नेपाळी चुकौनी

पुण्यात सध्या ऊन 'मी' म्हणत नाहीये तर हॉ हॉ हॉ असे भयानक राक्षसी हसत 'आम्ही' म्हणतंय! अक्षरशः होरपळून घरी आल्यावर गॅसजवळ काही करण्याची किंवा पोळी भाजी खाण्याचीही इच्छा होत नव्हती तेव्हा ही व्हायरल रेसिपी आठवली. केली आणि चक्क आवडली! थोडंच साहित्य असल्याने अगदी पटकन होते.

साहित्यः
दही - २ वाट्या (आमटीची वाटी)
उकडलेले बटाटे - मोठे दोन
कांदा - मोठा १
कोथिंबीर - मुठभर चिरलेली
एकेक टी स्पूनः लाल मिरची पूड, जिरेपूड, आमचूर पावडर,
मीठ चवीनुसार

फोडणीसाठी:
तेल - २ टेबलस्पून
कसूरी मेथी - चिमूटभर
लाल मिरची - एक अक्खी
हिरवी मिरची - २ बारीक तुकडे करून
हळद - चिमूटभर

कृती:
१. मोठ्या बोल/कुंड्यामधे दही थोडं पाणी घालून फेटून घ्या, त्यात एकेक टी स्पूनः लाल मिरची पूड, जिरेपूड, आमचूर पावडर, मीठ घालून नीट मिसळा.
२. त्यात उभा पातळ चिरलेला कांदा, बारीक तुकडे केलेले बटाटे (उकडलेले) आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळा.
३. तडका पॅनमध्ये तेल घालून वर दिलेल्या साहित्याची फोडणी करा आणि चुकौनीवर ओतून व्यवस्थित एकत्र करा.

चुकौनी तयार!! भाताबरोबर छान लागते, पोळीबरोबरही चालते. ब्रेडला लावून सँडविच म्हणूनही छान लागते. नक्की करून बघा.

img-20260519-wa0003.jpg

ह्याचा आकार कढईसारखा असला तरी तो निम्म्या आकाराचा कुंडा आहे. :)

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.