ऋग्वेदातील मंडलांमध्ये काय आहे हे बघण्याआधी काही गोष्टी स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्या आधी बघुया.
ऋषी: पौराणिक मालिका बघुन सगळ्यांच्या मनात ऋषींचे एक विशिष्ट चित्र तयार झाले आहे. ऋषी म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करून, कुबडी आधाराला घेऊन तप करत बसलेले वृद्ध व्यक्ती, ज्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातुन कुणितरी अप्सरा येते, आणि आपली फसवणूक झाल्याचे कळताच ते तिला शाप देतात. पण ऋग्वेदातील ऋषी ह्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. वय, लिंग, ब्रह्मचार्य पालन अशी कुठलीही अट ऋषी ह्या संज्ञेसाठी नव्हती. यास्काचार्यांनी निरुक्तात ऋषी शब्दाची अतिशय सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, 'ऋषिर्दर्शनात् । स्तोमान् ददर्श इत्यौपमन्यवः।’ अर्थात 'ऋषी' हा शब्द 'दृश्' (पाहणे) या धातूपासून तयार झाला आहे. ज्याला मंत्रांचे 'दर्शन' झाले, तो ऋषी. प्राचीन परंपरेनुसार, ऋषींनी मंत्रांची रचना केलेली नाही, तर ते मंत्र त्यांना ध्यानावस्थेत 'दिसले' किंवा स्फुरले. म्हणूनच वेदांना 'अपौरुषेय' मानले जाते. त्या अनुषंगाने ही व्याख्या आहे. इथे 'दर्शन' म्हणजे डोळ्यांनी पाहणे नसुन मंत्राचा अर्थ आणि स्वरूप उमजणे अभिप्रेत आहे.
ऋषी शब्दाची आणखी एक सुटसुटीत आणि व्यावहारिक व्याख्या कात्यायन ऋषींच्या 'ऋग्वेद सर्वानुक्रमणी' या ग्रंथात येते. कात्यायन ऋषी सांगतात, 'यस्य वाक्यं स ऋषिः।’ अर्थात ज्याचे ते वाक्य (किंवा मंत्र) आहे, तो ऋषी. उदाहरणार्थ ऋग्वेदातील संवाद सूक्तांमध्ये (उदा. पुरुरवा-उर्वशी संवाद), जेव्हा उर्वशी बोलते तेव्हा त्या मंत्राची ऋषी 'उर्वशी' असते आणि जेव्हा पुरुरवा बोलतो तेव्हा 'पुरुरवा' ऋषी असतो.
देवता: आपण आज ज्या अर्थाने 'देवता' हा शब्द वापरतो (मूर्ती किंवा देव), ऋग्वेदात त्यापेक्षा व्यापक अर्थाने हा शब्द वापरला आहे. "यत्तेन उच्यते सा देवता" म्हणजे ज्या विषयाबद्दल ऋचेत किंवा सुक्तात सांगितले जाते, ती त्याची देवता. म्हणजेच, सूक्ताचा जो मुख्य प्रतिपाद्य विषय (Subject Matter) आहे, त्याला 'देवता' म्हणतात. ऋग्वेदात केवळ इंद्र, अग्नी, वरुण हेच देव नाहीत. जर एखाद्या सूक्तात 'ग्रावा' (सोमवल्ली कुटण्यासाठी वापरला जाणारा दगड) बद्दल वर्णन असेल, तर त्या सूक्ताची देवता 'ग्रावा' आहे. नदीसुक्तात नद्या देवता आहेत. इतकेच काय अक्षसुक्तात (जुगाराचे व्यसन लागलेल्या माणसाचे आत्मवृत्त) देवता आहे ‘अक्ष’ म्हणजे जुगार खेळताना वापरतात तो फासा! काही सूक्तांत 'श्रद्धा', 'मन्यू' (राग), 'वाक्' (वाणी) यांसारख्या अमूर्त संकल्पनांनाही देवता मानले आहे. थोडक्यात ऋषी ज्या विषयाला उद्देशून आपले विचार प्रकट करतात, ती शक्ती म्हणजे 'देवता'.
कवि: ऋग्वेदात कविचा अर्थ कविता करणारी व्यक्ती इतका मर्यादित नाही तर अतिशय भारदस्त आहे. कवी शब्द 'कव्' (वर्णन करणे) या धातूपासून बनला आहे. 'कवि' म्हणजे असा विद्वान ज्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचे ज्ञान आहे. "कवयः क्रांतदर्शिनः" अर्थात ज्याची दृष्टी काळाच्या आणि सृष्टीच्या पलीकडे जाते, तो कवी. त्यामुळे कवी हा केवळ प्रतिभावंत नसून तो 'पंडित' आहे. कवीजवळ 'धी' (शुद्ध बुद्धी) आणि 'मनीषा' (मनावर नियंत्रण ठेवून मिळवलेले ज्ञान) असते. ऋग्वेदात देवांनाही (विशेषतः अग्नी आणि इंद्राला) 'कवी' म्हटले आहे, कारण ते सर्वज्ञ आहेत.
वेदांचे अपौरुषेयत्व
ह्या तीन संज्ञा समजुन घेतल्यानंतर वेदांचे “अपौरुषेय” असणे समजुन घेणे सोपे होईल. भारतीय परंपरेत 'अहंकार' हा ज्ञानातील अडथळा मानला जातो. त्यामुळे ऋषी “ह्या सुक्ताची किंवा ऋचेची रचना मी केली आहे”, असे म्हणत नाहीत. कारण "हे माझे विचार आहेत," असे म्हणणे म्हणजे त्या विचारांना व्यक्तीच्या बुद्धीच्या मर्यादेत अडकवणे. ऋषी स्वतःला केवळ एक 'माध्यम' (Channel) मानतात. त्यांच्या मते ज्ञान विश्वात कायम असते, ऋषींची प्रज्ञा फक्त त्या ज्ञानाचा आविष्कार करते. ज्ञानाचे दोन मुख्य पैलू आहेत:
(१) शाश्वत ज्ञान: ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनने शोधण्यापूर्वीही अस्तित्वात होताच. त्याचप्रमाणे, सृष्टीचे नियम (ऋत) आणि आध्यात्मिक सत्ये ही मानवाच्या जन्मापूर्वीही होती आणि नंतरही राहतील. या अर्थाने वेद 'अपौरुषेय' आहेत.
(२) मानवी दोषांपासून मुक्ती: मानवी बुद्धीला भ्रम, प्रमाद (चूक), विप्रलिप्सा (फसवण्याची इच्छा) आणि करणापाटव (इंद्रियांच्या मर्यादा) हे चार दोष असतात. वेद 'अपौरुषेय' आहेत म्हणजे वेदांमधील ज्ञान या मानवी दोषांच्या पलीकडचे असे त्रिकालाबाधित सत्य आहे.
थोडक्यात, ज्ञानाचे दोन स्तर असतात, अनुभुती (perception) आणि अभिव्यक्ती (expression). ह्यातील अनुभव अपौरुषेय आहे पण अभिव्यक्ती नाही. त्यामुळे अनुभव शब्दांत मांडताना वापरलेली शैली, भाषा आणि व्याकरण ह्यांच्या प्रकटीकरणाला ऋषीचे नाव दिले जाते. भारतीय आणि पाश्चात्त्य दृष्टिकोनातला मूलभूत फरक ह्यातुन स्पष्ट होतो. पाश्चात्य दृष्टिकोनात एखाद्या ग्रंथाचा लेखक असणे हे अभिमानास्पद मानले जाते. ह्याउलट भारतीय (वैदिक) दृष्टिकोनात सत्याचा केवळ 'द्रष्टा' असणे ही अधिक सन्मानाची गोष्ट मानली जाते. कारण लेखकाला मर्यादा असते, पण द्रष्टा हा अमर्याद सत्याचा साक्षीदार असतो.
ऋग्वेदातील मंडल # २ ते ७ ह्यांना वंशमंडले म्हंटले जाते. म्हणजे एकाच कुटुंबातील (clan/community ह्या अर्थाने) व्यक्तींनी रचलेली सुक्ते ज्यात समाविष्ट आहेत अशी मंडले. आपण मागील भागात पाहिले की ६, ३, ७ आणि २ ही मंडले (ह्याच क्रमाने) सगळ्यात आधी रचण्यात आली. त्यामध्ये काय आहे ते आता बघुया.
मंडल ६: भारद्वाज बार्हस्पत्य
अग्नि स्तुती
भारद्वाज ऋषी हे बृहस्पती चे पुत्र (किंवा शिष्य) आणि बृहस्पति हे अंगिरसांचे. म्हणजेच भारद्वाज हे अंगिरस कुलाशी संबंधित आहेत. अंगिरस हे ऋग्वेदातील सर्वात जुन्या ऋषींपैकी एक मानले जातात. भारद्वाज वारंवार आपल्या 'अंगिरस' पूर्वजांचा उल्लेख करतात. ऋग्वेदातील सगळ्या मंडलांची सुरुवात अग्नी स्तुती ने होते. अग्नी ची स्तुती करताना भारद्वाज ऋषिंनी अग्नीच्या 'अंगिरस्त्व' रूपावर (म्हणजेच अग्नीचे अत्यंत तेजस्वी आणि शुद्ध रूप) अधिक भर दिला आहे. भारद्वाज ऋषींच्या अग्नी स्तुती मधुन आपल्याला कळते की अथर्वन ऋषींनी अग्नी अरणीतून म्हणजे दोन लाकडांच्या घर्षणातून निर्माण करण्याची कला मानवाला दिली. भृगु ऋषींनी तो प्रज्वलित झालेला अग्नी मानवी वस्त्यांमध्ये आणला आणि घराघरात त्याची 'स्थापना' केली. अंगिरस ऋषींनी त्या अग्नीच्या साहाय्याने 'यज्ञ' ही संस्था उभी केली. त्यांनी अग्नीला 'हव्यवाह' म्हणजे देवांपर्यंत नैवेद्य नेणारा बनवले. अंगिरस अग्नीशी इतके एकरूप झाले की त्यांना 'अग्निरूप' मानले गेले. अंगिरस ऋषींना ऋग्वेदात 'अग्नीचे पुत्र' किंवा अग्नीशी सर्वात जवळचे नाते असलेले ऋषी मानले जाते.
अग्नि चे वर्णन करताना भारद्वाज ऋषी अग्नीच्या त्रिविध रुपांचाही उल्लेख करतात. ही त्रिविध रुपे म्हणजे अग्नी ची तीन वेगवेगळी रुपे: पृथ्वीवरील (यज्ञामध्ये किंवा स्वयंपाकघरात वापरला जाणारा) पार्थिव अग्नी, ढगांमध्ये चमकणारी वीज आणि आकाशात तळपणारा सूर्य. विशेष म्हणजे भारद्वाज ऋषी हा दृष्टांत देत आहेत. म्हणजेच त्या काळात ही सर्वांना माहीत असलेली वस्तुस्थिती आहे. वीज, सूर्य आणि अग्नी हे एकाच मूर्तिमान शक्तीचे आविष्कार आहेत, हा निष्कर्ष काढणाऱ्या लोकांचे निरीक्षण किती सुक्ष्म आणि त्यावरील अनुमान किती तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक असतील, विचार करा. ह्या सुक्ष्म निरीक्षणाचे आणि त्यावरुन काढलेल्या तर्क शुद्ध अनुमानाचे अनेक दाखले सहाव्या मंडलात आढळतात.
इंद्र स्तुती
इंद्राचे पुरंदर हे विशेषण भारद्वाज ऋषींनीच वापरले आहे. इंद्राच्या पराक्रमाचे वर्णन करताना भारद्वाज ऋषी सांगतात की, इंद्राने आपल्या शक्तीने शंबराचे ९९ किल्ले एकामागून एक उद्ध्वस्त केले (म्हणजे इंद्राच्या कृपेमुळे आम्हाला ते करणे शक्य झाले). इंद्राने ह्या किल्ल्यांच्या नाश करुन भरत कुलीन राजा दिवोदास अतिथिगव (अतिथींचा सत्कार करण्यासाठी गाई अर्पण करणारा) ह्याला विजय मिळवून दिला. भारद्वाज ऋषी हे दिवोदासाचे पुरोहित होते. इंद्राला प्रसन्न करुन घेण्यासाठी योग्य त्या यज्ञाचे नियोजन अर्थातच त्यांनी केले. हे किल्ले 'शारदीय' होते, असा उल्लेख सूक्तात येतो. मागील भागात आपण पाहिले त्याप्रमाणे, ते किल्ले म्हणजे नद्यांचे पाणी अडवण्यासाठी बांधलेले मजबूत बांध असावेत. कारण, इंद्राची प्रार्थना करताना भारद्वाज ऋषी इंद्राला विनंती करतात की, “जल मिळावे म्हणून आम्ही तुला बोलवत आहोत.” तसेच वारंवार इंद्राने वृत्रासुराचा पाडाव करुन जलस्त्रोत मुक्त केले हा संदर्भही देतात. भारद्वाजांच्या वर्णनानुसार, हे किल्ले पर्वतांच्या शिखरांवर किंवा दुर्गम भागात होते. भारद्वाज ऋषी इंद्राच्या असीम शक्तीचे वर्णन करताना म्हणतात की, इंद्राने जेव्हा 'वज्र' उगारले, तेव्हा पृथ्वी आणि आकाशही हादरले. त्याने किल्ल्यांचे अडथळे दूर करून नद्यांना मार्ग मोकळा करून दिला.
इंद्राला आवाहन करताना भारद्वाज (आपल्या दृष्टीने) महत्वाचा संदर्भ देतात. ते म्हणतात, इंद्र जसा नहुषाचा पुत्र ययाती याचे ऐकत असे (त्याला प्रसन्न होत असे), तसाच आमचेही ऐको आणि आमच्या प्रार्थनेला स्वीकारो. तसेच काही ठिकाणी ययातीच्या मुलांचा (पुरु, यदु, तुर्वशु इ.) उल्लेख येतो. ह्यावरुन दोन गोष्टी स्पष्ट होतात, एक म्हणजे ऋग्वेदाच्या ६ व्या मंडलाच्या निर्मितीवेळी ययाती हा वर्तमान काळातील किंवा नजीकच्या भुतकाळातील एक प्रसिद्ध राजा होता. दुसरे म्हणजे वि.स.खांडेकरांच्या ‘ययाती’ कादंबरीत जी ययातीची प्रतिमा आहे त्यापेक्षा अगदी उलट अशी प्रतिमा त्या काळात लोकांच्या मनात होती. भारद्वाजांच्या वर्णनावरून असे जाणवते की ययाती एक महान 'यज्ञकर्ता' होता. त्याने इंद्राला इतके प्रसन्न केले होते की, इंद्र त्याच्या हाकेला ओ देऊन धावून जात असे. ययातीचे राज्य हे 'आदर्श वैदिक राज्य' मानले जाई, जिथे यज्ञ आणि धर्म यांचा संगम होता. इथे एक अवांतर पण महत्वाचा संदर्भ म्हणजे ययातीची मुलगी दृषद्वती (माधवी), हिचे विवाह प्रत्येकी २०० श्यामकर्णी अश्वांच्या बदल्यात ज्या तीन राजांशी झाले त्यांच्या पैकी एक काशीचा राजा दिवोदास होता. त्याला आणि माधवीला प्रतर्दन नावाचा पुत्र झाला. दिवोदास आणि प्रतर्दन ह्यांच्या पराक्रमाबद्दलचे गौरवोद्गार नंतरच्या मंडलात येतात. अर्थात माधवीचा पती हाच अतिथिगव दिवोदास का त्याचा पुर्वज ह्या बद्दल खात्रीने सांगता येत नाही.
शंबर हा दस्युंचा राजा होता. हे दस्यु किंवा दास नेमके कोण होते ते नीटसं स्पष्ट होत नाही पण त्यांचे वर्णन केवळ शत्रू म्हणून नाही, तर एका 'वेगळ्या जीवनशैलीचे' लोक म्हणून केले आहे. भारद्वाज त्यांच्या साठी खालील विशेषणे वापरतात.’अव्रत’ म्हणजे 'व्रत' (वैदिक नियम/विधी) न पाळणारे, ‘अमानुष’ म्हणजे ज्यांचे रीतीरिवाज (वैदिक समाजाच्या तुलनेत) मानवी वाटत नाहीत आणि ‘अक्रतु’ म्हणजे यज्ञ न करणारे. दस्युंकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती किंवा गाई होत्या, ज्या त्यांनी लपवून ठेवल्या होत्या, असाही संदर्भ येतो. त्यामुळे हे संघर्ष केवळ धार्मिक नव्हते, तर संसाधनांवरून (गाई आणि जमीन) झालेले संघर्ष होते असे दिसते. सहाव्या मंडलात ह्या संघर्षाचे स्वरूप मुख्यतः बचावात्मक (defensive) म्हणजे इतरांनी केलेल्या आक्रमणापासून संरक्षण अशा स्वरूपाचे आहे.
भारद्वाज ऋषी आणखी एका युद्धाचा संदर्भ देतात. यात अभ्यावर्तिन चयमान या राजाने 'वरशिख' याच्या पुत्रांचा पराभव केला. हे युद्ध 'हरियुपिया' नावाच्या गावात/शहरात झाले असा उल्लेख येतो. हे हरियुपिया म्हणजेच हडप्पा असावे असे काही तज्ञांचे मत आहे. अभ्यावर्तिन चयमान हा राजा 'पार्थव' कुळातील होता. त्याला भरत कुलाचा समर्थक मानले जाते. वरशिख हा विरोधी टोळीचा प्रमुख होता. त्याच्या पुत्रांनी आणि सैन्याने अभ्यावर्तिन चयमानच्या राज्यावर आक्रमण केले होते. वृचीवन्त हे वरशिखाच्या बाजूने लढणाऱ्या सैन्यप्रमुखाचे नाव असावे. भारद्वाज ऋषी सांगतात की, इंद्राने अभ्यावर्तिन चयमानच्या बाजूने उभे राहून वरशिखाच्या सैन्याचा नाश केला. अर्थातच त्यासाठी इंद्राला प्रसन्न करुन घेण्याचे कौशल्य भारद्वाज ऋषींचे! ह्याच सुक्तात 'यव्यवती' नदीचा उल्लेख येतो. जिच्या काठावर वरशिखाच्या 'वृचीवन्तः' सैन्याचा पराभव झाला. काही संशोधकांच्या मते यव्यवती नदी म्हणजे आजची झोब (Zhob) नदी असावी, जी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानाच्या सीमावर्ती भागात (गोमल नदीच्या दक्षिण भागात) वाहते. या भौगोलिक खुणांवरून असे लक्षात येते की, हा संघर्ष प्रामुख्याने आजच्या पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांताच्या (North-West Frontier) आसपासच्या मैदानी प्रदेशात झाला होता. सूक्तानुसार, वरशिखाचे सैन्य इतके मोठ्या संख्येने होते की त्यांच्या विनाशाचे वर्णन करण्यासाठी 'शता’ (शेकडो ह्या अर्थाने) हा शब्द वापरला आहे. त्यांच्या रथांचा आणि सैनिकांचा मोठा संहार झाला, ज्यामुळे अभ्यावर्तिन चयमानचे वर्चस्व प्रस्थापित झाले. युद्धातील विजयानंतर अभ्यावर्तिन चयमानने भारद्वाज ऋषींना मोठे दान दिले, ज्याचे वर्णन शेवटच्या ऋचांमध्ये येते. त्याने २० गाई, दोन रथ आणि सोन्याने मढवलेल्या दासी ऋषींना अर्पण केल्या. यावरून राजा-पुरोहित ह्यांच्या मधील सुरुवातीला असलेले नाते स्पष्ट होते: राजा विजयासाठी ऋषींचे आशीर्वाद घेतो आणि विजयानंतर कृतज्ञता म्हणून दान देतो.
पुषन् स्तुती
सहाव्या मंडलातील सुक्ते प्रामुख्याने इंद्र आणि अग्नि स्तुती साठी असली तरी सहाव्या मंडलात इतर देवतांची स्तुती देखील आढळते ज्यात प्रामुख्याने वैश्वदेव (निसर्गातील शक्ती ज्यामध्ये अग्नी, आकाश, सूर्य पृथ्वी आणि नद्यांचा ही समावेश होतो) आणि पुषन ह्यांचा समावेश आहे. ‘पुषन’ हा बहुदा भारद्वाज ऋषींचा आवडता देव होता किंवा भारद्वाज कुलाची ती कुलदेवता असावी. ऋग्वेदातील पुषन वर असलेल्या दहा सुक्तांपैकी पाच ही भारद्वाज ऋषींनी सहाव्या मंडलात रचलेली सुक्ते आहेत. इतर मंडलात पुषनचा त्रोटक उल्लेख आढळतो. पुषन हा अन्नाचे पोषण करणारा, हरवलेल्या गाई शोधून देणारा आणि प्रवाशांना योग्य दिशेचे मार्गदर्शन करणारा देव होता असे दिसते. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पुषन हा इंद्र, अग्नी इ. देवांप्रमाणे सोमपान करणारा देव नाही. भारद्वाज ऋषी त्याचा उल्लेख ‘करंभभाद’ म्हणजे करंभ भक्षण करणारा असा करतात. करंभ हा प्रामुख्याने भाजलेले जव (Barley) आणि दही किंवा तूप यांच्या मिश्रणातून तयार केलेला पदार्थ होता. आजच्या भाषेत सांगायचे तर, करंभ म्हणजे भाजलेल्या पिठापासून तयार केलेली 'लापशी' किंवा 'लाडू' होते. म्हणजे इंस्टंट फुड होते. प्रवासी किंवा शेतात काम करणाऱ्यांसाठी करंभासारखे पौष्टिक आणि टिकाऊ अन्न हा एक व्यावहारिक पर्याय होता. त्यामुळे तो त्यांच्या देवाचा आवडता नैवेद्य होता.
ह्या पुषन् देवाला भारद्वाज विनंती करतात की, "पणींच्या हृदयाला आर (गुराख्यांचे उपकरण) टोच, जेणेकरून. त्यांचे मन मृदू होइल, आणि ते गरीब (पुरोहितांना) धन देतील!” पणी म्हणजे व्यापारी जे काहीसे hedonistic आणि वैदिक संस्कृती न मानणारे लोक होते असे दिसते. भारद्वाज ऋषींनी पणींचे वर्णन अत्यंत 'लोभी' आणि 'यज्ञ न करणारे' (अग्रथीत) लोक असे केले आहे. त्यांनी आधीच्या सुक्तात अग्नी ला विनंती केली आहे की त्याने पणींनी लपवून ठेवलेले धन किंवा गाई ऋषींना मिळवून द्याव्यात. पणींसारख्या लोभी व्यक्तींपासुन आमचे रक्षण कर अशी प्रार्थना भारद्वाज ऋषींनी विश्वेदेवांकडे पण केली आहे. एकंदरीत पणी हे वैदिक पुरोहितांना जड जाणारे लोक असावेत असे दिसते. सहाव्या मंडलात 'ऋत' (Cosmic Order) या संकल्पनेवर खूप भर दिलेला आहे. भारद्वाजांच्या मते, निसर्गातील नियम पाळणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. ह्याच कल्पनेच्या विस्तार नंतरच्या मंडलात आढळतो. एकुणच निसर्गाबद्दल कृतज्ञता बाळगणारी, सुसंवादी (collectivist) अशी ही संस्कृती होती, असे म्हणता येईल. ह्या विचारधारेशी सहमत नसणारे काही समुह त्यावेळी आसपास होते, आणि त्यांच्याशी ह्यांचा वारंवार संघर्ष होत होता. त्यामुळे युद्ध हा जीवनशैली चा एक अपरिहार्य घटक होता.
‘अस्त्र-शस्त्र सुक्त’ हे सहाव्या मंडलातील शेवटचे सुक्त आहे. ह्यालाच ‘आयुध सुक्त’ असेही म्हणतात. ह्या सूक्तात शस्त्रांची स्तुती आणि युद्धात जाणाऱ्या राजासाठी आणि सैनिकांसाठी 'आशीर्वचन' आहे. ह्या सुक्तात धनुष्य, ज्या (धनुष्याची प्रत्यंचा), बाण (सुवर्णमुखी आणि लोहमुखी अशा दोन प्रकारचे, वेग आणि दिशा नियंत्रित करण्यासाठी पिसांचा वापर केलेले), इषुधि (बाणांचा भाता), वर्म (चिलखत) आणि हस्तघ्न (मनगटांवर घालण्याचे चामडी आवरण) इत्यादींचे वर्णन येते. त्याचबरोबर रथ, रथाचे चाक, त्यातील आरे, अक्ष, इत्यादींचेही वर्णन आहे. रथात बसलेला सारथी हा अत्यंत चतुर आणि कुशल असावा, असेही सुचवले आहे. एकुणात प्रगत युद्धशास्त्र आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान असण्याच्या टप्प्यावर ऋग्वेदाची सुरुवात होते.
पण संघर्ष होत असले तरी त्यांचे पर्यवसन कायमस्वरूपी दुफळीत झाले होते असे दिसत नाही. बाविसाव्या सुक्तातील दहाव्या कडव्यात असे म्हटले आहे की “हे इंद्रा, तु आम्हाला एकत्र केलेली विपुल संपत्ती दे. ह्या संपत्तीमुळेच तु ‘दासांना आर्य’ बनवलेस. त्याच्याच पुढच्या सुक्तात असा उल्लेख आहे की सोमपान करणारा इंद्र भक्तांचे, समर्थांचे, भ्यायलेल्यांचे आणि उत्साही दस्युंचे रक्षण करतो. एकंदरीत वैदिक आणि अवैदिक असे दोन्ही प्रकारचे लोक दोन्ही बाजूंनी लढत होते असा निष्कर्ष मी काढला. पंचेचाळीसाव्या सुक्तात तर ‘बृबु’ हे काहिसे चमत्कारिक नाव असलेल्या पणिंच्या बाजुच्या एका व्यक्तीचा गौरव केला आहे कारण त्याने भारद्वाजांना दान दिले. पणींच्या टोळीतील असूनही 'बृबु' याने दान दिले, हा उल्लेख हे सिद्ध करतो की संघर्ष टोळ्यांमध्ये होता, पण वैयक्तिक स्तरावर संवाद आणि आदरही होता.
समारोप
भटक्या टोळ्यांच्या कितीतरी पुढची अवस्था गाठलेल्या समाजाचे दर्शन सहाव्या मंडलातुन होते. पक्क्या घरात रहाणारे, समृद्धीची (अन्नधान्य, पशुधन, मुलेबाळे आणि दीर्घायुष्य) कामना करणारे आणि त्याचबरोबर सुक्ष्म निरिक्षण असणारे हे लोक होते. सत्तेचाळीसाव्या सुक्तात सोमपानाने काय काय फायदे होतात ह्याचे अतिशय मार्मिक वर्णन भारद्वाज ऋषिंचे पुत्र गर्ग ऋषींनी केले आहे. ते म्हणतात, “सोमरस प्यायल्यावर बोलायची स्फुर्ती येते, ह्यानेच उत्कृष्ट कल्पना स्फुरतात. थोडक्यात ह्या बुद्धिवर्धक सोमाने सगळे जग (आकाश, जमिन, पाणी, अन्न/औषधी वनस्पती, दिवस आणि रात्र असे पृथ्वीचे सहा भाग) निर्माण केले आहे. थोडक्यात सोम हा फक्त आनंद देत नाही तर तो मनीषा (बुद्धी/विचारशक्ती) जागृत करतो! तसेच एकेठिकाणी भारद्वाज ऋषींनी गायीचे दुध हे बलवर्धक आणि कांतिवर्धक आहे असेही निरिक्षण नोंदवले आहे.
एकुणच ‘भटक्या, न स्थिरावलेल्या टोळ्यांतील लोकांनी निसर्गाच्या भितीतुन रचलेल्या स्तुती पर कविता’, असे ऋग्वेदाचे वर्णन काही संशोधक करतात पण मला मात्र ह्याच्या अगदी विपरीत संदर्भ आढळले. मला सहाव्या मंडलातील समाज हा स्थिर, रहाण्यासाठी घरे बांधणारा, शेतीसाठी कायमस्वरूपी जलस्त्रोत उपलब्ध व्हावेत म्हणून प्रयत्नशील असलेला, पशुधन, आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुदृढ आणि कर्तृत्ववान संततीची कामना करणारा असा आढळला. मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, व्यावहारिक महत्वाकांक्षाच्या पलीकडे पाहु शकणारे लोक हे वैदिक समाजाचे वैचारिक नेतृत्व करत होते. अग्नी ची प्रार्थना करताना भारद्वाज ऋषी अग्निला विनंती करतात की आमचे पोषण करणारे अन्न हे पाप रहित मार्गाने मिळवलेले असो, आम्ही योग्य मार्गाने मिळवलेले यश हे सगळ्यांसाठी कल्याणकारी असो. ते पुढे असेही सांगतात की अग्नि ची उपासना करणाऱ्या आमचा नेता हिंसारहित, लोकांचे रक्षण करणारा आणि सगळ्यांना समजून घेणारा असो. हे वाचल्यावर असे वाटत नाही का की एक समाज म्हणून आपण आज आहोत त्या पेक्षा कितीतरी उन्नत आणि प्रगल्भ वैदिक समाज होता? भारद्वाज पुत्र गर्ग ऋषी म्हणतात, “इंद्राने स्वतःच्या इच्छेने अनेक रुपे घेऊन सगळीकडे उपस्थित असतो.” एकच परमेश्वर प्रत्येकाच्या शरीरात वास करतो. मुळ तत्व एकच असुन त्यापासून हा सृष्टीचा पसारा निर्माण झाला आहे. ह्या वेदांतातील तत्वज्ञानाचे अस्तित्व अगदी सुरुवातीपासून जाणवते.
भारद्वाज कुलाने जो वैचारिक किंवा बौद्धिक पाया रचला, त्यावर पुढच्या काळातील विश्वामित्र, वशिष्ठ इ. ऋषींनी वैदिक संस्कृतीची इमारत उभी केली. ज्या 'मनीषा' किंवा बुद्धीचा उल्लेख आपण इथे पाहिला, तिला 'गायत्री' मंत्राच्या माध्यमातून वैश्विक रूप कसे मिळाले? हे आपण पुढील भागात पाहूयात.
