तर, सोमवारची संध्याकाळ. दिवसभराच्या ऑफिसच्या कामाचा, ताणाचा क्षीण अंगात पसरलेला. काहीशा विष्ण्ण मनस्थितीतच टीव्ही चालु केला. घरात अंधार, मनात अंधार, विविध कारणांमुळे. प्राइमवर मनोज वाजपेयी दिसला. टायटल न वाचता, चित्रपट आहे का सिरीज आहे काही न बघता चालु केला. मनोज वाजपेयी असेल ते सर्व काही बिनधोक बघावे हा नेहमीचाच विचार.
सुरुवातीची पाच मिनिटं सरळ स्कीप केला. तेच ते, इंट्रो म्युझिक, टायटल्स वगैरे. चालु केला थेट शेकोटी सीनपासुन. सगळे कुटुंब शेकोटीभोवती बसलंय, आईला गाण्याचा आग्रह होतो, ती काहीतरी छान गाते. चला, फॅमिली ड्रामा वाटतोय, बघुया. सुंदरसं घर, अगदी विंटेज, सभोवताली जंगल, झाडी, बागायती. सकाळ होते. मनोज बागायतीचा मालक आहे. भली मोठी इस्टेट, हजारो एकर वगैरे. साहजिकच ती सांभाळायला , कामं करायला गावातली माणसं, बाया, मॅनेजर वगैरे आलेच. खुप ऑथेंटीक आहे हे सगळं. मनोज साहेबी थाटात न फिरता, गावातल्यांपेक्षा जरा बरे पण मळकट शर्ट घालुन फिरतो. गावातली लोक सगळी फारच निरागस, साधी , खरीखुरी वाटतात. मेकअप केलेली पात्रं नव्हेत. मनोजची फॅमिली इंग्रजीतच संवाद करते एकमेकांशी. बायको म्हणुन आहे ती कड्डक मड्ड्म वाटते. फारच रोखुन बघते काहीकाही सीन्समध्ये. मुलगी छान आहे, तिची घोडसवारी तर मस्तंच. छोटा भाऊ झिपरे केस घेऊन इथेतिथे वावरलाय. त्याचा एक गुढ सीन आहे तो काही मला अजुनही कळलेला नाही. घाबरु नका, स्पॉयलर्स देत नाही. कारण नावही न वाचता आणि पहिले सीन्स स्कीप केल्यामुळे मी जो पिक्चर पाहिला तो मला वेगळाच उमगला. काय चाल्लंय, काय झालंय हे कळायला मलाही पार पिक्चर संपल्यावर गुगल करावे लागले की प्लीज एक्सप्लेन 'जुग्नुमा'.
तर, त्यामुळेच 'जुग्नुमा' हा माझ्यासाठी खास अनुभव ठरला. जसे जसे सीन्स समोर येत गेले मी मनात एक कथा बांधु लागले जी पुर्णपणे माझी कल्पनाशक्ती होती, माझे अंदाज होते. बरेचसे सीन्स हे अंधारी, विंटेज, गुढ आहेत, जे मला पार लहानपणापासुन ऐकलेल्या अद्भुत कथाविश्वात घेऊन गेले. मध्येच खुप स्लो आणि रटाळ वाटला चित्रपट ( हे कदाचीत सोमवार असल्यामुळे असेल. मिटींग्स आणि ताणतणाव). मग एक डुलकीच काढली. २० एक मिनिटांनी उठुन परत रिवाइंड केले तेव्हा नाव नीट वाचले.
हिमालयाचे दर्शन होते बर्याच सीन्समध्ये. खुप सुंदर चित्रीकरण आहे. नंतर गुगल केल्यावर कळाले की काहीतरी वेगळाच १६ की ७० एमेम कॅमेरा लेन्स का काय वापरलंय. मध्येच तिलोत्तमाचा एक सीन आहे. तिचे काम नेहमीप्रमाणेच क्लास आहे. पुर्णवेळ (डुलकी सोडुन) लहान मुलांसारखी उत्सुकता, उत्कंठा, भिती असं कायकाय वाटत राह्तं. डोकं कामाला लागतं की काय चालु असावं, काय होणार आहे. आपण अंदाज बांधत राहतो. माझ्याबाबतीत म्हणायचं तर माझी मरगळ, वैताग सगळं मी त्या २.३० तासात (माझ्ही डुलकी धरुन) विसरले. खुप दिवसांनी एक वेगळाच सिनेमा पाहिल्यासारखं वाटलं. आठवडा होत आला तरी सिनेमा डोक्यातुन गेलेला नाही अजुन.
लिहिण्याचा खटाटोप याचसाठी की लाँग विकेंड आहे अमेरीकेत , कुणी उगीच्च रिमोट पकडुन स्क्रोल करत असाल तर बिन्धास्त 'जुग्नुमा' वर क्लीक करा. लिहीते अजुन थोड्यावेळाने.
