आज फ्रीजमध्ये अगदी पाव वाटी खवलेला नारळ उरला होता, त्याला मार्ग दाखवायचा म्हणून रिल्समध्ये दिसलेली वाटपाची डाळ आठवली. आमच्याकडे अशी डाळ कधीच करत नाहीत म्हणून वाईच insta खंगाळलां!
साहित्य:
कुकर साहित्य:
तूरडाळ: १ वाटी
मध्यम कांदा: अर्धा चिरून
मध्यम टोमॅटो: १ चिरून (कैरीच्या सीझनमध्ये टोमॅटो अर्धा आणि दोन तुकडे कैरी)
दोन हिरव्या मिरच्या: उभ्या चिरून (तिखट प्रेमींनी जास्त म्हणजे तीन चार घ्या)
अर्धा चमचा हळद
थोडे मीठ
वाटप साहित्य:
खवलेला ओला नारळ: पाव वाटी
चिरलेला अर्धा कांदा,
दोन दाणे काळीमिरी
चमचाभर धने
फोडणीसाठी:
तेल/तूप
मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता
कृती:
१. डाळ व्यवस्थित धुवून, दहा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.
२. हे वरचं सगळं कुकर साहित्य डाळीत पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.
३. मिक्सरमध्ये पाव वाटी खवलेला ओला नारळ, अर्धा कांदा, दोन दाणे काळीमिरी आणि चमचाभर धने घालून वाटप तयार करा.
४. शिजलेली डाळ एका कढईत/पातेल्यात काढा. त्यात वाटप आणि तुम्हाला डाळ किती पातळ हवी त्यानुसार पाणी घालून उकळी आणा.
४. तडका पॅन मध्ये तेल/तूप घालून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता अशी फोडणी करून ती डाळीवर ओता. मीठ चेक करून पुन्हा थोडं घाला. नीट ढवळा.
वाढताना वरून कोथिंबीर शिवरा. हवी असल्यास वाटपात लसूण घालू शकता. पण ही गोडी डाळ आहे यात शक्यतो कांदा लसूण घालत नाहीत.
वाटप: घट्ट वाटलेले पदार्थ
वाटण: सरसरीत पातळ वाटलेले पदार्थ
डाळ छान झाली आणि सगळ्यांना आवडली. तुम्ही करून बघा!

