ऋग्वेद: स्थल आणि काल निश्चिती

आर्य स्थलांतर सिद्धांत

ऋग्वेदाचा निश्चित काळ ठरवण्याबाबत संशोधकांचे एकमत नसले तरी ऋग्वेदातील मंडलांच्या कालनुक्रमाबाबत तज्ञांमध्ये एकवाक्यता आढळते. आपण मागील भागात पाहिले की ऋग्वेदाच्या शाकल शाखेत एकुण दहा मंडले आहेत. भाषाशास्त्रज्ञांना असे आढळून आले की, ह्या दहा मंडलांची तुलना केली असता त्यातील भाषेत कालौघात झालेले बदल दिसून येतात. भाषाशास्त्र(Linguistics) आणि शैलीशास्त्र (Stylometric) ह्या दोघांच्या आधारे संशोधकांनी ऋग्वेदातील मंडलांचा खालील कालानुक्रम (Chronology) लावला आहे.

(१) प्राचीनतम काळ (The Earliest Layer)
क्रम: ६ मग ३ मग ७ आणि सगळ्यात शेवटी २
(२) मध्यम काळ (The Intermediate Layer)
क्रम: ४ मग ५ आणि सगळ्यात शेवटी १ (सूक्त ५१ ते १९१)
(३) संकलन आणि संक्रमण काळ (The Transitional Layer)
क्रम: ८ मग ९ आणि सगळ्यात शेवटी १ (सूक्त १ ते ५०)
(४) अर्वाचीन काळ (The Latest Layer)
क्रम: १० वे मंडल

संपूर्ण ऋग्वेदाचा कालखंड निश्चित करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा फ्रेडरिक मॅक्समुलर ह्यांनी केला. ते भाषाशास्त्रज्ञ होते. त्यांनी स्वतः कधी भारताला भेट दिली नाही, परंतु लंडनमधील 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी वेदांचा अभ्यास केला. त्या आधारे त्यांनी दोन गृहितकं मांडली:

(१) सांस्कृतिक/भाषिक स्थलांतर: त्यांनी मांडले की 'आर्य' हे एका विशिष्ट वंशाचे लोक असून त्यांचे मूळ स्थान मध्य आशियात (Central Asia) होते. तिथून एक गट युरोपकडे गेला आणि दुसरा गट इराणमार्गे भारतात आला.
(२) काल निश्चिती (१५०० ई.स. पूर्व): त्यांनी १८५९ मध्ये लिहिलेल्या 'History of Ancient Sanskrit Literature' या ग्रंथात ऋग्वेदाचा काळ इ.स. पूर्व १५०० असा निश्चित केला. त्यांनी संस्कृत साहित्याचे चार भाग केले (छंद, मंत्र, ब्राह्मण आणि सूत्र) आणि प्रत्येकाला केवळ २०० वर्षांचा वेळ दिला. हा आकडा त्यांनी साहित्याच्या विकासासाठी लागणाऱ्या अंदाजे वेळेवरून काढला होता.

मॅक्समुलर ह्यांच्या सिद्धांताच्या आधारे विल्यम जोन्स (१७८६) ह्यांनी कलकत्ता येथे 'एशियाटिक सोसायटी'च्या बैठकीत जाहीर केले की संस्कृत, लॅटिन आणि ग्रीक या भाषांमध्ये कमालीचे साम्य आहे. यातून 'इंडो-युरोपियन' भाषा समूहाची संकल्पना जन्माला आली. त्यांचा युक्तिवाद असा होता की जर या भाषा सारख्या आहेत, तर त्या बोलणारे पूर्वजही एकच असावेत आणि ते कुठल्यातरी एका केंद्रातून जगभर पसरले असावेत. पण मॅक्समुलर यांनी सुचविलेला इ.स. पूर्व १५०० हा कालखंड आणि 'आर्य स्थलांतर’ सिद्धांत हा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. त्यांच्या समकालीन आणि नंतरच्या अनेक पाश्चात्य व भारतीय संशोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतले आहेत.
समकालीन व्यक्तींपैकी काही प्रमुख व्यक्तींची माहिती थोडक्यात देते. मॉरीस विंटरनित्झ (Maurice Winternitz) ह्यांनी म्हटले की, वेदांच्या रचनेसाठी मॅक्समुलर यांनी दिलेला २०० वर्षांचा प्रत्येक टप्पा अत्यंत अपुरा आहे. भारतीय साहित्याचा आवाका पाहता हा काळ इ.स. पूर्व २००० किंवा २५०० च्याही मागे जातो. लोकमान्य टिळकांनी खगोलशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे ऋग्वेदाचा काळ निश्चित केला. हे गणित 'संपात बिंदूचे चलन' (Precession of Equinoxes) या संकल्पनेवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, पृथ्वीच्या अक्षाच्या फिरण्यामुळे आकाशातील नक्षत्रांची स्थिती हजारो वर्षांच्या कालखंडात हळूहळू बदलत असते. ऋग्वेदात जेव्हा एखाद्या विशिष्ट नक्षत्रात (उदा. मृगशीर्ष किंवा कृतिका) वसंत ऋतू सुरू झाल्याचे वर्णन येते, तेव्हा त्या वेळची आकाशाची स्थिती 'उलटी' मोजून तो नेमका कोणता काळ होता, हे गणिताने अचूक काढता येते. या गणितानुसार ऋग्वेदाचा काळ इ.स. पूर्व ४००० ते ४५०० इतका मागे जातो असे टिळकांचे मत होते. हर्मन जॅकोबी (Hermann Jacobi) या जर्मन संशोधकानेही नक्षत्राच्या आधारे ऋग्वेदाचा काळ इ.स. पूर्व ४५०० असाच निश्चित केला होता. योगी अरविंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील त्यांच्या लिखाणातुन मॅक्समुलर ह्यांच्या सिद्धांतावर आक्षेप नोंदवला आहे.

मॅक्समुलर यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे १८९० च्या सुमारास एक महत्त्वाचे विधान केले होते. ते म्हणाले होते, "मी दिलेला इ.स. पूर्व १५०० हा कालखंड केवळ एक किमान मर्यादा आहे. पृथ्वीवरील कोणतीही शक्ती वेदांचा नेमका काळ कधीच सांगू शकणार नाही." त्यांनी आर्य स्थलांतर सिद्धांताचा वापर वंशश्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी केला जातो आहे हे बघितल्यावर हे पण सांगितले होते की आर्य ही संज्ञा त्यांना वंशाच्या नाही तर भाषेच्या अनुषंगाने अपेक्षित होती. ज्या मॅक्समुलर यांच्या नावावर १५०० ई.स. पूर्व हा कालखंड आजही प्रमाण मानला जातो, त्यांनी स्वतःच तो कालखंड अंतिम नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यांची आयुष्याच्या उत्तरार्धातील मते तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांना सोईची नसल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा, त्यांची पुर्वीची मतेच संदर्भ म्हणून वापरली गेली.

३,४०० वर्षांपूर्वीचा शिलालेख

ऋग्वेदाची रचना इ. स. पुर्वी १५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन आहे ह्याचा पहिला पुरावा १९०६ मधील एका उत्खननातुन जर्मन पुरातत्वशास्त्रज्ञ ह्यूगो विंक्लर (Hugo Winckler) ह्यांनी दिला. त्यांना उत्खननात एक Clay Tablet मिळाली जी 'क्युनिफॉर्म' (Cuneiform) या प्राचीन लिपीत लिहिलेली होती. शिलालेख आधुनिक तुर्कीये मधील अंकारा जवळ असलेल्या 'बोगाझकोयी' या ठिकाणी सापडला. त्याचा कालखंड साधारणपणे इ.स. पूर्व १३८० (सुमारे ३,४०० वर्षांपूर्वी) चा निश्चित करण्यात आला. हा शिलालेख एका युद्धाच्या समाप्तीनंतर झालेल्या शांतता कराराचे वर्णन आहे. हा करार दोन राजांमध्ये झाला होता, मित्तानी राजा शतिवाझा (Mattiwaza) आणि हित्ताईत राजा सुप्पिलुल्युमा (Suppiluliuma I). या कराराच्या शेवटी, कराराचे पालन व्हावे यासाठी दोन्ही राजांच्या विविध देवतांना 'साक्षीदार' म्हणून पाचारण करण्यात आले आहे. यात मित्तानींच्या खालील देवतांची नावे स्पष्टपणे आढळतात:

'इन्-दर' (इंद्र)
'यू-रु-व-न' (वरुण)
'मि-इत-र' (मित्र)
'न-सा-ति-अ' (नासत्य म्हणजे अश्विनी कुमार)

हे नाव आणि त्यांचा क्रम ऋग्वेदातील देवतांच्या जोड्यांशी (उदा. मित्र-वरुण) कमालीचे साम्य दर्शवतो. ऋग्वेदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही इंडो-युरोपियन साहित्यात (उदा. ग्रीक किंवा इराणी) अश्विनीकुमारांना 'नासत्य' म्हटलेले नाही. 'नासत्य' हा शब्द अस्सल ऋग्वैदिक संस्कृतातील आहे. मॅक्समुलर म्हणतात की ऋग्वेद इ.स. पूर्व १५००-१२०० मध्ये भारतात लिहिला गेला. मग प्रश्न असा आहे की, जर ऋग्वेद भारतात नुकताच लिहिला जात होता, तर त्यातील देवतांची नावे तुर्कीतील राजांच्या करारात (केवळ १०० वर्षांच्या फरकाने) कशी काय पोहोचली? ही नावे तिथे रुजण्यासाठी आणि त्यांना 'साक्षीदार' म्हणून अधिकृत दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा काळ जावा लागला असणे आवश्यक आहे.

आर्य आक्रमणाचा आभासी सिद्धांत

सर मॉर्टिमर व्हीलर (Sir Mortimer Wheeler) हे १९४० च्या दशकात 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (ASI) चे महासंचालक होते. त्यांनी हडप्पा आणि मोहेंजोदारोच्या उत्खननात शास्त्रीय पद्धती आणली, पण त्यांचे निष्कर्ष खूपच टोकाचे होते. मॅक्समुलर यांनी केवळ 'स्थलांतराचा' (Migration) उल्लेख केला होता, पण व्हीलर यांनी त्याला 'हिंसक आक्रमणाचे' रूप दिले. मोहेंजोदारोमध्ये त्यांना काही सांगाडे विखुरलेल्या अवस्थेत सापडले. त्यांनी असा दावा केला की, बाहेरून आलेल्या आर्यांनी (जे प्रगत शस्त्रे आणि घोडे/रथ घेऊन आले होते) या शहरांचा नाश केला. नंतरच्या संशोधनात ते सांगाडे ज्यांचे होते त्या व्यक्ती नैसर्गिक आपत्तीत मरण पावल्या असल्याचे सिद्ध झाले. त्या सांगाड्यावर शस्त्रांच्या घावांच्या खुणा नव्हत्या. ऋग्वेदात देखील आक्रमणाचे किंवा बाहेरून येऊन इथे स्थायिक झाल्याचे चे एकही स्पष्ट भौगोलिक वर्णन नाही. ऋग्वेदातील इंद्राचे एक विशेषण 'पुरंदर' (किल्ले फोडणारा) असल्याने त्यांनी इंद्रालाच या विनाशाचा मुख्य सूत्रधार मानले. ऋग्वेदातील 'पुर' या शब्दाचा अर्थ व्हीलर यांनी 'विशाल दगडी किल्ले' असा लावला होता, जे फोडण्यासाठी इंद्राने आक्रमण केले असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, आधुनिक संशोधनानुसार ऋग्वेदातील 'पुर' हे दगडी किल्ले नसून नदीच्या पुरापासून वाचण्यासाठी बांधलेले मातीचे उंच कट्टे किंवा संरक्षक भिंती (Embankments) असू शकतात. हडप्पा संस्कृतीतील नगरांच्या संरचनेचा अभ्यास केला तर हे स्पष्ट होते की, तिथे संरक्षणापेक्षा पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठीच अशा उंच भिंती बांधल्या गेल्या होत्या.

ह्या संदर्भातील शेवटचा मुद्दा जो डॉ बी बी लाल ह्यांनी मांडलाय तो भौगोलिक स्थानाच्या बाबतीतला आहे. आर्य त्यांचे प्रगत तंत्रज्ञान (रथ आणि घोडे) घेऊन मध्य आशियातुन भारतात आले असे मानले तर त्यांना भारतात येण्यासाठी दोनच रस्ते उपलब्ध होते. पहिला मार्ग हिंदूकुश पर्वत रांगेतील खैबर खिंडीतून, जो आजच्या पाकिस्तानात असलेल्या पेशावर शहरात उघडतो. दुसरा मार्ग सुलेमान पर्वत रांगांमध्ये असलेल्या बोलन खिंडीतून जो आजच्या बलुचिस्तान मधील क्वेटा शहरात उघडतो. खैबर आणि बोलन खिंडीतून हजारो लोक, रथ आणि घोडे घेऊन आल्याचे कोणतेही मोठे पुरातत्त्वीय पुरावे (उदा. त्या काळातील शस्त्रे किंवा सांगाड्यांचे ढीग) तिथे सापडलेले नाहीत.तज्ञांच्या मते या अत्यंत खडकाळ आणि चढ-उताराच्या मार्गावरून लाकडी चाकांचे रथ चालवणे किंवा ते सुस्थितीत पलीकडे नेणे तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय होते. रथांसाठी सपाट मैदानी प्रदेशाची आवश्यकता असते, जो अफगाणिस्तानच्या डोंगररांगांत नाही. थोडक्यात खैबर आणि बोलन खिंडीतून व्यापारी तांडे किंवा लहान टोळ्या (घोडेस्वारांसह) येणे शक्य आहे, पण पूर्ण संस्कृती, रथ आणि हजारो लोकांचा ताफा येणे उपलब्ध पुरावे बघता शक्य वाटत नाही. हे सगळे लक्षात घेतले तर काय घडले नाही ह्याची खात्री पटते पण मुळ प्रश्न अजुनही अनुत्तरितच रहातात? ऋग्वेदाची रचना साधारण कुठल्या कालखंडात झाली? कुठे झाली? आणि कुणी केली? तर आता त्यांच्या कडे वळु. त्यासाठी आपल्याला सरस्वती नदीचा आढावा घ्यावा लागेल.

नदीतमा सरस्वती

ऋग्वेदात सरस्वती चा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी एकुण ७३ वेळा येतो आणि गंगेचा फक्त २/३ वेळा. तिचे जे वर्णन आहे ते एका विशाल आणि वेगवान नदीच्या रूपात आहे. तिला 'गिर्यभ्य: समुद्रात' (पर्वतांपासून समुद्रापर्यंत) वाहणारी म्हटले आहे. वशिष्ठ ऋषींनी तिला 'नदीतमे' (नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नदी), 'अम्बितमे' (मातांमध्ये सर्वश्रेष्ठ माता) आणि 'देवितमे' (देवींमध्ये सर्वश्रेष्ठ देवी) असे म्हटले आहे. थोडक्यात नंतरच्या काळात जे महत्त्व गंगेला मिळाले ते ऋग्वेदात सरस्वतीला आहे. 'नदीस्तुती' सूक्तात सरस्वतीचे स्थान यमुना आणि शुतुद्री (सतलज) यांच्या दरम्यान असल्याचे सांगितले आहे. ती हिमालयापासून ते अरबी समुद्रापर्यंत वाहणारी, बारामाही म्हणजे glacial fed नदी होती. ऋषी-मुनींना सरस्वतीच्या काठावरच अनेक मंत्रांचे ‘दर्शन’ झाले, म्हणून ती पुढे 'वाणिची' आणि 'ज्ञानाची' देवी बनली. पण आज सरस्वती नदी अस्तित्वात नाही. जेव्हा सरस्वती भौतिक रूपाने लुप्त झाली, तेव्हा भारतीय परंपरेने तिला 'अदृश्य' मानले. प्रयागराज (अलाहाबाद) येथील त्रिवेणी संगमावर गंगा आणि यमुना उघडपणे दिसतात, पण सरस्वती गुप्तपणे येऊन मिळते, अशी श्रद्धा आहे. संशोधकांत मात्र ह्या नदी बद्दल दोन मतप्रवाह होते. पहिला म्हणजे ही एक काल्पनिक नदी असावी आणि दुसरा म्हणजे ही आर्यांच्या मुळ स्थानी असलेली नदी असावी जिची स्मृती त्यांनी भारतात आल्यावरही जपली.

डॉ यशपाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी' (Yashpal et al.) १९७९-८० मध्ये अमेरिकेच्या Landsat उपग्रहावरून मिळालेल्या फोटोंचा वापर करून प्रथमच राजस्थानच्या वाळवंटातील जुन्या जलमार्गांचे नकाशे तयार केले. यातून हे स्पष्ट झाले की एकेकाळी सतलज आणि यमुना या नद्या सरस्वतीच्या उपनद्या होत्या. १९९५-९६ मध्ये इस्रो च्या Indian Remote Sensing विभागातील डॉक्टर के. गुप्ता, आणि डॉक्टर बी. के. भादरा ह्यांनी IRS-1C उपग्रहाचा वापर करून सविस्तर माहिती गोळा केली. या उपग्रहाकडे जमिनीच्या खाली पाहण्याची क्षमता (Optical and Microwave data) होती. २००२-२००३ मध्ये इस्रोने अधिकृतपणे सरस्वती नदीच्या 'पॅलेओ-चॅनेल्स'चा एकात्मिक नकाशा समोर आणला. ह्या नकाशात हे स्पष्ट झाले की एकेकाळी सरस्वती नदी खरोखरच अस्तित्वात होती, जी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शिवालिक पर्वत रांगांमध्ये उगम पावुन हरयाणा, राजस्थान आणि गुजरात मार्गे कच्छच्या रणात खंबात च्या आखातात अरबी समुद्राला मिळत होती. या नदीच्या पात्राची रुंदी ४ ते १० किमी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. २०१६ मध्ये भारत सरकारने नेमलेल्या के. एस. वल्दिया समितीने इस्रोच्या गेल्या अनेक वर्षांच्या डेटाचा आणि फोटोंचा पुनरभ्यास करून हा निष्कर्ष दिला की, ऋग्वेदातील सरस्वती आणि इस्रोने शोधलेले पॅलेओ-चॅनेल्स हे एकच आहेत. इ.स.पूर्व ६००० ते ४००० या काळात सरस्वती आपल्या पूर्ण वैभवात होती. यमुना आणि शुतुद्री (सतलज) ह्या तिच्या उपनद्या होत्या. इ.स.पूर्व ४००० ते ३००० ह्या काळात भूगर्भीय हालचालींमुळे (Tectonic shifts) यमुनेने आपला मार्ग बदलला आणि ती पूर्वेकडे गंगेला जाऊन मिळाली. त्याचप्रमाणे सतलज पश्चिमेकडे सिंधू नदीकडे वळली. सरस्वतीचा मुख्य पाण्याचा स्रोत तुटल्याने ती 'मौसमी' नदी (monsoon fed) बनली. संशोधकांच्या मते आजच्या काळातील हंगामी नदी ‘घग्गर’ हीच पुर्वीची सरस्वती आहे जी प्रवाहाचा आवेग कमी झाल्याने नैसर्गिक उतारा कडे म्हणजे पाकिस्तानात जाते आणि तिथे ‘हाकरा’ म्हणून ओळखली जाते. इ.स.पूर्व १९०० च्या सुमारास सरस्वती नदीचे हे ट्रांझिशन पुर्ण झाले, म्हणजेच पुर्वीची भव्य सरस्वती लुप्त झाली.

जर ऋग्वेदात सरस्वतीचे वर्णन 'समुद्राला मिळणारी' आणि 'विशाल' असे असेल, तर याचा अर्थ ऋग्वेदाचा काळ इ.स.पूर्व ४००० पेक्षाही प्राचीन आहे. कारण त्यानंतर ही नदी समुद्रापर्यंत पोहोचत नव्हती. संशोधनानुसार, सिंधु संस्कृतीतील जवळपास २/३ वसाहती ह्या सरस्वती च्या काठावर होत्या , ज्यामध्ये हरियाणातील, राखिगढी, भिराना, कुणाल, बनावली, राजस्थानमधील कालिबंगन, आणि गुजरातमधील लोथल व धोलाविरा ह्यांचा समावेश आहे. म्हणुन आजकाल बरेच तज्ञ ‘सिंधु संस्कृती’ ऐवजी ‘सिंधु-सरस्वती संस्कृती’ असा उल्लेख करतात. भिराणा आणि राखीगढी येथील कार्बन डेटिंगनुसार ही सरस्वती काठावर वसलेली संस्कृती इ.स. पूर्व ७००० ते ८००० वर्षांइतकी जुनी आहे. भिराणा आणि कुणाल ही स्थळे हे सिद्ध करतात की सरस्वती खोऱ्यात इ.स. पूर्व ४००० च्याही आधीपासून प्रगत वसाहती होत्या. बनावली येथे सरस्वती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर 'यव' (जव किंवा Barley) सापडले आहेत. ऋग्वेदात धान्यांमध्ये 'यव' यालाच सर्वाधिक महत्त्व दिले आहे. कालिबंगन आणि बनावली येथे यज्ञकुंडे सापडली आहेत. ही अग्निकुंडे Mature Harappan काळातील म्हणजे साधारणपणे इ.स. पूर्व २६०० ते इ.स. पूर्व १९०० ह्या काळातील आहेत. या कुंडांमध्ये राख, कोळसा आणि प्राण्यांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष ऋग्वेदातील 'यज्ञ' परंपरेचे भौतिक पुरावे मानले जातात. विशेष म्हणजे, सिंधू नदीच्या खोऱ्यातील मोहेंजोदारो किंवा हडप्पा येथे असे अग्निकुंड सापडलेले नाहीत, जे सरस्वती खोऱ्यातील या संस्कृतीचे वेगळेपण आणि 'वैदिक' धागा अधोरेखित करतात. इ.स. पूर्व १९०० च्या सुमारास ह्यापैकी बहुतांश स्थळे ओस पडू लागली होती. हेच ते वर्ष आहे जेव्हा सरस्वती नदी भूगर्भीय हालचालींमुळे लुप्त झाली किंवा तिचे पात्र पूर्णपणे बदलले. सरस्वती नदीचे लुप्त होणे हे हडप्पा (सिंधु-सरस्वती) संस्कृतीच्या विनाशाचे हे एक प्रमुख कारण मानले जाते.

जनुकशास्त्रीय पुरावा

आजचे बहुतांश संशोधक कालिबंगन, राखीगढी आणि बनावली या तीन ठिकाणांना वैदिक संस्कृतीचे मुख्य केंद्र मानतात, कारण तिथे सापडलेले 'अग्निकुंड', 'यव' (Barley) आणि सरस्वती नदीचे भौगोलिक सान्निध्य हे ऋग्वेदातील वर्णनाशी तंतोतंत जुळते. मात्र काही संशोधक अजूनही असा युक्तिवाद करतात की, हडप्पा संस्कृती नागरी (Urban) होती आणि ऋग्वेद ग्रामीण किंवा पशुपालक (Pastoral) वाटतो. हा भेद (नागरी विरुद्ध पशुपालक संस्कृती) राखीगढी मधील जनुकीय संशोधनानंतर आणखीनच कमकुवत ठरतो. भारतीय उपखंडातील हवामान, आणि मातीच्या ऍसिडिक गुणधर्मांमुळे डीएनए सॅंपल्स आतापर्यंत मिळाले नव्हते. सुदैवाने राखीगढीमधील उत्खननात सापडलेल्या एका सांगाड्यातुन डीएनए मिळवण्यात संशोधकांना यश मिळाले.

डॉ वसंत शिंदे आणि डॉ नीरज राय ह्यांनी २०१९ मध्ये त्याचे जनुकीय विश्लेषण प्रसिद्ध केले. राखीगढीमध्ये सापडलेल्या ६११ क्रमांकाच्या एका महिलेच्या सांगाड्याचा DNA अभ्यासला असता, त्यात 'R1a1' हा तथाकथित 'आर्यन' जनुकीय गट (Steppe DNA) सापडला नाही. हा सांगाडा इ.स.पुर्व २५०० मधील आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय संशोधकांनी (उदा. डेव्हिड राइक, टोनी जोसेफ) यावर दोन महत्त्वाचे आक्षेप नोंदवले आहेत. पहिला म्हणजे हा केवळ एकाच व्यक्तीचा जनुकीय डेटा आहे आणि दुसरा राखीगढीचा पुरावा एका महिलेचा आहे. स्थलांतर प्रामुख्याने पुरुषांकडून झाले (Y-Chromosome) झाले असण्याची शक्यता असु शकते. ह्या दोन्ही मर्यादांवर मात करण्यासाठी डॉक्टर नीरज राय ह्यांच्या टीम ने राखीगढीच्या DNA ची तुलना ११ प्रगत हडप्पाकालीन व्यक्तींशी केली, ज्यांचे अवशेष तुर्कमेनिस्तान (Gonur) आणि इराण (Shahr-i-Sokhta) येथे सापडले होते. या व्यक्ती हडप्पा संस्कृतीतील 'स्थलांतरित' किंवा 'व्यापारी' होत्या. या सर्व १२ व्यक्तींचा (१ राखीगढी + ११ बाहेर सापडलेल्या) जनुकीय आराखडा सारखाच होता. याला विज्ञानात 'Genetic Outliers' अभ्यास म्हणतात. यामुळे नमुना आकार १ वरून १२ वर गेला आणि निष्कर्षाची व्याप्ती वाढली. संख्याशास्त्रीय मर्यादा कमी करण्यासाठी संशोधकांनी आधुनिक अल्गोरिदम वापरले ज्याद्वारे दोन लोकसमूहांमधील पूर्वजांचे नाते मोजले जाते. राखीगढीच्या DNA मध्ये दक्षिण आशियाई (ASI) आणि उत्तर आशियाई (ANI) यांचे जे मिश्रण दिसले, ते आजच्या उत्तर आणि दक्षिण भारतातील जवळजवळ सर्व जाती-जमातींमध्ये आढळते. पण तरीही एका सांगाड्यावरून संपूर्ण उपखंडाचा इतिहास लिहिणे हे 'Over-generalization' ठरू शकते. येत्या काळात अजुन काही डीएनए सॅंपल्स मिळतील अशी मला आशा आहे.

निष्कर्ष

ह्या सगळ्या संशोधनांचा एकत्रित आढावा घेतल्यावर माझे मत असे आहे की आर्य म्हणून कुणी बाहेरून घाउक प्रमाणात स्थलांतरित झालेला वंश अस्तित्वात नाही. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या वंशाचे लोक भारतात आले आणि वांशिक सरमिसळ नक्कीच झाली, पण तिचा प्रभाव संस्कृतीवर पडावा इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. वैदिक संस्कृती ही बाहेरून आयात केलेली नसून ती या मातीतील सांस्कृतिक उत्क्रांतीचे सर्वोच्च शिखर आहे. हडप्पा आणि वैदिक संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ऋग्वेद हे ह्या संस्कृतीचे पहिले अपत्य!

ऋग्वेदाचा कालखंड खालीलप्रमाणे विभागता येईल:
प्रारंभिक काळ (Early Phase): इ.स. पूर्व ६००० ते ७००० (जेव्हा अत्यंत प्राचीन खगोलशास्त्रीय निरीक्षणे नोंदवली गेली).
उत्कर्ष काळ (Peak Phase): इ.स. पूर्व ४००० ते ४५०० (टिळकांचा काळ आणि सरस्वती नदीचा सुवर्णकाळ). हा ऋग्वेदातील बहुतांश सुक्तांच्या रचनेचा काळ असावा.
अंतिम संकलन (Final Compilation): इ.स. पूर्व ३००० ते २५०० (सरस्वती आटण्यास सुरुवात झाली त्या सुमारास).

सरस्वती नदीचे लुप्त होणे ही केवळ एक भौगोलिक घटना नव्हती, तर ती एका महासंस्कृतीच्या स्थित्यंतराची नांदी होती. ऋग्वेद हा या स्थित्यंतराचा सर्वात मोठा साक्षीदार आहे. आधी काहीसे अस्पष्ट, अंधुक दिसणारे आपल्या पूर्वजांचे प्रतिबिंब आता तुलनेने जास्त स्पष्ट दिसायला लागले आहे. एकाच वेळी निसर्गाबद्दल अमाप कुतुहल आणि कृतज्ञता असणारे हे लोक होते. त्यांचा निसर्गाकडे आणि आयुष्याकडे ही बघण्याचा दृष्टिकोन अतिशय तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक होता. त्याचा मागोवा आपण पुढील भागांत घेऊ.

वर
0 users have voted.