मिक्स भाज्यांचं लोणचं- नॉर्थ इंडियन स्टाईल

साहित्य-
भाज्या- कॉलीफ्लॉवर, मुळा, शलगम (टर्निप), गाजर, हिरव्या मिरच्या, ओली हळद, आलं.
सुके मसाले- पिवळी मोहरी, बडिशेप, मेथी दाणे, जिरं
फोडणीत घालायला- मोहरीचं तेल, ओवा, मिरी, हळद, कलौंजी (ऑप्शनल), मीठ, काळं मीठ, व्हिनेगर, कश्मिरी लाल तिखट, थोडा तयार लोणचं मसाला.

कृती-

सगळ्या भाज्या आधी धुवून घ्याव्यात. फ्लॉवरची फुलं काढून घ्यावीत. मुळ्याचं साल काढून आडव्यात तुकडे करुन मग उभे जाडसर तुकडे करुन घ्यावेत. गाजराचीही सालं काढून आधी आडवे आणि मग उभे जाडसर तुकडे करुन घ्यावेत. शलगमचे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत. एका पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी येऊ द्यावी. आणि ह्या चारही भाज्या त्यात घालून ३ मिनीटं शिजवून घ्याव्यात. मग गॅस बंद करुन चाळणीत निथळून घ्याव्यात. पाणी निघून गेलं की एका पसरट ट्रेमध्ये वगैरे पंचा पसरुन त्यावर ह्या भाज्या कोरड्या करुन घ्याव्यात. पंख्याखाली कोरड्या केल्या तरी चालतील. पाण्याचा अंश राहाता कामा नये.

ह्या भाज्या वाळतायत तोवर हिरव्या मिरच्यांचे आडवे तुकडे, ओल्या हळदीची सालं आणि आल्याची सालं काढून दोन्हीचे जाडसर तुकडे करुन बाजूला ठेवावेत. एका पॅनमध्ये साधारण ६ टेबलस्पून पिवळी मोहरी घेऊन एखाद मिनिटभर भाजून बाजूला गार करायला ठेवावी. त्याच पॅनमध्ये १/४ कप बडिशेप, २ टेबलस्पून मेथी दाणे आणि १ टिस्पून जिरं भाजावं. भाजून झालं की गार करत ठेवावं. गार झालेली पिवळी मोहरी भरड वाटावी. बाजूला ठेवावी. मग हे तीन भाजलेले जिन्नसही भरड वाटून बाजूला ठेवावेत.

एका पसरट पॅनमध्ये दोनेक कप मोहरीचं तेल घेऊन गरम करावं. साधारण त्यातून धूर यायला लागला की गॅस बंद करावा. किंचीत गार (भाज्या जळणार नाहीत इतपत) झालं की त्यात ओवा, मिरी, हळद घालून वर ब्लांच करुन गार केलेल्या भाज्या घालाव्यात. मिक्स करावं. मग त्यात हिरव्या मिरच्या, ओली हळद, आलं घालून मिक्स करावं. त्यात वर वाटलेली मोहरी, बडिशेप वगैरे मसाला घालावा. कलौंजी, काळं मीठ, रेग्युलर मीठ, कश्मिरी लाल तिखट, तयार लोणच्याचा मसाला घालून मिक्स करावं. त्यात साधारण अर्धा एक कप व्हिनेगर घालून मिक्स करुन गार करत ठेवावं. २,३ दिवसांनी मुरलं की खायला घ्यावं.

ही रेसिपी ऑनलाईन बघून केली आहे. इथे डॉक्युमेंटेशनकरता लिहिली आहे. प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल.

ही खालची रेसिपी मला आडोने दिली होती. पराठ्यांबरोबर बरोबर छान लागतं आणि झटपट होतंही.

साहित्य- गाजर, बीटरुट, हिरव्या मिरच्या आणि अगदी बारीक अख्खे कांदे (पर्ल अनियन्स बहुतेक)

कृती- गाजर आणि बीट उभे तुकडे करुन घ्यायचे. मिरच्या हव्या तशा कापा. कांदे अख्खेच.
दोन पातेली गॅसवर ठेवा. एका पातेल्यात पाणी घालून उकळी काढा आणि त्यात गाजर, बीट घालून अगदी दोनेक मिनिटं ठेवा.
दुसर्‍या पातेल्यात अर्धा कप पाणी, १ कप व्हिनेगर, जास्त साखर आणि चवीपुरतं मीठ घालून उकळी काढा आणि गॅस बंद करा.
दोन मिनिटांनी भाज्या बाहेर काढून ह्या व्हिनेगरच्या मिश्रणात बुडवून ठेवा. त्यातच मिरच्या आणि कांदाही घाला.(हे दोन्ही ब्लांच करायचं नाहीये) चांगलं गार झालं की घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवून फ्रिजमध्ये स्टोअर करा.
908a91e3-aa65-4dec-948d-3d263daea3e7.jpeg

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.