मटकीची डाळ आणली होती आमट्यांचे व्हेरिएशन व्हावे म्हणून.
एका प्रदर्शनात मस्त कांदा लसूण मसाला मिळाला. तो एका सुंदर ऑलिव्स च्या बाटलीत काढून ठेवलाय. त्यामुळे तो ड्रॉवर उघडला की दिसतो आणि सारखा वापर करू वाटतो.
परवा मटकीची डाळ दिसली आणि अचानक झणझणीत सोलापुरी डाळ कांद्याची आठवण झाली.
मग काय केला लगेच.
मटकीची डाळ
चिरलेला कांदा
चिरलेला टोमॅटो
आलं लसूण पेस्ट
लाल तिखट
हिंग
अजून थोडा नुसता अर्धवट कुटलेला लसूण
कढीपत्ता
सुक्या लाल मिरच्या
कांदा लसूण मसाला
सुकं खोबरं
कोथिंबीर
फोडणीचे साहित्य
मीठ
तेल
मटकीची डाळ तासभर आधी भिजत घालून ठेवा.
जास्त तेलाची फोडणी करून त्यात आलं लसूण पेस्ट परता. हळद, लाल तिखट घालून लगेच भरपूर चिरलेला कांदा घालून परता.
हळद आणि लाल तिखट कांद्यावर घातलं तरी चालेल .
मग भिजवलेली मटकीची डाळ घाला थोड्या पाण्यासकट.
झाकण ठेवून शिजू द्या. एकीकडे थोडं पाणी गरम करत ठेवा. एका वाफेनंतर कांदा लसूण मसाला, अर्धवट कुटलेला लसूण घालून थोडं गरम पाणी घाला. पुन्हा झाकण ठेवून शिजवा. शिजेपर्यंत अधून मधून झाकण काढून परतून लागेल तसं थोडं गरम पाणी घालत रहा. शिजत आलं की टोमॅटो घालून दोन तीन मिनिटं होऊ दे.
गरम पाणी फक्त शिजण्यापुरतं आणि डाळकांदा कढईला लागू नये म्हणून घालायचं आहे. पाणी खूप नकोय नाहीतर आमटी होईल. डाळ न करपता शिजणे यासाठी पाणी.
मीठ घालून ढवळा. आच बंद करून तसंच झाकून ठेवा.
अजून एक फोडणी करा हिंग आणि सुक्या लाल मिरच्यांची.
वरून ही फोडणी आणि खोबरं , कोथिंबीर घाला आणि दोन मिनिटं झाकण ठेवा. आच बंद असली तरी फोडणी आत मुरेल.
टिपा :
१. वाचायला जास्त वाटलं तरी पटकन होतो हा डाळ कांदा. मटकीची डाळ लगेच शिजते.
२. प्रमाण मुद्दाम दिलं नाही कारण सगळं कमी जास्त चालतं. भरपूर कांदा , भरपूर तिखट, भरपूर तेल आणि भरपूSSSSSSर लसूण हे सोलापुरी डाळ कांद्याचे वैशिष्ट्य.
आपल्या भरपूरच्या आयडिया नुसार जिन्नस घेऊ शकता.
३. अर्धवट कुटलेला लसूण शेवटच्या फोडणीतही चांगला लागेल.
४. खरंतर फोडणी म्हटलं की काय घालायचं ते माहिती असतं तरी आमच्या नववधूला सांगावं लागतं तसं इथं पण सांगते. सुरवातीच्या फोडणीत फक्त मोहरी जिरं. शेवटच्या फोडणीत अजून हवी तर मोहरी जिरं प्रमाण बघून घाला. आणि आच बंद करून सुक्या मिरच्या आणि हिंग घाला.

फोटो : चॅटजिपिटी साभार.
