ऋग्वेद म्हणजे जगातील आजच्या घडीला उपलब्ध असणारे सर्वात प्राचीन पुस्तक. ‘काय आहे ह्या पुस्तकात?’ असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर आहे कविता! अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर ऋग्वेद म्हणजे अनेक कविता संग्रहांचे संकलन आहे. वेगवेगळ्या कविंनी वेगवेगळ्या वेळी केलेल्या कविता असलेल्या पुस्तकांचा एकत्रित संच! ह्यातील प्रत्येक पुस्तकाला मंडल अशी संज्ञा आहे. आता हे संकलित वाङमय आहे म्हणजे त्याचे संपादन करणारी कुणितरी व्यक्ती असणार हे ओघाने आलेच. तर असे कितीतरी संपादक होऊन गेले ज्यांनी आपापल्या मतानुसार कविता आणि त्या पठण करण्याच्या पद्धतीनुसार ऋग्वेदाचे संपादन केले. प्रत्येक संपादित आवृत्तीला ऋग्वेदाची एक शाखा म्हंटले गेले.
ऋग्वेदाच्या एकुण २१ शाखा आहेत असा उल्लेख पतंजली ऋषींच्या महाभाष्यात सापडतो. दुर्दैवाने त्यातील १६ संपादकांचे नाव देखील आज आपल्याला माहीत नाही. ज्या पाच संपादकांचे नाव आपल्याला ज्ञात आहे ते आहेत, शाकल्य, बाष्कल, अश्वलायन, शांखायन (+ कुषितक) आणि मांडुक्य. ह्या पाच पैकी केवळ शाकल शाखा ही आज आपल्याला पुर्णपणे उपलब्ध असलेली एकमेव शाखा आहे. शाकल्य ऋषिंनी संपादित केलेल्या ऋग्वेदात एकुण १० पुस्तके म्हणजे मंडले आहेत. ह्या दहा मंडलात एकुण १०१७ सुक्ते आणि १०५५२ ऋचा आहेत. पहिले आणि दहावे मंडल सगळ्यात मोठे असुन त्यात प्रत्येकी १९१ सुक्ते आहेत. ह्या शाखेचा पदपाठ शाकल्य ऋषींनी तयार केला. बाकीच्या शाखांमध्ये केवळ पदपाठच भिन्न होते की ऋचा आणि सुक्तेही ते कळायला अर्थातच मार्ग नाही.
ऋग्वेदातील कवितांना सुक्त (सु + उक्त म्हणजे well said ह्या अर्थाने) म्हंटले गेले आणि कवितेतील कडव्यांना ऋचा. मुळ धातु ऋच् (स्तुती करणे) पासुन ऋचा हा शब्द तयार झाला. व्याख्या द्यायची झाल्यास "ऋच्यते स्तूयते अनया इति ऋक्” म्हणजे जिच्या द्वारे (देवतांची) स्तुती केली जाते, ती म्हणजे 'ऋक्' किंवा 'ऋचा'. काव्य म्हंटले की छंदोबद्ध (वृत्तबद्ध) रचना हे ओघाने आलेच. ऋग्वेदातील सुक्ते अनेक छंदात असली तरी त्यातील सात छंद (गायत्री, उष्णिह, अनुष्टुभ, त्रिष्टुभ, बृहती, पंक्ती आणि जगती) अत्यंत महत्त्वाचे आहेत. छंदांची ओळख त्यांच्यातील अक्षरसंख्येवरून आणि चरणांच्या विभागणी वरुन ठरते. उदाहरणार्थ ऋग्वेदात सगळ्यात जास्त वापरला गेलेला छंद आहे गायत्री छंद ज्यातील एकुण अक्षर संख्या आहे २४ जी ८-८-८ अशा तीन चरणात विभागली जाते. बऱ्याच जणांच्या नित्यपठणात असणारा गायत्री मंत्र हा सवितृ (सूर्य) देवतेची स्तुती करणारा गायत्री छंदातील मंत्र आहे ज्यात ८ अक्षरांचे ३ चरण आहेत.(तत्सवितुर्वरेण्यं (८) | भर्गो देवस्य धीमहि (८) | धियो यो नः प्रचोदयात् (८) ||) त्या अनुषंगाने त्याला खरेतर सावित्री मंत्र म्हणायला हवे.
परंपरेनुसार, विशिष्ट छंद विशिष्ट देवतेशी जोडला गेला आहे, उदाहरणार्थ गायत्री: अग्नी, त्रिष्टुप: इंद्र, जगती: विश्वेदेव, इत्यादी. पूर्वसुरींनी छंदांवर इतके तपशीलवार काम करून ठेवलेले असल्याने नंतरच्या विद्यार्थ्यांना छंदाचा अभ्यास करणे अनिवार्य होते. त्यामुळेच छंदशास्त्र हे वेदांगातील एक प्रमुख अंग आहे, ज्याला वेदांचे पाय मानले जाते (छन्दः पादौ तु वेदस्य).
ऋग्वेदातील भाषेला, 'आर्ष संस्कृत' किंवा 'वैदिक संस्कृत' म्हणून ओळखले जाते, ती लौकिक संस्कृतपेक्षा (जिच्या व्याकरणाचे नियम पाणिनी ने तयार केले) प्राचीन आणि वेगळी आहे. 'आर्ष' म्हणजे 'ऋषींची' किंवा 'ऋषींकडून आलेली'. आर्ष संस्कृतमध्ये नियमांपेक्षा 'लय' आणि 'स्वर' यांना अधिक महत्त्व आहे. वेगळ्या पद्धतीने सांगायचे तर आर्ष संस्कृत म्हणजे 'कंपनांचे शास्त्र' आहे. लौकिक संस्कृत ही logical तर आर्ष संस्कृत ही intuitional आहे असे म्हणता येईल.
लौकिक संस्कृतमध्ये प्रचलित असलेल्या शब्दांची वेगळी रुपे वैदिक संस्कृत मध्ये आढळतात. वैदिक संस्कृत मध्ये संधीचे नियम पाणिनीच्या व्याकरणासारखे कडक नाहीत. शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अनेकदा संधी तोडून वाचली जाते. तसेच वैदिक संस्कृत ही पूर्णपणे 'स्वरप्रधान' भाषा आहे. मंत्राचा अर्थ केवळ शब्दांवर नाही, तर तो शब्द कोणत्या स्वरात उच्चारला आहे यावर ठरतो. यासाठी तीन मुख्य स्वर वापरले जातात:
उदात्त (High tone): उंच स्वर.
अनुदात्त (Low tone): नीच स्वर.
स्वरित (Falling tone): मध्यम किंवा मिश्र स्वर.
जर स्वराचा उच्चार चुकला, तर अर्थ पूर्णपणे बदलू शकतो. म्हणूनच वेदांना 'श्रुती' (ऐकून जतन केलेले) म्हटले जाते आणि आधीच्या भागात सांगितलेली फुलप्रुफ सिस्टीम त्यासाठी विकसित करण्यात आली. एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ऋग्वेदाच्या (शाकल शाखेच्या) भाषेत 'ळ' या वर्णाचा वापर आढळतो, जो नंतरच्या शास्त्रीय/लौकिक संस्कृतमध्ये नाहीसा झाला. ऋग्वेदातील पहिल्याच ऋचेत 'अग्निमीळे पुरोहितम्' असा उल्लेख येतो. येथे 'ळ' चा वापर हा ऋग्वेदाच्या अगाध प्राचीनतेचा मोठा पुरावा आहे. नियम असा आहे की, जेव्हा दोन स्वरांच्या मध्ये 'ड' येतो, तेव्हा वैदिक संस्कृत मध्ये त्याचा 'ळ' होतो (उदा. अग्निमीडे ऐवजी अग्निमीळे). ळ हा उच्चार आजही मराठी, तामिळ, उडिया इत्यादी प्राकृत भाषांत टिकून आहे, मात्र पाणिनीच्या व्याकरणावर आधारित लौकिक संस्कृतमध्ये 'ळ' ऐवजी 'ल' किंवा 'ड' वापरला जाऊ लागला. 'ळ' चा हा वैशिष्ट्यपूर्ण वापर आर्ष संस्कृतला इतर सर्व भाषांपासून वेगळे आणि अधिक प्राचीन ठरवतो.
पण ह्या सगळ्या फरकांमुळे होते काय की लौकिक संस्कृतमध्ये एका शब्दाचा जो अर्थ रूढ झाला आहे, वेदात तो असेलच अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे वैदिक संस्कृत समजून घेण्यासाठी नंतरच्या काळात एक शब्दकोश विकसित करण्यात आला त्याचे नाव “निघण्टु’. यात वेदांतील कठीण आणि संदिग्ध शब्दांचे संकलन केले आहे. उदाहरणार्थ 'गौ' या शब्दाचा सामान्य अर्थ 'गाय' असा होतो, पण निघण्टुमध्ये या एकाच शब्दाचे २१ पेक्षा जास्त अर्थ (उदा. पृथ्वी, वाणी, किरण इ.) दिले आहेत.
ह्या निघण्टुवर आधारित भाष्य म्हणजे ‘निरुक्त’ यास्काचार्यांनी तयार केले. हे वेदांगाचे दुसरे प्रमुख अंग आहे. निरुक्त म्हणजे etymology, ते 'शब्दाच्या मुळाशी' जाऊन शब्दाची निर्मिती कोणत्या धातूपासून (Action) झाली आहे हे समजावून सांगते. हे कसे ते समजून घेण्यासाठी खालील उदाहरणांची मदत होईल. 'अश्व' म्हणजे केवळ घोडा नाही, तर जो 'अश्नुते' (रस्ता वेगाने व्यापुन घेतो) तो अश्व. ही दृष्टी निरुक्त देते. लौकिक संस्कृतमध्ये 'इंद्रशत्रु' या शब्दाचा अर्थ उच्चार बदलला तरी बदलत नाही, पण वैदिक संस्कृत मध्ये बदलतो. वेदांची भाषा प्रतीकात्मक आहे आणि ती समजून घेण्यासाठी स्वरांचे ज्ञान आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'इंद्रशत्रु' हा शब्द. निरुक्तात स्वराच्या बदलामुळे अर्थ कसा बदलतो हे सांगताना हे उदाहरण वापरले आहे.
जर 'इंद्र' या शब्दावर जोर (उदात्त स्वर) दिला, तर तिथे 'बहुव्रीहि' समास होतो आणि अर्थ होतो "इंद्र ज्याचा घातक (शत्रू) आहे असा तो" (म्हणजेच वृत्रासुर). याउलट, जर 'शत्रु' या शब्दावर जोर दिला, तर तिथे 'षष्ठी तत्पुरुष' समास होतो आणि अर्थ होतो "इंद्राचा शत्रू". एका स्वराच्या चुकीमुळे 'इंद्राच्या नाशाची इच्छा करणारा' या इच्छेऐवजी 'इंद्राकडून मारला जाणारा' असा उलटा अर्थ निष्पन्न होऊ शकतो. ही सूक्ष्म दृष्टी निरुक्त देते. पण हे एवढ्यावरच मर्यादित नाही. वैदिक संस्कृत मध्ये शब्दांना गुढ छटा आहेत (किंवा असे म्हणता येईल की आज आपल्याला त्या अर्थछटा गुढ वाटतात). उदाहरणार्थ अग्नी, इंद्र किंवा वृत्र हे केवळ निसर्गशक्ती नसून ते मानवी चेतनेतील वृत्तींची प्रतीके आहेत आणि हे 'गूढार्थ' समजण्यासाठी निरुक्ताची ही व्याकरणनिष्ठ मदत लागते. यास्काचार्य म्हणतात की, जो वेदांचा केवळ पाठ करतो पण त्याचा अर्थ (निरुक्त) समजत नाही, तो त्या खांबासारखा (स्थाणु) आहे जो केवळ छताचे वजन पेलतो, पण त्याला घरातील अन्नाची चव माहित नसते!
हे सगळे वाचून कदाचित ऋग्वेद हे फारच किचकट प्रकरण आहे त्यामुळे त्याच्या वाट्याला जाणे नको असे वाटले असेल ना? पण काळजी करू नका, एका व्यक्तीने आपले सगळ्यांचे काम खूप सोपे करून ठेवले आहे. ही व्यक्ती म्हणजे सायणाचार्य (१३१५ - १३८७), विजयनगर साम्राज्याचे महामंत्री जे बुक्कराय आणि हरिहरराय द्वितीय ह्यांच्या राज्यकाळात कार्यरत होते. त्यांनी वेदांवर जे भाष्य लिहिले, ते आज 'सायण-भाष्य' म्हणून ओळखले जाते आणि तेच वेदांचा अर्थ समजून घेण्याचा मुख्य आधार आहे. सायणाचार्य स्वतः अतिशय विद्वान होते, त्यांनी एकूण २८ पेक्षा जास्त ग्रंथांची रचना केली. त्याचबरोबर ते तलवार चालवण्यातही निष्णात होते. विजयनगर साम्राज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी अनेक लढायांचे नेतृत्व केले आणि राज्याचा विस्तार करण्यास मदत केली.
त्यांच्या वडिलांचे नाव मायण आणि आईचे नाव श्रीमती होते. हे जोडपे अद्भुत असले पाहिजे कारण त्यांची तिन्ही मुले high achievers होती. सायणाचार्यांचे थोरले भाऊ माधवाचार्य ह्यांनी संन्यास घेऊन विद्यारण्य माधव असे नाव धारण केले त्यांना विद्यारण्य स्वामी म्हणून ओळखले जाते. ते शृंगेरी-शारदा पीठाचे १२ वे शंकाराचार्य होते. विजयनगर साम्राज्याच्या उभारणीत त्यांची महत्त्वाची भुमिका होती. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली त्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘सर्वदर्शनसंग्रह’. त्यात त्यांनी एका निष्पक्ष संशोधकाची भूमिका घेऊन लोकायत (चार्वाक) दर्शनाची मांडणी केली आहे. ती इतकी संतुलित आणि पद्धतशीर आहे की, आजही चार्वाक विचार समजून घेण्यासाठी तो सर्वात उत्तम ग्रंथ मानला जातो. ह्यात लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की चार्वाक हे वेदांना मानत नव्हते आणि विद्यारण्य स्वामी स्वतः वेदांचे प्रकांड पंडित होते. त्यांनी चार्वाकांची भुमिका अशा पद्धतीने मांडली आहे की वाचणाऱ्याला क्षणभर वाटते की ते स्वतःच चार्वाक समर्थक आहेत!
तर धाकटे बंधु भोगनाथ हे कवि होते. त्यांना 'कविसाक्षात्' किंवा 'राजकवी' अशा पदव्या होत्या. त्यांच्या लेखनातून त्यांची रसिकता आणि शब्दप्रभुत्व दिसून येते. काही शिलालेखांनुसार, ते सायणाचार्यांचे स्वीय सचिव किंवा सल्लागार (Counsel) म्हणूनही कार्यरत होते. विजयनगरच्या सुरुवातीच्या काळातील सांस्कृतिक बांधणीत त्यांचा मोठा वाटा होता. एकाच कुटुंबातील तीन भावांनी मिळून इतिहास, धर्म आणि साहित्य यांवर इतका खोल ठसा उमटवल्याचे हे भारतातीलच नाही तर जागतिक इतिहासातील एक दुर्मिळ उदाहरण असावे.
सायणाचार्यांनी चारही वेदांच्या संहितांवर भाष्य लिहिले. त्यांच्या या ग्रंथाला त्यांनी 'माधवीय वेदार्थ प्रकाश' असे नाव देऊन, हे कार्य आपल्या बंधूंच्या नावे अर्पण केले. वेदांमधील मंत्र प्राचीन संस्कृतमध्ये असल्याने अत्यंत गूढ होते ज्यांचा अर्थ सामान्य माणसांनाच काय पण विद्वानांनाही समजणे कठीण होते. सायणाचार्यांनी या कठीण मंत्रांचा सोप्या भाषेत अर्थ लावून ते जनसामान्यांसाठी खुले केले. मंत्राचा विनियोग कोणत्या यज्ञात करायचा? त्या मंत्राचे व्याकरण काय आहे? त्या मंत्राशी निगडित कथा किंवा संदर्भ काय आहेत? या सर्व गोष्टींचे सविस्तर विवेचन त्यांनी त्यांच्या लेखनातून केले आहे. वैदिक संशोधनाच्या क्षेत्रात सायणाचार्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.
सायणाचार्यांचे ऋग्वेदावरील भाष्य, ज्याला 'ऋग्वेद-भाष्य-भूमिका' आणि 'वेदार्थ प्रकाश' म्हटले जाते, हा जागतिक साहित्यातील एक चमत्कार मानला जातो. ऋग्वेदाची क्लिष्ट भाषा (वैदिक संस्कृत) आणि व्याकरणाला सायणाचार्यांनी एक सुटसुटीत स्वरूप दिले.
सायणाचार्यांचे भाष्य हे मुख्यत्वे 'याज्ञिक' (Ritualistic) आहे. एखादा मंत्र केवळ वाचण्यासाठी नसून, त्याचा प्रत्यक्ष यज्ञात (उदा. अश्वमेध, सोमयाग) कधी आणि कसा वापर करायचा, हे ते 'विनियोग' सांगताना स्पष्ट करतात. यामुळे ऋग्वेदाचा प्रत्यक्ष जगण्याशी आणि परंपरेशी असलेला संबंध अधोरेखित होतो. त्याचबरोबर त्यांनी ऋग्वेदातील पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भांचे संकलन केले. सायणाचार्यांनी या संदर्भांचा अर्थ लावताना जुन्या ऐतिहासिक कथा (इतिहास-पुराण) आणि 'अनुक्रमणी' (Index of Seers/Deities) यांचा आधार घेतला. यामुळे ऋग्वेदातील सूक्ते कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या ऋषींनी गायली, याचा एक संदर्भ आपल्याला मिळतो.मॅक्स म्युलर यांनी जेव्हा ऋग्वेदाची 'क्रिटिकल एडिशन' काढली, तेव्हा त्यांनी सायणाचार्यांच्या भाष्याचाच आधार घेतला. त्यांच्या शिवाय पाश्चात्य जगताला वेदांचा अर्थ लावणे अशक्य होते.
सायणाचार्यांनी वेदांचा अर्थ प्रामुख्याने 'यज्ञ' (Ritualistic) दृष्टिकोनातून लावला ह्यावर काही अर्वाचीन अभ्यासकांचा आक्षेप आहे. महर्षी दयानंद सरस्वती आणि श्री अरविंद घोष यांनी असा विचार मांडला की, सायणाचार्यांनी वेदांमधील 'अध्यात्म' बाजूकडे थोडे दुर्लक्ष करून कर्मकांडाला अधिक महत्त्व दिले. ते खरे असले तरीही सायणाचार्यांच्या कामाचे महत्त्व कमी होत नाही. त्यांचे काम महत्त्वाचे अशासाठी आहे की, त्यांनी त्यांच्या आधीच्या सर्व विद्वानांच्या कामाचा समन्वय साधून एक 'पूर्ण भाष्य' तयार केले, जे आजही जगातील सर्व वेद-अभ्यासकांसाठी पाया मानले जाते. शब्दांचे अर्थ आणि व्याकरण स्पष्ट करण्यात सायणाचार्यांचे योगदान निर्विवाद आहे. जर सायणाचार्य झाले नसते, तर आज आपल्याला वेदांमधील मंत्रांचे व्याकरण आणि त्यांचे प्राचीन संदर्भ समजून घेणे अत्यंत कठीण गेले असते. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी विजयनगर साम्राज्याने दिलेले हे सर्वात मोठे योगदान आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरु नये.
