उपवासाबद्दल सांगण्याआधी ते का करावेसे वाटले ह्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. होपफुली कुणाला तरी ह्या अनुभवातुन 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ' ह्या उक्तीप्रमाणे फायदा होईल.
मला पीसीओएस हा विकार आहे आणि माझ्या मोठ्या मुलाचा जन्म असिस्टेड रिप्रोडक्शन मुळे शक्य झाला. मी कॉलेजमध्ये असताना माझे वजन ५९- ६० किलो होत जे माझ्या उंची साठी योग्य वजन आहे (बीएमआय २३). पुढे अमेरिकेत शिकायला गेल्यापासून ते वाढायला लागले आणि ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर मी प्रयत्न पुर्वक ते कमी करुन ७० वर आणले आणि पुढची अनेक वर्षे ते ७० किलोच्या जवळपास ठेवले. पीसीओएस आणि दोन्ही प्रेग्नंसीमध्ये जेस्टेशनल डायबिटीस असल्याने मला डायबिटीस आणि पुढे त्यातुन होणारे कॉम्प्लिकेशन्स ह्याची शक्यता खुप जास्त आहे हे मला गेली १५ वर्षे माहिती आहे. त्यामुळे वजन ७० किलो ला स्थिर ठेवणे, वेळेवर रक्तचाचण्या करणे, आहार - विहाराची शिस्त पाळणे हे मी काटेकोर पणे करायचे. पण कोविड आउटब्रेक, त्याच सुमारास पीएचडी संशोधनात सातत्याने आलेल्या अडचणी ह्यामुळे माझी गाडी घसरणीला लागली. तिथुन पुढची ५ वर्षे घसरणच सुरू होती. कडेलोट २०२५ च्या सुरवातीला झाला.
जुन २०२४ ते जानेवारी २०२५ ह्या काळात मी ४ प्रिय व्यक्ती एकापाठोपाठ एक गमावल्या. त्याच दरम्यान बॉस च्या अतिशय अनप्रोफेशनल वागण्याला खरंतर हरासमेंटला कंटाळून नोकरीचा राजीनामा दिला आणि चक्क काहिच न करता घरी बसले. प्रचंड डिप्रेस होते. त्यामुळे जीवनशैलीतील शिस्त पुर्णपणे मोडकळीस आली होती. ज्या गोष्टी करु नका म्हणून तज्ञ सांगतात (मी ही इतरांना सांगते) त्या सगळ्या गोष्टी मी त्या काळात केल्या. परिणामी अर्थातच इन्सुलिन रेझिस्टंस, इन्फ्लेशन, बॉडी फॅट आणि वजन प्रचंड वाढले. आकडे सांगणे मला खूप कठीण जातेय पण सांगायलाच हवेत. ऍट माय लोएस्ट मी तब्बल १४ किलो वजन आणि १५% बॉडी फॅट वाढवुन घेतले होते. आहारशास्त्राचा अभ्यास करुनही मी स्वतःला इतके घसरु दिले हे माझ्यासाठी अतर्क्य आणि अतिशय लाजिरवाणे आहे.
वार्षिक चाचण्यांमध्ये हे वर दिलेले आकडे बघणे हा वेक अप कॉल होता. इथे जर परिस्थितीवर नियंत्रण मिळवले नाही तर पुढे काय काय होइल ते माहिती होते. त्यामुळे फायनली मी ऍक्शन मोड मध्ये आले. पहिला टप्पा होता इन्फ्लमेशन आणि इन्सुलिन रेझिस्टंस आटोक्यात आणणे. त्यासाठी माझ्या मते इंटरमिटंट फास्टिंग इतका चांगला उपाय दुसरा नाही विशेषतः चाळीशी पार केलेल्या भारतीय व्यक्ती साठी. तुम्ही नेट वर शोधले तर तुम्हाला ढोबळमानाने खालील टाइम लाइन मिळेल.
जेवणानंतर:
०-४/५ तास अन्नातून मिळालेली साखर रक्तात मिसळली जाते परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
५ - ८ तासांत रक्तातील साखरेच पुर्ववत होते.
१२ - १६ तासांत लिव्हर मध्ये साठवलेली साखर (ग्लायकोजेन) ही वापरुन संपते आणि शरीर इंधन म्हणून साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करते.
२४+ तास: पेशींमधील कचरा निर्मूलन प्रक्रिया (autophagy) कार्यान्वित होते.
४८ - ५६ तास: ग्रोथ हॉर्मोन ची पातळी वाढते.
५६ - ७२ तास: इन्सुलिन सेन्सिटिव्हिटि वाढते.
७२ तास पुर्ण: इम्युन पेशींचे पुनर्निर्माण होते ज्यामुळे प्रामुख्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
पण हे टप्पे ढोबळ आहेत. तुमच्या चयापचयाची सद्य स्थिती म्हणजे त्यात झालेल्या बिघाडाचे प्रमाण आणि तुमची जीवनशैली (आहार, विहार, मानसिक ताण आणि झोप) ह्यांच्या प्रभावामुळे शरीरात कुठला टप्पा कधी गाठला जाईल हे ठरते. वारंवार रक्त चाचण्या करण्याचा आणि त्याद्वारे माझ्या शरीरावर किती तासांच्या उपवासाचा काय परिणाम होतो ते समजुन घेण्याचा पर्याय मला उपलब्ध नसल्याने शरीरात होणारे बाह्य बदल नोंदवुन हळुहळु उपवासाचा कालावधी वाढवण्याचे मी ठरवले. नक्की किती तासांचा उपवास माझ्या शरीरात काही मिनिंगफुल बदल घडवून आणेल हे मला शोधायचे होते. एकाच वेळी मी सब्जेक्ट आणि मीच रिसर्चर दोन्ही होते. त्यामुळे प्रत्येक बदलाची अगदी काळजीपूर्वक नोंद ठेवली. हे करताना लक्ष वजनावर केंद्रीत होऊ नये म्हणून वजन महिन्यात फक्त एकदाच करायचे हा नियम घालून घेतला. १ एप्रिल पासून १४ तासांच्या उपवासाला सुरुवात केली. शरीराचे म्हणणे ऐकत हळुहळु उपवासाचा कालावधी वाढवत २० तासांपर्यंत आणला. आठवड्यातून एकदा २४ तासांचा उपवास करायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्याची शरीराला पुरेशी सवय झाली असे वाटले तेव्हा थेराप्युटिक फास्टिंग म्हणजे ३०+ तासांच्या उपवासाला महिन्यातुन एकदा सुरुवात केली. ज्यातील सध्याचा उच्चांक ४० तासांचा आहे. उपवास करताना तो करणे जास्तीत जास्त सोपे जाईल ह्या दृष्टीने आहारात बदल केले (फोकस वजन कमी करणे हा नव्हता). १ एप्रिल पासून आजपर्यंत दिवसाचे जे टार्गेट असेल ते पुर्ण केल्याशिवाय उपवास सोडला नाही. अगदी कुठेही असले (विमान प्रवासात असले) तरीसुद्धा.
१ एप्रिल २०२५ ते १ जानेवारी २०२६ मध्ये केलेल्या उपवासाने मला माझ्यात खालील बदल दिसले.
(१) वेदना मुक्ती: कणकण (malaise) आणि अंगदुखी हे इन्फ्लमेशनमुळे होते. जसजसे ते कमी झाले तशी एनर्जी लेव्हल वाढली. अनेक वर्षात पहिल्यांदाच मी काहिही दुखत नाही अशी शारीरिक स्थिती अनुभवली. मध्यंतरी फार त्रासदायक वाटणारी टाच दुखी (planter fascitis) पुर्णपणे गेली. मिनीमलीस्ट शुज वापरुन मी आता दिवसांत एकुण २ ते २.५ तास चालते आणि एरवी वावरताना चप्पल घालून चालु शकते, जे पुर्वी मला शक्य नव्हते.
(२) सुज: तळपाय (बोटांपासुन घोट्यापर्यंत चा भाग) आणि डोळे (पापणीचे केस जिथुन सुरू होतात त्या डोळ्यांच्या कडा) ह्या दोन्ही भागातील सुज कमी झाली.
(३) कमरेचा घेर आणि पोटाचा आकार: कमरेच्या घेराबद्दल सगळ्यांना माहीती असतेच. पोटाचा आकार जितका जास्त बहिर्गोल (convex) तितके लिव्हर च्या भोवती असलेले हानिकारक फॅट (visceral fat) चे प्रमाण जास्त. माझे पोट पुर्ण सपाट झाले नाही पण त्याचा फुगीरपणा लक्षणीयरीत्या कमी झाला.
(४) त्वचा: विशेषतः चेहऱ्याची त्वचेवर कुणीतरी खोडरबर घेऊन नको असलेल्या गोष्टी खोडुन काढाव्यात तसा चेहऱ्याच्या त्वचेचा पोत बदलला. ब्राऊन स्पॉट गेले, पोअर्स श्रिंक झाले, डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि फुगीरपणा (पफीनेस) गेला आणि पिंपल्स येणे बंद झाले अगदी पाळीच्या आसपास देखील आता पिंपल्स येत नाहीत.
(५) झोप: झोप नीट न लागणे ही माझी अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. उपवास नियमित करायला सुरुवात केल्यानंतर मात्र झोपेची गुणवत्ता कमालीची सुधारली. आता मी अंथरुणावर पडल्यापासून ५-१० मिनिटांत झोपु शकते आणि सकाळी उठल्यावर मला कमालीचे फ्रेश वाटते.
(५) ब्रेन क्लॅरिटी आणि फोकस: हा जो फायदा आहे ना ह्याच वर्णन करणे अशक्य आहे इतका प्रचंड आहे. मध्यंतरी मेनोपॉझ संदर्भात ब्रेन फॉग ची चर्चा वाचली होती मी मैत्रीण वर. तिथे कुणीतरी म्हंटले होते की एच आर टी सुरू केल्यानंतर जी क्लॅरिटी आणि फोकस मिळाला त्याला तोड नाही. मला ते वाचून वाटले की मी अक्षरशः तीच स्थिती अनुभवते आहे.
(६) वजन आणि बॉडि फॅट %: वजन कमी करणे हा उपवासाचा उद्देश नव्हता. म्हणजे निव्वळ उपवासाने ते कमी होईल असे मला वाटले नव्हते. सुरवातीला म्हणजे १७+ तासांचा पल्ला गाठेपर्यंत वजनात काही फरक दिसला नाही. पण त्यानंतर मात्र फरक दिसायला लागला. एकुण ५ महिन्यात ८ किलो वजन कमी झाले. नुकत्याच केलेल्या वार्षिक चाचणीत बॉडी फॅट ५% नी कमी झाल्याचे दिसले.
तर अशी माझी आतापर्यंतची प्रगती. मी सुरवात केली तेव्हा इन्सुलिन रेझिस्टंस आणि इन्फ्लमेशन कमी करुन, एनर्जी लेव्हल वाढवायची आणि ती वाढल्यानंतर वजन आणि इतर बाबींवर लक्ष द्यायचे असे मी ठरवले होते. पण माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आणि खुप लवकर रिझल्टस मला मिळाले. म्हणून हे इथे शेअर करते आहे. कुणाला प्रयोग करायचे असतील तर हळुहळु आणि संथ गतीने सुरू करा आणि २४+ तासांच्या उपवासाआधी डॉ कडुन ग्रीन सिग्नल घ्या असे सुचविन.
