तू... माझा बाप्पा

तू आलास
तुझ्या आगमनाची तयारी आम्ही चौघांनी आधीच करून ठेवली होती. दहा दिवस माझ्या घरी राहिलास.
ते दहा दिवस माझ्यासाठी नेहमीच शांतवणारे आणि तू माझ्याजवळ आहेस हा दिलासा देणारे असतात. खूप बरं वाटतं आत कुठेतरी.
तू आहेस.
आत्ता. इथे.
माझ्या घरी.
माझ्या डोळ्यांसमोर.
मनाला वाटेल तेंव्हा तुला डोळे भरून पाहता येतं.
बोलत बसता येतं तुझ्याशी.
रोज तुझ्यासाठी हार गुंफताना तल्लीन होऊन जाते मी.
दुर्वा निवडताना दोन्ही लेक सोबत येतात. दुर्वांचा पसाराच जास्त करतात पण मनापासून मदत करतात मला. धाकट्याला दूर्वांशी खेळायला आवडतं. मोठ्याला या वर्षी हार करायला शिकवलं मी. सुंदर हार गुंफला त्याने विसर्जनादिवशी.
उकडीचे मोदक केल्यावर ते सुबक झाले कि डोळ्यात पाणी येतं. तू करवून घेतोस माझ्याकडून सगळं. रोज खिरापत काय हे लेक विचारतो. त्याला मी मराठी शिकवू शकले त्याचं बरं वाटतं. माझं लहानपण त्या दोघांच्यात मला बघता येतं. या वर्षी मला जास्वंदीची फुलं वाहायची होती तुला. माझी कुंडीतली जास्वंद काय बहरली तू आल्यावर. लेकरं खुश फुलं बघून. तू करवून घेतोस सगळं. बिन मागता देतोस.
आशीर्वादाचा हात उंच ठेवतोस.
दहा दिवस भुर्रर्र उडून जातात.
तू जायची वेळ येते.
मोठा म्हणतो आपण त्याला ठेवून घेऊया कि जास्त दिवस.
मी हसते, म्हणते अरे त्याला त्याच्या आई वडिलांकडे
जायला हवं ना!
तो कायम कसा राहील इथे?
आपल्या घरी दरवर्षी दहा दिवस राहायला येतो हे किती छान आहे. लेक जरा नाखुशीनेच हो म्हणतो. धाकटा बाय बाप्पा म्हणतो आणि तुझ्या रिकाम्या आसनाकडे टुकूटुकू बघत बसतो.
घर रिकामं झाल्यासारखं वाटतं.
रोजच्या आरतीची मज्जा संपते. विसर्जनाचे मोदक मन लावून करते मी.
सगळे मिळून विसर्जन करतो. नवऱ्याच्या हातात बसून तू निघतोस. मी पुन:पुन्हा तुला डोळे भरून पाहून घेते.
पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणात तू जातोस.
लवकर ये रे पुढच्या वर्षी म्हणताना पाण्यात बुडणारी तुझी मूर्ती मलाच धूसर दिसायला लागते.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle