माझ्या पत्रिकेत परत एकदा पक्षीनिरीक्षणासाठी परदेशगमनाचा योग असावा. ॲागस्टच्या सुरूवातीला अचानकच एका पक्षीनिरीक्षक मित्राचा मेसेज आला की ॲाक्टोबरमध्ये बोर्निओ, मलेशियाला एक पक्षीनिरीक्षण ट्रीप आखतोय, तुला येण्यात इंटरेस्ट आहे कां? बरोबर कोण कोण आहे विचारल्यावर कळलेली नावं डायरेक्ट ओळखीची नसली तरी अगदी अपरिचितही नव्हती. योगायोगाने तारखाही जमण्यासारख्या होत्या. त्यामुळे एकाच वर्षातल्या दुसऱ्या पक्षीनिरीक्षणाच्या ट्रीपचा मोह टाळू शकले नाही व होकार कळवला. बऱ्याच जणांचे बोर्निओचे फोटो बघितले होते पण माझा तिथे जाण्याचा योग असा इतक्या पटकन येईल असं वाटलं नव्हतं.
ज्याने ह्या ट्रीपसाठी विचारलं तो मायबोलीवरचा कांदेपोहे आयडी अर्थात विनायक जोशी. तिथल्या अनेक गाईड्सकडे चौकशी करून प्लॅन ठरवत , कॅास्टिंग वगैरेचा अंदाज घेत होता. मग त्यातल्या त्यात काय हवं आणि ट्रीपचं एस्टिमेट ठरल्यावर ट्रीप फायनल झाली. मग तिकीटं वगैरेचे सोपस्कारही यथावकाश आटोपले व निघायच्या तारखेची वाट बघत बसलो.
आम्ही ह्या ट्रीपसाठी चौघंजण जाणार होतो. आम्ही दोघं भारतातून तर दोन जण जपानहून येणार होते. जाताना आम्ही कौलालंपूरहून पुढे ‘कोटा किनाबालू’ला जाणारी फ्लाईट घेणार होतो तर परत येतानाची फ्लाईट ‘संदाकान’ ह्या ठिकाणाहून होती.
बोर्निओचा उत्तर भाग हा मलेशियाच्या ‘साबा (Sabah)’ या राज्यात येतो. बोर्निओ हे एक वेगळं बेटच आहे. त्याला तीन देशांच्या सीमा लागून आहेत. दक्षिणेकडे इंडोनेशिया, उत्तरेकडे मलेशिया व ब्रुनेई. या बोर्निओतच मलेशियातला सगळ्यात उंच ‘माऊंट किनाबालू’ (१३,४५५ फूट) येतो. बोर्निओत बराच भाग डोंगराळ आहे व त्यातला काही भाग हा वर्षावन (Rainforest) आहे. पावसाचं प्रमाण खूप असल्याने इथे जैवविविधताही खूप आहे. तर अशा या भागात पक्षांच्या सुंदर प्रजाती व वन्यजीवन न दिसले तर त्यात नवल ते काय.
तर अशा या बोर्निओला आम्ही निघालो होतो. आमचा प्लॅन हा आठ दिवसांचा होता. कुठल्या ठिकाणी कोणते पक्षी दिसतील याची लिस्ट गाईडने दिली होती. पण पक्षी बघितल्याशिवाय व त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांची नावं लक्षात रहात नाहीत निदान माझ्यातरी, त्यामुळे ती लिस्ट मी काही फार मनापासून वाचली नव्हती. ॲाक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही मलेशियाला जायला निघालो. आम्हांला कौलालंपूरहून विमान बदलून कोटा किनाबालूला जाणारं विमान घ्यायचं होतं.
दुपारी १ च्या सुमारास कोटा किनाबालूच्या विमानतळावर उतरलो. स्वागताला जपानहून आलेली मंडळी व लोकल गाईड हजर होते. हॅाटेलमध्ये चेकइन करून फ्रेश होऊन लंचला व तिथून लगेचच पक्षी बघायला जायचा प्लॅन होता. त्याप्रमाणे हॅाटेलवर गेल्यावर लगेचच कॅमेरा बॅग घ्यावीच लागली.
मगाशी एअरपोर्टहून हॅाटेलवर जाताना ऊन होतं आणि जेवायला जातानाच पाऊस सुरू झाला. गाईड आम्हांला एका प्रायव्हेट प्रॅापर्टीमध्ये घेऊन गेला. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला ‘Slaty-breasted Rail’ (निळ्या छातीची पाणकोंबडी) (निळ्या छातीची फटाकडीपेक्षा हे पाणकोंबडी बरंय.
) हा पक्षी अळ्या खायला येत होता. तेव्हाही पाऊस होताच. मनाजोगे फोटो काढून तिथून निघालो. तान्जूंग आरू नावाच्या ठिकाणी पोचलो. तिथे झाडावर आमची वाट बघत असल्यासारखा एकच ‘निळ्या मानेचा पोपट (Blue-naped Parrot)’ बसला होता. जवळच्याच झाडावर ‘हिरवे शाही कबूतर (Green Imperial Pigeon)’ ही होता. पुढे झाडीत ‘मलबारी खंड्या / कंठेरी धीवर (Collared Kingfisher) दिसला. हे चार पक्षी पावसातच क्लिक करून झाले व संध्याकाळी ६.३०च्या सुमारास आम्ही हॅाटेलवर परतलो. आता जेवायचं काय आणि कुठे बघायचं ह्यावर विचारविमर्श सुरू केला. मलेशियाला जायच्या आधी तिथे राहाणाऱ्या एका मैत्रिणीकडून शाकाहारींसाठी काय परिस्थिती आहे याची चौकशी केली होती. परिस्थिती फार काही आशादायी नाही हे कळल्यामुळे आम्ही रेडी-टू-इट खाणं तसंच ठेपले-खाकरा-लाडू असं सटरफटर आमच्या बरोबर आणलं होतंच. हॅाटेलच्या आसपास काही मिळणार नाही हे लक्षात आल्यावर आम्ही हॅाटेलच्याच रेस्टॅा.मध्ये मेनू बघून आम्हांला हवं तसं करून द्यायला सांगितलं. नशिबाने ते एक व्यवस्थित झालं. उद्या सकाळी आम्ही ‘ट्रूसमाडी’ नावाच्या ठिकाणी जाणार होतो.

१. निळ्या छातीची पाणकोंबडी
२. निळ्या मानेचा पोपट
३. हिरवे शाही कबूतर
दिवस दुसरा :- ट्रूसमाडी
दुसऱ्या दिवशी पहाटेच ट्रूसमाडीकडे जायला निघालो. साधारण ६.३० वाजता तिथे पोचलो. आज दिवसभर इथे हाईड फोटोग्राफीच असणार होती. हाईड फोटोग्राफी म्हणजे एका ठिकाणी बसूनच पक्षाचे फोटो काढायचे. समोर पक्षांसाठी खाणं टाकलेलं असतं तिथे पक्षांची ये जा सुरू असते. पक्षांना डिस्टर्ब होऊ नये यासाठी तुम्ही त्यांना दिसणार नाही अशी सोय असते. सकाळी पोचलो तेव्हा ढगाळ वातावरण होतं त्यात उजेडही नव्हता व छान झाडांमध्ये होती हाईड. एकूणात आनंद होता. पोचून आपापल्या जागा घेतल्या तेव्हा ‘क्रेस्टेड पार्ट्रिज’ नर-मादी जोडी फिरत होती पण फार जवळ व उजेड अजिबात नसल्याने काहीही फोटो मिळाले नाहीत. आता वाट बघणं आलं. दिवसभरात वेगवेगळे पक्षी येत जात होते. मध्येच थोडं ऊन (पक्षी उजेड) आलं की आशा पल्लवित होत होत्या पण ते अगदी थोडाच वेळ.

१. केशरी डोक्याचा कस्तूर (Orange-headed Thrush)

२. पिवळ्या पोटाचा बुलबुल (Yellow-bellied Bulbul)

३. पेनान बुलबुल (Penan Bulbul)

१. पांढऱ्या तुऱ्याचा शामा (White-crowned Shama)

२. Chestnut-hooded Laughing Thrush

३. Sunda’s Scimitar Babbler
नाही म्हणायला ‘बुलवर्स फेजंट (Bulwer’s Pheasant)’ ह्या फक्त बोर्निओमध्येच दिसणाऱ्या पक्षाने हजेरी लावली. मादी व तिच्याबरोबर पिल्लू अशी मंडळी उगवली पण नर जो एकदम दिसायला जबरदस्त असतो त्याने हजेरी लावली नव्हती. थोड्या वेळाने तो ही आला आणि जीव थोडा शांत झाला. बुलवर्सने ४-५ फेऱ्या मारून सगळ्यांना खुश केलं.


Bulwer’s pheasant
दुपारी आणलेल्या ठेपल्यांचंच जेवण करून परत हव्या असणाऱ्या पक्षाची वाट बघत बसलो. बॅंडेड पिट्टा यायला हवा होता, त्याचंही यायचं काही लक्षण दिसत नव्हतं. ३.३० च्या आसपास वाटलं की आता बास झालं, निघूया. उजेड नव्हता, मध्येच पाऊस हजेरी लावून जात होता आणि हवे ते पक्षीही येत नव्हते. ५ पर्यंत वाट पाहून निघू असं ठरलं आणि…..क्रिमसन-हेडेड पार्ट्रिजने हजेरी लावली. सकाळी रेड-ब्रेस्टेड पार्ट्रिज येऊन गेला होता व आता हा. सगळ्या आशा सोडून दिलेल्या असताना एकदम क्रेस्टेड पार्ट्रिजची जोडी अचानकच आली. खरंतर फोटो काढायला अनुकूल लाईट अजिबात नव्हता पण फोटो काढणं तर मस्टच होतं. मनसोक्त फोटो काढल्यावर डोक्यातून बॅंडेड पिट्टाला काढून टाकून तिथून निघालो. पुढचे दोन दिवस आम्ही ‘किनाबालू पार्क’ मध्येच पक्षीनिरीक्षण करणार होतो. त्यामुळे आमचा मुक्काम ‘कोटा किनाबालू’ च्या जवळपासच्या ठिकाणी असणार होता. पुढच्या दोन रात्री आम्ही तिथेच राहाणार होतो.

Crimson-headed Partridge


Crested Partridge (नर व मादी)
कोटा किनाबालूच्या पायथ्याशी असलेलं आमच्या दोन रात्रींच्या मुक्कामाचं रिसॅार्ट छान होतं पण तिथे ना रेस्टॅारंट होतं ना बाकी काही. रूममध्येही फोन वगैरे काही नव्हता. रिसेप्शनही बऱ्यापैकी लांब होतं. वायफाय तर चालतंच नव्हतं. एकूणात आनंदीआनंद होता. पण रिसॅार्टचा परिसर खूपच छान होता. नावातच झेन होतं त्यामुळे माझी तरी अपेक्षा तशीच होती.
दिवस तिसरा :- किनाबालू पार्क
माऊंट किनाबालूच्या पायथ्याशी किनाबालू पार्क आहे. आम्ही साधारण ६.२० च्या आसपास पोचलो असू. काही मोजकी लोकं वगळता शुकशुकाट होता. गाईडने खालीच तिकीट घेतलं व बसने आम्हांला गेटपर्यंत सोडलं. इथून मिनी बसेसने ट्रेकर्स मंडळी किनाबालूच्या पायथ्याशी जातात व तिथून ट्रेक सुरू करतात. ७ वाजता ते गेट उघडतं असं कळलं. आम्ही पायीच जायला सुरू केलं कारण तसंही वाटेत पक्षी बघत बघतच वर जायचं होतं. हवा अगदी आल्हाददायक वगैरे म्हणतात तशी होती. इथे परत ३-४ दिवस घालवायला यायला हवं यावर सगळ्यांचच एकमत झालं. पक्षांचा किलबिलाट सुरू झाला होता पण फोटोसाठी उजेड तसा कमीच होता.गाईड दिसेल त्या पक्षांची नावं सांगत होता व आम्ही जमेल तसं क्लिक करत होतो. हा किनाबालूच्या बेसपर्यंत जाणारा रस्ता खूपच सुंदर होता. छान शांतता होती सगळ्या वातावरणात. चढ बऱ्यापैकी होता. हळूहळू जात होतो त्यामुळे मॅनेजेबल होतं. मधेच केव्हातरी आमची गाडी अधेमधे कुठेतरी येऊन थांबली. आज दिवसभर आम्ही याच वाटेवर मधेच चालत तर मधेच गाडीत बसून वरखाली करणार होतो. आमचा गाईड एका कोणत्या तरी ट्रोगॅान पक्षाच्या मागे होता. पण ट्रोगॅानचा काही पत्ता नव्हता. अनेक वेगवेगळे पक्षी मात्र दिसत होते.
(माऊंट किनाबालूचा फोटो काही लोड झाला नाही)


Grey-chinned minivet (Male & Female)
किनाबालूच्या पायथ्याशी एक फार भारी रेस्टॅारंट दिसलं. मग ठरवलं आजचं दुपारचं जेवण इथेच घ्यायचं. जेवण, सर्व्हिस सगळंच एकदम भारी होतं. तिथेच मागच्या झाडांवर पक्षांचा कल्लाही सुरू होता. एक-दोन मस्त पक्षीही मिळाले तिथे.

१. टेमिंकचा सूर्यपक्षी (Temminck’s Sunbird)

२. Black-sided Flowerpecker
दिवसभर अशी तंगडतोड करून पाय मात्र चांगलेच बोलायला लागले व ट्रायपॅाड खांद्यावर वागवल्याने खांदाही दुखायला लागला होता. किनाबालू हे ठिकाण उंचीवर असल्याने हवेत मस्त गारवा होता. आम्ही इथे राहिलेलो ते रिसॅार्ट खूप छान होतं पण वर सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्याकडे जेवणाची वगैरे काहीही सोय नसल्याने आजही आम्ही आमच्याकडचं खाऊनच वेळ मारून नेली. उद्याही आम्ही अर्धा दिवस असंच वर-खाली करून ‘टेलूपिड’ नावाच्या ठिकाणी जाणार होतो.
दिवस चौथा :- किनाबालू पार्क व पोरिंग हॅाट स्रिंग्ज
आजचा दिवस उजाडला तो पाऊस घेऊनच. आमचा इथला गाईड बऱ्यापैकी खडूस होता. पुरूष मेंब्रांशी थोडं जमत होतं त्याचं तसं पण बायकांशी म्हणजे आम्हां दोघींशी फार सौख्याने वागत नव्हता तो (निदान आम्हांला तरी असंच वाटत होतं). सकाळी निघताना त्याला म्हटलं आज पाऊसच असणारे कां? तर म्हणाला काय माहित असू शकेल, काय करणार? म्हटलं वेदर ॲप काय दाखवतंय? फारच नाईलाज झाल्यासारखं त्याने वेदर ॲप उघडलं. त्यात पाऊस आहे हे दिसत होतं. नंतरही त्याला माझा रेन पॅांचो तुझ्या बॅगमध्ये ठेवशील कां विचारल्यावर नाईलाजानेच ठेवला त्याने. कोलंबियाच्या माझ्या गाईडला फार म्हणजे फारच उचक्या लागल्या असणारेत त्या ८ दिवसात. असो,
किनाबालू पार्कला पोचेपर्यंत परत बारीक बारीक पाऊस सुरू झालाच होता. त्यामुळे पॅांचो घालावा लागलाच व तसंच पावसात कालचाच प्रोग्रॅम सुरू झाला. पाऊस असला तरी पक्षांची ॲक्टिव्हिटी होती तशी सुरू. मिळतील/जमतील तसे फोटो काढत होतो. नाश्त्याला कालच्याच रेस्टॅारंटमध्ये गेलो आणि जो काही मुसळधार पाऊस सुरू झाला. मग गाईडने एक प्रस्ताव मांडला की इथून थोड्या अंतरावर एक जागा आहे. तिथे जगातलं सगळ्यात मोठं फुल ‘रॅफ्लेसिया अर्नोल्डी’ (Stinking Corpse Lily) फुललं आहे, ते बघायला जायचं कां? तिथे जवळपास एक पार्क आहे तिथेही काही पक्षी बघायला मिळतील. पाऊस थांबण्याची वाट बघत बसलो असतो तर वेळ फुकट गेला असता व तसंही तो थांबायचं काही लक्षण दिसत नव्हतं त्यामुळे आम्ही ते फुल बघायला निघालो पण तिथे जायच्या आधी गाडीने परत किनाबालू पार्कमध्ये एक चक्कर मारली.
तिथून निघाल्यावर साधारण अर्ध्या तासात आम्ही ‘रानाऊ’ नावाच्या ठिकाणी पोचलो. फुललेलं फुल बघायला लोकांची बरीच गर्दी झाली होती. आम्ही पण तिकीट काढलं व आत गेलो.

रॅफ्लेसिया अर्नोल्डी ही रॅफ्लेसियासी कुटुंबातील रॅफ्लेसिया परजीवी वंशातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे . ती सुमात्रा आणि बोर्नियोच्या वर्षावनांमध्ये आढळते. ह्याचा वास कुजलेल्या मांसासारखा असतो. इंग्लिशमध्ये त्याला ‘Stinking Corpse Lily’ च म्हणतात.
कळ्या विकसित होण्यासाठी अनेक महिने लागतात आणि फुले फक्त काही दिवस टिकतात. फुले द्विगुणी असतात - नर किंवा मादी, म्हणून यशस्वी परागीकरणासाठी दोन्ही फुले आवश्यक असतात.
जेव्हा रॅफ्लेसिया पुनरुत्पादनासाठी तयार होतो, तेव्हा त्याच्या यजमानाच्या मुळाच्या किंवा देठाच्या बाहेर एक लहान कळी तयार होते आणि ती वर्षभरात विकसित होते. कोबीसारखे डोके जे विकसित होते ते अखेर फुल उघडण्यासाठी उघडते. पुंकेसर फुलाच्या आत एका अणकुचीदार डिस्कशी जोडलेले असतात. कुजलेल्या मांसाचा एक दुर्गंधीयुक्त वास माश्या आणि भुंग्यांना आकर्षित करतो. रॅफ्लेसिया अर्नोल्डी द्वारे तयार केलेल्या कुजणाऱ्या मांसाचा तीव्र वास त्याच्या परागकणांना आकर्षित करण्यासाठी एक प्रमुख अनुकूलन आहे. रासायनिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की हा सुगंध डायमिथाइल डायसल्फाइड आणि डायमिथाइल ट्रायसल्फाइड सारख्या सल्फरयुक्त संयुगांमुळे येतो, जे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यात देखील उपस्थित असतात. ही संयुगे कॅरियन माशी (कॅलिफोरिडे कुटुंब) आकर्षित करतात, जी वनस्पतीचे प्राथमिक परागकण म्हणून काम करतात. माश्या फुलांच्या वासाने आणि रंगाने फसल्या जातात, ते कुजणारे मांस समजतात आणि प्रक्रियेत फुलांमध्ये परागकण हस्तांतरित करतात. ही अत्यंत विशिष्ट परागकण रणनीती सुमात्रा आणि बोर्नियोच्या दाट वर्षावनांमध्ये पुनरुत्पादन सुनिश्चित करण्यास मदत करते. यशस्वीरित्या परागीकरण करण्यासाठी, माश्या आणि/किंवा भुंग्यांना नर आणि मादी दोन्ही वनस्पतींना त्या क्रमाने भेट द्यावी लागते. उत्पादित होणारी फळे असंख्य बारीक बियांनी भरलेल्या गोल बेरी असतात. (सौजन्य - विकीपिडिया)
तिथेच नेपेंथेस म्हणजेच पीचर प्लॅन्ट्सपण होती. त्याचे पण फोटो काढले व त्या पार्ककडे जायला निघालो. पार्कमध्ये शिरतोय न शिरतोय तर गेटजवळच सुभग (Common Iora), Chestnut Munia व लाल-डोळ्यांचा बुलबुल (Red-eyed Bulbul) हे पक्षी स्वागताला आले. तिथेच खालून एक सुंदर ओढा वाहत होता. पार्क खरोखरच सुंदर दिसत होतं. पुढेच हॅाट स्प्रिंग्ज दिसत होते.
बऱ्याचदा एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दलही आपले काही पूर्वग्रह असतात किंवा काही कल्पना असतात व ते तसं नाही निघालं की आपल्या समजुतीला धक्का लागतो. तसं माझं ‘मलेशिया’ या देशाबद्दल झालं. देशाबद्दल फार काही अपेक्षा नव्हती (हे उगाचच खरंतर). जायचं ठरवलं तेव्हा तसं म्हटलं तर एक्सायटेड वगैरे काही नव्हते मी. विनायकने विचारलं नसतं तर माझा बोर्निओला इतक्यात जायचा विचारही नव्हता. पण या देशाने मला फार म्हणजे फारच सुखद धक्का दिला. सगळीकडे स्वच्छता दिसत होती. कुठेही हॅार्न ऐकायला येत नव्हता. गाड्या व्यवस्थित अंतर ठेवून थांबत होत्या. रस्ते सुंदर होते. आपल्या देशातून दुसऱ्या देशात गेल्यावर किती छोट्या छोट्या गोष्टीचंही अप्रूप वाटायला लागतं. हे पार्कही त्याला अपवाद नव्हतं.
किरमिजी रंगाचा शिंजीर (Crimson Sunbird) जास्वंदीच्या झाडात बागडत होता. त्याचे फोटो काढायचा प्रयत्न केला पण छे…काही जमलं नाही. जाऊ देत म्हटलं, तसाही माझा काही तो लाईफर (पहिल्यांदाच बघत असलेला) नव्हता. गाईड आम्हांला थोडं पुढे घेऊन गेला. तिथे गाईडने दाखवलं, झाडात ‘रॅफल्स मालकोहा (Raffle‘s malkoha)’ फिरत होता. फोटो काढायचा प्रयत्न केला पण तो काही चांगला येणार नाही याची कल्पना होती. मालकोहाला आमची दया आली असावी. फिरत फिरत समोरच्या एका झाडावर गेले. आता त्यांचा फोटो काढायला मान आकाशाकडे करावी लागत नव्हती. नर व मादी असे दोघेही होते. आम्ही फोटो काढतोय हे बघून तिथे बघ्यांची गर्दी जमली. एका थोड्या वयस्कर बाईला मी कॅमेऱ्यातून टिपलेला फोटो दाखवला, म्हणजे तिलाही डिटेल्स कळतील म्हणून. तिने विचारलं, ह्या फोटोंचं काय करता? म्हटलं काहीच नाही करत. तर म्हणाली तुम्ही हे फोटोज मॅगझिनमध्ये द्यायला हवेत. तिला मी कुठून आली आहेस असं विचारलं कारण ॲक्सेंटवरून मला ती ॲास्ट्रेलियन किंवा ब्रिटीश वाटत होती. तर ती ब्रिटीश निघाली, टर्कीमध्ये रहाते म्हणाली. विनायक म्हणाला फ्लाईटमध्ये माझ्या बाजूलाच बसले होते. हे त्याने तिला सांगितल्यावर ती थक्कच झाली.
मालकोहानंतर तिथेच मागच्या झाडावर रॅकेट-टेल्ड ड्रोंगो ही बसला होता. त्याचेही फोटो काढले व आता जेवायला जाऊ असं म्हटलं.


Raffle‘s malkoha (नर व मादी)

Greater racket-tailed Drongo
आमच्यातल्या शैलेशला जेवायचं नव्हतं. तो म्हणाला मी Crimson Sunbird ची वाट बघतो. परत दिसला आणि मनाजोगे फोटो काढता आले तर बघतो. तिथे एक रेस्टॅारंट आहे असं गाईडने सांगितलं होतं. रेस्टॅारंट इतकं सुंदर होतं. आम्ही मस्तपैकी ग्रीक सॅलड, गार्लिक ब्रेड व पास्ता ॲार्डर केला. सगळ्याची चव सुंदर होती. असं भरपेट जेवण झाल्यावर आम्ही परत पक्षांच्या मागे लागलो. नंतर ‘नारिंगी पोटाचा फुलटोच्या’ (Orange-bellied Flowerpecker) सोडल्यास बाकी कोणीही दिसलं नाही खरंतर पण त्या एकाच पक्षाने आमचा बराच वेळ खाल्ला. साधारण पावणेपाचच्या सुमारास तिथून निघालो. आजचा मुक्काम ‘टेलूपिड’ नावाच्या ठिकाणी असणार होता. तिथे फार काही ॲाप्शन्स नाहीत हे कळलं होतं. तिथे पोचायला दोन-अडीच तास लागणार होते.

Crimson Sunbird (मिळाला होता मला चांगला फोटो)

Orange-bellied Flowerpecker
मी खरंतर देशात पक्षीनिरीक्षणाची अशी ५-६-७ दिवसांची एकच ट्रीप केली होती. परदेशातल्या दोन ट्रिप्सचा अनुभव गाठीशी जमा झाला आता. वाटलं तरी ह्या ट्रीप्स तशा दमणूक करणाऱ्या असतात. अर्थात त्यात मजा आणि पक्षी बघायला मिळाल्याचं समाधानही असतंच. सकाळी लांबच्या अंतरावर जायचं असेल तर लवकर निघावं लागतं. त्याआधी किमान तासभर तरी आधी उठावं लागतं. संध्याकाळी हॅाटेलवर पोचू त्यानंतर कॅमेऱ्याच्या बॅटरीज चार्ज करणं, मेमरी कार्डमधले फोटो लॅपटॅापवर ट्रान्सफर करणं ही कामं असायचीच. ते सगळं उरकायला ११.३०-१२ सहज वाजायचेच. त्यामुळे मी झोप प्रवासातच पूर्ण करायचे. हम्म तर…अगदी टेलूपिडला पोचता पोचताच जाग आली मला. मुक्कामाच्या ठिकाणाची जागा बघून तर आपण शारजाहमध्ये आलो की काय असंच वाटलं. हॅाटेल तर…… काहीही न बोललेलं बरं असंच होतं. नेमकी मी अंघोळीला गेले असताना बाकीच्या मंडळींनी बाहेर जाऊन फळं आणली, त्यांचं रात्रीचं जेवण होतं ते. मी मग होते त्यातले ठेपलेच खाल्ले. नशीब इथे एकच रात्र मुक्काम होता म्हणून.
क्रमश :
