या वर्षातले पहिले बॅककंट्री कॅम्पिंग वेज माउंट लेक या आमच्या घरापासून काही तासंवर असलेल्या लेक काठी केले.
हा लेक अल्पाईन लेक आहे, आजूबाजूच्या माउंटन्स वरची ग्लेशिअर्स या लेकच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहेत. या लेकच्या काठावरुन ग्लेशिअर अगदी जवळून बघता येते. अर्थात, इथे जायला बराच खडतर ट्रेक करून जावं लागतं. साधारण सहा किलो मिटरमधे जवळपास चारहजार फूट उंची गाठायची असल्यामुळे हा ट्रेक करणं फार दमवणारं आहे. त्यामुळं आम्ही तिथं दोन दिवस कॅम्पिंग करायचं ठरवलं होतं. माझ्या नवऱ्याने -शशीने इथल्या लोकल माउंटेनिअरिंग क्लबच्या मेंबर्ससाठी ही फॅमिली फ्रेंडली ट्रिप ठरवली होती.
या ट्रिपसाठी पहिल्यांदाच काव्या स्वत:च सामान असलेली बॅकपॅक घेणार होती. माझी बॅग साधारण दहा किलो, शशीची पंधरा किलो आणि काव्याची साधारण पाच ते सहा किलो झाली.
आमच्या तीन बॅग्जमधे मिळून आमचं सगळं सामान मावलं. जास्त जागा स्लिपिंग बॅग्ज आणि टेंट्ने घेतली. नाष्ट्यासाठी घरी केलेले उपमा मिक्स, पोहे मिक्स आणि ईंस्टंट ओट्स घेतले होते. २ लिटर कुकिंग पॉट्मधे छोटा स्टोव आणि खायचे कप्स मावतात. टॅको करायला रेडी टू इट टॉर्टीया, टॅकोसॉस आणि थोड्या भाज्या कापून घेतल्या. पहिल्या दिवशी खायला मेथीचे पराठे करुन घेतले होते. काव्याला बेगल्स आणि क्रिमचीज तर आम्हला पराठ्यांबरोबर खायला हमस घेतले होते. शिवाय रेडीमिक्स चहा आणि सूप पॅकेट्स सुद्धा घेतली होती. एवढा ऐवज आम्हला दोन दिवसाच्या कँपिंगसाठी पुरेसा झाला.
शुक्रवारी सकाळी दहा पर्यंत आम्ही ट्रेलहेडला पोचलो. आमच्या बरोबर माझी शेजारीण आणि मैत्रीण सेलेस्ट आणि तिची बारा वर्षाची लेक क्लोई पण होत्या. माउंटेनिअरिंग क्लबमधले या ट्रीपला येणारे मेम्बर्स आम्हाला थेट ट्रेलहेडला भेटले. यात २० महिन्याच्या हेझनला घेऊन आलेले पॉल आणि मेलनी, एलेन आणि तिची भाची केल्सी, सुहृद आणि हरीणी हे जोडपे आणि त्यांची मैत्रीण रजनी होते. लहान बाळ धरून आम्ही एकूण तेरा जण होतो. ट्रेक सुरु करायला आम्हाला साधारण साडेअकरा वाजले. आलोक हा आमचा एकोणसत्तर वर्षाचा मित्र दुपारी उशीरा निघणार होता. तो भरपूर अनुभवी आहे त्यामुळे तो एकटा येणार असला तरी आम्हाला त्याची काळजी नव्हती .
ट्रेलवर सुरुवातीची दहा पंधरा मिनिटे थोड्या सपाटीवर चालल्यावर जो चढ सुरु झाला तो शेवटपर्यंत चढत्या भाजणीने वाढतच गेला. मध्ये मध्ये छोटे ओहोळ, झाडांची मुळं आणि काही बोल्डर फिल्ड्स पार करत जाताना कुठे पाय अडकून पडू नये म्हणून काळजी घ्यावी लागत होती.
काव्या आणि क्लोई छोट्या हेझन बरोबर ट्रेल मार्कर शोधायचा खेळ खेळत पुढे पळत होत्या. त्यांच्या पाठीवर साधारण पाच किलो वजन असलेल्या बॅकपॅक्स होत्या पण त्याचा त्यांच्या वेगावर काही परिणाम दिसत नव्हता. हेझनची आई मेलनी आणि बाबा पॉल त्या दोघींबरोबर पुढे होते त्यामुळं आम्ही थोडे मागे असलो तरी आम्हाला काळजी नव्हती. ट्रेल अवघड असल्यामुळं कोणीतरी मोठं सोबत असल्याशिवाय पुढं जायचं नाही हा नियम मुलींसाठी केला होता. अधून मधून थांबत एकमेकांना प्रोत्साहन देत तर कधी चेष्टा मस्करी करत चालत असल्यामुळे अवघड सेक्शन्स सुद्धा सहज पार पडत होते.
शेवटचा चढ आणि बोल्डर पॅच मात्र अगदी कस बघणारा होता. इथे येईपर्यंत ग्रुप बऱ्यापैकी विखुरला होता. मुली केव्हाच पुढे गेल्या होत्या मी मध्ये आणि बाकी सहा जण मागून येत होते.
मी बोल्डर फिल्ड चढून सपाटीवर आले आणि मला लेकचे दर्शन झाले.
वर एक पिट टॉयलेट आणि इमर्जंसी हट आहे आणि काही कॅम्पिंग साईट्स सुद्धा आहेत.
डावीकडे हट आणि उजवीकडे पिट टॉयलेट
आम्ही लेक शेजारी असलेल्या कॅम्पसाईट्स वर कॅम्पिंग करायचं ठरवलं होतं. त्यासाठी दुसऱ्या बाजूने अजून दहा मिनीट चालून काही बोल्डर्स उतरायचे होते पण इथे रेंजर्सनी बऱ्यापैकी सपाट दगड टाकून पायऱ्यांची वाट तयार केली होती. खाली आल्यावर एक स्ट्रीम ओलांडून मग अजून थोड्या कॅम्पसाईट होत्या. ही स्ट्रीम दरवेळी ओलांडणे ही पुढचे दोन दिवस एक कसरतच होती.
स्ट्रीम ओलंडताना सेलेस्ट
आम्ही खाली पोचेपर्यंत मुलींनी शेजार शेजारच्या कॅम्पसाईट निवडून एक एक टेंट लावायला सुरुवात पण केली होती. ग्रुपमधल्या काही जणांना आमच्यापासून थोड्या लांब पण लेक कडेलाच अजून साईट्स मिळाल्या. सगळ्या कॅम्पसाईट्स लेक समोरच असल्यामुळे सगळेच स्पॉट प्रीमियम होते.
लेक कडेच्या कॅम्पसाईट्स
आमचा टेंट
एव्हाना तीन वाजून गेले होते. टेंट लावून झाल्यावर पहिल्यांदा खाऊन घेतलं. सकाळी येतानाच एक फुटलॉन्ग सबवे सँडविच पॅक करून आणलं होतं. शिवाय घरून आणलेले मेथी पराठे होते. त्यामुळे लंचसाठी स्टोव्ह काढून काही शिजवायची वेळ आली नाही .
या कॅम्पसाईट्स जिथे आहेत त्याच्या आजूबाजूला तीव्र उताराचे माउंटन स्लोप आहेत, त्यामुळे हिवाळ्यात इथे खूप avalanche होतात त्यामुळे इथला बेअर हँग (बेअर किंवा इतर प्राण्यांपासून खाद्य सामान सुरक्षित टांगून ठेवण्यासाठी असलेली व्यवस्था ) आणि पिट टॉयलेट दोन्ही मुळापासून उखडले जाऊन इकडे तिकडे पडले होते. एवढ्या वर या अल्पाईन वातावरणात बेअर ना काही खायला मिळत नाही त्यामुळं इथे बेअर क्वचितच दिसतात, मात्र छोटे उंदीर आणि मॉरमॉट नावाचे खार वर्गातले प्राणी इथे खूप होते आणि धीटपणे कॅम्पसाईट जवळ हिंडत सुद्धा होते.
मारमॉट
संध्याकाळी जोराचा वारा सुटला होता. कुकिंग करताना मधेच स्टोव विजू नये म्हणून टेंटच्या फ्लॅपचा(वेस्टीब्युल) आणि बॅगेचा आडोसा करावा लागला.
टॅको तयार होत असताना,
खाण्याचं सगळं सामान खाणं झालं कि बेअर हँग मध्ये नेऊन ठेवावं लागतं होतं. दुसरा सुस्थितीतला बेअरहॅन्ग सुद्धा इमर्जन्सी हट जवळच होता त्यामुळं बाथरूमला जाण्यासाठी आणि खाण्याचं सामान दरवेळी आणण्या नेण्यासाठी इमर्जन्सी हट जवळच्या पिट टॉयलेटकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. वरून खाली यायला आम्हाला दहा मिनिटे लागत होती पण वर जायला मात्र वीस मिनिटे लागत होती पुढच्या दोन दिवसात आमच्या पाच सहा खेपा झाल्या.
खालच्या फोटोत मी हट कडे जात असताना. मागे लेकच्या कडेने टेंट्चे रंगीत ठिपके दिसताहेत.
पाहिल्यादिवशी रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळा ग्रुप आमच्या कॅम्पसाईट्स जवळ जमला. ऊन जसं कॅम्पसाईट्स वरून मागे सरकलं तसं वातावरण एकदम थंड झालं. लेकमध्ये अजूनही न वितळलेला बर्फ किंवा बर्फाच्या लाद्या होत्या. त्या वरून वारे वाहत आल्यामुळे हवेत बोचरा गारठा जाणवायला लागला. मागच्या काही अनुभवांवरून शहाणे झाल्यामुळे आम्ही आमची इन्सुलेशन जॅकेट्स घेऊन आलोच होतो, मग पटापट ती अंगावर चढवून गप्पा मारत बसलो. आजूबाजूच्या शिखरांवर मस्त माउंटन ग्लो पसरला होता
या कॅम्पसाईट्स पासून अजून दोन तीन माउंटन्सला जाता येते. शशीला त्यापैकी माउंट कुकला जायचे होते. मी आणि सेलेस्टने आधीच उद्या निवांत राहायचं ठरवलं होतं. आमच्या कॅम्पसाईटवरून एक ट्रेल अजून पुढे एका लेक कडे जात होती आणि दुसऱ्या काही ग्रुप्स मधले कॅम्पर्स त्या लेक पर्यंत आणि त्याच्याही पुढे एक आइसकेव्ह होती तिथपर्यंत जाऊन आलेले आम्हाला माहित होतं. उद्या जर आमचे पाय ठीक असतील तर मुलींना घेऊन तिकडे जायचं असा आमचा बेत होता. काहीजण माउंट कुकला जायला तयार झाले तर काहींनी कुठे न जाता कॅम्पसाईटवरच निवांत राहायचं ठरवलं.
आलोकला यायला रात्रीचे साडेअकरा झाले. आम्ही सगळे तोपर्यंत जागेच होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी निवांत उठलो. शशी,सुहृद, केल्सी पॉल आणि मेलनी दहाच्या आसपास माउंट कुकला गेले. आम्ही ब्रेकफास्ट करून आमच्या दुसऱ्या ग्रुपला भेटायला गेलो, आलोकला रात्री वर पोचायला उशीर झाला होता. या कठीण ट्रेलवर किती सामान बॅकपॅक मध्ये आणायला हवं याचा अंदाज सपशेल चुकला असं तो म्हणाला. आज तो दिवसभर कुठे न जाता इथेच बसून फोटोग्राफी करणार होता. हरिणी, रजनी आणि एलेन पण कॅम्पसाईटवरच थांबणार होत्या.
आलोक त्याच्या टेंट समोर
पॉल आणि मेलनी हेजनला घेऊन गेल्यामुळे काव्या आणि क्लोई आमच्यासोबत आइसकेव्ह पर्यंत यायला तयार झाल्या, नाहीतर त्या तिथेच त्याच्याबरोबर खेळत बसल्या असत्या. पाणी, स्नॅक्स, एक एक्स्ट्रा लेयर जॅकेट, हायकिंग पोल्स आणि जर मधला स्नोपॅच आइसी झाला असेल तर त्यासाठी शूजवर लावायचे ट्रॅक्शन स्पाईक्स असा सगळा जामानिमा घेऊन निघायला आम्हाला साडेअकरा झाले.
कॅम्प साईटवरून दिसणारी केव्ह
आम्हाला काल भेटलेला मनुष्य म्हणाला होता त्या दिशेने चालायला सुरुवात केली. दगडातून जाणारी ट्रेल पार करत स्नो पॅच पर्यंत पोचलो.
ऊन चांगलचं वाढल्यामुळे स्नो भुसभुशीत झाला होता, स्पाईक्सची गरज नव्हती त्यामुळे आधी इथून गेलेल्या लोकांच्या शू ट्रॅकच्या मागावर आम्ही पुढे गेलो, थोडं वर चढून गेल्यावर ग्लेशिअरच्या खाली असलेला टपर लेक दिसला.
अलीकडे टपरलेक आणि दगडी टेकाडीच्या पलीकडे वेज लेक आणि त्याच्या काठावर दिसणारे टेंटचे छोटे ठिपके.
काही वर्षां पूर्वी पर्यंत ग्लेशिअर या लेकाला लागून होते आता ते बरंच मागे सरकलंय.
या लेकमध्ये वरून बरेच ओहोळ येऊन मिळत होते. आम्ही ते ओलांडून पुढे ग्लेशिअरच्या बाजूने असलेल्या खडकाळ पॅच वरून एकदाचे त्या आईस केव्ह पर्यंत पोचलो. याआधी आम्ही कुणीच आइसकेव्ह बघितली नव्हती त्यामुळं तिथं त्या केव्हला बघायला फार भारी वाटतं होतं. केव्ह दोन्ही बाजूनं ओपन होती त्यामुळं या बाजूने त्या बाजूला जाता आलं असतं. पण वरून छोटे दगड सतत खाली पडत होते त्यामुळं आम्ही फक्त बाहेरूनच केव्ह बघण्यावर समाधान मानलं. थोडावेळ तिथे टाईमपास करून आम्ही परत आलो.
आइस्केव्हचं अंतरंग
कॅम्पसाईटला परत येईपर्यंत दोन वाजून गेले होते. आम्ही खाऊन घेतलं आणि फूड बॅग्स ठेवायला हटकडे निघालो. रेंजर्सनी तोपर्यंत लेक शेजारच्या कॅम्पर्ससाठी सिजनल टॉयलेट टेन्ट उभा केला होता पण खाण्याचं सामान ठेवायला लॉकर्स पुढच्या आठवड्यात येणार होते. हटकडे जायच्या रस्त्यावर पॉल आणि मेलनी भेटले. माउंटकूक च्या ट्रेलवर बराच स्नो होता त्यामुळं ते दोघे परत आले होते. उरलेला ग्रुप समिटकडे गेला होता. आम्ही परत येऊन बाकी ग्रुपला आइसकेव्ह चे फोटो दाखवले. ते बघून त्यांनाही तिकडे जायची सुरसुरी आली. पण ऊन जरा जास्तच असल्यामुळं त्यांनी थोडं उशिरा जायचं ठरवलं.
आल्या दिवसापासून मुली रोज लेक मध्ये डुबक्या मारायला जात होत्या. हा लेक ग्लेशिअरच्या पाण्याने भरत असल्यामुळे पाणी फारच गार होतं पण त्यांना त्यात मजा येत होती. आइसकेव्ह वरून परत येताना त्यांनी मला आणि सेलेस्टला पण त्या थंड पाण्यात डुबकी मारण्यासाठी पटवलं. थंडीत हा लेक पूर्णपणे गोठलेला असतो. आता जरी उन्हाळा होता तरी अजूनही बर्फाच्या लाद्या लेकच्या पृष्ठभागावर तरंगत होत्या. हवा ज्या दिशेला वाहत असे त्या प्रमाणे त्या कधी आमच्या साईट्सच्या बाजूला किंवा समोर डोंगराच्या बाजूला जात होत्या. नेमक्या आत्ता त्या आमच्याबाजूला जमा झाल्या होत्या. माझ्याकडे चेंज नाही म्हणून मी पळवाट काढायचा प्रयत्न केला पण सेलेस्टने तिची एक शॉर्ट मला देऊ केली. आम्हीही मग त्या थंड पाण्यात डुबक्या मारून आमची पोलर प्लंजची हौस भागवून घेतली.
मुली त्यांचे स्विम सुट्स घेउनच आल्या होत्या. लेकचं पाणी जरी खूप थंड असलं तरी बाहेर आल्यावर उन्हात कपडे आणि अंग लगेच वाळत होतं. मुली आदल्या लेकमधे गेल्या तेव्हा बर्फाचा थर दुसर्या बाजूला होता.
मुलींच्या मानाने आम्ही अगदीच भोज्याला शिवून आलो. पण तेव्हड्यात सुद्धा अमचे पाय गार पडले.
आमचे हे उद्योग झालयावर आम्ही निवांत गप्पा मारत बसलो. माउंट कुकला गेलेले शशी, केल्सी आणि सुहृद अपेक्षेपेक्षा जरा उशिराच परत आले. उरलेला ग्रुप आइसकेव्ह कडे गेला होता ते पण थोड्यावेळाने परत आले. टपरलेकला येणाऱ्या छोट्या स्ट्रीम्स आता जास्त जोरात वाहात होत्या आणि या ग्रुपला त्या ओलांडून पलीकडे जाता आलं नाही त्यामुळे ते फक्त टपरलेक पर्यंत जाऊन परत आले.
जेवण करून थोडावेळ गप्पा मारून सगळा ग्रुप पांगला. आज सगळेच हाईक करून आणि दिवसभर उन्हात वावरून दमलो होतो. त्यामुळं ऊन उतरल्यावर साधारण दहाच्या आसपास आम्ही आपापल्या टेंटमध्ये झोपायला गेलो. सकाळी कॅम्पसाईट स्वच्छ करून सगळं सामान पॅक करून झाल्यावर ग्रुप फोटोसेशन झालं.
स्वच्छ कॅम्पसाईट
आलोकने काढलेला ग्रुप फोटो
आणि मेलनीने काढलेला मुलींचा फोटो
वेगवेगळ्या प्रकारे पोटभर फोटो काढून झाल्यावर एकदाचे आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. हटकडे जाणारा चढ चढून वर आलो आणि मग पुन्हा हट मध्ये पण थोडा टाईमपास केला. तिथे एक व्हिजिटर जर्नल होतं त्यात काहीबाही लिहिलं. थोडे फोटो काढले.
हिवाळ्यात येणारे हायकर्स बाहेर वेदर खराब असेल तर इमर्जन्सी हटमधे रात्री थांबू शकतात इतर वेळी हट्मधे राहण्याची परवानगी नाही.
हटच्या आतमधे
जो शेवटचा चढ चढायला सगळ्यात जास्त वेळ लागला होता तो उतारायलाही तसाच अवघड होता त्यामुळं सेलेस्ट तर त्याला व्हॅली ऑफ डेथच म्हणत होती. पाठीवराच्या बॅग्स सांभाळत सावधानपणे हा पॅच सगळ्यांनी पार केला.
व्हॅली ऑफ डेथ उतरताना
याच्याच शेजारी लेकमधून तयार झालेला धबधबा खाली कोसळताना.
पुढची सगळी ट्रेल जरी उताराची होती तरी या पॅचपेक्षा सुसह्य होती आणि घरी जायच्या ओढीनं ती लवकर पार पडली. पार्किंग लॉटमध्ये पोचल्यावर अजून अशा कॅम्पिंग ट्रिप्ससाठी पुन्हा भेटू म्हणत सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
वेज लेक मधे वेज माउंटन
टिपः काही फोटो माझे तर काही ग्रुपमधल्या इतरांचे आहेत. फोटो पब्लिक डोमेनमधे प्रकाशीत करण्याची परवनगी सगळ्यांकडून घेतलेली आहे.