मैत्रिण माध्यमातून झालेली मैत्रिण - कस्तो आणि माझ्यात एक बारीक धागा समान आहे, तो म्हणजे गिर्यारोहण, निसर्ग पालथे घालणे, कँपिंग याची आवड, असं आपलं मी समजते! अर्थात ती मंडळी भलभलते हाईक्स करतात, ते माझ्या आवक्याबाहेरचे असल्याने...सामाईक आवड वगैरे कस्तो समजणार नाही!! पण तरी आपण एकदा एकत्र बॅककंट्री कँपिंग करुया असं आमच़ कधीतरी बोलणं झालेलं. आणि नेमके तिच्या फॅमिलीचे आणि आमचे वेगवेगळे ट्रीप्सचे प्लॅन्स (जे वेगवेगळी जंगलं भटकणे हेच होते, ते त्या दोन्ही ठिकाणी सध्या जंगल-आगी चालू असल्याने कॅन्सल झाले आणि अचानक आमचे एकत्र जायचे ठरले. खरं तर माझ्यासारख्या लिंबू-टिंबूला त्यांच्याबरोबर न्यायला कस्तो मंडळी तयार झाली, हेच आश्चर्य! पण बिचारे चांगले आहेत तसे, कस्तो आणि श्री. कस्तो!
तर गेल्या वीकांताला हे बॅककंट्री कँपिंग केलं. हा त्या कँपिंग मैफिलीचा वृत्तांत! (बॅककंट्री कँपिंग म्हणजे जंगलात्/डोंगरावर आतमध्ये काही अंतर चालून जाऊन केलेले कँपिग. फ्रंट्कंट्री कँपिंग मध्ये कँपसाईटलाच गाडी नेता येते, गाडीतून सामान उतरवून बाजूलाच टेंट ठोकायचा. त्यामुळे हव्वे ते गाडीत कोंबून नेता येते. हिवाळ्यात छोटा पोर्टेबल बॅटरी-ऑपरेटेड हीटर तर उन्हाळ्यात छोटा पोर्टेबल बॅटरी-ऑपरेटेड पंखा इथपासून ते गाद्या-गिर्द्या, उश्या, पांघरूणं...काहीही नेता येते :). बॅककंट्री कँपिंग ला मात्र सामान आपले आपण वाहून चालायचे असल्याने किती न्यायचे याला मर्यादा येतात.)
कस्तो रहात असलेल्या व्हॅनकुव्हर शहरापासून २-२.५ तासावर असलेल्या एका जंगलात (E. C. Manning Provincial Park) जायचं ठरलं. बालवाडीतल्या माझ्याकरीता - हायकिंग्/क्लाईंबिंग Ph. D. असलेल्या मि. कस्तोंनी एक साधा-सरळ-सोप्पा हाईक निवडला. ४ मैल (बहुतांश सपाट!) चालत जाऊन strike lake कँपसाईट वर जाऊन तंबू ठोकायचे ठरवले.
शुक्रवारी सकाळी आम्ही दोघं आमच्या घरून ६.३० ला निघून पल्याडच्या देशात, कस्तो कडे ९ वा. पोहोचलो. कस्तो कडे खाण्यापिण्याची चंगळ असते. आम्ही गेलो तर त्यांच्या दोन मॉम्सनी मिळून (कस्तोची माता आणि श्री. कस्तोंची माता!) वाफाळत्या इडल्या, गरमा गरम सांबार आणि चटपटीत चटणी असा बेत तयार ठेवलेला...मग काय! मी चांगल्या ७-८ इडल्या रिचवल्या. वरती मि. कस्तोंना कॉफी बनवून द्या असं फर्मान सोडलं. आता कसं! पुढील प्रवासाला निघायला मोकळे! दोन्ही काकू आणि कस्तोच्या लेकीला बाय-बाय करून आम्ही मार्गी लागलो. दु. १२.३० वाजता पार्किंग लॉटला पोहोचून, गाडी लावून, पाठीवर विंचवाचे बिर्हाड लावून आम्ही दु, १ वा. चालायला सुरूवात केली. अगदी मजे-मजेचा, अगदी सोप्पा असा हा हाईक आहे.
lightning lake - हाईकची सुरूवात.
या जंगलात अनेक तलावांची साखळीच आहे. त्यांची नावही अगदी मस्त, सार्थ आहेत! मेघगर्जना/वादळ या अर्थी सगळी नावं! अगदी सुरूवातीला, पार्किंग लॉट आहे तिथे आहे, lightning lake - "वीजांचा चकचकाट तलाव". या तलावाच्या बाजूने चालायला सुरूवात करायची. हा तलाव एका छोट्या ओहोळाने दोन भागात विभागला गेलाय. दोन्ही भाग मिळून प्रचंड मोठ्ठा आणि सुंदर तलाव आहे. पार्किंग लॉटमध्ये बोटी भाड्याने मिळू शकतात, त्या घेऊन अनेकजण इथे बोटींग करत होते. सुंदर, शांत, निसर्गरम्य अश्या या तलावात बोटींगला फार मजा येत असेल. तर एकदा परत इथे बोटींगला येऊ असे मी ठरवूनच टाकले.
तलावाच्या बाजूने चालत, lightning lake - भाग १ ला संपून भाग -२ लागला. या दोन भागांना जोडणार्या स्ट्रीम वर रेनबो ब्रिज नावाचा पूल आहे. त्या पूलावरून अनेक जणं तलावात उड्या मारत होते. "अरे व्वा! काय मस्त! काय मज्जा येत असेल अश्या उड्या मारायला!" अशी दुरून डोंगर साजरी वाक्य टाकत आम्ही पुढे निघालो. (नियतीच्या आणि मि. कस्तोंच्या मनात काय होतं, ते आम्हा पामरांना तेव्हा कळलं नाही!)
तलावाच्या बाजूने रानफुले वगैरे बघत आम्ही पुढील तलावापाशी आलो. त्याचं नाव आहे - Flash lake - "वीजांचा लखलखाट तलाव"! हा तर आणखीनच सुंदर तलाव होता. आजूबाजूला असलेल्या गर्द हिरव्या झाडांमुळे संपूर्ण तलाव हिरवागार, पाचूचा तलाव असावा, असा दिसत होता.
ह्याच्याही काठाने, जंगलातल्या पायवाटेने चालत आम्ही पुढच्या तलावापाशी - Strike Lake (वीजेचा तडाखा तलाव!) ओलांडून साधारण ३.३० वा. जंगलातल्या आमच्या कँपसाईट पाशी आलो.
इथे ९ तंबू ठोकायला जागा केल्या आहेत. शुक्रवार असल्याने बरीच मंडळी असतील असा आमचा होरा होता. पण केवळ अजून एकच - ३ जणांचा गृप आलेला होता. आम्ही निवांतपणे सामान उतरवून, हव्या त्या जागा निवडून, आमचे तंबू ठोकले.
झाडांना लावायचे हॅमॉक - झोपाळे बांधले. मि. कस्तो अगदी सुगृहस्थासारखे आम्हाला खाणं करण्याच्या मागे लागले. बाकी उंडार मंडळींनी उंडारक्या करायला घेतल्या. आळशी मी, हॅमॉक मध्ये जाऊन पहुडले आणि लगेच नीद्रादेवीच्या प्रार्थनेत गुंतले.
कस्तो व श्री. कस्तो त्यांच्या हॅमॉकमध्ये चहा पीत बसलेले निवांत क्षण!
कस्तो आणि मि. कस्तो, यांनी खाण्याचे प्लॅनिंग जबरदस्त केलेले होते. त्यामुळे हे कँपिंग - हे बॅककंट्री कँपिंग न वाटता रेग्युलर कँपिंग वाटतंय असं मी अनेकदा नमूद केलं. अर्थात आमची चंगळ झाली! पुढले दोन दिवस - हमस ब्रेड सँडविच, मेथी पराठे- लसून चटणी, मॅगी/चिन्स सिक्रेट नूडल्स, टोमॅटो सूप, पोहे, उपमा - अशी आमची खाण्याची चंगळ होती. चहा-कॉफीचे घाणे तर चालूच होते! शाही कँपिंग होतं एकदम!
खाऊन झाल्यावर मी आणि कस्तो ने, मी एक पझल गेम खेळायला नेलेला, तो खेळायला काढला. नवरे मंडळी - "नसते डोक्याला ताण देणारे गेम्स कशाला खेळायचे?" - असे म्हणून हॅमॉक्स मध्ये ताणून द्यायला गेले. आमचे खेळताना फोटो-बिटो मात्र काढले तेवढ्यात. पझल्स सोडवताना फोटो काढायचे म्हणून कस्तोच्या सुचनेनुसार आम्ही लगेच "विचारवंत" पोझेस वगैरे दिल्या! हो, फोटोत तरी आपण विचार करतोय, असं लोकांना वाटावं!! आणि या स्वतःच्या कृतीवर खूश होऊन आम्ही टाळ्या बिळ्या दिल्या एकमेकींना...तर ते "विचारवंत" फोटो तर काही काढले की नाही, देव जाणे...हे दात काढून हश्या आणि टाळ्यांचे मात्र फोटो लगेच मुबलक काढले गेलेत.
तेवढ्यात मी वर म्हटलंय तसं या सर्व तलावांची नावं सार्थ ठरावीत असे जोरदार ढगांचे गडगडाट चालू झाले, आणि पावसाचे टपोरे थेंब आलेच. मग सगळं जरा आडोश्याला ढकलून आम्ही पण आपापल्या टेंट मध्ये जाऊन बसलो. पाऊस उघडल्यावर
मग गप्पा, चहा-कॉफी करता करता एकीकडे मी नेलेल्या स्केचबुक मध्ये मी काही स्केचेस काढली. कस्तोनी माझ्या स्केचेस ची तारीफ चालू केल्याबरोबर तिलाही स्केचिंगला बसवले. तिने कसलं भारी स्केच काढलं!
माझं स्केच
माझं स्केच
कस्तोनी काढलेलं स्केच
रात्रीचं जेवण म्हणून पराठे भाजले तव्यावर (अर्थात शेफ श्री. कस्तो. यांनी!) नॉरचं गरमा-गर्म टोमॅटो सूप आणि गरम पराठे, लसूण चटणी! मस्त थंडगार वातावरणात इतकं भारी वाटलं जेवण!
(पराठे मी करून नेलेले. मागे पहिल्यांदा कस्तो कडे गेलेले तेव्हा धाकटा लेक सोबत होता आणि श्री. कस्तोंनी केलेले पराठे खाऊन तो पराठ्यांचा मापदंड बनवलेला त्याने. मला त्या काकासारखे पराठे जमत नाहीत, असं त्यानी प्रामाणिकपणे मला सांगून टाकलेलं! एवढंच नाही, तर तो अजूनही या काकाचा उल्लेख पराठा मॅन असाच करतो. तर यावेळी मी केलेले पराठे खाऊन, खुद्द पराठा मॅनने मस्त झालेत पराठे - असं सांगितल्याने मी कॉलर ताठ करून बसले! घरी येऊन लेकाला मात्र हे सांगण्यात अर्थ नव्हता. तो काही ते मानणार नाही!)
दुसर्या दिवशी सकाळी कस्तोने आणलेल्या पोह्यांचा मस्त नाश्ता करून मग तलाव साखळीतला पुढील तलाव Thunder Lake (गडगडाट तलाव) च्या हाईकला निघालो. हा तलाव आमच्या कँपग्राऊंडपासून पुढे ४ मैल होता. सुरूवात केल्यावर पहिले काही वेळ रस्ता आधीच्यासारखाच सोप्पा होता...पण पुढे मात्र तो फार वाढलेल्या झाडीतून होता. त्यातून कस्तो आणि मी हात-पाय उघडे टाकणारे कपडे घालून निघालेलो, त्यामुळे ती झुडुपं आमच्या हातापायांना टोचत होती. मग आपण कश्या निबीड अरण्यातून सीतेसारख्या वनवासाला निघालोय, असं आमचं मत झालं. आपण दोघी सीतेसारख्याच गरीब-भाबड्या आहोत, वनवासाला निघालोय - असं ही एकमताने आम्हीच ठरवलं! आपण म्हणून अश्या काट्याकुट्यातून जातोय, गरीब गायींसारख्या - हा डायलॉग वारंवार मारण्यात आला. श्री. कस्तो त्याकडे दुर्लक्ष करून पुढे दिसेनासे झाले. मग आम्ही तश्याच त्या निबिड अरण्यातून काटया-कुट्यांमधून वाट काढून पुढे गेलो तर पुढे हा मोठठा दगडाचा डोंगर!
निबिड झाडीतून वाट काढणार्या आम्ही दोघी सीतामाई!
काट्याकुट्यांचं जंगल पार केलं, आता दगडधोंड्यांचा डोंगर पार करा...असं म्हणत तो ही पार केल्यावर पल्याड तो Thunder Lake दिसला...मात्र त्याचं पाणी फारच आटलेलं. त्या डोंगराच्या उतारावरून तलावाच्या काठाशी उतरायला श्री. कस्तोंनी निवडलेली भयंकर उताराची वाट बघून मी, त्या वाटेनी उतरायला सपशेल नकार दिला. मग मी, आणि कस्तोला त्या वाटेने जमलं असतं तरी केवळ मला साथ द्यायला ती, आम्ही परत वळलो. एक दुसरी सोपी वाट सापडली, आम्हाला खाली उतरायला आणि आम्ही त्या तलावाच्या किनारी पोहोचलो. तिकडे थोडे फोटो काढून मग परत आमच्या कँपसाईटकडे परत वळलो.
दुपारी परत एकदा ढगांचा कडकडाट, वीजांचा लखलखाट करत पाऊसधारा बरसल्या. Lightning, Thunder, Flash ही बाकीच्या तलांवांची नावं सार्थ केलीस तरी वीजराणी, आमचं कँपग्राऊंड असलेल्या तलावाचं नाव सार्थ करू नकोस - Strike lake - वीज कोसळणे - असा आम्ही आपला धावा केला!
रात्री परत गरम गरम सूप आणि गरमा-गरम नूडल्स खाऊन मी आणि कस्तो गाणी गात बसलो, जरा घसे साफ करून घेतले. पुरेसे घसे खरवडून झाल्यावर मग झोपायला गेलो.
दुसर्या दिवशी उठून परत कस्तोने पाणी न घालता शिजवून आणलेला उपमा - श्री. कस्तोंनी पाणी घालून, वाफ आणून - गरमा-गरम खिलवला. मग आवरा-आवरीला सुरूवात केली. सगळा संसार परत विंचवाच्या बिर्हाडात कोंबायचा होता. दोनेक तास लावून सगळं आवरलं, टेंटस् गुंडाळले आणि मग गाशा गुंडाळून परतीच्या वाटेला लागलो. वाटेत थांबत बरेच फोटो काढले.
आम्हाला वाटले, आता २-२.५ तासात चालत पोहोचू गाडीपाशी, येताना लागला तसाच वेळ! तर कसलं काय! वाटेत परत तो येताना लागलेला रेनबो ब्रिज लागला. आणि श्री. कस्तोंनी शांतपणे आदेश दिला, आता इथून पूलावरून उडया मारायच्या,सगळेजणं मारतायंत तश्या आपण पण! आता आली का पंचाईत! पाणी किती थंड असेल या विचारानेच मला हुडहुडी भरली. हे सगळे तलाव - हे आजूबाजूच्या डोंगरातल्या बर्फांनी, ग्लेशिअर्सच्या पाण्याने झरत असतात, त्यामुळे भर उन्हाळ्यातही त्यांचं पाणी थंडच असतं...पण श्री. कस्तोंनी शांतपणे स्विमपँटस चढवून, पूलावर जाऊन ऊडी मारली पण. (त्याचं कारण त्यांच्या आधीच्या वेज माउंट ग्लेशिअर लेक मध्ये त्यांनी मारलेल्या डुबक्या असणार! त्या तलावाच्या मानाने ह्याचं पाणी म्हणजे उष्ण पाण्याचे झरेच!) मात्र पाण्यात पडल्यावर त्यांची झालेली रिअॅक्शन बघून - पाणी भलतंच थंड आहे, याची मला खात्री झाली. मी पाण्यात पाय घालून पण बघितले आणि या इतक्या थंड पाण्यात जमणार नाही वगैरे सांगून बघितले. पण श्री. कस्तो कसले ऐकतायंत...मारा उडया - त्यांनी फर्मान सोडलं. मग काय करता? त्यांनी खिलवलेल्या खाण्याला जागून मारल्या उड्या...थंडगार पाण्यात डुंबून मस्त फ्रेश वाटलं हा पण! मज्जा आली. मग परत एक उड्यांचा डाव झाला.
परत एकदा परतीची वाट धरली. यावेळेस Lightning Lake च्या दुसर्या बाजूची वाट आम्ही धरलेली. ती थोडी जास्त लांब फिरून आहे, त्यामुळे पलिकडे पार्किंग लॉट दिसत होता पण गोल वळसे घालून जाणारा रस्ता काही संपेना...शेवटी संपला, पार्किंग लॉटमध्ये परत आलो आणि आमच्या बॅककंट्री कँपिंगची सांगता झाली.
************************************************************************************************************************
हल्ली मी illustrative ट्रॅव्हल sketching जर्नल बनवण्याचे प्रयोग करत असते. तर या ट्रीपचं पण हे बनवलंय. त्याचा एक व्हिडीओ केलाय तो टाकते इथे.