नमस्कार मैत्रिणींनो,
आज आपली मैत्रीण.कॉम एक वर्षाची झाली जगभरातल्या मराठी स्त्रियांसाठी टिचकीसरशी उपलब्ध होणारा आधारगट हा मुख्य उद्देश घेऊन मैत्रीण ची वाटचाल सुरू झाली. आधारगट म्हणून मैत्रीण आज भक्कमपणे उभी राहिली आहे. सोबतीने अनेक उपक्रम, चर्चा, लेखनही गेल्या वर्षभरात अगदी यशस्वीपणे पार पडले. आज पहिल्या वाढदिवशी एक वेगळे पाऊल टाकण्याचा मानस आहे.
अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, अनेक आवडत्या गोष्टी राहून जातीत. स्त्रियांच्या बाबतीत तर हे अजून जास्त घडतं. व्यावहारिक शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, मूल, स्थलांतर अशा अनेक कारणांमुळे एखादी आवडीची गोष्ट शिकणे राहूनच जाते. नंतरच्या रुटिनमधे ते शिकणे शक्यही होत नाही आणि मनात असले तरी तसे क्लासेस आपल्या वेळेत मिळणं, शोधणं अवघड होऊन बसतं. बऱ्याचदा आपल्या हातात वेळही मोजका असतो, पण त्या मोकळ्या-मोजक्या वेळेला सत्कारणी लावायचं असतं, पण उपलब्ध साधनच नसतं. आज टेक्नॉलॉजीच्या प्रचंड प्रगतीमुळे अनेक संधी उपलब्ध आहेत. अगदी अनेक कोर्सेस, युट्युबवरचे व्हिडिओज, अनेक साईट्स आज आहेत; पण मराठी मधे अजून मोजक्याच संधी उपलब्ध आहेत.
मैत्रीणने यावर विचार केला, तोच विचार आजच्या निमित्ताने आपल्यासमोर जाहीर करीत आहोत.
हो, आज आपण मैत्रीण युनिव्हर्सिटीची घोषणा करीत आहोत. मराठी नेटवर्क मधले एक महत्वाचे पाऊल आज आपण संघटितपणे टाकतो आहोत.
प्रथमच सांगू इच्छितो की ही युनिव्हर्सिटी फक्त मैत्रीणच्या सदस्यांपुरतीच मर्यादित असेल. आणि मैत्रीणच्या सदस्यांना ह्या युनिव्हर्सिटीतील कोर्सेस सहजी करता येतील. अजून ही सुरुवात आहे. तेव्हा सध्या अगदी छोटे कोर्सेस, वर्कशॉप्स स्वरुपात सुरू करीत आहोत. जसजसा मैत्रिणींचा सहभाग वाढेल तसतशी या युनिव्हर्सिटीची क्षितीजं विस्तारत जातील. सध्या मैत्रीण सदस्यांमधील त्या त्या क्षेत्रातील मैत्रिणीच हे कोर्सेस, वर्कशॉप्स घेतील, हे अजून एक वैशिष्ट्य!
विविध कला/ शास्त्र शिकण्यासाठी काही आठवड्यांचे वर्कशॉप, काही लेक्चर्स, काही व्हिडिओज, प्रात्यक्षिकं, मार्गदर्शन, चर्चा, शंकानिरसन, काही इव्हेंट्स, सहभागींच्या कलाकृती/ आर्टिकल्स, लेखन यांचे सादरीकरण, प्रमाणपत्र आणि कौतुक सोहळा अशा विविध मार्गांनी हे कोर्सेस मार्गक्रमण करतील ही अपेक्षा आहे.
शिवधनुष्य आहे हे; पण मैत्रीणमधील सर्व सदस्यांच्या सहकार्याने उचलूयात :)
विविध विषय आता डोळ्यासमोर आहेत. उदाहरणार्थ विणकाम,गणित, ओरिगामी, क्विलिंग,टेरारियम, बेकरी प्रॉडक्ट्स, वैदिक गणित, एक्सेल - फोटोशॉप सारखी सॉफ्टवेअर्स, कवितेतील वृत्त, संज्ञापन कौशल्य, वक्तृत्व, लेखन, संशोधन पेपर इत्यादी. (वर्कशॉप/कोर्स बनवण्याबाबत उत्सुक असलेल्या सदस्यांनी कृपया अॅडमीनशी संपर्क साधावा. http://maitrin.com/contact किंवा इमेल अॅड्रेस : maitrinwebsiteअॅटgmail.com)
या उपक्रमांमधे कौशल्य पातळी वा क्लिष्टता खूप अपेक्षित नाही तर केवळ त्या विषयाची, कौशल्याची एक सुरुवात करून देणे अपेक्षित राहील. एकदा मातृभाषेतून प्राथमिक पातळी आत्मसात केली की नेटवरील असंख्य संधी मैत्रिणींना हाताळता येतील. मातृभाषेतून त्या विषय-कौशल्याची ओळख झाली की कोणत्याही भाषेतील प्राविण्य मैत्रिणी सहज मिळवू शकतील.
चला तर मग या "मैत्रीण युनिव्हर्सिटी"चा एक भाग होऊ. अनेक नव्या गोष्टी शिकू. राहून गेलेल्या आवडीनिवडी पूर्ण करूत. आणि नेटवरील विविध विषयांच्या तयार ज्ञानसाधनेसाठी तयार होऊ.
आजच आपल्या पहिल्या कोर्सची आपण घोषणा करत आहोत. "क्रोशा विणकामाचा श्री गणेशा" या साठी ही लिंक पहा.