उन्हाने रखरखलेल्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात आहे निलंगा नावाचे लहान तालुक्याचे शहर. हा तालुका उत्तर कर्नाटकातील दुष्काळी बिदर जिल्ह्याला खेटून आहे. तेलंगणा आणि कर्नाटकातून कष्टाची कामं करणारे हजारो लोक येऊन निलंग्याच्या आसपास पसरले आहेत. हातात कमी पैसा, पोटात भूक आणि नीट जेवायलाही वेळ नाही या परिस्थितीतून जन्माला आला निलंगा राईस!
थोडक्या साहित्यात पोट भरणारा पण तरीही चमचमीत! खरं तर निलंग्यात भात शेती नाही, तेलंगणातून आणलेला चांदतारा नावाचा तांदूळ ह्या राईससाठी वापरतात. शहरात भरपूर टपऱ्या उघडल्या, दहा रुपये, वीस रुपये प्लेट अशी किंमत. त्यामुळे अल्पावधीत तो लोकप्रिय झाला.
मराठवाड्यात सगळीकडे हॉटेलमध्ये, टपऱ्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत निलंगा राईस खायला मिळतो. हल्ली तर पुण्या मुंबईतही मिळतो.
ही सगळी गोष्ट वाचून मला निलंगा राईस काय प्रकार असतो ते पहायचं होतं पण पुण्यात ज्या टपऱ्या दिसतात तिथे खाण्याची हिंमत झाली नाही. म्हणून म्हटलं घरीच करून पाहू, खूप रेसिपीज शोधल्या आणि केलाही! कधीतरी खिचडीतून बदल म्हणून खायला चांगला आहे.
साहित्य: (एक - दोन जणांसाठी)
तांदूळ - एक वाटी (चांदतारा नाही, घरातला सुरती कोलम वापरला)
मसूर डाळ - अर्धी वाटी
निवडलेली आणि धुतलेली मेथी पानं - दोन वाट्या
प्रत्येकी एक कांदा, टोमॅटो, बटाटा
थोडे कच्चे भिजवलेले शेंगदाणे
मूठभर भिजवलेला पांढरा वाटाणा
थोडं आलं, एक सोललेला लसणीचा गड्डा
हिरव्या मिरच्यांची पेस्ट - एक चमचा
साजूक तूप/तेल - दोन चमचे (खरं तर वनस्पती तूप वापरतात पण ते माझ्याकडे नाही)
फोडणीला मोहरी, जिरे, हिंग, हळद
कढीपत्ता
लाल तिखट - एक चमचा
काळा/गोडा/बिर्याणी मसाला - एक चमचा
धने जिरे पूड - एकेक चमचा
मीठ आवडीनुसार
कसूरी मेथी - दोन चमचे (मेथीच्या स्वादामुळेच या भातात जान येते!)
कोथिंबीर
आवडत असेल तर तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी घालू शकता, पण खऱ्या रेसिपीत हे नाहीत कारण स्वस्त, कष्टकऱ्यांना परवडणारा हा भात आहे. मीही नाही घातले कारण मला authentic च्या जवळपास जाणारा भात करायचा होता.

कृती:
१. डाळ-तांदूळ धुवून बाजूला ठेवा. वाटीत शेंगदाणे भिजवा.
२. लसूण-आलं ठेचून घ्या. कांदा उभा आणि टोमॅटो मध्यम चिरून घ्या. बटाटा धुवून, साल न काढता मोठ्या लांबट फोडी करून घ्या.
३. कुकरमध्ये तेल तापत ठेवा. मोहरी तडतडल्यावर जिरे, हिंग, कढीपत्ता फोडणी करा. आता त्यात ठेचलेले आलेलसूण घालून परतून घ्या. कांदा परतून घ्या. शेंगदाणे परतून घ्या आणि शेवटी टोमॅटो घालून परतून घ्या. (खूप परतायचे नाही, सगळ्या गोष्टी फक्त मऊसर होऊ द्या.)
४. आता यात बटाटा घाला, मेथीची पानं घाला आणि परतून घ्या. मेथी मऊ पडल्यावर डाळ आणि तांदूळ घालून परतून घ्या. शेवटी यात पांढरा वाटाणा घालून परता.
५. आता यात सगळे मसाले, मिरची पेस्ट, तिखट आणि हळद घालून परता.
६. तांदुळाच्या दुप्पट पाणी ओता. त्यात मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि कसूरी मेथी घालून नीट ढवळा. उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ द्या.
७. कुकर उघडल्यावर भात ताटात काढून वर तूप आणि कोथिंबीर घाला. बऱ्यापैकी चमचमीत, मसालेदार तरीही पौष्टिक असा हा राईस छान लागतो. नक्की करा आणि खा!

