वैदिक किंवा सनातन वाङमय म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ नसून संपूर्ण संस्कृतीचा 'Encyclopedia' आहेत. ज्यात भाषेपासून (व्याकरण) ते अंतराळापर्यंत (ज्योतिष) आणि आरोग्यापासून (आयुर्वेद) ते मनाच्या गाभ्यापर्यंत (उपनिषदे/दर्शने) सर्व विषयांचा ऊहापोह आहे. ढोबळ मानाने वैदिक वाङमयाचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
श्रुती साहित्य: ह्यात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ह्या चार वेदांचा समावेश होतो.
स्मृती आणि इतर पुरक साहित्य: ह्यातील मुख्य घटक खालीलप्रमाणे
वेदांगे आणि षड्दर्शने: अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर वेदांगे म्हणजे वेदांना समजुन घेण्याची साधने आणि दर्शने म्हणजे सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले विविध प्रकारचे तर्कशुद्ध प्रयत्न.
उपवेद: प्रत्येक वेदाशी संबंधित एक उपयोजित विज्ञान (Applied Science) आहे.
ऋग्वेद — आयुर्वेद (आरोग्यशास्त्र)
यजुर्वेद — धनुर्वेद (युद्धकला/संरक्षण)
सामवेद — गंधर्ववेद (संगीत आणि कला)
अथर्ववेद — शिल्पवेद/स्थापत्य (अभियांत्रिकी आणि वास्तुकला) किंवा अर्थशास्त्र.
इतिहास: रामायण आणि महाभारत. रामायण आणि महाभारत हे काव्य रुपात असले तरी वैदिक साहित्यामध्ये त्यांचे वर्णन इतिहास म्हणुन केले गेले आहे.
पुराणे: १८ महापुराणे, जी वेदांमधील कठीण तत्वज्ञान सामान्य माणसाला गोष्टींच्या स्वरूपात समजावून सांगतात.
स्मृती ग्रंथ: उदाहरणार्थ मनुस्मृती, पराशर स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी, ज्यात सामाजिक नियमावली आहेत.
माझ्या दृष्टीने ह्यातील सगळ्यात महत्त्वाचे आहेत वेद, वेदांगे आणि दर्शने. त्यांच्या बद्दल थोडे विस्ताराने सांगते.
वेद
विद् (जाणणे) या धातु पासुन वेद हा शब्द विकसित झाला आहे. ढोबळ मानाने वेद म्हणजे ज्ञानाचा मुळ स्त्रोत असा अर्थ काढता येईल. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत हे सगळ्यांना माहीत असतेच. ह्यातील प्रत्येक वेदाचे चार भाग आहेत संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे जे मानवी जीवनाच्या चार टप्प्यांशी (आश्रमांशी) आणि वैचारिक प्रगल्भतेशी जोडलेले आहेत.
संहिता
संहिता म्हणजे वेदांचा सगळ्यात प्राचीन आणि मुळ भाग. ऋग्वेद आणि सामवेद संहिता ह्या संपूर्णपणे पद्य रचना आहेत. तर यजुर्वेद यज्ञाचे मंत्र आणि अथर्ववेदातील बहुतांश भाग पद्य आहे.
संहितांचे पठण करुन त्या आत्मसात करणे हा वेद शिक्षणाचा पहिला टप्पा आहे जो ब्रह्मचर्याश्रमाशी संबंधित आहे. अर्थातच गुरुकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठांतर आणि उच्चारशुद्धीवर भर दिला जातो.
वेदांचे ज्ञान हजारो वर्षे कोणताही बदल न होता टिकून राहण्यामागे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित केलेल्या पाठांतर पद्धती आहेत. छापील पुस्तके किंवा रेकॉर्डिंग नसतानाही, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वेद पोहोचवताना त्यात एक स्वल्पविराम किंवा अनुस्वारही बदलू नये, यासाठी ही अद्भूत 'एरर-करेक्शन' (Error Correction) सिस्टीम विकसित करण्यात आली होती. वेद पठणाच्या मुख्य दोन पद्धती आहेत: प्रकृती पाठ आणि विकृती पाठ.
प्रकृती पाठ (पाया), हे साधे पठण असते, ज्याचे तीन प्रकार आहेत:
संहिता पाठ: मंत्र जसा आहे तसा सलग म्हणणे.
पद पाठ: मंत्रातील प्रत्येक शब्द (पद) फोडून, संधी विलग करून म्हणणे.
क्रम पाठ: शब्दांच्या जोड्या करून म्हणणे (उदा. १-२, २-३, ३-४...).
विकृती पाठ (Advanced Methods)
जेव्हा मंत्रांतील शब्द क्रमाने उलट-पालट करून पठण केले जातात, त्या पद्धतीला 'विकृती' म्हणतात. अशा ८ विकृती आहेत:
जटा माला शिखा रेखा ध्वजो दण्डो रथो घनः |
अष्टौ विकृतयः प्रोक्ताः क्रमपूर्वा महर्षिभिः ||
अर्थ: जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दण्ड, रथ आणि घन ह्या 'आठ' विकृती सांगितल्या गेल्या आहेत. या सर्व विकृतींचा पाया 'क्रम पाठ' हा आहे. म्हणजेच, ज्याला १-२, २-३ असा 'क्रम' येतो, त्यालाच या पुढच्या विकृती साधता येतात. हे सर्व नियम (प्राचीन) महान ऋषींनी रचले आहेत.
यात 'घन' हा सर्वात कठीण आणि सर्वोच्च पाठ मानला जातो.
'घन' या शब्दाचा अर्थ होतो 'ठोस' किंवा 'भक्कम'. घनपाठ करणाऱ्या व्यक्तीला 'घनपाठी' म्हणतात. यात शब्दांची गुंफण इतकी क्लिष्ट असते की, त्यात चूक होण्याची शक्यता शून्य असते.
घनपाठाचे सूत्र (Pattern): समजा एका मंत्रातील शब्द १, २, ३ असे आहेत, तर त्यांचा क्रम असा असतो:
१-२, २-१, १-२-३, ३-२-१, १-२-३
२-३, ३-२, २-३-४, ४-३-२, २-३-४
म्हणजेच, प्रत्येक शब्द मागे-पुढे करून, जोड्या लावून आणि उलट क्रमाने अनेकदा उच्चारला जातो.
घनपाठाचे फायदे:
अक्षय शुद्धता: शब्दांचा क्रम इतक्या वेळा बदलला जातो की, एखादा शब्द विसरणे किंवा बदलणे अशक्य होते.
स्वर रक्षण: वेदांमध्ये 'उदात्त, अनुदात्त आणि स्वरित' या स्वरांना खूप महत्त्व आहे. घनपाठामुळे या स्वरांचे अचूक रक्षण होते. अर्थातच हा पाठ करण्यासाठी प्रचंड एकाग्रता आणि स्मरणशक्ती लागते.
आजचे 'कॉम्प्युटर सायन्स' ज्याला 'Checksum' किंवा 'Hashing' म्हणतात (डेटा ट्रान्सफर करताना तो बदलला नाहीये ना हे तपासण्याची पद्धत), त्याचेच हे मानवी मेंदूवर आधारित रूप आहे. संशोधनानुसार, जे घनपाठी असतात, त्यांच्या मेंदूतील 'Gray Matter' आणि 'Hippocampus' (स्मरणशक्तीशी संबंधित भाग) इतरांच्या तुलनेत अधिक विकसित असतो, ज्याला 'The Sanskrit Effect' असेही म्हटले जाते. (संदर्भ: Dr. James Hartzell ह्यांचे संशोधन). मी हा संदर्भ शोधला कारण वेदांचा आवाका लक्षात घेता एवढे सगळे मानवी मेंदुत रिटेन होणे शक्य आहे का, असा प्रामाणिक प्रश्न मला पडला होता. ह्या संशोधनामुळे माझी स्वतःची खात्री पटली की पिढ्यानपिढ्यांचा प्रवास करून जे काही “वेद” म्हणून आपल्या पर्यंत आज पोहचले आहे ते मुळ स्वरुपात आहे. पठण पद्धती समजुन घेतल्यानंतर आपण ह्या मंत्रांच्या विनियोगाकडे वळु.
ब्राह्मण ग्रंथ
संहितेतील मंत्रांचा वापर कसा करायचा, हे सांगणारे ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ.
स्वरूप: हे गद्य (Prose) स्वरूपात आहेत. यात यज्ञांच्या विधींचे सविस्तर वर्णन, त्यामागच्या कथा आणि नियम दिले आहेत. (उदा. ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण).
हेतू: कर्मकांडांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणे.
जीवनशैली: हा भाग गृहस्थाश्रमासाठी आहे, जिथे माणूस सामाजिक आणि धार्मिक कर्तव्ये (यज्ञ-याग) पार पाडतो. गृहस्थाश्रमातील कर्तव्ये पार पाडल्यानंतर कर्मकांडात गुंतुन न पडता त्यातील गाभा समजुन घेणे अपेक्षित आहे त्यासाठी आरण्यक ग्रंथ मदत करतात.
आरण्यक ग्रंथ
'अरण्य' म्हणजे जंगल. जे ग्रंथ अरण्यात जाऊन शांत चित्ताने अभ्यासायचे असतात, ते आरण्यक.
स्वरूप: यात बाह्य कर्मकांडांपेक्षा 'प्रतिकात्मक' यज्ञांवर आणि उपासनेवर भर दिला आहे. यज्ञाच्या विधींमागील गुड अर्थ शोधण्याचा प्रयत्न येथे सुरू होतो.
हेतू: कर्मकांडाकडून हळूहळू तत्वज्ञानाकडे जाण्याचा हा प्रवास आहे.
जीवनशैली: हे वानप्रस्थाश्रमाशी सुसंगत आहे, जिथे माणूस संसारातून निवृत्त होऊन चिंतनाकडे वळतो.
उपनिषदे
याला 'वेदांत' (वेदांचा अंत किंवा अंतिम सिद्धांत) असेही म्हणतात.
स्वरूप: हे पूर्णतः तत्वज्ञानात्मक आहेत. यात गुरु-शिष्य संवादामधून 'ब्रह्म', 'आत्मा', 'सृष्टी' आणि 'मोक्ष' यावर सखोल चर्चा केली आहे. एकुण १०८ उपनिषदे आहेत पण त्यातील १० ते १२ उपनिषदांना 'मुख्य' मानले जाते कारण त्यावर आद्य शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे.
हेतू: अंतिम सत्याचा शोध घेणे आणि अज्ञान (Avidya) दूर करून विद्या (Vidya) प्राप्त करणे.
जीवनशैली: हा संन्यासाश्रमाचा पाया आहे, जिथे केवळ ज्ञानप्राप्ती हेच ध्येय असते.
वेदांगे
वेदांची भाषा आणि त्यातील गर्भित अर्थ समजून घेण्यासाठी सहा 'वेदांगे' अत्यंत महत्त्वाची मानली जातात. यांना वेदांचे 'अवयव' म्हटले जाते.
शिक्षा (Phonetics): उच्चारशास्त्र. मंत्रांचा उच्चार अचूक कसा असावा, याचे शास्त्र.
कल्प (Rituals): यज्ञ आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडण्याचे नियम (उदा. श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे).
व्याकरण (Grammar): भाषेची शुद्धता टिकवण्यासाठी (पाणिनीचे 'अष्टाध्यायी' हे याचे उत्तम उदाहरण).
निरुक्त (Etymology): शब्दांची उत्पत्ती आणि अर्थांचे स्पष्टीकरण.
छंद (Metrics): काव्याची रचना आणि लयबद्धता.
ज्योतिष (Astronomy/Astrology): यज्ञ आणि महत्त्वाच्या कार्यांसाठी योग्य काळ (वेळ) ठरवण्याचे शास्त्र.
दर्शने
दर्शन म्हणजे मानवी बुद्धीने सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले विविध प्रकारचे तर्कशुद्ध प्रयत्न आहेत. एकुण नऊ दर्शने
आहेत आणि त्यांचे वर्गीकरण दोन मुख्य गटांत केले जाते: आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन.
आस्तिक दर्शने
येथे 'आस्तिक' म्हणजे देवाला मानणारे नव्हे, तर 'वेदांचे प्रामाण्य' मानणारे. ही सहा आहेत—सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत. वेदांमधील तत्वांचे तर्कशुद्ध विश्लेषण करण्यासाठी ही दर्शने विकसित झाली.
नास्तिक दर्शने
जी वेदांचे प्रामाण्य मानत नाहीत. यात लोकायत (जडवाद किंवा भौतिकवाद सांगणारे दर्शन ज्याला अनुसरून चार्वाकाने कर्ज काढून तुप खाण्याचा सल्ला दिला आहे), बौद्ध आणि जैन या तीन दर्शनांचा समावेश होतो.
प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत, ज्याला आपण 'प्राथमिक किंवा पायाभूत शिक्षण' म्हणू शकतो, त्यामध्ये वेद संहितांचे पाठांतर आणि वेदांगांचा प्राथमिक अभ्यास हे अनिवार्य घटक होते. यालाच 'स्वाध्याय' असेही म्हटले जाई. गायत्री मंत्रापासून सुरुवात करून, स्वतःच्या शाखेच्या वेदाचे पठण आणि दैनंदिन विधींसाठी लागणारे 'कल्प' (वेदांग) शिकणे हा किमान अभ्यासाचा भाग होता. ज्याला आपण आज 'Well-educated' म्हणतो, त्याला तेव्हा 'बहुश्रुत' (ज्याने खूप ऐकले आणि आत्मसात केले आहे असा) म्हटले जाई. ज्याने किमान वेदांगे आणि संहितांचा अभ्यास केला आहे, तोच समाजात जबाबदार नागरिक किंवा 'विद्वान' म्हणून वावरण्यास पात्र ठरत असे.
वैदिक साहित्याचा आवाका किती आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल. माझे ह्या विषयावरचे वाचन अतिशय मर्यादित आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा विस्तृत आढावा घेण्यास मी असमर्थ आहे. पुढील काही भागात मी ‘जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ’ म्हणून ओळखला जाणाऱ्या ऋग्वेदाचा परिचय करून देणार आहे.
