त्या तॄणांच्या माळरानी

डोळ्यासमोर नजर जाईल तिथपर्यंत विस्तीर्ण माळरान, सोनेरी पिवळ्या गवताने आच्छादलेले! साधारण हजारेक एकराचा त्याचा पसारा. त्याच्या ज्या कडेला मी उभी आहे. तिथून माळरान संपून उत्तरेकडे शेताडी सुरू होते. ती थेट वायव्येकडून आग्नेयेकडे पसरलेल्या पुणे सोलापूर महामार्गापर्यंत. या सगळ्यातून तिरकी काट मारून एक छोटासा ओढा वाहतो त्याचा आता रस्त्यापल्याडच्या शिवारांत फारसा माग लागत नाही. पण लागला तरी पुढे उत्तरेकडे लगेचच असलेल्या भीमेच्या काठापर्यंतच त्याची धाव असणार हे स्पष्ट आहे. पश्चिम दख्खनमध्ये अनेक ठिकाणी अगदी सर्रास आढळणार्‍या भौगोलिक परिसर-तुकड्यांमधलाच हा एक. गावातले लोक याला बामणथळ म्हणतात. मी इथे यायच्या आधी फक्त एका ताम्रपाषाणयुगीन स्थळाची साठच्या दशकातली जुनी नोंद पडताळून बघणे एवढाच एक उद्देश होता. पण इथे आल्यावर दख्खनच्या इतिहासाच्या अतिमहत्वाच्या पैलूचा चार हजार वर्षांचा एक प्रातिनिधिक पट माझ्यासमोर उलगडणार आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती.

पश्चिम दख्खनमध्ये प्रवास करताना ही अशी कुरणे, गवताळ पट्टे आपल्याला बरेचदा दिसतात. हिवाळ्यात उन्हाळ्यात पिवळे तांबूस असलेले गवत पावसाळा आला की हिरवेगार होते. हे चक्र गेली हजारो वर्षे अव्याहत चालत आलेले आहे. भारतीय उपखंडात मोसमी पाऊस साधारणपणे दोन कोटी सत्तर लाख वर्षांपूर्वी सुस्थापित झाला असं पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला सांगतात. मानवी इतिहासाची उपखंडातील पाळेमुळे साधारणपणे दहा लाख वर्षापूर्वीपर्यंत मागे जातात आणि दख्खनमध्ये आपल्याला साधारणपणे आठ लाख वर्षांपूर्वीपासून आदिमानवाचा वावर दिसतो. संपूर्ण भारतीय प्रागैतिहास, इतिहासपूर्व काल आणि ऐतिहासिक काल हे मोसमी पावसाने निर्माण झालेल्या नैसर्गिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर आकारास आले, घडले. मोसमी पावसाच्या या पर्यावरणात उपखंडामध्ये अमाप विविधता आहे. बर्फाच्छादित पर्वतांपासून सागरकिनार्‍यांपर्यंत आणि घनदाट जंगलांपासून वाळवंटापर्यंत विविध पर्यावरणीय आणि भौगोलिक प्रदेश यात येतात. अर्धशुष्क, बहुतांशी हंगामी जलस्रोतांचा दख्खनचा भूभाग याचाच एक भाग आहे.
दख्खनच्या अर्धशुष्क भूमीत पठारांवर, त्यांच्या उतारावर बरड माळराने आणि गवताळ प्रदेश, अधेमधे सुपीक काळ्या मातीची शेतजमीन आणि नद्यांच्या काठाकाठाने असलेली गाळाची जमीन यांचे मिश्रण दिसून येते. हे कधीपासूनचे आहे? तर लोणारच्या तळ्यातून अभ्यासलेले पुरावे आपल्याला दख्खनच्या पुरापर्यावरणीय इतिहासाचे काही महत्वाचे टप्पे दाखवतात. साधारणपणे साडेचार हजार वर्षांपूर्वी, जेव्हा दख्खनच्या पहिल्या शेतकरी वसाहतींचा उदय (२४५० इ स पू) झालेला दिसतो, तेव्हा मोसमी पावसाची तीव्रता कमी झालेली असल्याने शुष्क पानगळीची जंगले कमी होऊन झाडोरा, गवताळ प्रदेश यांचं प्रमाण वाढायला लागलेले दिसते.

आदिमानवाचे शिकारी भटके जीवन सोडून शेतीचा शोध लावून स्थिर जीवनाची सुरुवात हा माणसांच्या इतिहासातील एक फार महत्वाचा क्रांतिकारी टप्पा मानला जातो. रानटी वाणे नियंत्रित लागवडीखाली आणणे आणि उपयुक्त प्राणी पाळायला सुरुवात करणे हा या क्रांतीचा गाभा होता. परिणामी, माणसाच्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाची चौकट जशी आमूलाग्र बदलली तशीच मनुष्यसमाजाचा आसपासच्या परिसराकडे बघायचा दृष्टीकोनही बदलला. त्या परिसराशी असलेले त्याचे नाते एका संक्रमणाच्या कालखंडापाशी येऊन पोहोचले. इतकी सहस्रके आसपासच्या परिसरातून आढळणार्‍या संसाधनांवर माणसे उपजीविका करत होती, पण त्यावर त्यांचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. किंवा त्यातल्या कुठल्याही संसाधनाची उपलब्धता त्यांच्या हातात नव्हती. आता मात्र चित्र बदलले.

पुरापर्यावरण आणि पुरावनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते भारतीय उपखंडात फार तुटक आणि अपुरा पुरावा असला तरीही आफ्रिकेतील अशाच अर्धशुष्क प्रदेशांतील घडामोडी लक्षात घेता इथेही शेतीच्या आधीच भटक्या शिकारी समूहांनी काही प्रमाणात प्राणी माणसाळवण्याचे प्रयत्न केले असण्याची शक्यता आहे तसेच आसपास उपलब्ध असलेल्या तृणवनस्पतींचा वापर आहारात केला असणार. त्यानंतरच या वनस्पतींची लागवड करण्याची युक्ती सुचली असणार.

जेव्हा शेतीचा शोध लागून माणसे एका ठिकाणी वर्षातून निदान बरेचसे महिने राहू लागली तेव्हा त्याचबरोबर पाळलेले प्राणीही राहू लागले. अर्धशुष्क पर्यावरणातील मोसमी पाऊसमानामुळे कुठलाही समूह कधीच पूर्णपणे शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून राहू शकत नव्हता आणि नाही.

बेभरवशी अर्धशुष्क पर्यावरणात तग धरून राहण्यासाठी मुख्यतः चार प्रकारचे मार्ग चोखाळले जातात असे जगभरच्या संशोधकांचे निरिक्षण आहे. हे मार्ग म्हणजे उपजीविकेची विविधता, साठवण, विविध पल्ल्यांची भटकंती आणि इतर समूहांशी देवाणघेवाण.

दख्खनचे आद्य शेतकरी याला अपवाद नव्हते. तुलनेने मर्यादित असलेली कसाची काळी माती सोडली तर आसपास जंगल आणि गवताळ प्रदेशातच ही छोटीछोटी गावे वसली होती. यांचा कालखंड उणापुरा दीडपावणेदोन हजार वर्षांचा. इ स पू २४५० च्या आसपास उदयाला आलेली ही ग्रामसंस्कृती इ.स.पू. ९००-७०० च्या आसपास लुप्त झाली. तांबे गाळायचे ज्ञान यांना अवगत होते परंतु लोहतंत्रज्ञान अवगत नव्हते. त्यामुळे यांना ताम्रपाषाणयुगीन कालखंड म्हणले जाते. तापीच्या खोर्‍यापासून भीमा- कृष्णेच्या खोर्‍यापर्यंत, खानदेशापासून ते अगदी आजच्या कर्नाटकापर्यंत या संस्कृतीच्या वसाहतींचे अवशेष मिळालेले आहेत. यात सर्वात महत्वाची मोठी गावे/प्रादेशिक केंद्रे होती घोड नदीच्या काठावरचं इनामगाव, प्रवरेच्या काठावरचं दायमाबाद आणि तापीच्या काठावरचे प्रकाशे. याशिवाय अनेको छोटी गावे, वाड्या, वस्त्या होत्याच. असेच आद्य शेतकरी समूह आसपासच्या गुजरात, माळवा, कर्नाटक, आंध्र या प्रदेशांतही होते. सिंधू संस्कृतीचे नागरीकरण लयाला गेले त्यासुमारास इथले भूप्रदेश वस्त्यांनी गजबजायला लागले होते. भारतीय उपखंडातले दुसरे शहरीकरण अजून दोन-अडीच हजार वर्षे दूर होते. सगळीकडे कमीअधिक प्रमाणात आद्य शेतकर्‍यांच्या ग्रामसंस्कृतींचे जाळे पसरले होते. दख्खनच्या गवताळ प्रदेशांच्या सांस्कृतिक इतिहासाचा पहिला टप्पा या वसाहतींबरोबर सुरू होतो

या दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन शेतकर्‍यांनी वरचे चारही मार्ग आचरणात आणलेले दिसून येतात.

शेतीचे तंत्रज्ञान नव्याने विकसित झाले होते शिवाय लोखंडी नांगर नसल्याने हाडांचे, शिंगांचे नांगर किंवा टोकदार दगडाचा वापर केला जात असे. शेतीतून मिळणारे धान्य संपायला काही महिने तरी लागतातच, त्यामुळे साठवणीचे विविध प्रकार या गावांमध्ये दिसून आलेले आहेत. पाणी साठवणीसाठी मोठाले रांजण, तसेच धान्य साठवणीसाठी चारपायांचे रांजण, पेवे, कणग्या अशा सोयी जवळजवळ प्रत्येक घरात होत्या.

शेती तशीही मोसमी पावसावर अवलंबून असते. खरीप आणि रबी दोन्ही हंगामात तृणधान्ये, डाळी, कडधान्ये, भरडधान्ये, तेलबिया अशी विविध पिके जरी घेतली जात असली तरी पोटापुरत्या उत्पन्नाची खात्री तेव्हाही नसणार. त्यामुळे गेली अनेक सहस्रके अवगत असलेला मार्ग म्हणजे शिकार आणि फळे, कंदमुळे गोळा करणे शिवाय मासेमारी करणे यातूनही पोटापाण्याची सोय केली जात होती. या बरोबरच उपजीविकेचा एक नवा मार्ग उदयाला आला होता. पशुपालन. शेतीचा शोध हा क्रांतिकारी असल्याने सहसा आपण मागे वळून इतिहासाकडे बघताना शेतीवरच लक्ष केंद्रित करतो आणि बाकी सर्व उपजीविकेचे मार्ग थोडे कमी महत्वाचे असे त्यांकडे नकळतपणे बघितले जाते. मात्र इथल्या पर्यावरणात, जिथे आजही इतक्या पुढारलेल्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेती पूर्ण कुटुंबाचे पोट सहसा भरू शकत नाही तिथे इतिहासपूर्व कालातही वेग़ळी परिस्थिती नव्हती. अशा वेळेस पशुपालनासारखा नवा उपजीविकेचा मार्गही या समूहांसाठी फायदेशीर ठरू लागलेला दिसतो. गाय-बैल, म्हैस, शेळ्यामेंढ्या, गाढव, डुक्कर, कोंबडी, कुत्रे आणि मांजर असे विविध प्राणी-पक्षी आता माणसाळले होते. या प्राण्यांमुळे शेतकीची कामे करण्याव्यतिरिक्त मांस, दूध-दुभते, चामडे, लोकर, (हत्यारे बनवण्यासाठी) हाडे अशा अनेक गरजा सहज भागवल्या जात होत्या. कुत्रे राखणीला तर मांजरांमुळे साठवणीच्या धान्याला होणारा उंदरांचा उपद्रव कमी असे हे सरळ साधे गणित.

पण यांचा प्रतिपाळ करायचा असेल तर शेतीला जशी काळी कसाची किंवा नदीकाठच्या गाळाची सुपीक जमीन हवी तशी ताजा पोटभर चारा मिळवण्यासाठी कुरणे हवीत. गावाच्या आसपासचे गवताळ प्रदेश, माळ या कामासाठी अगदी आदर्श होते. बहुतेक वसाहती या पाणी, शेतजमीन आणि चराऊ कुरणे यांच्यापैकी किमान दोन घटकांच्या उपलब्धतेनुसार वसवल्या होत्या हे त्यांची भौगोलिक स्थाने बघता उघड होते. इनामगाव किंवा दायमाबाद सारखी मोठ्ठी गावे हे तीनही घटक जवळपास सहजी मिळतील अशा पद्धतीने वसवलेली होती.

जरी स्थानिक पातळीवर चराऊ कुरणे उपलब्ध असली तरीही आसपासच्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून पशुपालक समूह बरेचदा विविध पल्ल्यांची भटकंती करतात. गाय-बैल, म्हैस या मोठ्या जनावरांना तुलनेने वारंवार चारा-पाणी लागते, शिवाय दूध-दुभते आणि शेतीच्या कामांसाठी त्यांची गरज असते पण शेळ्यामेंढ्यांना त्या तुलनेने कमी पाणी लागते, त्यांची चाल जास्त वेगवान असते. तेव्हा त्यांचे कळप घेऊन गुराखी गावांची पंचक्रोशी ओलांडून आसपासच्या प्रदेशांमध्ये भटकत असणार, हिंडत असणार हे स्वाभाविक आहे. मात्र गावात असे शेळ्या-मेंढ्या राखणारे वेगळे गट होते की प्रत्येक घरातले एखाददोन जण अशा या भटकंतीत समाविष्ट असायचे याचा नक्की पुरावा आपल्याला मिळालेला नाही. इनामगाव सारख्या साधारण हजारेक वस्तीच्या गावातले लोक शेतीसाठी सुद्धा जवळच्या वाळकी नामक एका ठिकाणी हंगामी स्थलांतर करत होते असा पुरावा उत्खननामधून मिळाला आहे, तेव्हा गुरे चरायला निदान काही महिने बाहेर घेऊन जाणे हेही होतच असणार. सध्याचे धनगर पावसाळा संपला की निघतात, ते थेट कोकणात उतरतात. हे इतके लांबपल्ल्यांचे मार्ग हे बर्‍यापैकी आधुनिक आहेत व ऐतिहासिक काळातही धनगर इतक्या खाली उतरत नसत हे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. परंतु सांस्कृतिक अभिसरणामध्ये अशा हिंडत्या-भटक्या गटांचा फार महत्वाचा वाटा असतो आणि धनगरही त्याला अपवाद नाहीत हेही नंतरचे ऐतिहासिक पुरावे आपल्याला सांगतात.

इतिहासपूर्व कालात तर अशा गटांचे महत्व फार मोठे होते. कारण फक्त भटकंती करून शेळ्यामेंढ्या उत्तम चार्‍यावर पोसणे हेच फक्त अशा भटकंतीचा उद्देश नसून आसपासच्या समूहांशी आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याचा हा बहुतांशी एकमेव मार्ग होता. कुठलाही समूह हा प्राथमिक गरजांमध्ये स्वयंपूर्ण होऊ शकत असला तरी अडचणीच्या काळात मदतीचा पाठिंबा एकमेकांना असावा म्हणून, रोटीबेटी संबंध निर्माण करून नव्याने जनुकीय संचय विस्तारण्यासाठी आणि समूहाचे अस्तित्व कायम राहील याची काळजी घेण्यासाठी तसेच विविध उपजीविकेच्या तसेच आर्थिक-सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या जिनसांची देवाणघेवाण करण्यासाठी म्हणून आसपासच्या जितक्या शक्य होईल तितक्या प्रकारच्या समूहांशी नाते निर्माण करणे हे अशा ग्रामसंस्कृतींसाठी अपरिहार्य असते. आणि या सगळ्या प्रक्रियेचे वाहक म्हणजे या चराऊ कुरणांतून भटकणारे पशुपालक गट.

जगभर असे दिसून येते की शिकारी असोत वा भटके पशुपालक, त्यांचे हिंडण्याचे एक ठराविक वर्तुळ असते. साधारणपणे ठरलेल्या टप्प्यांतून आणि ठरलेल्या हंगामातून ही भटकंती होत असते. चारहजार वर्षांपूर्वी, शहरे नसताना, रस्ते-हमरस्ते नसताना, गावाबाहेर पायवाटाही सहसा नसताना इतरेजनांशी संपर्क साधायचा तर या अशा ठरलेल्या टप्प्यांतून होत असणार. आसपास जसे शेतकरी गावांतले समूह होते तसेच अजूनही भटकेच असलेले, शेती न शिकलेले शिकारी समूहही असणारच. नियंत्रित बाजारपेठ, चलनव्यवस्था यांच्या उदयाआधी दोन हजार वर्षे अस्तित्वात असलेले हे लोक या चराऊ कुरणांच्या भटकंतीत होणार्‍या मुक्कामांमध्ये जिनसांची देवाण-घेवाण करत असतील असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. ही देवाणघेवाणीची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली असणार आणि म्हणूनच या कालात दख्खनमध्ये आपल्याला दूरदूरहून आलेल्या जिनसा मिळतात. राजस्थानमधून तांबं, गुजरात किनार्‍यावरचा शंख, अफगाणिस्तानातला लापिस लाझुली, कोकणातून सुगंधबेलासारखी औषधी वनस्पती, कर्नाटकातून सोने आणि सर्पंटाईनसारखे दगड आणि कायकाय. एरवीही शेतमालाची देवाणघेवाण होत असेल याचे चुटपुटते पुरावे मिळतात. उदा: शिरूरजवळ असलेल्या दुष्काळी पट्ट्यातल्या इनामगावमध्ये तांदळाचे तीन दाणे आणि काही कडवे वाल उत्खननात मिळाले. इतर सांस्कृतिक धार्मिक संकल्पनांची, मिथककथांची, अगदी गावगप्पांचीही देवाणघेवाण इथे होत असणार. दूरदेशाच्या नवलकथाही कदाचित लोक एकमेकांना ऐकवत असणार.

अशा हंगामी वसाहतींचे पुरावे सापडणे अवघड असते, कारण एखादा आठवडा पाले ठोकणार, किंवा उघड्यावर आडोशाने राहणार. थोडीफार मागे सोडलेली खापरे, दगडाची सूक्ष्मास्त्रे सोडले तर मागे काही पुरावा न सोडता पुढच्या टप्प्यावर निघणार.

दख्खनमध्ये अशी गारगोटीची सूक्ष्मास्त्रे जशी ताम्रपाषाणयुगीन वसाहतीत आढळतात तशीच एरवीही माळरानात, पठारावर इतर कुठल्याही वसाहतींच्या पुराव्याशिवायही आढळतात. कदाचित ताम्रपाषाणयुगीन भटके गुराखी तिथे कधीकाळी येत असत याच्या पुसट खुणा अजून अस्तित्वात आहेत. इतिहासकार कोसंबींनी अशा अनेक ठिकाणांहून सूक्ष्मास्त्रे नोंदवून पठारावरची भटक्या पशुपालकांची संस्कृती विरुद्ध नदीकाठच्या शेतकर्‍यांची संस्कृती अशा दृष्टीकोनातून काही लोकेतिहासाची-लोकधर्माची मांडणी केली आहे. मात्र मिळालेली सूक्ष्मास्त्रांची छायाचित्रे वा रेखाटने न दिल्याने ती सूक्ष्मास्त्रे मध्याश्मयुगीन होती का ताम्रपाषाणयुगीन याचा उलगडा होत नाही. तसेच त्यांनी शोधाशोध केलेल्या ठिकाणांच्या बाहेरच्या प्रदेशांतही अनेको सूक्ष्मास्त्रे विखुरलेली स्थळे आता आढळली आहेत. तसेच शेतकर्‍यांची ग्रामसंस्कृती आणि पशुपालक, भटके समाज हे बहुतेकवेळा एकाच समूहाचा भाग होते हे आतापर्यंत विशद झालेच आहे. मात्र असे भटके पशुपालक गट हे दख्खनच्या इतिहासाचे मूलाधार आहेत याची पहिली मांडणी कोसंबींनी या अभ्यासाद्वारे केली आणि या तुलनेने दुर्लक्षित समाजघटकांच्या इतिहासाकडे संस्कृतीकडे इतर अभ्यासकांना नव्याने बघण्यास उद्युक्त केले. याच बरोबरीने दख्खनमध्ये सातत्याने ताम्रपाषाणयुगीन वसाहतींची उत्खनने होत होती. आता मागे वळून बघताना या सर्व अभ्यासांमुळे आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे क्षितिजे किती आणि कशी विस्तारत गेली हे स्पष्टपणे दिसून येते.

तर अशा तर्‍हेने हे गवताळ प्रदेश शेतजमीनीच्या बरोबरीने या आद्य शेतकर्‍यांच्या जीवनप्रणालीचे केंद्र होते. उपजीविका म्हणून नाही तर बाहेरच्या अफाट जगाशी संपर्क साधायचा एकमेव मार्ग म्हणजे ही भटकंती, विविध गावांमध्ये नातेसंबंध निर्माण करण्यासाठीही हाच मार्ग वापरला जात असणार. या दख्खनच्या गवताळ कुरणांनी किती प्रकारची समृद्ध सांस्कृतिक आर्थिक देवाणघेवाण आणि अभिसरण बघितले असेल ते तेच जाणोत! पुरातत्वीय पुरावेही जिथे अगदीच तुरळक आहेत, तिथे हे सगळे काही प्रमाणात तर्कानुमानाने समजून घ्यावे लागते.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही ताम्रपाषाणयुगीन गावे उपजीविकेचे विविध मार्ग चोखाळत असत. कशावर किती भर द्यायचा याचा निर्णय तत्कालीन पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून असणे साहजिक आहे. आपला जसा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ असतो तसाच हा उपजीविकेच्या पर्यायांचा पोर्टफोलिओ! गरजेनुसार पर्यायांचा कमीजास्त वापर करायचा. साधारणपणे दीडहजार वर्षे एका साच्यातून जगत आलेल्या या वसाहतींना या पोर्टफोलिओची खरी गरज लागली ती साधारणपणे इ.स.पू १००० च्या आसपास. पर्यावरणाची शुष्कता वाढू लागली होती आणि दुष्काळही वारंवार पडू लागले होते असे पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला सांगतात. शेतीवर पोट चालवणे आता दिवसेंदिवस अवघड होत होते असे या वसाहतींचे अवशेष आपल्याला सांगतात. प्रथम तापी आणि गोदावरी खोर्‍यातल्या वस्त्या-गावे उजाड झालेली दिसतात. तिथले लोक अचानक कुठे गायब झाले याचा शोध घेताघेता इनामगावचा अंतकाळाचा पुरावा हाती आला. तिथे या वारंवारच्या दुष्काळाने जेरीला आलेले गावकरी जगायची धडपड करत होते त्याच्या खुणा अगदी ठळकपणे दिसून आल्या. भारंभार खरीप आणि गव्हासकट रबी पिके घेणारे शेतकरी आता जव आणि नाचणी या कमी पाणी लागणार्‍या, दुष्काळात तगून राहणार्‍या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. गाईम्हशींची खिल्लारे जवळपास संपायला आली. त्याची जागा आणखी शेळ्यामेंढ्यांनी घेतली. खाण्यात गोमांस हे प्रमुख अन्न राहिलं नाही, त्याजागी शिकार करून आणलेले काळविटाचे मांस हे प्रमुख पदार्थ ठरलं. अर्थातच वाढलेल्या शेळ्यामेंढ्यांबरोबर भटकंती करणारे गट वाढलेले असणार. जेव्हा गावात शेती करणं जवळपास अशक्य झालं असेल तेव्हा या लोकांना मायेचा आधार दिला या गवताळ कुरणांनी, त्याच्या आसपासच्या जंगलांनी.

आजही दख्खनच्या भूमीची वहिवाट कृषीप्रधान राहू शकत नाही, मग तीनेक हजार वर्षांपूर्वी कुठलीही शहरी प्रशासनिक यंत्रणा मदतीसाठी अस्तित्वात नसताना या समूहांनी काय करावं? परत एकदा शेतीचं स्थैर्याचं जीवन सोडून कुरणांच्या आश्रयाने भटक्या गुराखी जीवनाचा अवलंब त्यांनी केलेला दिसतो. आधी जमेल तसे जमेल तेव्हा गावाकडे परतत होते, मग कधीतरी तेही थांबलं असणार. पुढची पाचसहाशे वर्षे आपल्याला दख्खनमध्ये वसाहती मिळत नाहीत. भटक्या गुराख्यांच्या पाऊलखुणा कधीच पुसून गेल्या आहेत. पण त्या होत्या हे आपल्याला पक्के माहित आहे. कारण सातवाहन काळाच्या थोडे आधी पासून, इ.स.पू ३र्‍या शतकापासून नागरीकरणाची, लोहतंत्रज्ञानाची चाहूल लागते. परत एकदा लोक गावं वसवतात, नव्याने शेतीचे डाव मांडतात. मात्र गवताळ कुरणांच्या आश्रयाने चालू असलेली उपजीविका चालूच राहते. ऐतिहासिक काळात शेतीला जास्त सांस्कृतिक महत्व मिळालं आणि या समूहांना थोडे दुय्यम अनुल्लेखित स्थान मिळाले. मात्र यांचं अस्तित्व सतत जाणवत राहतं. फक्त यादव, होयसळ सारख्या पशुपालकांतून वरती आलेल्या बलाढ्य राजकुळांतच नव्हे तर खेडोपाडी हिंडताना जागोजागी मौखिक इतिहासांमध्ये गवळी राजाच्या कथा येतात, उल्लेख येतात. कितीकदा जुन्या पांढरी या गवळी राजांची टेकाडे म्हणून दाखवली जातात. सांस्कृतिक स्मृतींमध्ये कधीकाळी फार महत्वाचे असलेले हे पशुपालक गट अजूनही आपली जागा राखून आहेत.

आता आपला बामणथळच बघा ना! मी इथे आले होते ते सरडेवाडीची ताम्रपाषाणयुगीन वसाहतीची पांढर शोधायला. बामणथळ नाव गावकर्‍यांनी सांगितलं. त्यांना पांढर वगैरे काही माहित नव्हती, पण बामणथळमध्ये ओसवाडा आहे असं मला परत परत सांगत होते. हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकत होते. पण बामणथळ हे नाव ओळखीचं वाटत होतं. ओसवाड्याला पोचले तेव्हा लक्षात आलं की एका दगडी इमारतीच्या बांधकामासारखे काही अवशेष आहेत, दोनतीन उघड्या खोल्या. आत मध्ययुगीन खापरे. बाकी काही नाही. ही अशी दगडी बांधकामे पश्चिम दख्खनमध्ये अनेक ठिकाणी आढळतात. इनामगावजवळच्या अशा एका अवशेषात ताम्रपाषाणयुगाच्या अंतकाळातील एक घडा मिळालेलाही पुरातत्वशास्त्रज्ञांनी नोंदलेले आहे.

हे सगळं नोंदवून घेताना एकदम आठवलं, बामणथळाचा उल्लेख कोसंबींनी केला आहे. पळसदेव शिलालेखावरच्या लेखामध्ये. इथे मध्ययुगीन अवशेष सापडतात हेही लिहिले आहे. तेच मी बघत होते. वाडा म्हणजे पशुपालकांची भटकंतीत राहायची, गुरं बांधायची जागा. तो आता ओस, उजाड पडला आहे म्हणून ओसवाडा. म्हणजेच असे वाडे, ही बांधकामे पशुपालक समूह शतकानुशतके बांधत वापरत आले आहेत. ही अशी खापरं आणखी कुठे मिळतात हे विचारल्यावर खबर्‍याने जवळच पाचेकशे फुटावर ओढ्याशेजारी असलेल्या पांढरीच्या टेकाडावर नेले. तिथली माती घराच्या जमिनीला चोपून वापरतात म्हणून त्याला चोपण रान म्हणतात इथे. पांढर हा शब्द गावात माहितच नाही. आज त्या टेकाडावर शेती होते. ताम्रपाषाणयुगीन खापरे मिळाली नाहीत पण सातवाहनकालीन मिळाली. दोन्ही जवळजवळ असलेले इतिहासाचे पुरातत्वाचे वेगवेगऴ्या कालखंडातले पुरावे. पुरातत्वमहर्षी ह धी सांकलिया आणि कोसंबींनी एकाच वर्षी, १९६२ मध्ये, नोंदलेले. पण दोघांनीही आसपास कदाचित बघितलेच नसावे. आणि वेगवेगळ्या नावाने नोंदल्याने आत्तापर्यंत ही एकच जागा आहे हेही कुणा अभ्यासकाला कळले नव्हते. मी दोन्ही जागचे अवशेष तपासून पुढे बामणथळाकडे गेले. त्या गवतात थोडी पुढे चालत गेल्यावर गारगोटीच्या सूक्ष्मास्त्रांचा खच पडलेला दिसला. ताम्रपाषाणयुगीन सूक्ष्मास्त्रे असावीत असे प्रथमदर्शनी दिसत होते. सांकलिया आणि कोसंबी यांच्या दोघांच्या नजरेतून हा पुरावा सुटला होता. कारण कुठेच याची नोंद नाही. आजही हा माळ आसपासचे गुराखी गुरं चारायला वापरतात.

साधारण एक किलोमीटरच्या परिघात दख्खनी पशुपालनाचा, गवताळ कुरणांचा चार हजार वर्षांचा सांस्कृतिक इतिहास प्रातिनिधिक रूपाने इथे हजर आहे. अर्थातच अशी इतरही संस्थळे असतीलच पण आजच्या विकासाच्या रेट्यात ही झपाट्याने नष्ट होताहेत, कुरणांचे प्रदेश नष्ट होत आहेत, लागवडीखाली बांधकामाखाली येत आहेत. तेव्हा जिथे आणि जसे शक्य होईल तसे हे पुरावे नोंदवून इतिहासाच्या आकलनात भर घालणे एवढेच आपल्या हाती आहे.

('भवताल' २०२३ च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित. इथे पुनर्प्रकाशित करण्याची अनुमती दिल्याबद्दल श्री. अभिजित घोरपडे यांची आभारी आहे)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle