पक्षीनिरीक्षण - सेलामत दातान्ग क मलेसिया अर्थात वेलकम टू मलेशिया - भाग २

भाग दुसरा -

दिवस पाचवा:- टेलूपिड

ट्रीप ठरवल्यावर मधेच कधीतरी विनायकला कळलं की टेलूपिडला जाताना जळवांचा त्रास होण्याची शक्यता आहे.त्यासाठी त्याने पुण्यातून सगळ्यांसाठी लीच सॅाक्स बनवून घेतले. जायच्या आधी कळलं की टेलूपिडच्या दोन हाईड्सपैकी एक बंद आहे व दुसरीला जाताना जळवांचा त्रास नाही. टेलूपिडलाही हाईड फोटोग्राफीच करायची होती. इथे फक्त आणि फक्त ‘बोर्निअन पिकॅाक फेजंट’ साठीच जायचं होतं. ह्या पक्षाच्या नराच्या अंगावर अगदी मोरासारखंच छान डिझाईन असतं. तो दिसला तर इथेच दिसतो असं कळलं. किनाबालूहून पहाटे लवकरच निघालो. वाटेत एका हॅाटेलवर चहा-कॅाफी व ब्रेकफास्टसाठी थांबलो. खाण्यासाठी तसे काही ॲाप्शन्स नव्हते तिथे त्यामुळे चहा/कॅाफी व बिस्कीट्स खाऊन निघालो व टेलूपिड गावात पोचलो. तिथून 4x4 गाडीने थोडं गेलो. आता १५ एक मिनीटांचा चढ होता जो पायीच चढायचा होता. साधारण ७.४५-८ च्या दरम्यान पोचलो असू. नक्की लक्षात नाही. ही हाईड बऱ्यापैकी प्रशस्त होती. ट्रायपॅाड वगैरे सेट करून कॅमेरा लावला. समोर पक्षांची ये-जा सुरू होती. थोड्या वेळाने ज्या पक्षासाठी आलो होतो त्याची मादी व पिल्लू आले. त्यांचे फोटो काढून झाले व नराची वाट बघत बसलो.

img_5157.jpeg

Bornean Peacock Pheasant (f)

White-crowned Shama त्याने अंगावर घेतलेलं पहारेकऱ्याचं काम चोख करत होता. कोणत्याही पक्षाला तिथे फिरकूच देत नव्हता, एस्पेशली छोट्या पक्षांना. थोड्या वेळाने परत एकदा बोर्निअन पिकॅाक फेजंटच्या मादी व पिल्लाने हजेरी लावली. बाकी काही बघितलेले तर काही नवीन पक्षी येत होते. मधे काही ॲक्टिव्हिटी नसेल तर डुलकी पण लागत होती*haahaa2* दुपारी जवळ असलेलं सटरफटर खाणं हाच ॲाप्शन होता. तसं काहीबाही खाल्लं व बसलो परत. नाही म्हणायला मध्येच Rufous-backed Dwarf Kingfisher (थोडासा काही फरक सोडता आपल्याकडे दिसणारा तिबोटी खंड्या), Chestnut-breasted Malkoha, Rufous Piculet अशांनी हजेरी लावून झोप उडवायला व मनोरंजन (म्हणजे फोटो काढायची संधी द्यायला) करायला मदत केली.

img_5169.jpeg

Rufous-backed Dwarf KF

img_5170.jpeg

Rufous Piculet

अगदी पाच वाजता निघायचं असं ठरवलं. तोवर तो नर फेजंट आला तर बरं. पण नाही….त्या दिवशी काही नशिबाने साथ नाही दिली. आवराआवरी करून तिथून निघालो. उतरत असताना माझ्या पायाला काहीतरी जळजळतंय असं जाणवलं मला, पण तिथे लक्ष न देता तसंच उतरलो. आता पुढचे दोन दिवस आमचा मुक्काम ‘सेपिलोक’ ह्या ठिकाणी असणार होता. हॅाटेलवर जायच्या आधी आम्ही जेवायला एका ठिकाणी थांबलो. तिथेही आम्ही खाऊ शकू असा डोसा दिसत होता. किनाबालूला येताना आम्हांला एका हॅाटेलमध्ये मिळाला होता. इथे एक वेटर केरळी दिसला. पोटभर खाऊन मस्त नारळपाणी पिऊन आम्ही सेपिलोकच्या हॅाटेलवर पोचलो तेव्हा रात्रीचे ९.३० वाजत आले होते. रूममध्ये पोचल्यावर शूज काढले तर सॅाक्सवर रक्त दिसलं. उतरताना तिथे जळजळल्याचा अर्थ कळला. जळवेने मला प्रसाद दिला होता. बॅंडएड लावावी म्हणून आणायला खाली उतरले तर सगळी दुकानं बंद झालेली. नशिबाने मुग्धाकडे होतं म्हणून. आंघोळ झाल्यावरही रक्त थांबत नव्हतं. उद्या आम्ही दिवसभर ‘रेनफॅारेस्ट डिस्कव्हरी सेंटर’ या ठिकाणी असणार होतो. जास्त लांब जायचं नव्हतं त्यामुळे ६.३० ला निघून चालणार होतं.

दिवस सहावा :- रेनफॅारेस्ट डिस्कव्हरी सेंटर, सेपिलोक

सकाळी वेळेत निघालो. RDC च्या प्रवेशद्वारापाशीच एक ग्रूप होता पक्षीनिरीक्षणासाठी आलेला. त्यांच्यात एक आजोबा होते ते कसेबसे काठी टेकत टेकत चालत होते. त्यांच्या उत्साहाची कमालच वाटली आम्हांला. हे सेंटर इतकं सुंदर होतं. गेल्यावर लगेचच एक तळं होतं. त्याच्या उजव्या बाजूला ‘ओरिएंटल डार्टर’ बसला होता तर लांबवर ‘स्टॅार्क-बिल्ड किंगफिशर’ बसला होता. पुढे काही सांगायच्या आधी ह्या पार्कबद्दल सांगायलाच हवं.

RDC हे पार्क खरंतर 3-in-1 पार्क आहे, वन्यजीव, पक्षी व बोटॅनिकल. हे पार्क काबिली-सेपिलोक फॅारेस्ट रिझर्वचा भाग आहे. याचं क्षेत्रफळ ४३०० हेक्टर असून याचं व्यवस्थापन साबाचं फॅारेस्ट डिपार्टमेंट पाहतं. इथे लोकांना सोयीचं व्हावं म्हणून कॅनपी वॅाक्स आहेत. अनेक झाडं खूप उंच आहेत त्यावरचे पक्षी बघता यावेत यासाठी टॅावर्स बांधलेले आहेत. तिथे दोन झाडं आहेत, त्यातील एक जे ‘सेपिलोक जायंट’ म्हणून ओळखलं जातं त्याची उंची ६५ मीटर आहे व दुसरं ‘काबिली मॅानस्टर’ म्हणून ओळखलं जातं, त्याची उंची ७५ मीटर आहे. दोन्ही झाडांचं वयोमान साधारण ८००-१००० वर्षं आहे. इथले कॅनपी वॅाक्स इतके उंच बांधले आहेत (साधारण २५ मीटर/८२ फूट) तरीही आपण झाडांच्या उंचीच्या मध्यभागीच असतो. हे पार्क मला इतकं आवडलं की सांगता सोय नाही. सगळीकडे कमालीची स्वच्छता दिसत होती. कुठे अगदी कागदाचा कपटाही दिसला नाही. बरं ठिकठिकाणी कचरा टाकू नका किंवा कचरा कचराकुंडीतच टाका असे फलकही लावलेले नव्हते किंवा कुठेही सफाई कर्मचारीही नव्हते पण तरीही……. नशिबाने इथे आम्ही दीड दिवस पक्षीनिरीक्षण करणार होतो.

पार्कमध्ये पहिल्या कॅनपी वॅाकवर पोचल्यावर आम्हांला White-crowned Hornbill ने दर्शन दिलं. गाईडला गिबनचे कॅाल्स ऐकायला येत होते. कॅाल्स जवळ यायला लागले व २-३ गिबन्स थोडं लांब पण समोरच्याच झाडांवर येऊन बसले. समोर येऊन बसलेले ‘Muller’s Bornean Gibbon’ होते. The fastest moving primate in tree canopy.

img_5205.jpeg

img_5206.jpeg

‘Muller’s Bornean Gibbon’

कॅनपी वॅाकवर ठराविक अंतरावर तिथे आढळणाऱ्या पक्षांची, वन्यजीवांची माहिती व छायाचित्रे लावली होती. इथे बोर्निअन ब्रिसलहेड हा पक्षी दिसतो, पण तो सगळ्यांना दिसतोच असं नाही. तुम्ही त्या भाग्यवान लोकांमध्ये असाल तरच तुम्हांला तो दिसेल. देशा-परदेशातून त्याला बघायला लोकं येतात असं तिथे माहिती फलकावर लिहीलं होतं. आमचा गाईड होताच त्याच्या मागावर म्हणजे लक्ष ठेवून होता त्याच्यावर व त्याच्या कॅाल्सकडे. अशाच एका कॅनपी वॅाकवरून आम्ही एका ट्रेलकडे निघालो. Black & Yellow Broadbill ने लांबूनच दर्शन दिलं. त्याचे फोटो काढून थोडं मागे येतोय तोवर गाईडला ब्रिसलहेड दिसला पण फारच झाडीत होता. आम्ही तो उडत होता तसं कॅमेरा-ट्रायपॅाड सांभाळत त्याच्या मागे पुढे करत होतो. असा बराच वेळ गेल्यावर ब्रिसलहेड निदान बरे फोटो मिळतील अशा जरा बऱ्या ठिकाणी बसला व आम्ही स्वत:ला भाग्यवान लोकांच्या यादीत टाकलं. ब्रिसलहेडच्या मागावर असताना दोन सुतारपक्षी व मगाचचाच ब्रॅाडबिलही दिसला.

img_5207.jpeg

img_5208.jpeg

Bornean Bristlehead

त्या पार्कमधला कॅफेही मला इतका आवडला. त्याच्या बाहेरच एक जास्वंदीचं झाड होतं त्यावर तपकिरी गळ्याचा सुर्यपक्षी (Brown-throated Sunbird) फिरत होता. दोन दिवस या कॅफेमध्येच आम्ही नाश्ता व जेवण केलं. दुपारच्या जेवणानंतर आमची मोहिम Black-crowned Pitta च्या शोधात निघाली. गाईडला साधारण अंदाज असावा तो कुठे दिसतो याचा त्या हिशोबाने तो दाट झाडीत शिरला व आम्ही त्याच्या मागे. थांबलो तिथे, गाईडला कॅाल येत होता त्याचा पण दिसत मात्र नव्हता. मग तिथून बाहेर आलो. डायार्डचा ट्रोगॅान दिसत होता. त्याचे फोटो काढले पण झाडामध्ये असल्याने क्लीन शॅाट काही मिळत नव्हता. त्याचे फोटो काढले तेवढ्यात गाईड अजून दुसऱ्या झाडीत शिरला. गाईड बाकी वागायला जरा खडूस होता तरी त्याची स्पॅाटिंग स्किल्स चांगली होती. लांबवर बसलेलं ‘Barred Eagle Owl’ दिसलं. आमच्या मागेच काही हौशे गवशे पण आले बघायला. तिथून बाहेर पडलो तर डायार्डचा ट्रोगॅान अजून होता तिथे. जरा वेगळ्या फांदीवर बसून त्याने चांगले फोटो दिले.

img_5172.jpeg
Diard’s Trogon

img_5171.jpeg
Barred Eagle Owl

या सगळ्यात गाईड ‘पिट्टा’ ला विसरला नव्हता. आम्ही अजून एका गर्द झाडीत घुसलो. समोरच्या झाडीत आमच्यापैकी कोणाला तरी पिट्टा ओझरता नजरेस पडला पण फोटो कुठचा येतोय. परत तिथूनही बाहेर पडलो व मला वाटतं त्या कॅफेमध्ये लंचसाठी गेलो. जेवणाचीच वेळ असल्याने कॅफे पूर्ण भरलेला होता. हवा चांगलीच दमट असल्याने चांगलंच उकडत होतं. अगदी घामाघूम व्हायला झालं होतं. मला वाटतं आम्ही फक्त काहीतरी प्यायलो व गाईडने आम्हांला एका ट्रेलवर नेलं. ह्या ट्रेलवर पिट्टासाठीच आलो होतो. त्या ट्रेलच्या वाटेवर ‘साबाचं तितर (Sabah Partridge)’ अगदी बिनधास्त फिरत होतं. काहीही पडलेली नव्हती त्याला आजूबाजूला असलेल्या लोकांची. हा तितर फक्त बोर्निओ मध्येच दिसतो म्हणजेच Endemic होता. त्याचे फोटो काढून आम्ही आडवाटेला शिरलो तर तो तितर तिथेही आला. या वाटेवर मात्र गाईडच्या प्रयत्नांना यश आलं. अगदी झाडांत हालचाल दिसली. फांद्या-पानांच्या आड ‘काळ्या तुऱ्याच्या नवरंग (Black-crowned Pitta)’ पक्षाने अखेरीस दर्शन दिले. दुपारपासून ज्याच्यासाठी सगळ्या झाडीत शिरत होतो तो अखेरीस दिसला. नंतर थोडे बरे फोटो मिळाल्यावर आम्ही तिथून निघालो. परतीच्या वाटेवर वर उल्लेखलेली दोन महाकाय झाडंही दिसली. अजून दोन तीन पक्षी यादीत घालून आजच्या दिवसाची सांगता केली. उद्या अर्धा दिवस आम्ही याच पार्कमध्ये फिरणार होतो व नंतर आम्ही संदाकान या ठिकाणी ‘किनाबातांगान’ या नदीमध्ये क्रूझ करणार होतो.
img_5173.jpeg

साबाचं तितर (Sabah Partridge)

img_5211.jpeg

Black-crowned Pitta

दिवस सातवा :- रेनफॅारेस्ट डिस्कव्हरी सेंटर, सेपिलोक व किनाबातांगान रिव्हर क्रूझ

कालच्यासारखंच सकाळी निघालो, फक्त आज सगळं सामान घेऊन निघालो. आज जरा पावसाळी हवा वाटत होती. पार्कच्या पार्किंग लॅाटमध्येच तीन-चार पक्षी दिसले. त्यांचे फोटो काढून आत गेलो. आम्हांला माणिक गालाचा सूर्यपक्षी (Ruby-cheeked Sunbird) हवा होता तो इथे दिसला. त्याचे छान फोटोही मिळाले. आज गाईडने विचारलं की ओरांगउटान रिहॅबिलिटेशन सेंटरला भेट देण्यात इंटरेस्ट आहे कां? असेल तर इथून जवळच ते सेंटर आहे आणि १० वाजता त्यांना खायला द्यायची वेळ आहे तर आपल्याला या पार्कमधून वेळेत निघावं लागेल कारण तिथे ते बघायला खूप गर्दी असते. त्यामुळे आज या पार्कमध्ये फार वेळ घालवता येणार नव्हता. तरीही काही पक्षी बघायला मिळाले व त्यांचे चांगले फोटोही काढता आले. कालच्याच कॅफेमध्ये नाश्ता करून आम्ही सेंटरकडे जायला निघालो. सेंटर त्या पार्कपासून साधारण १५ मिनीटांच्या अंतरावर होतं. तिकीट काढून आत गेलो तेव्हा त्या ओरांगऊटानची फिडींगची जागा मोकळी होती म्हणजे लोकांची गर्दी नव्हती. त्यावेळेस त्या फीडरवर ‘Pig-tailed Macaques’ बागडत होते. ह्या जातीच्या माकडांची शेपटी अगदी छोटी होती त्यामुळेच त्यांना हे नाव पडलं आहे. त्यांचेही भरपूर फोटो काढले. मला ट्रीपहून परत आल्यावर लक्षात आलं. माकडं ही पोर्ट्रेट्ससाठी छान सब्जेक्ट्स आहेत. त्यांचे फोटो एडिट करायला मजा येतेय. तर जशी वेळ होत आली तशी गर्दी व्हायला लागली. आमच्या गाईडने सांगून ठेवलं होतं की आधीच तुमच्या जागा पकडून ठेवा नंतर तुम्हांला हलायला जागा मिळणार नाही. त्याचं ऐकून आम्ही आधीच जागा पकडल्या होत्या.

img_5183.jpeg
Pig-tailed Macaques

सेपिलोक ओरांगउटान रिहॅबिलिटेशन सेंटरबद्दल थोडंसं :- हे सेंटर अनाथ व विस्थापित ओरांगउटानचा बचाव व त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी १९६४ मध्ये स्थापन झालं. या अनाथ ओरांगउटाननां परत जंगलात जगण्याचं इथे शिकवलं जातं. हे सेंटर १०६१० एकर्सवर वसलं आहे जे काबिली-सेपिलोक फॅारेस्ट रिझर्व्हच्या अखत्यारीत येतं.

बरोब्बर १० वा. ओरांगउटाननां खायला घालणारा माणूस तिथे एक प्लॅटफॅार्म बनवला होता त्यावर चढला. त्याच्या पाठीवर मोठी बास्केट लावली होती. त्यात अनेक फळं व भाज्या होत्या. तो त्या प्लॅटफॅार्मवर चढल्या चढल्या बाजूलाच असलेल्या केबलवरून एक नर ओरांगउटान आला. त्याने त्याला हवी ती फळं/भाज्या उचलल्या व तो जरा बाजूला जाऊन खायला लागला. लगेच एक मादी पिल्लाला घेऊन आली व ती ही तिला हव्या असलेल्या भाज्या/फळं निवडत बसली. खाणं बघून पिग-टेल्ड मकाक जातीची माकडंही त्यावर हात मारायला लागली. ते बघून ती आई ओरांगउटान त्यांना फटकावत होती. Haahaa 2 फार म्हणजे फार मजा आली त्यांचे फोटो काढायला. खाणं झालं, ओरांगउटान फॅमिली निघून गेली तशी लोकंही पांगली व आम्हीही तिथून निघालो. पण निघायच्या आधी गाईडने आम्हांला ‘Western-hooded Pitta’ दाखवला व मगच आम्ही पुढच्या ठिकाणी जायला निघालो.

img_5184.jpeg

ओरांगउटान

img_5209.jpeg

Western-hooded Pitta

आज आमचा मुक्काम ‘किनाबातांगान’ नदीच्या काठी असणार होता. त्यामुळे आम्ही तिथून निघाल्यावर न थांबता त्या गावात पोचलो. आमची गाडी आजची रात्र इथेच थांबणार होती. आमचं सामान छोट्या होडीत भरलं व आम्ही आमच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. अगदी टळटळीत ऊन होतं पण नशिबाने बोट राईड ८-१० मिनीटांचीच होती. नदीचं पात्र अगदी विस्तीर्ण म्हणता येईल असं होतं आणि लांबवर पसरलेलं दिसत होतं. या नदीत मगरी आहेत तसंच इथे छोट्या उंचीचे हत्तीही (Pygmy Elephants) दिसतात असं कळलं.

आजचा मुक्काम ‘बोर्निओ नेचर लॅाज’ वर असणार होता. होडीतून उतरलो, सामान उतरवलं गेलं. वेलकम ड्रिंक व मस्त गार टॅावेल देऊन मालकाने आमचं स्वागत केलं. परिसर खूपच सुंदर होता. लॅाग केबिन्स होत्या व काही केबिन्सखाली पाणी दिसत होतं. जेवण तयार होतं. छान गरम गरम जेवून आम्हांला अर्ध्या तासात होडीतून पक्षी बघायला निघायचं होतं. निघायच्या आधीच पावसाची जोरदार सर आली. बोटीत जायच्या आधी पावसासाठी पॅांचो घेतला ते बरं झालं.

निघाल्यापासूनच पक्षी दिसायला सुरूवात झाली. एका झाडावर तर इतके सर्पपक्षी/तिरंदाज (Oriental Darter) बसले की त्या झाडाचं नावच Darter Tree ठेवलं. खूप मस्त पक्षी दिसत होते या राईडला. मध्येच पावसाची परत एक सर आली, नशिबाने पॅांचो घेतला होता म्हणून. इथे ‘घोंगी खंड्या (Stork-billed Kingfisher) व नीलकर्ण खंड्या (Blue-eared Kingfisher) ने मस्त दर्शन दिलं. मनासारखे फोटो काढता आले. करड्या डोक्याचा मत्स्यगरूड (Grey-headed Fish Eagle), तुरेवाला सर्पगरूड (Crested Serpent Eagle), वॅालेसचा तुरेबाज गरूड (Wallace’s Hawk Eagle), रातबगळा (Black-crowned Night Heron) व अजून बरेच पक्षी दिसले. इथे अजून दोन प्रकारची माकडं दिसली. लांब शेपटीचं माकड (Long-tailed Macaque किंवा Crab-eating Macaque) पण म्हणतात व लांब नाकाचं माकड (Proboscis Monkey). लांब नाकाच्या माकडातला नर दिसला तेव्हा लाईट इतका कमी झाला होता का बस्स. नराच्या अंगावर अगदी जॅकेट घातलेलं असावं अशी फर असते. अंधार पडता पडता आम्ही परतीला लागलो. एकंदर ही बोट राईड फारच मस्त झाली.

img_5178.jpeg

घोंगी खंड्या (Stork-billed Kingfisher)

img_5179.jpeg

नीलकर्ण खंड्या (Blue-eared Kingfisher)

img_5180.jpeg

लांब नाकाचं माकड (Proboscis Monkey)

img_5212.jpeg

Dollarbird

उद्या सकाळी पण आम्ही ही राईड करून निघणार होतो. लॅाजवर येता येता गाईडने रात्रीची बोट राईड किंवा जंगलात नाईट ट्रेल असे ॲाप्शन दिले. नाईट ट्रेलवर खूप चिखल व डास असतील असं त्याने सांगितल्यावर मी तिथेच काट मारली. रात्रीच्या वेळेस बोट राईडला जायचा पण मूड नव्हता माझा त्यामुळे मुग्धाला पण जाता आलं नाही. केपी आणि शैलेशला नाईट ट्रेलवर जाण्यात रस होता. इतक्या दिवसांत मला आणि मुग्धाला निवांत अशा गप्पा मारता आल्याच नव्हत्या मग आम्ही म्हटलं की आज आपण गप्पा मारूया. गप्पा होताहोताच नाईट ट्रेलला गेलेले दोघंजण आले. आत्तापर्यंतचा हिशोब वगैरे केला. उद्या सकाळची राईड झाल्यावर आम्ही निघणार होतो. आमची दुपारी २.१५ ची परतीची फ्लाईट होती त्याकरिता इथून ९.३० ला निघावं लागणार होतं. बाकी सगळी रोजचीच कामं (चार्जिंग वगैरे) केली. बॅगेतलं सामान नीट अरेंज केलं व दिवस संपवला.

दिवस आठवा :- किनाबातांगान रिव्हर क्रूझ

सकाळी मला वाटतं ६ वाजता परत एकदा रिव्हर क्रूझला निघालो. काल गेलो होतो त्या बाजूला न जाता आज उलट्या दिशेला निघालो. हवा स्वच्छ होती व मुख्य म्हणजे छान उजेड होता. आज बाकी टूरिस्टनां घेऊन आलेल्या होड्या पण दिसत होत्या. पक्षांची ॲक्टिव्हिटी पण सुरू झालेली होती. आज अगदी कमी होता आमच्या हातात. हम्म..काल संध्याकाळी ज्या दिशेला गेलो होतो तिथे एका झाडाला भरपूर फळं लागलेली दिसत होती. तेव्हा विनायक म्हणाला की उद्या सकाळी इथे यायला हवं, पक्षी दिसतील. आज नेमक्या त्याच्या उलट्या दिशेलाच गेलो होतो आम्ही.

या वाटेवर तीन-चार वेगळे पक्षी दिसले, Black & Red Brodbill, White-chested Babbler, Malaysian Blue Flycatcher व Chestnut-breasted Malkoha पण ॲक्टिव्हिटी तशी खूपही नव्हती व मुख्य म्हणजे वेळ नव्हता हातात म्हणून विनायक गाईडला म्हणाला की कालच्या त्या फळं असलेल्या झाडाच्या जवळ जाऊया, तिथे ॲक्टिव्हिटी असेल. गाईडला ही कल्पना फार पसंत नाही पडली. नाईलाजानेच वळलो आम्ही आणि हाय रे कर्मा…..फळं असलेल्या झाडापाशी काहीही ॲक्टिव्हिटी नव्हती. विनायकने सुचवल्यामुळे गाईडचा मूड गेलेला वाटला आम्हांला. काहीही इंटरेस्ट नाहीये त्याला आता असं वाटलं. उरलेला वेळ फुकटच गेला कारण काल ज्या ठिकाणी आम्हांला खूप पक्षी बघायला मिळाले तिथे आज शांतता होती. नाही म्हणायला या नदीत मगरी असतात असं कळलं होतं तर. दोन मगरी नदीकडेला दिसल्या.

img_5213.jpeg

Black & Red Broadbill

८.३० ला लॅाजवर परतलो. अंघोळी वगैरे उरकून ९.३० ला निघायचं होतं. त्याप्रमाणे निघालो. इथून निघताना सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. किनाबालू पार्क, किनाबातांगान नदी व रेनफॅारेस्ट डिस्कव्हरी सेंटरला परत भेट देण्याइतपत पोटेंशिअल आहे त्यात. बघूया असेल नशिबात तर परत जायला नक्कीच आवडेल. वेळेत निघालो त्यामुळे एअरपोर्टवर वेळेत पोचलो व अशा रितीने आमच्या बोर्निओ पक्षीनिरीक्षण ट्रीपची सांगता झाली.

img_5214.jpeg

टीप:- फोटोंची क्वालिटी फार काही चांगली नाहीये (कोलंबिया ट्रीपच्या तुलनेत) याची कल्पना आहे तरी गोड मानून घ्या.

कलाकृती: 

वर
0 users have voted.