शेवटी नऊ वाजता मोठ्ठ्याने घोषणा झाली, टिम टिटिएच, गेट रेडी फॉर समीट !!
त्याक्षणी खरं तर नक्की काय वाटत होतं सांगणं कठीण आहे. आज ( किंवा एकूणच ) जायला मिळावं म्हणूनची इच्छा, आता जायचंय म्हणून जरा अस्वस्थता, जमेल ना म्हणून थोडी चिंता + केदारची काळजी असं सगळं एकत्र जाणवत होतं.
केदारला डुलकी लागली होती, त्याला उठवलं. तो लगेच येस्स म्हणून उठून बसला. आधी स्लिपींग बॅग्ज गुंढाळून कडेला करुन ठेवल्या. दोघांचं सामान नीट वेगळं करुन आधीच ठेवलं होतं म्हणून गडबड होत नव्हती.
आधी आठवणीने हार्नेस अडकवली. शुज घालणार एवढ्यात लक्षात आलं, शू करुन यायला हवी. *biggrin* शुज घालून तसंही खटाटोप करावा लागत होता, त्यात हार्नेस चढवल्यावर जाणं अशक्यच झालं असतं.
पण आत्ता टेंटच्या बाहेर जायचं ह्या कल्पनेनीच अंगावर काटा येत होता, पण वेळ नव्हता, हिंमत करुन बाहेर आले.
बाहेर आले तर आश्चर्यकारकरित्या मुळीच थंडी जाणवली नाही. २ दिवसांनी वटपौर्णिमा होती म्हणून चंद्र तसाही मोठाच दिसत होता, त्यात बर्फावर किरण पडून छान उजेड होता.
टॉयलेट टेंटकडे जातांना दोनदा सटकन पाय घसरलाच. जाऊन बाहेर आले आणि समोर सगळे टेंट बघून राहावलं गेलं नाही आणि फोटो काढला. तोच मागच्या भागातला शेवटचा फोटो.
सगळीकडे आवाज, एक्साईटमेंट, गडबड जाणवत होती. गाईड्स दर ५ मिनीटांनी येऊन आवरा, आवरा सांगत होते.
आत जाऊन हार्नेस चढवली, शुज, क्रॅम्पॉन्स घातले. नेहमीचे ट्रेकींगचे शुज टेंटमध्ये कोपर्यात सरकवून ठेवले. तयार होऊन बाहेर पडलो.
गरम पाणी ( गरम म्हणजे कोमट ) घ्यायला बोलावलं होतं. ते आमच्या हायड्रेशन बॅगमध्ये भरुन घेतलं. तिथे पाणी नव्हतंच. बर्फ गोळा करुन तो वितळवून घेत होते.
पाणी घ्यायला गेले आणि पाणी देणारा दादा म्हणाला, दिदी, आपने हार्नेस गलत पहना है.
हेच. हेच मला नको होतं. मला हार्नेसची डावी उजवी बाजू अर्धवट उजेडात कळलीच नाही.
आता हार्नेस सरळ करायची म्हणजे आधी पायातले दोन्ही अडथळे काढणे आले. आणि पावणेदहा वाजून गेलेले.
मग मदतीला आला अब्बास भाई. हा लीड गाईड होता. तो म्हणाला, रुको. पहले हार्नेस लूज करो. ती खूप सैल केली आणि मग पायातून शुज न काढता सहज निघाली. मग सरळ करुन नीट घातली. हे चालू असतांना नविन आला. त्याला बफर डे चे नियम विचारुन घेतले. तो म्हणाला,आता तयार झालो आहोत, आत्ता जर पाऊस आला तर जाणं कॅन्सल आणि मग बफर डे पण. जर पाऊस थांबलाच नसता तर बफर डे. पण तरी आम्ही उद्या प्रयत्न करायचा का ह्याचा विचार केलाच असता. आणि बफर डे घेतला तर ज्यांना यायचे नाही ते परत जाऊ शकतात. इतरांना परत गेलेल्यांची एका दिवसाची कॉस्ट विभागून घ्यावी लागते.
नविन पावणेदहापासूनच प्रत्येक टेंटपाशी जाऊन सगळ्यांना बाहेर काढत होता.
तरी सव्वा दहा वाजलेच सगळे जमून निघायला, तो चिडला.
कोलला पोहोचायला ( कोल हा क्लाईंबचा पहीला टप्पा होता ) दिड वाजताचा कट ऑफ सांगितला होता तुम्हाला. इथेच पंधरा मिनीटे लावलीत, पुढे प्रत्येक मिनीट महत्तवाचं आहे, आता चला, निघा.
दिड वाजेच्या पुढे जो कोलला पोहोचेल त्याला परत पाठवले जाईल असं सांगितलं होतं.
शिवाय तुमची ८०% शक्ति चढायला वापरा, २० % उतरायला. एनर्जी संपत आहे लक्षात आलं तर परत फिरा. हे ही पुन्हा पुन्हा सांगत होते.
फायनली सव्वा दहाला निघालो. आधीची पंधरा वीस मिनीटे केदारवर नजर ठेऊन होते. पण त्याचं जॅकेट केशरी आणि ग्रुपमध्ये निम्म्या लोकांची लाल केशरी जॅकेट्स होती त्यामुळे जरा वेळाने कळेना. मग तो नाद सोडला, नाहीतरी पूर्ण वेळ त्याच्यावर लक्ष शक्यच नव्हतं.
तरी निघतांना घाईत त्याला बाजूला घेऊन, वाटेल तिथून परत फिर. उगाच बाकीचे मागे लागले तर दुर्लक्ष कर हे कितीतरीव्यांदा सांगितलं. त्याने नेहमीप्रमाणे हो गं, परत परत तेच नको सांगूस न म्हणता फक्त मान डोलावली आणि टेक केअर म्हणून पुढे गेला.
मी रांगेत बरीच मागे होते. मला हेच बरं पडलं. पुढे असलो की मागे असलेल्यांसाठी अखंड चालत रहावं लागतं. आणि चढावर किंवा कठीण चाल असेल तर मी माझ्या पद्धतीने चालते. इथेही मी ५० आकडे चालणे, २० आकडे दम खाणे असा क्रम निश्चित करुन तो फॉलो करु लागले. अशानी एक रिदम सेट होतो आणि आकडे मोजत बसल्याने वेळ जाऊन उगाच मनात भलते विचार येत नाहीत. चढ अजून कठीण झाला तर मी चालण्याचे आकडे थोडे इकडे तिकडे करुन दम जास्त वेळ घेते.अर्थात हे माझं माझ्यासाठी आहे. आणि म्हणून मी मागे होते तर मला बरंच वाटलं.
चालायला सुरुवात केल्यावर काहीच वेळात एक मुलगी ( जिच्या बॅगवर घंटा लावलेली होती ) तिला काहीतरी त्रास होऊ लागला. असं झालं की थांबून कोण, काय ही चौकशी करु नका, तुमचं चालणं सुरु ठेवा हे सांगितलेलं असल्याने काळजी वाटली तरी पुढे चालत राहीलो.
जराच वेळात दुसर्या दोघी जणी ढेपाळल्या. एकीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, दुसरीची पायाची जुनी इन्ज्युरी डोकं वर काढू लागली, तिला चालवेचना. खरं तर वरपर्यंत कोण कोण जाऊ शकेल ह्याचा मी जो अंदाज बांधला होता त्यात ह्या दोघीतली एक होती. तीच, जी एकटी रहात होती. आमच्या बाली पास ग्रुपमधलीच.
दोघी सतत थांबत होत्या. मी दोन तीन्दा त्यांना ओव्हरटेक केलं, ते त्यांना फार लागलं. मग त्या अजून वेगात येऊन माझ्या पुढे जात आणि मग दमून थांबत. ह्यामुळे माझा पेस, रिदम बिघडत होता पण मी त्या थांबल्या की बाजूने पुढे जाणे चालूच ठेवले.
त्यांच्यामुळे दोन गाईड्स मागे अडकले होते. शेवटी आधी समजावून, मग जरा रागावून तिघींना परत पाठवलं.
ह्यात माझ्यात आणि ग्रुपमध्ये थोडी गॅप पडली. पण सगळे हाकेच्या ट्प्प्यात होते आणि गाईड्स आजूबाजूला होते. एकदा मध्येच वेळ बघितली, साडे अकरा झाले होते. म्हणजे एक तास झाला की. ते कोल काही नक्की कुठे आहे ते समजत नव्हतं. गेले ३ दिवस हातवारे करुन, खूणा करुन, वो वहा है वो कोल, उसके बाजूसे उपर जाना है और फिर वहासे लेफ्ट लेके सिधा समीट असं अनेकदा बघितलं होतं. पण खालून बघणं वेगळं, ज्याला मी कोल समजत होते, ते ते नसेलच.
अशी समीट्स रात्रीच चालायला सुरु करतात. मुख्य कारण बर्फ. रात्री तो कडक, टणक असतो. दिवस सुरु झाला की तो भुसभुशीत, स्लशी होतो आणि चालणं अवघड होतं.
दुसरं, अंधारात, जेव्हा तुम्हाला तुमचा हेड टॉर्च दाखवतो तेवढंच दिसत असतं तेव्हा आपण किती, कुठे चालत आहोत हे कळत नाही आणि त्यामुळे उगाच मनावर ओझं येत नाही. हेच उतरतांना, आपण हे एवढे चढून आलो !!!! असं होतं. आणि दिवसा बर्फावरुन सूर्याचे किरण परावर्तीत होऊन त्रास होतो. म्हणून बरीचशी समीट्स रात्री किंवा पहाटे लवकर सुरु करतात.
अजून दोन तास हातात आहेत. चढ असा होता की इच्छा असली तरी ह्याहून जास्त वेगाने जाता येत नव्हतं त्यामुळे पूर्ण प्रयत्न करायचा, वेळेवर पोहोचलोच तर ठिक. नाहीतरी ठिक असं ठरवलं.
दम आधीपासूनच लागत होता, आता श्वास अजून जड होऊ लागले
तेवढ्यात बाजूने कुठूनतरी दुसरी टिम ( दुसरा ग्रुप ) आला. ५ जण होते. ते मस्त चालत होते. २५ पावले चढणे आणि काही सेकंद थांबणे, त्यांचा गाइड एकदम गप्पीष्ट होता. त्यानेच मला सांगितलं, ड्रायफ्रुट्स आणत जाऊ नका , पचायला जड पडतात.त्याच्या गप्पा ऐकत आणि त्या ग्रुपला फॉलो करत मी बरंच अंतर कापलं. घड्याळात वेळ बघणं कटाक्षाने टाळत होते. रादर किती वाजले ते कळून काय फरक पडणार होता !
मस्त रिदम सेट झाला आणि माझा हेड टॉर्च बंद पडला !!!!! मला आधी कळलंच नाही. पौर्णिमेच्या चंद्राचा आणि सगळ्यांच्या हेडटॉर्चचा उजेड बर्फावर पडत होता म्हणून वेगळं काही जाणवलं नाही. कळलं जेव्हा नविन ओरडला, हेड टॉर्च क्यो बंद किया! मग बर्फात पाय रुतवून, जमेल तसा तोल सांभाळत सॅक काढली, त्यात सामान असं काही नव्हतंच. खायचे पदार्थ, एक जास्तीची टोपी, नी कॅप आणि हेडटॉर्च, बॅटर्या. ते सगळं नीटपणे वेगवेगळ्या कापडी पिशव्यांमध्ये घालून गाठी मारुन ठेवलं होतं. हे एक लर्निंग. ग्लोव्ज घातले असतील आणि वेळेची कमतरता असेल तर पिशव्यांना गाठी बिठी मारु नका. ग्लोव्ज काढून मग चाचपडत हेडटॉर्च काढला आणि घातला. ह्यात नविन ओळ्ख झालेला ग्रुप पुढे गेला.
आता परत एकला चालो रे. पुढे गेलेल्यांपैकी आपले कोण, दुसरे कोण हे कळायला काहीही मार्ग नव्हता. गाईड्स मात्र आपला, परका असं न बघता सगळ्यांनाच मदत करत होते.
आम्ही नेहमीप्रमाणे झिग झॅग चढत होतो. ह्या झिग झॅग्जना सरळ क्रॉस करत दोघे जण मागून आले. ते सरळ जात होते म्हणून जास्त दमत होते. त्यांना आमचा गाईड ओरडला आणि मग ते दोघेही नीट लाईनवर आले. त्यातला एक जण कानपूरहून आलेला होता. त्याच्याशी हिंदी इंग्लिश मध्ये बोलत ( बोलणं काय तर कहा है कोल, आरामसे चलो. धिरे चलो एवढंच ! खरं तर ते शब्दही तोंडातून सलग बाहेर पडत नव्हते.
चालण्याबद्दल तर लिहीतंच नाही. प्रत्येक पाऊल टाकणं ही एक परिक्षा होती. आधी चढाचा ग्रेडीअंट जास्त नव्हता. ३०/४० अंश असेल. ह्या टप्प्यापर्यंत तो ५०/६० झाला होता. ऊंची खूपच गाठली गेली होती आणि प्रत्येक पाऊल टाकतांना, प्रत्येक श्वास घेताना दुप्पट मेहनत करावी लागत होती. पाठीवरची रिकामी सॅकही जड जड वाटायला लागली होती. गंमत म्हणजे थंडी तेवढी जाणवत नव्हती.
असा बराच वेळ गेला ( असावा ). पुढे गेलेला आमचा एक गाईड मागे आला आणि मला विचारलं, मॅम, वापस जाना है क्या ? पिछे एक ग्रुप वापस जाने के लिये खडा है, उनके साथ जा सकते हो. मी विचारलं, कोल कितना दूर है ? तर म्हणे, ये क्या, आप कोल परही हो. अरे वा ! आलो पण.
आणि मग मुख्य प्रश्न. कुठे जायंच? पुढे की परत ? ९९% वेळा असं घडतं की जेव्हा अश्या वेळा येतात की तेव्हा घेतलेला निर्णय भविष्यात चुकीचा वाटू शकतो. पण तेव्हा निदान विचार करायला थोडा तरी वेळ असतो.
पण १६,४०० फूट ऊंचावर, बर्फात, क्रॅम्पॉन्सच्या जीवावर तोल सावरत उभं राहून, पाठीवरची घसरणारी सॅक धरत पुढे जायचं, जाऊ शकू का? की मागे फिरायचं असा खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायला फक्त मिनीटभर वेळ असतो.
मी पुढे, पुढे म्हणजे वर नजर टाकली. थोड्या सपाटीनंतर सरळ ऊभ्या चढाची बाह्यरेषा दिसत होती. खालच्या बाजूला फक्त बर्फ. खोटं कशाला बोलू ! मनात पुढे जावं, निदान जाऊन बघावं असा मोह निर्माण झालाच. पण त्याचक्षणी लटपटणार्या पायांनी आठवण करुन दिली की खाली उतरुनही जायचं आहे. उतरायला वेळ जरा कमी लागेल पण उतरणं हे माझी विक लिंक आहे. मला मुळीच वेगात उतरता येत नाही, शिवाय नुकताच इन्ज्युरीतून बरा झालेला गुडघा आत्तापर्यंत शहाण्यासारखा वागला होता, त्याला दुखवायचं नव्हतं. आणि थकवा बर्यापैकी जाणवत होता म्हणून ठरवलं, परत जाऊया.
हे सगळे विचार मिनीटभरात येऊन गेले आणि त्याला सांगितलं, जाते मी परत. कुठे आहेत ते लोक थांबलेले ? तर तो म्हणाला, मी येतोय तुम्हाला सोडायला. एकट्यांना कसं जाऊ देऊ ?
पाणी प्यायले, घड्याळात बघितलं. ३.१० म्हणजे सुरु करुन तब्बल पाच तास झाले होते. पाच तास मी चालत होते. एकदा वर आकाशात बघून देवाला सांगितलं, अजून तीन तास तरी चालवत ठेव बाबा.
आणि आम्ही परत निघालो. केदारबद्दल विचारलं तर तो म्हणाला, वो तो कबका कोलसे आगे चला गया. आता आम्ही झिगझॅग चालत नव्हतो. सरळ रेषेत खाली. उतरणंही कठीण होतं. पण निदान अगेन्स्ट ग्रॅव्हिटी नव्हतं. बाबाजी वेगात चालत होते. मला काही जमत नव्हतं. मला म्हणाला, आप तो बहोत आगे तक आ गयी ! हमे लगा नही था !
आगे और ३/४ लोग है जो वापस आ जायेंगे शायद.
जरा वेळाने आम्ही त्या परत जाणार्या ग्रुपपाशी पोहोचलो. ३ जण होते आणि एक गाईड. त्याच्या ताब्यात मला देऊन आमचे गाईड परत गेले. पुन्हा वर ! काय तो स्टॅमिना !!
आणि आम्ही चौघे परत निघालो. थोडं फार बोलत होतो. चालता चालता मध्येच काही कळायच्या आत मी धाडकन पडले. बर्फच असल्याने नशिबाने लागलं नाही. बहुतेक क्रॅम्पॉन्स एकमेकात अडकले. उठून पुन्हा चालायला सुरुवात केली. काही वेळ गेला असेल तर पुन्हा पडले. आता उठताच येईना. गुडघे टेकवून उठू की हातांवर जोर टाकून कळेचना. शेवटी त्या गाईडने आणि एका मुलीने दोन्हीकडून धरुन मला ऊभं केलं.
आता मात्र चांगलंच गळून गेल्यासारखं वाटत होतं.
शेवटी खोल खाली लुकलुकणारे दोन तीन दिवे दिसले. तो अॅडव्हान्स बेस कँप. आला एकदाचा.
पोहोचलो. तिथे आमच्या कँपवर, जाग होती. मला बघून आधी आलेला एक गाइड धावत आला आणि विचारु लागला, तब्येत बरी आहे ना ? त्याला वाटलं, मला AMS चा त्रास होऊ लागल्याने मी परत आले. त्याला सांगितलं, मी फार फार दमले आहे. पण माझी तब्येत अगदी बरी आहे.
लटपटत टेंटपाशी गेले. तर तो आला आणि क्रॅम्पॉन्स काढून देऊ लागला. मला इतकं ऑकवर्ड वाटलं. हे त्यांचं काम नाहीये, पण ते लोक इतके सेल्फलेस असतात ! नको नको म्हणाले तरी त्याने ते काढून दिले आणि आ अॅ , हेल्मेट बरोबर टेंटपाशी नेऊन ठेवले. आता आराम करा, काही लागलं तर हाक मारा, मी इकडेच आहे असं म्हणून तो बाजूच्या टेंटकडे गेला आणि आधी आलेल्या तिघींना हाका मारुन, बरं वाटतंय ना, काही हवंय का ते विचारुन परत गेला.
मी कशीबशी टेंटमध्ये शिरले आणि सॅक न काढताच आडवी झाले. पाय बाहेर, मी आत.
हालचालच करवेना.
पाचच मिनीटात थंडीचा फटका बसला, मग कसेबसे शुज, हार्नेस काढलं आणि भराभरा स्लीपिंग बॅग उघडून आत शिरले.
सव्वा पाच वाजत आले होते.
केदार आणि बाकीचे कुठे असतील ? कसे असतील ? वगैरे विचार करत झोपायचा प्रयत्न केला पण झोप येईना.
उजाडलं होतं म्हणून काही कळतंय का, दिसतंय का बघावं म्हणून तासाभराने पुन्हा बाहेर आले. हे आपलं उगाच. डोळे मोठे, बारीक करुन, टक लाऊन बघायचा खूप प्रयत्न केला, पण काही कळत नव्हतं.
पुन्हा आत जावं म्हणून वळले आणि इतका वेळ लक्षात आलं नव्हतं की समोरच्या दगडावर एक जण झोपलाय. झोपला म्हणजे दमून आडवा पडला होता. हा कोण ते कळेना, दुसर्यांपैकीही असू शकेल.
जवळ जाऊन बघितलं तर सनी होता. मला आश्चर्य वाटलं.
हा कसा काय इथे ? त्याच्याजवळ जाऊन त्याला हाक मारली. डोळे उघडून अतीव दु:खाने तो म्हणाला, नही कर पाये दिदी. त्याक्षणी मलाच फार वाईट वाटलं. पण ती वेळ, आत्ता नाही जमलं तर काय, परत येऊ वगैरे वगैरे बोलायची नव्हती. त्याच्या पायावर थोपटून म्हणाले, इथे थंडीत नको थांबूस, आत जा.
उठता उठता तो म्हणाला, अनन्या, शिवम और मधू भी वापस आ रहे है. अनन्या आणि शिवम ? माझ्या ड्रीम टिम मध्ये हे दोघे होतेच. तशी तर आधीच आलेली रितीका पण होती. सनीच्या बाबतीत मी जरा साशंक होते कारण तो मला ( म्हणजे त्याला ) जमेल का, होईल का अश्या प्रश्नांच्या घेर्यात होता.
काय झालं वगैरेची चौकशी न करता त्याला आत जा म्हणून उठवलंच. तेवढ्यात बाकीचे येऊन पोहोचले. हा सनी फ्रस्टेट होऊन एकटाच पुढे आला आणि बर्फात वाट चुकला. नशिबाने त्याला एक जण भेटला म्हणून तो नीट येऊन पोहोचला. त्यांच्याबरोबर आलेला गाईड जामच चिडला होता. शेवटी त्यांच्यावर जवाबदारी असते. ते सगळे अगदी वाईट मुडमध्ये होते.
आप कहासे वापस आये ? मला विचारलं. मी कोल हून आले. ते ही कोल हूनच आले होते, फक्त त्यांनी परत जायचं का हा विचार करायला बराच वेळ लावला. नविनला व्यवस्थित वैताग दिला आणि फायनली परत आले.
मनात खूप होतं केदारबद्दल विचारावं., पण ही वेळ नाहीच. आधीच हे वाईट मनस्थितीत आहेत.
तरी निघता निघता अनन्या म्हणालीच, केदार इज लिडींग द पॅक. वो पक्का कर लेगा. ह्म्म.. छानच. आणि बाकीचे ? उसके साथ रॉनी, जितू और अनय है. उतना पता चला.
ते चौघे आपापल्या टेंटमध्ये निघून गेले. मी तिथेच दगडावर बसले. थंडी वाजत होती., तरी आत जावं वाटेना. मग किचन टेंटमध्ये जाऊन चहा मागितला. खरं तर त्यांनी आलेल्यांना आधीच द्यायला हवा होता.
मग आत बाहेर करत कसाबसा वेळ काढला.
उरलेला ग्रुप येईल तेव्हा हाक मारा असं सगळ्यांना बजावून सांगितलं. मला केदारचा फोटो काढायचा होता.
साडेदहा वाजत आले होते. मी टेंटमध्ये वाट बघत पडले होते,अचानक, आई, आलो आम्ही. भूक लागलीये, काहीतरी दे. असं म्हणत केदार धडकला. अरे, मला फोटो काढायचा होता ना !
परत आलेले चौघे पूर्ण ओले होऊन आले होते कारण उताराचा बराचसा टप्पा त्यांनी घसरून पार केला होता. बाहेर जाऊन सगळ्यांचं कौतुक केलं आणि इतका वेळ पिनड्रॉप सायलन्स असलेला कँप हसणं, ओरडणं ह्यांनी भरुन गेला.
आल्या आल्या केदारने जाहीर केलं, आता ह्या जन्मात असं एक्स्पिडीशन करणार नाही !. ओके. ठिक आहे.
किचन स्टाफला विचारलं जेवणाचं काय तर बाकीचे परत येईपर्यंत नाही म्हणे. पण जे आले आहेत, भुकेले आहेत त्यांना तरी जेऊ द्या म्हणून जरा दमच भरला तेव्हा जरा हालचाल सुरु झाली.
केदार टेंटमध्ये जाऊन आडवा झाला. त्याला बरोबर असलेला खाऊ दिला. ओले कपडे बदलून कोरडे घालायला दिले. त्याचं डाऊन जॅकेट पार भिजलं होतं. फ्लीस खालून ओलं झालं होतं, थर्मल ओलसर झाले होते. मग माझं फ्लीस त्याला दिलं, जास्तीचं थर्मल दिलं.
आजची रात्र जायची आहे, गरम कपडे पुरेसे नाही झाले तर काय हा किडा डोक्यात सोडून मी त्याचं रसभरीत वर्णन ऐकायला लागले.
तेवढ्यात खाना लग गया अशी हाक ऐकू आली. गरमगरम राजमा चावल. केदारला टेंटमध्येच नेऊन दिलं. चार घास पोटात जाताच म्हणाला, बाय द वे, अजून कोणती कोणती एक्सपिडीशन्स आहेत ?
आता जन्मात करणार नव्हतास ना ?
हे काही फोटो.
हे ABC वरुन दिसणारं पीक. सर्कल केलं आहे ते. किती जवळ दिसतंय ना ? ते सर करायला ९ तास लागले.
हे कोलच्या पुढे गेल्यावर
हाच तो ८०% चा ऊतार किंवा चढ.
आणि शेवटचा टप्पा. हे दोन्ही फोटो व्हिडीओ मधून स्क्रीनशॉट घेऊन टाकले आहेत.
शेवटी समीट गाठलं !!!!
आणि दिसणारं ( किंवा अजिबात न दिसणारं ) द्रुश्य.. त्यावेळी ढग आल्याने काही वेळ व्हिजीबिलिटी नव्हती.
हा ढग थोडे कमी झाल्यावर काढलेला फोटो आहे.
रेषेच्या एका टोकाला बाण आहे आणि दुसरं टोक आहे ते कोल. तिथे एक काळा मोठा ठिपका आहे तो एक मोठा प्रचंड खडक होता. त्यामुळेच कोल खालून लक्षात यायचं.
तिथून रोप लाऊन ती रेष जशी गेली आहे तसं चढून आले आणि बाणाच्या पूढे थोड्या अंतरावर ( जिथून फोटो काढला ) ते पीक.
खाली उतरतांना,
पोटभर जेऊन सगळी ट्रेकींग गिअर्स त्यांच्याकडे जमा करुन आवराआवरी करुन खाली निघायला सांगितलं. स्लीपिंग बॅग्ज, मॅट्स आमच्या आम्हालाच न्यायच्या होत्या. पाऊस नव्हता पण कधीही पडेल असं वाटत होतं. खाली पोहोचेपर्यंत तरी पडू नये, बॅग्ज, मॅट्स ओल्या झाल्या तर रात्री पंचाईत होईल.
केदारची स्लिपिंग बॅग किचनच्या सामानाबरोबर घोड्यावर ठेवायला दिली. आधी ते तयार नव्हते, पण तो दमलाय वगैरे सांगून त्यांना न्यायला लावलीच.
खरं तर एक वेळ तरी घोडे द्यायला हवे होते सामान न्यायला. आमच्या बाजूला जो कँप होता त्यांचं प्लॅनिंग मला आवडलं. एक तर ते आमच्या आधी पोहोचले त्यामुळे त्यांना जरातरी बर्फ नसलेली जागा मिळाली.
त्यांच्यापैकी जे लोक लवकर्/आधी परत आले, त्यांना घेऊन सामान आवरुन खाली निघून गेले. समीट करणारे दोन जण आणि गाईड ह्यांच्यापुरता एक टेंट तिथेच ठेवला. ते लोक परत आल्यावर जरा वेळ थांबून मग तो टेंट घेऊन खाली गेले. किचन स्टाफ आधीच खाली गेल्याने त्यांना नीट तयारी करुन जेवण मिळालं.
आम्ही खाली, लेडी लेग साईटवर पोहोचलो. नशिबाने पाऊस आला नाही. हाच रस्ता उतरायला लोड फेरी नंतर मला सव्वा तास लागला होता, तो मी चाळीस एक मिनीटात, सगळं सामान घेऊन उतरले. खाली जे दोन टेंट ठेवले होते त्यात सामान टाकलं आणि गवतावर आडवे झालो.
समीट न करता परत यायला लागलं हे मी सोडल्यास बाकी सात जणांच्या मनाला फार लागलं होतं. अजूनही त्यावर बोलणं सुरुच असतं. मला वाईट वाटलं पण माझी एकूण तयारी बघता मी बरीच मजल मारली.
एक राहीलचं सांगायचं. जो भुभू आम्ही ABC ( Advanced Base camp ) वर पाहीला होता, त्याने पण समीट केलं !!! आम्ही वर निघालो तेव्हा मला तो जातांना दिसला, आणि नंतर मी विसरुन गेले. कोणतंही गिअर नाही, इतकंच काय, शूज नाहीत, स्वेटर, जॅकेट्स, टोप्या, हेड टॉर्च नाही, खाऊ नाही काही नाही. आरामात तो वर पोहोचला आणि मग आमच्याबरोबर खाली लेडी लेगला आला. पुढे तो आमच्याच बरोबर खाली पण उतरून आला, आणि पुन्हा वर गेला. तो म्हणे दर सीझनला जेवढे ग्रुप्स वर जातात त्यांच्याबरोबर एकदा जाऊन येतोच !!
आम्ही कायम डॉग आणि कॅट फूडची पाकीटे बरोबर ठेवतो, तशी ह्याही वेळी होती. तो खाऊ त्याला खाऊ घातला. नाहीतर किचन स्टाफ त्याला खायला घालतातच.
हाच तो भुभू
खाली आलो, टेंट लावले, सामान आत टाकलं आणि मी लगेच माझी बॅग भरुन टाकली. थोडं ऊन आल्यासारखं वाटलं म्हणून केदारची ओली जॅकेट्स वर वाळत घातली, त्यातलं एक, ज्याची फक्त कड ओली झाली होती ते चक्क वाळलं.
चहाची वेळ झाली, चहाबरोबर गरम गरम सामोसे होते पण जेमतेम दोन तीन जणांना दोन मिळाले, बाकीच्यांना एकेकावर समाधान मानावं लागलं. हेड कूकचं म्हणणं होतं, प्रत्येकी दोन केले होते, पण ते नक्की कमी होते.
रात्री जेवणात मात्र पनीर आणि गुलाबजाम होते.
संध्याकाळी असेच टिपी फोटो काढले. हा रात्री आठ वाजताचा आहे.
आता समीट केलेल्यांकडून वर्णनं एकायला मिळत होती.
आमचा ग्रुप सगळ्यात आधी चढाच्या तळाला पोहोचला. त्यामुळे तिथे रोप्स आम्ही ( म्हणजे गाईड्सनी लावले ). जो ग्रुप पहीले जातो तो रोप्स लावतो, आणि जो शेवटी जातो तो ते काढून आणतो. शिवाय एकमेकांच्या ट्रेकर्स ना खाली नेणे आणणे अशीही मदत करतात. जसं मी दुसर्याच ग्रुपच्या गाईडबरोबर खाली आले.
तर समीटच्या अगदी जवळ पोहोचेपर्यंत सगळ्यांची अवस्था वाईट झाली होती. त्यातून अजून फक्त १० मि, १५ मिनीटं असं अनेकदा ऐकल्याने केदार एकदम वैतागला आणि मी परत जातो म्हणून थांबला. त्यामुळे बरोबरचे तिघेही, चला चला जाऊया परत म्हणून थांबले.
ऊंचावरती जसा ऑक्सीजन कमी होतो तशी लॉजिकली विचार करण्याची क्षमताही कमी होते. त्यातून हे लोक सात वाजता समीटवर पोहोचले म्हणजे ९ तास चढत होते., दमले होते, बर्फात थंडीने गारठले होते. बरं चालणंही कठीणच कारण रोपला जोडून घेऊन बर्फात चालायचं होतं. कोलच्या पुढे पूर्ण ८० अंशाचा चढ होता त्यामुळे मध्येच थांबावं लागलं तर बाजूच्या बर्फाच्या भिंतीचा आधार घेऊन ऊभं रहावं लागायचं.
तर परत जाऊ, परत जाऊ असं ऐकल्यावर एक गाईड म्हणाला, काय परत जाऊ ? शेवटचे १० मीटर राहीलेत. तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेना. तेव्हा चला, चला असं शब्दशः ढकलतच तो पुढे घेऊन गेला आणि खरंच १० मीटरवर समीट होतं.
खरं फ्रेंडशीप पीक ह्या पॉइंटच्या अजून पुढे आहे. पण तिथवर कोणी जात नाही. जाऊ शकत नाही असं नाही, पण एक आदराची भावना म्हणून जात नाहीत. बर्याच पीकच्या बाबतीत असं करतात.
त्यांनी तिथे फोटो काढले. अर्थात नविन काही त्यांना फार वेळ थांबू देणार नव्हता. मग उतरायला सुरुवात. सगळी तरुण, वयाने लहान मंडळी असल्याने भराभरा उतरु लागले आणि पुढे तर घसरतच आले.
दुसर्या म्हणजे शेवटच्या दिवशी नऊ वाजता निघायचं ठरलं. उतरायला तीन तास लागणार होते. आणि पुढे मनालीला पोहोचायला तासभर. म्हणजे उशीरात उशीरा दोन अडीचपर्यंत पोहोचू शकलो असतो.
पण दुसर्या दिवशी निघायलाच साडे दहा वाजले. सर्टीफिकीट्स वाटतांना एखादं वाक्य बोला सांगितलं तर बरेच जण किमान दहा मिनीटं तरी बोलले, त्यात जे समीट करु शकले नाहीत ते ( पुन्हा मी सोडल्यास ) रडले वगैरे. त्यांनी ते जास्तच मनाला लाऊन घेतलं.
सनी आणि अनन्या आदल्या दिवशी मला म्हणालेच होते, हम लोग अगले साल फिरसे आयेंगे दिदी. आपभी आईये, महेश सर को भी लेके आईये. साथ मै करेंगे.
निघता निघता पुन्हा एकदा फोटो सेशन.
हा आमचा बाली पास ग्रुप.
शेवटी निघालो. उतरणं जरा ट्रिकी होतं कारण पावसामुळे चिखल आणि रस्ता जामच निसरडा झालेला. पण घाई नव्हती म्हणून आरामात, थांबत उतरलो.
आम्ही उतरत असतांना वेगवेगळे २/३ ग्रुप्स चढतांना दिसले. त्यांना जरा अवघड गेला असेल पुढचा प्रवास कारण पाऊस नीटच सुरु झाला होता.
खाली आलो, रेंज येताच पहीला फोन महेशला केला. आमचा एक प्रॉब्लेम झाला होता. आम्ही शुक्रवारी उतरलो. बफर डे लागला असता तर शनिवारी उतरलो असतो म्हणून परतीची रिझर्व्हेशन्स रविवारची केली होती आणि हॉटेल बुकींग शनिवारचंच. म्हणून लगेच त्याच हॉटेलमध्ये आजही खोली मिळते आहे का बघ म्हणून त्याला सांगितलं. खरं तर ही माझी चुक होती म्हणू शकते. जर शनिवारी उतरलो तर शुक्रवारचं बुकींग वाया जाईल, शुक्रवारी उतरलो तर आरामात खोली मिळेल म्हणून मी एकाच दिवसाचं बुकींग केलं आणि त्याच हॉटेलमध्ये खोली मिळाली नाही. मग दुसरं हॉटेल. म्हणजे सामान इकडे तिकडे नाचवणं आलं.
परत नेणारी बस अर्ध्या तासाने आली आणि आम्ही पावणेतीनला निघालो. जरा अंतर जात नाही तोच टायर पंक्चर ! नशिबाने पटकन चाक बदललं गेलं आणि पुढे वाईट्ट ट्रॅफिकमध्ये अड्कलो. फायनली सहा वाजता मनालीला पोहोचलो. तिथे तुफान गर्दी. पटापट सामान ताब्यात घेऊन, बाय बाय म्हणून समोर येईल ती कॅब पकडली आणि पाच मिनीटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेलसाठी तब्बल सातशे रुपये मोजावे लागले.
त्या रात्री सुखाने झोप आली. आता टॉयलेटला जायचंय तर जावं का, वळतांना स्लिपींंग बॅगची चेन उघडली तर परत लावेपर्यंत झोप उडेल, थंडी वाजली तर काय असे काही प्रश्न सोडवायचे नव्हते.
शनिवारी आरामात हॉटेल बदललं. संध्याकाळी केदार आणि मी असेच फिरायला बाहेर पडलो. मॉलरोडला जायचं नव्हतं मग असेच फिरत फिरत गेलो. एक मस्त बेकरी दिसली तिथे डोनट्स खाल्ले आणि पेस्ट्री घेऊन आलो.
रविवारी सकाळी आठच्या बसचं बुकींग होतं. ह्यावेळची बस छान पडदे वगैरे असलेली होती आणि चक्क ती वेळेत, साडेतीनला चंदिगढला पोहोचलीही. तिकडे कॅब बुक करता येईना कारण पिक अप लोकेशन समजेना. आम्ही होतो सेक्टर ४३ आणि पिक अप लोकेशन दाखवत होते सेक्टर १७. कदाचित दोन्ही समोरासमोर असतील. एका स्टॉलमध्ये विचारलं तर तो म्हणाला, ये गलत है. मग सरळ रिक्षा करुन एअरपोर्टला गेलो. आमची फ्लाईट रात्री दहाची होती, आम्ही साडेचारला तिकडे पोहोचलो तर डिजीयात्रा गेटवरची कॉन्स्टेबल बाई म्हणाली, अंदर आ गये तो बाहर नही जा सकते. अग बाई, पाठवलं तरी नाही जाणार. आता कधी घरी पोहोचतो आहोत असं झालंय.
आत गेल्या गेल्या दिसलं नेसकॅफेचं कॉफी शॉप. मग मोठ्ठा मग भरुन कॉफी घेऊन, आरामात बसलो. चेकईनला वेळ होता. आमचे रापलेले चेहरे,( माझं नाक अजूनही टॅन आहे.), ट्रेकींग सॅक्स वगैरे बघून काही जणांनी ट्रेक करुन आलात का वगैरे विचारलं. तिथे आमच्याच फ्लाईटमध्ये असणार्या तीन आजोबांशी ओळख झाली. त्यांना केदार माझा भाऊ वाटला !!!!!! (पण मला छानच वाटलं ऐकून)
यथावकाश पुण्याला पोहोचलो आणि घरी !!!! कसंलं बरं वाटतं म्हणून सांगू !!!! पण म्हणून आता पुन्हा जाणार नाही असं काही नाही !!
ह्या ट्रेकमध्ये मला TTH ची जेवणाची अरेंजमेंट जरा विस्कळीत वाटली. १० मुख्य जेवणांपैकी पाच जेवणात खिचडी/ दाल राईस होता. आता इतक्या ऊंचावर काय आणि कसं देणार हे खरं असलं तरी मुख्य मुक्काम दोनच होते, थोडं नीट प्लॅनिंग करता आलं असतं. पण सगळेच्या सगळे सहा गाईड्स मात्र मदतीला तत्पर आणि कडक होते. पुन्हा जेव्हा आम्ही सगळे एकत्र ट्रेकला जाऊ तेव्हा परत नविनलाच मागून घ्यायचंं हे तर पक्कं ठरलं आहे.
आणि मनाली !!!! काय ते ट्रॅफिक... सगळा भारतच तिकडे फिरायला आला आहे की काय असं वाटावं इतकं. आणि कॅबसाठी सुरुवातच ५०० रुपयांपासून करतात. ते बेस फेअर. आणि बसून निघालो की मॅम, अपने खुशीसे और २०० दे देना !!! म्हणजे ? मी एकाला म्हणाले, नाहीये मी खुश, ५०० पण देत नाही. मग गप्प बसला.जर टॅक्सी युनियन मधून घेतलीत तर वर मागत नाहीत, पण मग सुरुवातच ७०० पासून. म्हणजे तेच.
आम्हाला दोघांना जाता येता बसचे जितके लागले ऑलमोस्ट तेवढेच मनालीत टॅक्सीला लागले. आणि हॉटेल टु बस स्टँड एवढंच आम्ही फिरलो., बाकी तिकडे पायीच फिरलो. आता मुख्य स्टँडच्या जवळची दोन तीन हॉटेल्स बघून नावे नोट करुन ठेवलीत. निदात ते जवळच्या जवळ तरी पडेल.
केदारबरोबरचा हा प्रवास अगदी मस्त, अविस्मरणीय झाला. आधी दोन दिवस वादावादी झाली आमची,पुढेही अधून्मधून खटके उडाले पण जमून गेलं. एरवी ही मुलं घरात जेमतेम द्रुष्टीला पडतात. इकडे आठवडाभर आम्ही बरोबर होतो. प्रत्येक वेळी चालतांना त्याच्या माझ्यात अंतर असलं तरी तो टप्प्या टप्प्यावर मी कुठे आहे ह्याचा अंदाज घ्यायचाच. बरेचदा, तुझी सॅक पकडतो, ABC ला जातांना स्लिपींग बॅग धरतो, खाली उतरतांना मला वेळ लागतो हे माहिती असल्याने आणि चिखलामुळे निसरड्या रस्त्यावर शेवटच्या दिवशी तो बराच वेळ माझ्या बरोबर चालला. मुलं बोलत नाहीत पण काळजी करतातच. ( हे त्याला बोलून दाखवलं तर तू काळजी करतेस आणि किती वेळा बोलून दाखवतेस, तू पण मनातल्या मनात काळजी कर हे उत्तर ऐकलं)
मुख्य मुद्दा राहीलाच. मी पुन्हा करेन का हे एक्स्पिडीशन ? अर्थात करेनच. करायलाच हवं. समीटपर्यंत पोहोचू शकले नाही म्हणून नाही, त्यात तर नशिबाचाही मुख्य हात असतोच, तर अजून तयारीनिशी करेन., फक्त लगेच, पुढच्या वर्षी करणार नाही. आधी इतर.
कारण,
best views come after the hardest climb