगळ्यांना. परत परत सगळ्यांकडून ऐकतांना मजा वाटत होती. आणि शिवाय, हम आपके ऊम्र के होंगे तो पता नही सिढीया तोभी चढ पायेंगे के नही असंही. म्हणजे काय ? मी त्यांना म्हणायचे, मुलांनो, तुम्ही इतक्या लहान वयात सुरुवात केली आहे, त
माझ्यासमोर एक फार कठीण टास्क होतं. केदारवर लक्ष ठेवायचं पण त्याला जाणवूही द्यायचं नाही. कंट्रोल ठेवायचा पण तो नकळत. अनेकदा नाही असं ठरवूनही सल्ले दिले, ओरडलेही काही वेळा. १/२ दिवस आमचे खटके उडाले पण मग सुरळीत झालं सगळं.
महीनाभर वाटाघाटी करुन केदार माझ्याबरोबर पाच, ( तब्बल पाच !!!) फोटो काढून घ्यायला तयार झाला होता. त्यातला हा एक.
चालायला सुरुवात केल्या केल्या तासाभरात एका प्रशस्त पठारावर हॉल्ट घेतला तो पाऊण तास. कारण घोडे पुढे गेले नव्हते. बसून बसून शेवटी कंटाळा आला.
पूढे एका ठिकाणाहून हनूमान टिब्बा हे शिखर दिसलं. ते जवळजवळ १९००० फूट आहे आणि चढायला फार कठीण. आणि इतरही लहान मोठी शिखरं दिसत होती. पुढे चालतांना एका ठिकाणी मनालीच्या माऊंटेनिअरींग इन्स्टिट्यूटचा कोर्स चालू होता त्याचे लोक लांबून अंधूक दिसले.
(हे जे छोटे ठिपके दिसत आहेत ना उतारावर, ते लोक आहेत)
माझं डोकं बारीक बारीक दुखायला लागलं होतं. पहील्यांदा जाणवलं तेव्हा धस्स झालं, AMS ( altitude mountain sickness ) तर नाही ना म्हणून. आधी तिच शंका येते मनात. पण दोन वाजायला आलेत आणि अजून जेवण झालं नाहीये, सकाळचा ब्रेफा कुठेच जिरला हेच कारण असेल ( असायलाच हवं ) म्हणून स्वतःला सांगत राहीले.
शेवटी तीनच्या दरम्यान कॅंपसाईटवर पोहोचलो. भक्तरचाल. हे साधारण १०,८०० फूटांवर आहे.
जातांना तोंडात काजूबदाम टाकत होते पण डोकं चढलं होतंच. कँपसाईटवर जाऊन, स्वतः पुढाकार घेऊन टेंटस लावाय्ला घेतले की गाईड्स पण मदत करतात आणि आपला टेंट लवकर लाऊन होऊ शकतो., आपण मदत केल्याचं समाधानही मिळतं. केदारला अशी लुडबूड आवडतेच. तो पटकन पुढे गेला आणि मदत करु लागला. पहील्याच दिवशी ३/४ जणांचे टेंट लावायला मदत करुन तो अगदी एक्स्पर्ट झाला. इतका की पुढे प्रत्येक ठिकाणी आम्हाला कोणी मदतीला यावं अशी वाटच बघाय्ला लागली नाही. तोच भराभरा काम सुरु करायचा आणि मी त्याच्या हाताखाली !!!! मदत करायचे.
माझं सगळं लक्ष किचन टेंटकडे होतं. तिकडे काम सुरु होतं. आज खिचडी/ दाल चावल असणार अशी अपेक्षा होती आणि खिचडीच होती. खूप चविष्ट होती. पावणेचार वाजता लंच मिळालं. मी ठरवलं होतं, जेवल्यावर तासभर वाट बघायची, डोक थांबलं तर ठिक, नाहीतर गोळी घ्यायची ( आम्ही ऊंचावर घ्यायची डायमॉक्स कधीच घेत नाही. डोकेदुखीसाठी मी माझी हक्काची सॅरीडॉन खाते.) आणि तरी नाही थांबलं तर ट्रेक लीडरला सांगायचं. पण नशिबाने २०/२५ मिनीटात थांबल दुखणं. आणि मी हुश्श केलं. ( पण उशीरा पोहोचल्याचा फायदा म्हणजे अक्लमटायजेशन वॉक टळला. )
जेवण झाल्यावर थोड्याच वेळात चहा आणि ब्रेड पकोडे होते. चहा घेतला पण पकोड्यांकडे बघवेना. इकडे आमचा ऑक्सीजन आणि पल्स चेक केलं. माझा ऑक्सीजन ९१ पण पल्स १०१ आल्यावर मला जरा शंका आली पण चेक करणारा निवांत होता. इकडे असेच आकडे येतात. काळजी करु नका, दम लागत नाहीये ना एवढं बघा असं म्हणून तो निघून गेला.
ही कँपसाईट अगदी लहानश्या टेकाडावर होती म्हणून बसायला धड जागा नव्हती. आम्हाला टेंटमध्ये जाऊ नका/झोपू नका,बाहेरच थांबा असं सांगितलं होतं. मला वाचत बसायचं होतं पण जागा मिळेना म्हणून तशीच टेकडीच्या कडेला जाऊन बसले. संध्याकाळी भुरभूर पाऊस पडायला लागला. गाईड्सपैकी एकाशी बोलत होते तर तो म्हणे, यहा १६ से मान्सून चालू हो रहा है ऐसे बताया है. म्हणजे अख्खा ट्रेक पावसात होणार ! थंडी एकवेळ मॅनेज करता येते पण पाऊस नको. कपडे ओले आणि थंडीत अजून वाढ.
रात्रीच्या जेवणात दाल राईस, कोबीची भाजी, पोळ्या होतं. मी फक्त थोडा दाल राईस घेतला.
रात्री झोप अशी लागली नाही.
सकाळी, सकाळी कसलं पहाटेच लवकर जाग आली पण काय करणार उठून म्हणून पडून राहीले. इकडे पहाटे चारलाच ऊजाडायला लागतं असं दिसलं आणि रात्री आठ पर्यंत पुढची २/५ पावलं दिसतील इतपत प्रकाश असतो.
आमची एक पंचाईत झाली होती. मनालीला रिक्षातून सामान काढतांना पाण्याची बाटली रिक्षातच पडून गेली आणि हॉटेलमध्ये घेतली ती बाटली मी तिथेच विसरले. एरवी चालतांना वॉटर हायड्रेशन बॅग्ज होत्या पण जेवायला जातांना पाण्यासाठी मोठा थर्मास नाचवत न्यावा लागायचा. आम्हाला पहील्या दिवसापासून रोज रात्री कोमट पाणी मिळालं. ते हायड्रेशन बॅग्जमध्ये थोडं घेऊन ( त्या जाड मटेरीयलच्या असतात पण उगाच वितळल्या वगैरे तर वैताग !) आणि थर्मास भरुन घेऊन ठेवायचो. थर्मासमधलं अर्ध पाणी उरवून ते दुसर्या दिवशी दात घासायला (!) वापरायचो.
पाच वाजता उठून दात बित घासून जरा वेळ बाहेरच बसले. चांगलीच थंडी होती पण तरी बसून राहीले. आज साडेसहा वाजता चहा, मग ब्रेफा आणि साडे आठला निघायचं होतं. वेळेवर पोहोचलात तर बियास कुंड बघायला जाता येईल असं आमिश दाखवलं होतं.
ब्रेफाला जॅमब्रेड, ऑम्लेट आणि व्हेज सँडविच होतं.
साडेआठ म्हणता म्हणता नऊ वाजलेच निघायला. आमच्या बरोबर जो EBC करुन आलेला ग्रुप होता, ते लोक अगदी पिकनीकला आल्यासारखे वागत होते. आरामशीर तयार होणं, जेवायला अनेकदा बोलावून लवकर न येणं, सतत आवाज, गडबड, गप्पा, हसणं, गाणी... आमचा ट्रेकलीडर वैतागत होता. ओरडत होता. पण त्यांच्यावर परिणाम शुन्य.
ही वरुन दिसणारी आमची कालची कँपसाईट.
आता मुक्काम लेडी लेग. १२,८०० फूट.