<<<अर्जिता म्हणजे अशी गोष्ट / किंवा काही जे खुप मेहनतीने, धडपड करून मिळवलं - समथिंग विच ईज गेन बाय स्ट्रगल.
मी मुद्दाम हट्टाने नवर्याला नाव बदलून हे नाव ठेवायला लावलं. शोधलंही मीच.>>>
तिचं नाव तिनेच शोधलं ते बरं झालं कारण इतकं अचुक नाव तिच्या साठी इतर कुणालाच शोधता आले नसते. एखादी गोष्ट काय तिच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तिने धडपड करुन, लढा देऊन मिळवल्या होत्या. लग्न, नोकरीतील परदेशी जाण्याची संधी, थोरल्या लेकीचा जन्म, धाकट्या लेकीचा जन्म आणि दुसर्या गरोदरपणात झालेल्या कॅन्सर च्या निदानानंतर मिळालेलं उणपुर २.५ वर्षांच्या आतबाहेरच आयुष्य!
आमची ओळख मैत्रीण वरच झाली. २०१६ साली मी पुण्यात रहायला गेले. त्यानंतर थोड्याच दिवसांत पुण्यातील आणि बाहेरुन येणाऱ्या मैत्रीणींच्या भेटिगाठींच ठरवण्यासाठी एक वॉट्स ऍप गृप बनवला गेला. मैत्रीणींचा असा गृप बनवला आहे म्हंटल्यावर गप्पा ओघाने आल्याच. त्या गप्पांमध्ये आमची एकमेकींशी मैत्री झाली. भेट म्हंटले तर एकदाच झाली होती, ती इंग्लंड ला जायच्या आधी, सगळी कामं उरकत धावत पळत १५ मि आम्हाला सगळ्यांना भेटायला आली होती कमला नेहरू पार्क ला. पण भेटीची गरजच वाटली नाही इतके सुर जुळले होते आमचे आधीच.
तिच्या बद्दल मला सगळ्यात पहिल्यांदा जाणवलेली गोष्ट म्हणजे तिच्या कडे असलेला प्रचंड उरक. घरकाम, आॅफिसच काम, लहानशी असलेली अस्मि हे सगळं ती इतक्या लिलया सांभाळायची तेही अगदी कुठेही जराशी देखील तडजोड न करता. मला प्रचंड आश्चर्य वाटायचं. त्यानंतर तिच्या ओळीमध्ये तिने अस्मिच्या जन्माच्या वेळी झालेल्या गुंतागुंती बद्दल सांगितलं तेव्हा तर मी थक्कच झाले. इतक्या मानसिक कसोटी पहाणाऱ्या प्रसंगातुन नुकतीच बाहेर आलेली ही मुलगी, उत्साहाचा हा न संपणारा स्त्रोत कुठुन मिळवत असेल? डिप्रेशन वगैरे ची तर बातच सोडा.
तो उत्साह तिकडे इंग्लंड मध्ये ही कायम होता. पुरण पोळ्या बद्दल तर तिने स्वतःच सांगितले इथे. पण त्या नंतर गुढीपाडवा आला आणि तिथे गाठ्या मिळणार नाहीत म्हणून तिने घरी गाठ्यांचा घाट घातला होता. त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे तिचा नवरा नोकरीनिमित्त दुसऱ्या गावी होता. त्यामुळे तिच्या ह्या उत्साहाचे प्रत्येक वेळी मला नव्याने आश्चर्य वाटायचे आणि ती असे धक्के नियमित द्यायची.
मग कधीतरी तिने तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसिबद्दल सांगितले. त्यानंतर मात्र तिचा वावर एकदम शांत होता आमच्या गृप वर. फक्त धाकटिच्या जन्मानंतर एकच अपडेट होता. सगळ्यांना सहाजिकच वाटलं की दोन लेकी, नोकरी ह्या सगळ्यात गुंतली असेल जरा स्थिरस्थावर झाले सगळे की लावेल हजेरी गृप वर. पण त्यानंतर ती गृप वर आली ती तिच्या कॅन्सरची बातमी घेऊनच.
तिला गरोदरपणातच कॅन्सर डिटेक्ट झाला. ती, तिच्या अवतीभवती असलेली सगळी प्रेमाची मंडळी, सगळेच ह्या निदानाने हबकून गेले. पण त्यातुन सगळ्यात आधी सावरली ती स्वतः. "आहे हे असं आहे" ह्या उक्तीप्रमाणे तिने तिच्या निदानाचा स्वीकार केला. कुठेही निराशेचा, माझ्या सोबत असं का व्हावं ह्या सेल्फपिटीचा यत्किंचितही लवलेश नाही. गरोदर असल्याने डिलीव्हरी झाल्यानंतरच उपचार सुरू करता आले.अतिशय शांतपणे तिने आम्हाला सांगितले ह्या सगळ्या बद्दल. एवढंच म्हणाली कधी एकदा केमो सेशन्स संपवुन धाकटिला कुशीत घेऊन बसते असं झालंय. कारण इन्फेक्शन च्या भितीमुळे तोपर्यंत तिला बाळाला हाताळायची पण परवानगी दिली नव्हती डॉंनी. हे सगळं तिने कसं काय जमवलं तिचं जाणे. पण तिथुन पुढच्या प्रत्येक कठीण परीक्षांना तितक्याच धैर्याने ती तोंड देत गेली. कुठेही तक्रार किंवा निराशेचा सूर न काढता.
तिच्यावर इंग्लंड मध्ये जे उपचार झाले त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. तिने पुण्यात परत येण्याचा निर्णय घेतला. अस्मि च शालेय वर्ष पुर्ण होईपर्यंत तिला तिथेच तिच्या बाबांबरोबर रहाणे भाग होते. त्यामुळे मनावर अक्षरशः दगड ठेवून ही धाकट्या लेकीला घेऊन आई वडिलांच्या सोबत पुण्याला आली. परत एकदा किमो- रेडिएशन चे चक्र पुर्ण केले, त्या चक्रामध्ये अपरिहार्य असणारे साइड इफेक्ट्स, अशक्तपणा, लहानमोठे इन्फेक्शन्स, धाकट्या लेकीची बिघडलेली तब्येत, अस्मिची भारतातील शाळा निवडण्याची प्रक्रिया कितीतरी आव्हानं तिने अगदी हसतमुखाने पेलली.
ती पुण्यात परत आली तेव्हा मी पुण्यात नव्हते, पण आम्ही वरचेवर मेसेजेस मधुन संपर्कात असायचो. मला फक्त गेल्यावर्षी जानेवारीत म्हणाली होती. कंटाळा आलाय ग आता, कधी एकदा केमो सेशन्स संपतील असं झालंय. लोकांचा देवावर असतो तसा माझा सायन्स जर्नल्स मध्ये प्रकाशित होणाऱ्या संशोधनांवर विश्वास होता. मी तिला नेहमी सांगायचे, सगळे स्टॅट्स तुझ्या बाजुने आहेत, वय लहान आहे, दृष्टीकोन सकारात्मक आहे, प्रेमाच्या माणसांचा आधार आहे. त्यामुळे ही लढाई तुच जिंकणार. तिच्या डॉक्टरांना पण तसच वाटत होते. तिच्या ५/६ किमो पर्यंत तिचे रिझल्ट्स बघुन ते पण एकदम खुश होते. लढाई जवळजवळ जिंकल्यातच जमा होती. डॉ कडुन "ऑल ओके " चा सिग्नल मिळाला की ती स्वतः मैत्रीण वर तिच्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल लिहिणार होती. हे सगळे गेल्यावर्षी च्या सप्टेंबर मध्ये व्हायचे होते.
पण कॅन्सर ने रडीचा डाव खेळला. तिने सगळे नियम पाळुन जिद्दीने जिंकत आणलेला डाव फिस्कटला. सप्टेंबर च्या सुमारास परत एकदा तिच्या शरीरात सगळीकडे कॅन्सर नी हातपाय पसरायला सुरुवात केली. ऑक्टोबर च्या शेवटी डॉ ही हतबल झाले होते. पण ती हरली नाही. तिने सांगितले मी ही लढाई सुरु ठेवणार. तिचा हा सकारात्मक दृष्टिकोन बघुन डॉ सुद्धा स्तिमित झाले होते. आपण शक्य ते सगळे प्रयत्न करुन बघु म्हणाले होते. मला आशा होती ती ही लढाई नक्की जिंकणार. पण तसं झालं नाही. तिची तब्येत ढासळतच गेली. जानेवारी महिन्यात एका टप्प्यावर तिने स्वतःच मेडिकल इंटर्वेंशन थांबवण्याची सुचना डॉ ना केली. ह्या लढाईतील सगळ्यात कठीण निर्णय देखील तिने स्वतः घेतला. इतकं पराकोटीच धैर्य तिने कुठुन आणले आणि कसे टिकवले हे प्रश्न आता अनुत्तरितच रहातिल. अर्जिता, I will miss you!