लाल मिरच्यांचा रंजका आणि झटपट लोणचे

शनिवारी नेहेमीप्रमाणे इथल्या Marche म्हणजे आठवडी बाजारात गेले होते. मला या बाजारात जायला फार आवडते. सगळ्या सिझनल भाज्या, फळे, मश्रुम्स, मीट, चीज, ब्रेड यांचे एवढे प्रकार बघायला मिळतात की डोळ्यांचे अगदी पारणे फिटते. सध्या एकटीच असल्याने खरेदी फार नसते पण शनिवार सकाळ इथे घालवणे हा आवडीचा कार्यक्रम आहे माझा. तर परवा, माझ्या नेहेमीच्या भाजीवाल्याकडे लालचुटूक मिरच्या दिसल्या. भानामती वगैरे झाल्यासारख्या काही विचार न करता मी त्या घेऊन टाकल्या. मग घरी येऊन याचे काय करायचे हे विचार सुरू झाले. मस्त ताज्या मिरच्या होत्या, फार जहाल तिखट वगैरे नव्हत्या. आणि १०-१२ च होत्या. मग लहानपणीचा रंजका आणि थोडे लोणचे करूयात असे ठरवले. रंजक्याची कृती आठवत नव्हती त्यामुळे मातेला फोन करून विचारण्यात आली. तर या दोन्ही रेसिप्या. एकदम मस्त तोंडीलावणी/ डावीकडची बाजू झाल्याने इथे लिहून ठेवत आहे.

रंजका
साहित्य
५-६ मोठ्या, फार तिखट नसलेल्या लालभडक ओल्या मिरच्या बारीक चिरून.
१ छोटा चमचा मेथीचे दाणे
२ मोठे चमचे तेल
१/२ लिंबाचा रस
मोहरी, हिंग, हळद
मीठ
कृती
१) तेल मध्यम आचेवर गरम करायचे आणि बारीक आचेवर मेथ्या नीट तळून घ्यायच्या. लालसर झाल्या पाहिजेत पण जळायला नकोत. त्या तेलातून नीट निथळून काढून घेऊन थोड्या गार करायच्या.
२) उरलेल्या तेलामधे हिंग, मोहोरी आणि अगदी किंचीत हळद घालून चरचरीत फोडणी करून गार होऊन द्यायची.
३) मिक्सरच्या भांड्यामधे आधी या तळलेल्या मेथ्या घेऊन त्याची बारीक पूड करायची.
४) मग त्यातच मिरच्यांचे तुकडे आणि एक चमचा/ चवीप्रमाणे शक्यतो खडे मीठ घालून जरा ओबड धोबड वाटून घ्यायचे.
५) या वाटलेल्या मिश्रणात फोडणी आणि लिंबाचा रस घालायचा की झाला रंजका.

अधिक टीपा
१) मिरच्यांचे कात्रीने तुकडे केले तर सोपे जाते आणि नंतर हाताची आग होत नाही.
२) हा रंजका पोळी, भाकरी, पराठे, थालिपीठ, धिरडी वगैरेंबरोबर छानच लागतो. पण मस्त ताज्या ब्रेडला घरची पांढरे लोणी आणि हा रंजका लावून केलेली सँडविचेस अप्रतिम लागतात. माझी लहानपणीची ही आठवण आहे.

ओल्या लाल मिरच्यांचे झटपट तात्पुरते लोणचे
इथे माझ्याकडे लोणच्याचा मसाला पण नसल्याने हे थोडेसे लोणचे केले.
साहित्य
५-६ मोठ्या, फार तिखट नसलेल्या लालभडक ओल्या मिरच्या बारीक चिरून.
१ छोटा चमचा मेथीचे दाणे
१ छोटा चमचा बडीशेप
१ छोटा चमचा धने
१ छोटा चमचा जीरे
१/२ छोटा चमचा मोहोरी
२ मोठे चमचे तेल
१/२ लिंबाचा रस
मोहरी, हिंग, हळद, १/४ चमचा कलौंजी
मीठ
कृती
१) एका पॅन मधे मेथ्या, बडीशेप, धने, जीरे आणि मोहोरी एकत्रच घेऊन तेल न घालता कोरडेच परतून घ्यायचे. बारीक गॅसवर जळून न देता थोडे खमंग परतून घ्यायचे. आणि गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची.
२) तेलामधे हिंग, मोहोरी, हळद आणि कलौंजी घालून चरचरीत फोडणी करायची. गॅस बंद करून थोडेसे लाल तिखट घालायचे. याने रंग छान येतो. मग फोडणी गार होऊन द्यायची.
३) एका बोलमधे मिरच्यांचे तुकडे घेऊन, त्यात चवीप्रमाणे मीठ आणि वरचा तयार मसाला घालून नीट मिसळून घ्यायचे.
५) या मिश्रणात फोडणी आणि लिंबाचा रस घालायचा. थोडेसे मुरले की लोणचे खायला घेता येते.

अधिक टीपा
१) कलौंजीने फार मस्त आणि वेगळी चव येते. शक्य असेल तर नक्की वापरा.
२) बहुतेक हे लोणचे फार टिकणार नाही. मुरायला वेळ लागत नाही. दुसर्‍या दिवशी पण छान लागत होते. पण फ्रीजमधे ठेवावे लागते.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.