८० च्या दशकातील गोष्ट. मी ७/८ वर्षांची असेन. नव्या इमारतीत राहायला आलो होतो आम्ही. मला दोन प्रकारच्या मैत्रिणी होत्या. माझ्या पेक्षा ४ ५ वर्षांनी मोठ्या आणि माझ्या वयाच्या. मोठ्या मैत्रिणी खूप सुंदर रांगोळी काढायच्या. माझ्या वयाच्या मैत्रिणी मध्ये एकीला मोठ्या चुलत बहिणी होत्या. ती पण छान रांगोळी काढायची. मला छान रांगोळी काढावीशी वाटायची आणि मनात असंही वाटायचं कि येईल आपल्याला.
कलेच्या, मुख्यतः: चित्रकला, हस्तकला, भरतकाम ह्या बाबतीत देवाने माझी गम्मत केलीय. म्हणजे खूप इच्छा दिलीय मनात कि हे करावं, पण मग हातात ते वळण द्यायला विसरला किंवा जाणून बुजून नाही दिलंय. ते तोच जाणो. तर मला रांगोळी, मेहंदी असं सगळं काढावंसं वाटत, पण जेव्हा काढायची वेळ येते तेव्हा अगदीच कडक होतात बोटं. नको तिथे माझ वळण सरळ होतं. आधी तर वळायचीच नाहीत. पण एक मात्र आहे एखादी गोष्ट करावीशी वाटली कि प्रयत्न करायची ताकद दिलीय देवाने.
तर, लहानपणीची रांगोळी. आई सुंदर रांगोळी काढायची. पण आम्हा सगळ्यात तिला वेळच मिळायचा नाही. पण तरी दिवाळीच्या दिवसात गेरू लावून फुलं तरी काढायचीच. ८/९ वर्षांची असताना मी रांगोळी काढायची असं ठरवलं. पहिली गाडी एकसारखा गेरू लावण्यात अडकली. १/२ तास प्रयत्न केल्या नंतर मला जेम तेम गेरू लावायला जमलं. गेरू तरीही एक सारखा नव्हताच. पण मी जसा होता तसा वाळू दिला आणि पहिल्यांदाच काढतोय तरी छोटी काढूया म्हणून ५*५ ठिपक्यांची रांगोळी काढली. आत्मविश्वास इतका कि खडूने वगैरे काढायच्या भानगडीत पडलेच नाही. रांगोळीने काढायला घेतली. मग कळलं इतरांच्या बोटातून बारीक सुटणारी रांगोळी माझ्या बोटातून थेंब थेंब नाहीतर गठ्ठया गठ्ठयाने पडते आहे. कशी बशी काढली रांगोळी. मग रंग भरायची वेळ आली. पूर्वी सगळे मऊ मऊ रंग मिळत. आत्ता संस्कार भारतीला वापरतात तसे. त्यात रांगोळी मिसळायची असते हि पण अक्कल/ ज्ञान नव्हते.कसे बसे रंग भरले. रांगोळी कसली रंगाचा छळ होता तो. अगदीच नाही आवडली हि रांगोळी मला. पण आईने पुसली नाही. म्हणाली बरी आहे आणि तशीच ठेवली. पण मोठ्या मैत्रिणी खूप हसल्या मला. खूप चिडवलं. दुसऱ्या दिवशी किती ठिपक्यांची काढणार असं विचारलं ६ कि ७. इतकं कसं कसं झालं मला. पण एक मोठी मैत्रीण प्रेमळ होती. तिने सांगितलं कि रांगोळी रंगात मिसळायची असते मग सुटतात रंग बोटातून. आणि म्हणाली बाकीचे कसे करतात बघ मग येईल हळू हळू.
मग सुरु झालं दिवाळीच्या दिवसात दुपारच्या वेळी ह्या त्या मैत्रिणीकडे जाऊन बघणं रांगोळी कशी काढायची रंग कसे भरायचे. प्रत्येक वेळी वाटायचं असं कसं लोकांना आपोआप येत. अशी चुकत माकत काढत राहिले. चुकाच जास्त. १०/१२ ठिपक्यांच्या वर गेले नाही. कितीही रंग घेतले तरी रांगोळी घालून घालून ते फिकट व्हायचे. वर मला एक वेगळीच अडचण होती. माझ्या तळ हातांना घाम यायचा. म्हणजे हाथ निथळता धरला तर घामाची धार लागेल इतका घाम. त्यामुळे रांगोळी ओलसर व्हायची. तरी माझे प्रयत्न चालू राहिले. वर्षां मागून वर्ष. ह्याचं बघ त्याचं बघ. हे करून बघ ते करून बघ. रांगोळीच्या पुस्तका मागे असलेल्या सगळ्या क्लुप्त्या मी वापरल्या असतील. असं करत करत बरी रांगोळी काढू लागले. भौमितिक आकार जमायचे. वर्तुळ, फुलं पानं वगैरेंच्या मागे मी गेलेच नाही. जिथे वर्तुळ असेल तिथे सरळ चौरस काढायचे. फुलं पानं असलेली रांगोळी निवडायचेच नाही. रंग अजूनही मनासारखे नव्हते पण प्रगती होत गेली. तेव्हा स्वतःची रांगोळी झाली कि मी सगळ्यांची बघून यायचे. मग मला माझी इतकी बरी नाही वाटायची. कधी कधी दुसऱ्या मजल्या वरून पाहिलं की माझीच रांगोळी मला खूप आवडायची. पण तरी अजून छान व्हायला हवी असं वाटत राहायचं. १०/१२ ठिपक्यांवरून हळू हळू १८ /२० ठिपक्यां पर्यंत जाऊ लागले. किती प्रकारे चुकू शकते ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांच मोजणं, ठिपके पसरणं, रांगोळी काढताना, मोजताना चुकणं, रंग भरताना एकात एक मिसळणं. आणि इतक झाल्यावर कुणीतरी त्यावर धावत जाणं, कुणाचा घागरा त्याला लागणं. बापरे. माझ्या बाबतीत हे सगळं झालंय. रांगोळीत जास्त न गुंतलेलं बरं.
रांगोळी काढत राहिले मी. मग रंगीत रांगोळी आली आणि रंग भरायचं काम थोडं सोप्पं झालं. रंग संगती अजूनही जमत नाही मला. युट्युब वर वेगवेगळ्या रांगोळ्या सोप्प्या पद्धतीने काढायच्या युक्ती मिळायला लागल्या. लोकांची सर्जनशीलता आणि कल्पना शक्ती बघून आपलं तोकडं पण जाणवतं . पण त्याचाच वापर करून स्वतःला आवडेल अशी थोडीफार रांगोळी जमायला लागली. मग आली संस्कारभारती. सुंदर रंगछटा आणि पाच बोटानी काढलेले अफलातून आकार. तासन तास एखादी रांगोळी बघत राहू शकते मी. फार भुरळ घातली ह्या रांगोळीने मला. आणि परत शिका, चुका , शिकाच चक्र सुरु झालं. पण जमतच नव्हतं. इथं एकलव्य होण्याचा पर्याय नव्हता. शिवाय पूर्वी सारख्या काढणाऱ्या मैत्रिणी, अगणित वेळ आणि तो पुरवणारी आई सगळेच दूर होते. युट्युब पण काही मदत करेना. बोटातून रांगोळी सुटायचीच नाही. मग एक ऑनलाईन वर्ग सापडला. आणि पहिल्याच दिवशी मला एकदम अरेच्या क्षण सापडला. हि रांगोळीच मुळी वेगळी असते. तिचे रंग सुद्धा वेगळे असतात. नेहमीच्या वापरातली रांगोळी पाच बोटातून सहज नाही सुटत. साधारण काय करायचं कसं करायचं ह्याची कल्पना आली. आणि आयुष्यभराचा एक मंत्र परत आला “सरावाला पर्याय नाही”. संस्कार भारतीची अजून गम्मत म्हणजे आधी सहज मिळणारे मऊसूत रंग आता फक्त दादरला एक कोपऱ्यात मिळतात. ते पण किलो भर घ्यावे लागतात. तेव्हढे घेतले असते तर मला आयुष्य भर संस्कारभारती करावी लागली असती किंवा व्यावसायिक रित्या रांगोळी काढावी लागली असती. म्हणून दिवाळीत २०० ग्रॅम रंग मिळे पर्यंत वाट पाहावी लागली. संस्कारभारती काढण्या साठी पाठ, कंबर फार भक्कम हवी. पूर्ण वाकून करायचं काम आहे ते. साधी २ फूट * २ फूट करताना पाठीला, कमरेला रग लागली माझ्या. पण खूप समाधान वाटलं. सराव अजून चालूच आहे.
इतकं सगळं केलं, झालं तरी ठिपक्यांची रांगोळी मला अजूनही भुरळ घालते. हल्ली कोणी काढत नाही जास्त. मी सध्या राहते तिथे मी एकटीच काढते. मी मात्र अजूनही गेरू लावून रांगोळी काढते. दिवाळीत बाकी व्यवधानच्या मागे खूप घाई होते. घरचे पण तक्रार करतात ४ ४ तास काय रांगोळी काढते. मग मी पटपट आटपते. आणि दिवाळी संपली की एक दिवस शांतपणे गेरू लावते. एक मनासारखी रांगोळी निवडते . आरामात ठिपके काढते. कुणी म्हणालच किती वेळ तर सगळं आवरून ठेवते आणि परत फुरसतीत काढायला घेते. घाई नाही गडबड नाही. दोन दिवस मनसोक्त रांगोळी काढते. सगळी प्रक्रिया अनुभवत आणि तिचा आनंद घेत. ह्या दरम्यान काय मस्त मूड असतो. कोणते रंग वापरायचे, कडा कशी काढायची असे मस्त विचार करत. शेवटी कशी दिसेल ह्याचं दृश्य मनावर उमटवत. आणि मी स्वान्त सुखाय रांगोळी काढते. स्वत:साठी……
असं स्वान्त सुखाय करता यायला हव. कुणी छान म्हटलं तरी छानच पण त्या आधी आपलं आपल्याला छान वाटायला हवं. इथे कुठली स्पर्धा, तुलना नसते. कधी कधी फार छानही नसते. पण हा सगळा अनुभव फार छान असतो. एक सुख समाधान देणारा… और क्या चाहिये !!!
