फ्रेंडशिप पीक एक्सपिडीशन - दिवस तिसरा, चौथा आणि पाचवा

तर आजचा मुक्काम होता लेडी लेग कँपसाईटवर.

मी जे वाचन केलं त्यात होतं की ही कँपसाईट झोपलेल्या स्त्रीच्या पायासारखी दिसते म्हणून नाव लेडी लेग. मग झोपलेल्या पुरुषाचा पाय असा काय वेगळा दिसतो ते कळेना ! तर मुल होतांना स्त्रीचे पाय जसे असतात तश्या त्या टेकड्या दिसतात म्हणून लेडी लेग !!! हे अर्थात लक्षात येत नाही. वरुन, आकाशातून दिसत असेल.

आजही तीन वगैरे तास चालायचं होतं.

केदार टणाटण उड्या मारत पुढे निघून गेला होता. आज चालणार्‍यांमध्ये तीन भाग पडले. पुढे, वेगात जाणारा एक गट, मध्येच एकटी मी आणि मागून गप्पा मारत, टिपी करत येणारा तिसरा गट. अजून एखादं कोणीतरी क्वचित जरा माझ्या मागे पुढे असायचं. पण एकटं चालायला मला तरी आवडतं. तेच बरं. सारखं काय आणि किती बोलणार कोणाशी !

दुसर्‍या EBC ग्रुपमध्ये एक मुलगा होता, तो त्यातल्या त्यात वेळेवर तयार होऊन हजर राहणारा आणि तयारीचाही दिसत होता. त्यांच्यात तोच पुढे असायचा. पण त्याची चालण्याची पद्दत वेगळीच होती. जनरली चढतांना झिग झॅग चढतात, म्हणजे ऊंची सावकाश गाठली जाते. हा ते झिग झॅग छेदत चालायचा. त्यामुळे अनेकदा तो अडकायचा कारण रस्ताच नसे. मग पुढे असलेला गाईड वरुन ओरडायचा. मी वयाचा अधिकार वापरुन एक दोनदा रागावून घेतलं त्याला.
आणि एक मुलगी होती, ती फार उत्साही होती. अखंड बडबड आणि हसणं. नेमकी त्या दिवशी ती माझ्या मागेच होती. तिच्या बॅगला एक लहानशी घंटा अडकवली होती, ती सतत वाजायची आणि मागून घोडे आलेत की काय असं वाटून मी किती तरी वेळा वळून बघितलं असेल.

whatsapp_image_2024-07-09_at_10.41.03_am.jpeg

ह्या आम्ही दोघी.

रस्ता चढाचा, पण छान होता. हवेत सुखद गारवा होता, एवढाच की डाऊन जॅकॅटही घालावं लागलं नव्हत. थांबलं की फक्त जरा शिरशिरी यायची.

whatsapp_image_2024-07-09_at_10.42.13_am.jpeg

आज माझा फोन केदारच्या ताब्यात होता कारण त्याच्या फोनवर फोटो नीट येत नाहीत अशी त्याची तक्रार होती. तसं तर तुझ्याही फोनवर येत नाहीयेत, आपण बाबांचा फोन आणायला हवा होता वगैरे वगैरे सुरुच होतं.

whatsapp_image_2024-07-09_at_10.42.49_am.jpeg

हे आम्ही असे चढून आलो.

रमतगमत आम्ही एका पठारावर पोहोचलो. आम्हाला सांगितलं, आराम करा थोडा वेळ, मग सगळे पसरले .घोडे आलेच नव्हते. मस्त प्रशस्त जागा होती. थोडे पुढे काही टेंट्स दिसत होते म्हणजे हीच कँपसाईट ! सगळे ग्रुप्समध्ये विखुरले आणि मी जॅकेट डोक्याखाली सारुन वाचायला सुरुवात केली.

whatsapp_image_2024-07-07_at_9.32.14_am.jpeg

यथावकाश घोडे आले, पुढे गेले आणि चला, चला टिम अश्या हाका सुरु झाल्या. म्हणजे ही कँपसाईट नाहीच. अजून पाऊण एक तास चालून शेवटी आम्ही पोहोचलो. इकडे भरपूर जागा होती. त्यातल्या त्यात सपाट जागा बघून आम्ही दोघांनी आमचा टेंट लावायला घेतला.

whatsapp_image_2024-07-09_at_10.48.47_am.jpeg

ही आमची सुंदर कँपसाईट.

लावता लावता केदार हळूच म्हणाला, आई एक प्रॉब्लेम झालाय !!. एका क्षणात माझ्या डोक्यात, AMS, कुठेतरी दुखणं, काहीतरी चुक अश्या अनेक शक्यता आल्या. माझा गॉगल हरवला. मगाशी थांबलो तिथेच कुठेतरी पडला.

आमचे हे गॉगल्स अँटी ग्लेअर गॉगल्स आहेत (होते !). बर्फात घालण्यासाठी, आणि तोच हरवला. अरे बाबा, शेवटच्या दिवशी तोच तर उपयोगी पडणार आहे ना.. तर म्हणाला, मी परत जाऊन बघतो, मला आठवतंय कुठे पडला असेल ते !!
आणि मग तुला शोधायला आम्ही येऊ का ? असं म्हणून त्याला आत्ता राहू दे, बघू काय करता येईल असं सांगून काम पूर्ण केलं आणि सामान आत टाकलं. जेवतांना सहज गॉगलचा विषय काढला तर दोन जणांकडे जास्तीचे होते. सनीच्या गॉगलवर लगेच क्लेम सांगितला आणि ह्या ट्रिपमधलं माझं हे एक लर्निंग होतं. जास्तीचे गॉगल नेणे. !!

सनीने दिला तो रे बॅनचा होता, शिवाय अ‍ॅन्टी ग्लेअर नव्हता, त्यामुळे मी माझा केदारला दिला आणि सनीचा माझ्यासाठी ठेवला. (बाली पास ग्रुपपैकी मी ज्यांच्या सतत संपर्कात असते त्यापैकी हा एक सनी. तो आणि त्याची बायको नॅशनल लेव्हलवर खेळलेले आहेत. ब्राझिलीयन जुजूत्सू अश्या काहीतरी नावाच्या खेळात.
सनी, त्याचा सख्खा मित्र रॉनी आणि तिसरा जीतू ह्यांच्याशी केदारची पहील्याच दिवशी मस्त गट्टी जमली. रॉनी आणि जीतू सारखे केदारबरोबर होते त्यामुळे मी निश्चींत होते ).
सनीची बायको अनन्या आणि तिची मैत्रीण रितीका ह्या आमच्या ग्रुपमधल्या दुसर्‍या दोघी. रितीकाला शेवटपर्यंत कोणीच टेंट शेअर करायला मिळालं नाही. इबिसी ग्रुपमधल्या तिघी एकच टेंट शेअर करायच्या पण तिच्याबरोबर कोणी आलं नाही. तिचा टेंट आमच्या शेजारीच असे कारण स्वतः पुढाकार घेऊन टेंट लावणार्‍यांपैकी ती पण एक होती. एकटीच आहेस तर रात्री अपरात्री काही लागलं तर सरळ हाक मार असं तिलासांगून ठेवलं होतं
गॉगलचं तर काम झालं !

पहील्या दिवशी मी केदारला पॅकींग करण्याबद्दल सुचना दिल्या होत्या, आता त्याचं तो पाहून घेईल असा ( खूप जड मनाने ) विचार करुन त्याला पूर्ण सूट दिली.

आजही जेवायला ( फार नसला तरी ) उशीर झाला. जेवायला होता कढी भात. आणि संध्याकाळी चहाबरोबर भजी.
चहानंतर आम्हाला बियास कुंड बघायला नेलं. एक बर्‍यापैकी मध्यम चढ होता आणि टोकावरुन खाली कुंड दिसत होतं. तिथूनही वर एक लहानसं अरुंद टेकाड होतं. केदार तिथेही चढून गेला.

whatsapp_image_2024-07-09_at_10.51.17_am.jpeg

आणि हे वरुन दिसणारं बियास कुंड

whatsapp_image_2024-07-09_at_10.51.27_am.jpeg

परत आलो तेव्हा मुख्य गाईड आणि एक दोन जण आम्हाला द्यायचं सामान ( ट्रेकींग गिअर्स ) मांडून ठेवत होते. आमचे शुज साईज आधीच नोंदवून घेतले होते त्याप्रमाणे स्नो बुट्स आणले होते.

प्रत्येकाला त्याच्या साईजप्रमाणे स्नो बुट्स ( नेहमीच्या साईजच्या वरचा एक साईज ),

whatsapp_image_2024-07-07_at_9.25.22_am.jpeg

क्रॅम्पॉन्स,

crampons.png

गेटर्स,

gaiters.png

हार्नेस,

harness.png

आईस अ‍ॅक्स,

ice_axe.png

रोप आणि हेल्मेट दिलं.

मग ते शुज कसे घालायचे हे सांगितलं. स्नो बुट्र्सच्या आत अजून एक बुट असतो, तो काढू नका, आत घालणं कठीण होतं हे म्हणे पर्यंट ४/५ जणांनी ते बाहेर काढलेही होते !!
स्नो बुट्स कडक, टणक असतात. पाय कसाही वाकवला तरी अजिबात हलत नाहीत त्यामुळे मस्त सपोर्ट मिळतो.

क्रॅम्पॉन्स खूप जपून हाताळावे लागतात. खालून खिळ्यांसारखी टोकं असतात, ती लागतात.
कडक बर्फ असेल तर क्रॅम्पॉन्स घालावे लागतातच, नाहीतर चालता येणार नाही.

क्रॅम्पॉन्स कसे घालायचे - बुट चढवलेला पाय क्रॅम्पॉन वर नीट ठेवायचा. मग मागच्या बाजूने एक खटका असतो तो वर करुन साधारण टाचेच्या वर बुटांमध्ये एक खाच असते त्यात बसवायचा. पुढच्या टोकाला एक लूप असतो त्यात एक पेर एवढ्या रुंद लेसेस असतात त्या तो पावलाच्या दोन्ही बाजूने वेढून, मागच्या खटक्यातून येणार्‍या लेसेसमधून अडकवून मग खटके लाऊन टाकायचे. हे करायला खटपट करावी लागते कारण जराजरी पाऊल इकडे तिकडे हललं की सगळं सैल होऊ शकतं.

मुख्य म्हणजे ह्यासगळ्या आधी हार्नेस चढवायची. ती कमरेच्या वर घट्ट करायची आणि दोन्ही मांड्यांनाही. हार्नेसची समोरची बाजू माझ्या चटकन लक्षात राहिली. एक मोठं बक्कल असतं तिथे, त्यात आईस अ‍ॅक्सचा आणि सपोर्टचा असे दोन्ही रोप्स अडकवतात. पण डावी उजवी बाजू काही समजेना. तेव्हा ते नंतर बघू म्हणून सोडून दिलं.

हा जामनिमा कसा चढवायचा हे समजावून घेऊन, चढवून बघितला आणि तेवढ्यात पाऊस सुरु झाल्याने घाईघाईने ते सगळं उतरवून टेंटमध्ये नेऊन ठेवलं.

क्रॅम्पॉन्स लावलेले स्नो बुट्स घालून चालतांना हवेत तरंगत आहोत की काय असं वाटत होतं. झोंबीज कसे एक एक पाऊल टाकत चालतात तसं.

जेवणाची वेळ होईपर्यंत सगळे डायनिंग टेंटमध्ये जमले. गप्पा, खेळ सुरु झाले. पुढे जेवतांना सांगितलं की उद्या हे सगळे अलंकार घालून तयार रहायचं., फक्त क्रॅम्पॉन्स आणि रोजचे ट्रेकींग शुज बॅगमध्ये ठेऊन घ्यायचे.

उद्या आमचं ट्रेनिंग असणार होतं. ते करत वर, अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्पला जायचं, तिथे तो जामनिमा उतरवून ठेवायचा आणि नेहमीचे शुज घालून जेवायला खाली परत यायचं.
ह्याला म्हणतात 'लोड फेरी'. वरच्या लेव्हलवर जाऊन सामान ठेऊन येणे.
वरची लेव्हल - अ‍ॅडव्हान्स बेस कँप. ऊंची १५,५०० फूट

जेऊन आल्यावर हेड टॉर्चच्या अपुर्‍या उजेडात,, आता हे नेहमीचच असतं., उद्याचं ब्रिफींग (किती वाजता चहा ब्रेफा, निघायचं कधी, रस्ता कसा असेल, रस्त्यात पाणी मिळू शकेल का, इतर काही महत्त्वाचं असेल तर ते ) रात्री जेवतांना करतात त्याप्रमाणे सामानाची हलवाहलव नंतर हेड टॉर्च चढवून आणि छोटा टॉर्च टेंटच्या मध्यावर छताला एक हुक असतो त्यात अडकवून अंधारात करावी लागते. आपल्या हालचालींनी टेंट हलतो त्यामुळे वर अडकवलेला टॉर्च हलतो, शिवाय समोरच्याच्या हेड टॉर्चचा उजेड आपल्या डोळ्यात जाऊन काजवे चमकतात ते वेगळेच.
त्यामुळे निदान ब्रिफींग चहाच्या वेळी करा म्हणजे जरातरी उजेडात काम करता येईल असं सांगूनही ब्रिफींग जेवतांनाच करतात !

पॅकींग केलं. फक्त डे सॅक्स घेऊन जायच्या होत्या. त्यात क्रॅम्पॉन्स ठेऊन सॅक्स फाटू नयेत म्हणून कपडे ठेवलेल्या पिशव्या रिकाम्या केल्या आणि त्यात गुंढाळून घेतले. माझ्या सॅकमध्ये शुज आणि क्रॅम्पॉन्स मावेनात म्हणून मग केदार म्हणाला, मी नेईन. पण त्याला माझे ओझे द्यावे असेही वाटेना. शेवटी दुसर्‍या दिवशी युक्ती सुचली आणि मी शुज सॅकच्या बाहेर बांधले आणि मग आत जागा झाली.

बाय द वे, रात्री जेवायला आलू मटर, पोळ्या, दाल राईस आणि गोडात सुजी हलवा होता. छान होता.

हा जो इबिसी ग्रुप होता तो फार आवाज करणारा होता. अखंड हसणं, ते ही हास्य क्लबमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारे हसतात तसं हसणं, मोठ्यामोठ्याने गप्पा, मोबाईलवर गाणी लाऊन वर भलतीच गाणी गात राहणं, असं सगळं एकाच वेळी सुरु असायचं. बरं थंडी एवढी होती की स्लीपींग बॅगमधून बाहेर येऊन, डायनिंग टेंटमध्ये जाऊन त्यांना ओरडायचं जीवावर येत होतं. खूप उशीरापर्यंत आवाज सुरु होते त्यामुळे माझ्या झोपेचं पार खोबरं झालं. मग झोप लागलीच नाही. जागी होते म्हणून थंडी पण जास्तच जाणवू लागली. शेवटी कसंबसं हात बाहेर काढून चाचपडत वॉर्मीजचा पॅक शोधला आणि एक काढून पोटावर ठेवला.

वॉर्मीज हे एक तळहातावर मावेल असा चौकोन असतो. तो पॅकमधून काढून तळहातात घासायचा आणि जिथे हवा तिथे ठेवायचा. शरीराची उष्णता घेऊन जरा वेळाने तो गरम होतो आणि जरा ऊब मिळते, फक्त तो डायरेक्ट शरीरावर ठेवायचा नाही, भाजतं. पण तो इतका लहान असतो की हजारदा हवा तिथे हलवावा लागतो. जरा मोठा, निदान लहान वहीएवढा काढला तर एकाच वेळी पोट छाती किंवा पाठ कव्हर होऊ शकते. हा डेकेथलॉनमध्ये मिळतो. दहाचा वगैरे पॅक असतो. असेच पावलांवर ठेवायचेही मिळतात. ते सॉक्सवर ठेऊन वर दुसरे सॉक्स घालायचे.
तर एक वॉर्मि ठेऊन घेतला. पहाटे शेवटंच बघितलं तर पावणे चार वाजले होते तेव्हा जरा डुलकी लागली.

सव्वा पाचला जाग आली तेव्हा अजिबात उत्साह वाटत नव्हता. आज दहा वाजता निघायचं होतं. ब्रेफाला पोहे आणि मॅकरोनी होती. मी थोडेसेच पोहे खाल्ले. आणि ही एक चूक मला नंतर भोवली कारण नीट खाल्लेलं नाही, अपूर्ण झोप त्यामुळे लवकर थकले.

दहा म्हणता म्हणता साडेदहा झाले तेव्हा नविन इबिसी ग्रुपवर चांगलाच भडकला. त्यांच्यापैकी २/३ जणच वेळेवर येत असत. बाकी आम्ही बाली पास ग्रुप तयार असायचो. एका मिनीटात निघाला नाहीत तर नेणार नाही असा निर्वाणीचा इशारा देऊन आम्हाला चालायला सुरुवात करायला सांगितली.

whatsapp_image_2024-07-07_at_9.25.20_am_1.jpeg

हे तयार होतांना आम्ही.

whatsapp_image_2024-07-07_at_9.25.21_am.jpeg

आणि मी

आजचं चालणं मजाच होती. बुट घालून, सुरुवातीला मोठे मोठे खडक होते त्यावरुन चालताना तारांबळ उडत होती.

मग सुरु झाला बर्फ आणि आमची परिक्षा.
चालायला सुरुवात केली आणि तेवढ्यात कोणीतरी, मी गॉगल विसरलो असं म्हणाल्यावर नवीन पुन्हा चिडला. नशिबाने रितीकाकडे असलेला दुसरा गॉगल त्याला मिळाला, नाहीतर त्याला खरंच कॅम्पवर परतही पाठवलं असतं.

आधी नविननी आम्हाला बर्फात चालण्याच्या तीन बेसीक पद्धती दाखवल्या.
१. डक वॉक - बदकासारखं पावलं तिरकी करुन फताडं चालणं.
२. टो वॉक - पायाच्या बोटांवर चालणं. हे सरळ उभा चढ असेल तिथे उपयोगी पडतं. टाच अजिबात टेकवायची नाही.
३. साईड वॉक - तिरकं चालतांना पावलाच्या कडांच्या मदतीने चालणं.
अजून एक हिल वॉक - उतरतांना टाचेवर उतरणं.

आम्ही चालणार होतो तो बर्फ रात्री कडक असणार होता, त्यामुळे पावलं टाकतांना जोरात बर्फावर आघात करुन टाकावी लागणार होती, ह्याची प्रॅक्टीस करतांना भरपूर बोलणी खाल्ली.

मला टो वॉक नाही म्हणजे नव्हतंच जमत. माझ्या मते मी टाच उचलत होते पण त्यांच्या मते टाच बर्फावरच होती. भरपूर ओरडणं ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की मला जे वाटतंय की मी टाच उचलते आहे ती बुटातल्या बुटात उचलली जातीये, बुट तसाच राहतोय!.
बोलणी खात खात एकदाचा तो प्रकार संपला.

whatsapp_image_2024-07-07_at_7.06.21_pm_2.jpeg

whatsapp_image_2024-07-07_at_9.25.20_am.jpeg

आणि केदार माझी मजा बघत होता. ना कानाला काही बांधलंय, ना ग्लोव्ज घातलेत, इतकंच काय, जॅकेटही नाहीये आणि हे मी आत्ता, फोटो अपलोड करतांना नोट केलं. Nottalking
btw स्नो बुट्स घालून बसतांना असं बसायचं, नीट बसता येतं. नाहीतर आ अ‍ॅ बर्फात खोचून त्यावर वजन टाकून वाकून दम टाकायचा.

मग सुरु झाली पडण्याची प्रॅक्टीस. शेवटच्या ट्प्प्यात, जिथे ८० अंशाचा चढ असणार होता तिथे रोपच्या मदतीने चढायचं होतं. रोप धरुन ओढून नाही तर रोपला आपण जोडले जाणार.
ह्यात एखादा/दी घसरली तर ती व्यक्ति बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणार. हे होऊ नये म्हणूनची प्रॅक्टीस.

सोळा जणांना दोन गटात विभागलं. सगळ्यांच्या हार्नेसमध्ये रोप जोडला गेला आणि चाला म्हणून सांगितलं. रोप जमिनीवर लोळता कामा नये, नाहीतर पायात येऊ शकतो. तो खूप जास्त ताणलाही जाऊ नये. मध्यम ओढ बसली पाहीजे आणि कंबरेच्या ऊंचीवर असला पाहीजे.
माझ्या गटात, माझ्या पुढे आमच्यातले सगळे तयार लोक होते. एव्हाना मी झोप न झाल्याने आणि नीट ब्रेफा न केल्याने खूप हळू हळू थकायला लागले होते. चालतांना मध्येच मी थांबले तर मला ओरडुन पुढच्यांना थांबवावं लागत होतं.

तर पडायचं किंवा सावरायचं कसं ?
१. पडणार्‍याने पडतांना जोरात I'm falling असं ओरडायचं ( जसं काही खरोखर पडतांना लक्षात राहणार आहे !)
२. हे ऐकताच बाकीच्यांनी स्वतःला बर्फावर झोकून द्यायचं आणि त्याचवेळी आईस अ‍ॅक्स बर्फात जोरात मारायची, कुर्‍हाड कशी मारतो तशी.
( मध्येच अवांतर आईस अ‍ॅक्स बद्दल. आ अ‍ॅ ला बर्फातला 'तिसरा पाय' म्हणतात. पडत असू तर सावरायला, बर्फात पायर्‍या खोदायला, चढावर आधार घ्यायला इतकच नव्हे तर दमलो तर दम टाकायलाही ती वापरता येते. ती बर्फात खुपसायची आणि तिच्यावर ओणवं होऊन, आधार घेऊन आराम करायचा. खाली फोटो देते )
आ अ‍ॅ ला एक लूप असतो, तो हातात अडकवायचा, शिवाय एका रोपने ती हार्नेसच्या हुकलाही जोडलेली असते. म्हणजे जर हातातून निसटली तरी पडून जाणार नाही)
३. पडतांना आ अ‍ॅ अशी मारायची की तिच्या जोरावर आपण, लाईनमधले इतर आणि पडणारा असे सगळे सावरले गेले पाहीजेत.
म्हणजे असं इमॅजिन करा की एक जण घसरत जातोय आणि तुम्ही ( आणि इतरांनी ) आ अ‍ॅ बर्फात रुतवली आहे. थोडं अंतर खाली घसराल पण बर्फातल्या आ अ‍ॅ मुळे तो वेग थांबवला जाईल.
४. मूळ पडणारा सावरला की त्याने उभं रहायचं आणि I'm safe असं ओरडायचं. हे ऐकल्यावरच बाकीच्यांनी एकामागे एक ऊभं रहायचं.
बरं, ऊभं राहताना हात, गुडघे टेकवत नेहमीप्रमाणे उभं रहायचं नाही. त्याचीही पद्धत आहे. ती काही मला लिहीता येत नाहीये. पण ती कोणालाच जमली नाही त्यामुळे तो नाद सोडला गेला.

हे सगळं समजवल्यावर आम्हाला सांगितलं की चालायला सुरुवात करा. आम्ही रँडमली एक नंबर ओरडू, त्याने पडायचं. आणि पडल्यावर आम्ही ( म्हणजे गाईड्स ) सांगू तोवर उठायचं नाही.
पहीला फॉल झाल्यावर ते लोक एकामागे एक आमच्या जवळ आले आणि खस्कन रोप धरुन ओढला. आ अ‍ॅ नीट खुपसली गेली आहे का ते बघायला. अर्थात ती तशी कोणाचीच नव्हती. मग पुन्हा बोलणी खाल्ली.
दुसर्‍या फॉलपर्यंत मला एक युक्ती सुचली. पडतांना मी आधी पडले ( पडले म्हणजे नीट गुडघे वगैरे टेकवून आडवी झाले, सगळेच तसे पडत होते) आणि मग आ अ‍ॅ जोरात खुपसली. परिणामी माझी मस्त, त्यांना हवी तशी सेट झाली. मग, देखो, मॅमने कितना जोर लगाके आ अ‍ॅ सेट किया है, ऐसे तो वो अकेलीही सबको बचा लेगी वगैरे बोलून मगाशी टो वॉकला जे जे ऐकवलं होतं त्यावर जरा मलमपट्टी केली गेली.

पुढे दोन दोन जणांना पडायला सांगितलं.

हे सगळं फार न झेपणारं व्हायला लागलं होतं. आधी उत्साहात असणारे सगळे जण पाय ओढत चालले होते.

एकदाचं हे ड्रील संपलं कारण आम्ही ऑलमोस्ट अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्पला आलो. आता झालं असे म्हणेपर्यंत, क्रॅम्पॉन्स चढवा असा आदेश आला.
क्रॅम्पॉन्स बसून चढवायचे नसतात, ते नीट बसत नाहीत. बर्फात उभे राहूनच घालायचे. एव्हाना ग्लोव्ह्ज घातलेले असले तरी हात गारठले होते. मला काही केल्या जमत नव्हतं. भूक लागली होती आणि चिडचिड होत होती.

whatsapp_image_2024-07-09_at_11.02.29_am.jpeg

ही जी सगळ्यात पुढे उभी आहे ती मी आहे. तोंडावर रुमाल बांधलेला असला तरी माझा अनुत्साह क्लिअरली दिसतो आहे !! Haahaa 2

शेवटी झटापट करुन, मदतीने कसेबसे ते शुजवर चढवले. शुज आणि क्रॅम्पॉन्स दोन्ही मिळून प्रत्येक पायावर तब्बल अडीच किलोचा भार वाढतो.
आणि पुन्हा डक वॉक, टो वॉक, साईड वॉक सुरु. ह्यावेळी जरा जास्त कठीण कारण इकडे चढ उतार होते आणि एव्हाना आम्ही १५,००० फुटांवर आलो होतो. नशिब पडण्याचं ड्रील पुन्हा घेतलं नाही, नाहीतर पुढच्याचे क्रॅम्पॉन्स आपल्या तोंडावर आणि आपले मागच्याच्या तोंडावर आदळू नयेत म्हणून अजून एक काम वाढलं असतं.

मी हे ड्रील यथातथाच केलं. खरं तर क्रॅम्पॉन्स चढवल्यावर एकदम कॉन्फीडेन्टली चालता येत होतं. खूप मस्त, फर्म सपोर्ट मिळतो, तरी शरीरातल्या शक्तिचा शेवटचा कणही संपला असल्याने एकही पाऊल टाकणं म्हणजे नको नको होऊ लागलं.

अखेरीस तो सगळा प्रकार संपला. सगळे अलंकार एकत्र करुन, त्यांनी दाखवले तसे एकमेकात अडकवून परत द्यायचे होते. देतांना एकेकाने द्यायचे आणि तो देतील तो नंबर लक्षात ठेवायचा. म्हणजे परत घेतांना गोंधळ झाला नसता.
ते सगळं सामान एका भल्या मोठ्ठ्या पिशवीसदृश पिशवीत ठेऊन, वरुन प्लॅस्टिकने झाकून ठेवलं गेलं. आम्ही खाली उतरायला सुरुवात केली.

तिथे जमलो होतो तिथे एका मोठ्या दगडामागे एक भुभू शांतपणे बसलं होतं. हा इथे असा का थांबला आहे ? तिथे काहीच आडोसा नव्हता, पाऊस आला तर कुठे जात असेल ? काय खात असेल ?
आमचा कलकलाट सुरु होता पण तो तटस्थपणे बसून होता.
हे ते भुभू. हा फोटो जेव्हा तो समीटच्या दुसर्‍या दिवशी आमच्याबरोबर खाली कॅम्पमध्ये आला तेव्हाचा आहे.

img-20240622-wa0018.jpg

पाठीवर फक्त पाणी असलेली सॅक घेऊनही तो सगळा उतार उतरायला मला सव्वा तास लागला ( जो मी एका दिवसाने, पाठीवर स्लीपींग बॅग, मॅट आणि इतर सामान घेऊन फक्त ५० मिनीटात चढले आणि नंतर अर्ध्या तासात उतरले ). अर्थात शेवटी होते. आणि माझ्याबरोबर नविन. त्याला सांगितलं, मी बहुतेक नाही करणार समीटचा अटेंम्प्ट. का ? तबियत ठीक है ना ? ( म्हणजे ए एम एस नाही ना ?) नशिबाने तब्येत ठिक होती, पण मी दमले होते. त्याला सांगितलं, रात्री गडबड करणार्‍यांचा बंदोबस्त करा नाहीतर आज मीच जाऊन बोलेन. मग काय व्हायचं ते होऊ दे. तो म्हणाला, हो, काल जास्त झालंय आणि किचन स्टाफने पण तक्रार केली आहे. त्या बिचार्‍यांना आवरुन झोपायला उशीर होतो आणि सकाळी लवकर उठून पुन्हा स्वयंपाकाला लागावं लागतं.
पुढे म्हणाला, आता जाऊन नीट जेवा आणि झोपून जा. आपल्याला उद्या रात्री जायचं आहे, तोवर व्हाल ठीक.

आणि अगदीच जायचं नाही असं ठरवलं असतं तरी मला वर अ‍ॅडव्हान्स बेस कँपलाच जाऊन रहावं लागलं असतं कारण खाली किचन टेंट आणि इतर २ टेंट सोडून बाकी सगळ वर हलवणार होते, सगळा स्टाफ पण वरच जाणार होता.

परत येऊन जेमतेम जेवले आणि आडवी झाले. झोप लागली नाही पण पडून बरं वाटलं. संध्याकाळी पुन्हा पाऊस आला. चहाच्या वेळी नविन आणि अजून एकाने सगळ्यांना रात्री गोंधळ करण्यावरुन लेफ्ट राईट घेतलं. बरं वाटलं ऐकायला. ते सौम्यपणे बोलले असते आणि पुन्हा आवाज सुरु झाला असता तर आज मी पक्कं ठरवलं होतं की जाऊन चांगलं ओरडायचं.

रात्री जेवायला आलूगोबी, पोळ्या, दाल राईस आणि गोडात कस्टर्ड होतं.
बाकी चहाच्या वेळी बोलतांना लक्षात आलं की सगळेच फार दमले आहेत. आजचा दिवस सगळ्यांनाच फार जड गेलाय.

नविनच्या ओरडण्याचा परिणाम म्हणा किंवा एकूणच जनता फार दमली होती म्हणा आज साडेनऊ वाजता कँप चिडीचूप झाला. बाजूला अजून २/३ कँम्प्स लागले होते, तिकडून उडत उडत काही आवाज आले तेवढेच. परिणामी मस्त झोप लागली. थंडी वाजली नाही किंवा कळली नाही. पहाटे साडेतीनला जाग आली तेव्हा छान फ्रेश वाटत होतं. पुन्हा एक डुलकी काढली आणि बाहेर पडले.

आज मुख्य दिवस, खरं म्हणजे रात्र.

आज आम्ही लवकर जेऊन एक पर्यंत वर, अ‍ॅडव्हान्स बेस कँपवर जाणार होतो. जातांना स्लीपींग बॅग, मॅट आणि समीटसाठी लागेल तेवढंच सामान घेऊन, उरलेलं इकडेच, इथे जे २ टेंट ठेवणार होते त्यात ठेवायचं होतं.
स्लीपींग बॅग जड असते. ती घेऊन वर चढणं ही एक परिक्षा आणि शिक्षा होती.
आमच्या मोठ्या ट्रेकींग सॅक्स मध्ये स्लीपींग बॅग शिरत नव्हती. अनेक प्रकारे प्रयत्न केला, शेवटी नविन मदतीला आला आणि त्याने सॅकला समोरुन अडकवून दिली. मॅट सॅकवरचं पण मानेच्या मागे येईल अशी अडकवली. हवा पावसाळी होती. मला एकच भिती होती ती जर पाऊस आला तर स्लीपींग बॅग ओली होईल. आणि त्या एक्स्ट्रा नसतात. ओली झाली तर उरलेले २ दिवस तसेच काढावे लागतील.

whatsapp_image_2024-07-07_at_9.25.17_am_2.jpeg

हा डोलारा घेऊन वर जायचं होतं.

आज जेवायला दाल राईस होता.

सगळे टेंट आवरले गेले, टेंट आणि किचनचं इतर सामान घेऊन जायला घोडे आले.
आणि आम्ही हळू हळू निघालो.

आज झोप झाल्याने आणि कालच्या अनुभवानंतर चूक नको म्हणून भरपूर जेवल्याने उत्साह वाटत होता. जसा चढ सुरु झाला तसं एक एक पाऊल टाकणं अवघड होत गेलं.

whatsapp_image_2024-07-07_at_9.25.17_am.jpeg

मी हसते आहे ते कॅमेरामन समोर असल्याने. पण मनातून........

मी जेमतेम अर्ध्या रस्त्यात पोहोचले होते तर केदार वर, कँपवर पोहोचला सुद्धा. त्याआधी मात्र त्याने हजार वेळातरी, आई, तुझी स्लीपींग बॅग मी धरतो, मला दे सांगितलं. मी अर्थात दिलीच नसती पण ऐकून बरं वाटलं.
नको नको म्हणत होतो तो पाऊस आलाच. मग धडपडत पाँचो घालणं आणि तो पायघोळ पाँचो घालून परत एक एक पाऊल टाकत चढणं ही कसरत सुरु केली. ७०% रस्ता संपला तो वर पोहोचलेला रॉनी खाली आला आणि काहीही न ऐकता माझी सॅक घेऊन गेला. देव त्याचं भलं करो !

whatsapp_image_2024-07-07_at_9.25.17_am_1.jpeg

हुजूर आराम फर्मा रहे है !!!

वर पोहोचलो तर वर आधीच २ टिम्स आलेल्या होत्या आणि एकांनी त्यातल्या त्यात बर्‍या ( जिथे जास्त बर्फ नव्हता ) अश्या जागेवर टेंट्स उभारले देखील होते.
पाऊस थांबला आणि टेंट लावायचं काम सुरु झालं. बर्फातच. बर्फावर.
आमचे उत्साही वीर होतेच मदतीला पुढे. १/२ टेंट लागले आणि मी एकात सामान नेऊन ठेवत होतेच की पुन्हा पाऊस सुरु झाला. खरं बर्फात तोल सावरत, फेर्‍या करत सामान नेतांना जाम त्रेधातिरपीट उडत होती.

whatsapp_image_2024-07-07_at_7.05.25_pm.jpeg

शेवटी केदारला ओरडून आत बोलवावं लागलं. उगाच भिजत बसला होता.
दिड वाजून गेला.

साडेचार वाजता पुजा करायची आहे तेव्हा बाहेर या असा निरोप मिळाला. जनरली समीटच्या आधी अशी पुजा करतात. पुजा म्हणजे दगडांची रास असते रचलेली, त्याच्यापुढे दिवा उदबत्ती लावतात. काहीतरी प्रसाद असतो.

करायला काहीच नव्हतं. हळूहळु बर्फाचा गारवा मॅट, स्लीपींग बॅग, अंगावरचे कपडे ह्यातून जाणवायला लागला. पावसाचा जोर वाढला होता, हळू हळू सगळीकडे शांतता झाली. टेंट्स अगदी लागून लागून होते म्हणून क्वचित घोरण्याचे आवाज पण येत होते.

साडेचार वाजले. पाऊस जोरात कोसळत होताच. पुजेसाठी बोलावणं काही आलं नाही.

पाच - साडेपाच -सहा. पाऊस तसाच पडतोय. शेवटी त्यांनी पुजा करुन घेतली आणि सगळीकडे उदबत्ती फिरवली. त्याचा मंद वास आल्यावर काय बरं वाटलं
साडेसहा वाजता टेंटमध्येच जेवण येईल, तुम्ही बाहेर येऊ नका असं सांगितलं.

आणि साडेसहाला प्रत्येक टेंटमध्ये जाऊन त्यांनी ताटं दिली. मसूराची घट्ट दाल आणि भात. पुन्हा पुन्हा येऊन अजून हवंय का विचारुन जात होते. फार कौतुक वाटलं त्यांचं आणि आदरही.

पाऊस अजून थांबला नव्हता. आता नऊ वाजता कशी हवा असेल त्यावर काय ते ठरवू, तुम्ही आराम करा असं सांगून ताटं गोळा करुन गाईड्स पावणेसातला गेले. हा सगळा वेळ केदार डुलक्या काढत होता. जागा होता तेव्हा सटरफटर गप्पा मारत होतो. तो तसा अबोल आहे. ( आमच्याशी बोलतांना ) पण ह्यावेळी आम्ही बर्‍याच गप्पा मारल्या.

समीट चढतांना आम्हाला मोठ्या सॅक घ्यायला सांगितल्या होत्या. त्यांच्यामुळे मागून पाठीचं संरक्षण होतं म्हणे. आता विचार करतांना जाणवतं आहे की कदाचित पाय घसरुन पडलो आणि घसरत जाऊ लागलो तर मोठ्या सॅकमुळे घसरण्याचा वेग कमी होतो वगैरेही काही कारण असेल की काय !.
आम्ही सॅकमध्ये पाणी, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स आणि मुख्य म्हणे जेल्स ठेऊन घेतल्या होत्या. शिवाय नी कॅप, कानासाठी जास्तीच्या टोप्या जास्तीचे हेड टॉर्च.
दर तासाला जेल खा म्हणजे खा च असं केदारला बजावून सांगितलं होतं.

आता नऊ वाजता कळणार काय करायचं ते. तर आम्ही काय घडू शकतं आणि त्यावर काय करायचं ह्याचा विचार करु लागलो.
१. हवा स्वच्छ होईल - मग प्रश्न नाही. जायचं
२. हवा तितकीशी स्वच्छ नसेल/ थोडा पाऊस असेल - अशात खरं तर नेणार नाहीत पण नेलंच तर ? माझ्या मनात जायचं नाही असं होतं पण केदार लगेच म्हणाला, मी जाईन. जेवढं जमेल तेवढं. मग मी पण हो, हो, आपण जाऊच म्हणाले.
३. पाऊस थांबणार नाही, आजचा दिवस कॅन्सल, बफर डे वापरणार. - मग काय ? बफर डे म्हणजे उद्या प्रयत्न करायचा. आणि उद्याही हवा चांगली असण्याची शाश्वती नाही. शिवाय उद्या दिवसभर ह्या बर्फात घालवावा लागेल. तेव्हा जर बफर डे लागला तर आपण परत जाऊ असं दोघांनी एकमताने ठरवलं. मला बफर डे चे नियम माहिती नव्हते, ते ह्या निमित्ताने माहिती होतील.

आजूबाजूने बोलण्याचे जे आवाज येत होते त्यावरुन मी अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते की जनमत (!!)) काय आहे ते.
अखेरीस पावणे आठ वाजता नळ बंद करावा तसा पाऊस अचानक थांबला. थांबला तो थांबलाच.

शेवटी नऊ वाजता मोठ्ठ्याने घोषणा झाली, टिम टिटिएच, गेट रेडी फॉर समीट !!

whatsapp_image_2024-07-07_at_7.05.24_pm.jpeg

ह्यातले बरेचसे फोटो आम्ही ( केदार आणि मी ) काढलेले आणि काही ग्रुपमध्ये शेअर झालेले आहेत. आ अ‍ॅ, गेटर्स आणि हार्नेसचे नेटवरुन घेतलेत.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle