जर्मनी आणि बरेच काही.. भाग 3

#Europe2025
Landsberg am Lech
जर्मनीच्या दक्षिणेला गर्द जंगलं, उंच शिखरं, देखणे किल्ले असणारी 27 गावं जोडणारा Romantic नाव सार्थक करणारा रस्ता आहे. पूर्वीच्या रोमन व्यापारी रस्त्यातले काही भाग जोडणारा रस्ता म्हणुन पण Romantic!
याच रस्त्यावर म्युनिक पासून अगदी तासाभरावर लेश नदीवरचे लॅन्ड्सबर्ग हे टुमदार गाव आहे. आपण परिकथेतील किल्ला म्हणुन Neuschwanstein Castle ऐकलेला असतो. हे तिथल्याच नदीवरचे हे गाव आख्खेच परिकथेतून उतरवलेले वाटते.
दुसर्‍या महायुद्धात फारसे नुकसान न झाल्यामुळे या गावाचे मध्ययुगीन सौंदर्य अबाधित राहिले आहे.
छोटी अरुंद दिसणारी पेस्टल रंगाची एक सारखी घरं हे Alps जवळच्या घरांचे वैशिष्टय़. अशी देखणी घरं असणार्‍या गावाचा townhall तसाच सुंदर हवा . सुंदर Baroque architecture असणारा townhall इथे गेली चारशे वर्ष उभा आहे! आतून आणि बाहेरून देखणी इमारत आहे ही. इथेच अतिशय सुसज्ज tourist information center आहे. इथे सर्व गावाची माहीत देणारे free audio guide मिळते. त्यामुळे हे गाव बघण्याची मजा द्विगुणित होते.
या गावात काय नाही? टुमदार घरं, दणकट तटबंदी ,अप्रतिम Baroque चर्चेस, लांब रुंद खळाळत वाहणारी नदी, देखण्या बागा, सुंदर इमारतींच्या मधल्या सुंदरशा गल्ल्या काय पाहू काय नको असे होते इथे.
इथे गावाच्या मध्यभागी इथली ग्राम देवता मेरी मातेचा पुतळा आणि कारंजे आहे. समोरच छानसा tower. मी छानसा नाही म्हणत आहे त्याचे नावच ते आहे! आजूबाजूला जोडून रंगीत घरं आहेत.
img-20250910-wa0007.jpg
img-20250910-wa0015.jpg
जाता येता सुंदर घरं दिसत राहतात. त्यामुळे मी दर दोन मिनिटांनी मी याच घरात रहायचे फायनल करायचे की दुसरे त्याहून गोड दिसणारे घर दिसायचे!
img-20250910-wa0010.jpg
पूर्वी हे गाव Bavaria आणि Swabia राज्यांच्या सीमेवर होते. Bavaria च्या दिशेला इथले अतिशय सुंदर gothic architecture चा नमूना असणारे गेट आहे Bayertor.
इथून उंचावरून गाव फार छान दिसते. उतरत येताना अप्रतिम paintings आणि Baroque, gothic architecture असणारी चर्च लागतात.
img-20250910-wa0009.jpg
img-20250910-wa0011.jpg
जवळच Mutterturm म्हणुन अगदी परिकथेत शोभेल असा सोनेरी छपराचा टॉवर आहे.
b472bfe37666-tourismus_lech_ammersee_2_robert_klinger_3000x2000.jpg
सगळे गाव फिरून आलो की मध्यावर भेटते लेश नदी. भर गावाच्या मध्यभागी असणारी ही नदी पूर आला की घरात पाणी घुसत असे. म्हणुन German Engineering डोके लावून नदीला टप्प्याटप्प्याने खोल करून पाण्याला शांत केले आहे. त्याचा इथे पायर्‍या पायर्‍यांचा छानसा धबधबा बनला आहे. याला Lech weir म्हणतात. हे या गावाचे प्रमुख आकर्षण. असाच धबधबा Neuschwanstein Castle असणार्‍या Fussen गावात याच नदीवर आहे. तो castle पेक्षा जास्त प्रेक्षणीय आहे!
img-20250910-wa0040.jpg
नदीला लागूनच इथे सुंदर बाग, जंगल आहे.
सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी म्हणजे या गावातले गणेश नावाचे इंडियन restaurant! इतके सुंदर भारतीय जेवण भारतात पण हल्ली मिळत नाही! हे पण खरे तर या गावाच्या प्रेक्षणीय स्थानामध्ये मोजायला हवे आहे !!
इथे सगळेच इतके देखणे आहे की या गावातून निघायला पाय हलतच नाहीत. फार प्रसिद्ध नसणारे, एक छोटेसे ,कोपर्‍यातले हे गाव फार फार आनंद देऊन गेले खरे..

वर
0 users have voted.