AI म्हणजे काय? एक साधं सोपं स्पष्टीकरण

radha.png

AI म्हणजे नक्की काय?

AI (Artificial Intelligence) म्हणजे संगणकाला माणसासारखा विचार, समज, निर्णय किंवा निर्मिती करण्याची क्षमता देण्याचा प्रयत्न. पूर्वी संगणकाला माणसाने प्रत्येक नियम सांगितला की संगणक त्या बरहुकूम काम करत असे

उदा.
ग्राहकाचे वय 18 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म स्वीकारा.

आता आपण सांगितलेल्या नियमात आपल्याकडून एखादी चूक झाली तरी संगणक तेच काम परत परत त्या चुकीच्या पद्धतीने करत असे पण आता ए आय मुळे आपण संगणकाला मानवी पद्धतीने विचार करायला शिकवतो आहोत

AI ची व्याख्या करायची झाली तर संगणकाला मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे विचार करायला शिकवणं म्हणजे AI

संगणकाला मानवी बुद्धीप्रमाणे विचार करायला शिकवण म्हणजे काय?

1 - पूर्वी संगणकाला फक्त संगणकाची भाषा समजत असे ‌- IT क्षेत्रातले लोक संगणकाची भाषा वापरून सॉफ्टवेअर लिहीत असत - आता संगणकाला तुझी माझी बोललेली भाषा ‌(मराठी इंग्लिश वगैरे) कळते

2- AI मध्ये संगणक हजारो-लाखो उदाहरणांमधून स्वतः पॅटर्न शिकतो
उदाहरण म्हणजे आपण संगणकाला शंभर कुत्र्यांची आणि शंभर मांजरांची चित्र भरवली तर यानंतर भरवलेलं चित्र कुत्र्याचं किंवा मांजराचं आहे का हे संगणक AI च्या मदतीने आपणहून ओळखू शकतो

3- भरपूर मोठा डेटा संगणकाला भरवला तर संगणक त्याचा अन्वय लावून स्वतः पुढचे काही अंदाज लावू शकतो -उदाहरण द्यायचं तर गेल्या काही वर्षात एअरपोर्ट मध्ये ज्या माणसांचे सिक्युरिटी चेक केले गेले आणि त्यातली जी माणसं चुकीच्या गोष्टी घेऊन जात होती त्यांचा डेटा AI ला भरवला तर चुकीचे पदार्थ घेऊन जाणाऱ्या माणसांना कसं ओळखावं याचे काही ठोकताळे किंवा अंदाज AI बांधू शकतो

3- आपल्याकडे एखादी खूप मोठी माहिती असलेलं काही कागदपत्र असेल तर त्याचा गोषवारा तयार करणे / एखाद्या मोठ्या चर्चेचं ट्रान्सस्क्रिप्ट AI ला भरवलं तर त्यातून त्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे संकलित करणे AI करू शकतो

ही केवळ काही उदाहरणे झाली

सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा असलेल्या AI चा प्रकार म्हणजे genAI किंवा generative AI

जनरेटिव्ह एआय म्हणजे काय

generative AI ची व्याख्या करायची झाली तर - सर्वसामान्य भाषेत (मराठी/ इंग्लिश अशी सर्वसामान्य माणसाची भाषा) आपण संगणकाला काही काम सांगितलं तर त्याप्रमाणे तो नवीन माहिती तयार करू शकतो

नवीन माहिती म्हणजे काय

1 -नवीन मजकूर तयार करणे
AI शाप की वरदान या विषयावर साधारण बारा वर्षाचे मुंबई शहरात वाढलेले मूल लिहील अशा पद्धतीचानिबंध लिही - अशी सूचना आपण संगणकाला दिली तर इंटरनेटवर AI विषयी काय माहिती आहे/ ती वाचून मुंबईत मोठे होणार बारा वर्षाचा मुलगा काय विचार करेल अशा पद्धतीने AI नवीन निबंध लिहून देईल -असा निबंध आत्तापर्यंत कुठेही लिहिलेला नसला तरी

2- हम्पीची देवळं समुद्रकिनाऱ्यावर आहेत असा विचार करून हम्पीच्या देवळात शेजारी समुद्रकिनाऱ्यावर राधा आणि कृष्ण फुटबॉल खेळत आहेत अशी कल्पना करून चित्र काढ अशी सूचना आपण याच शब्दात genAI ला दिली तर असं कल्पनाचित्र AI रेखाटू शकेल
3- याच पद्धतीने एखादा खोटा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप AI करू शकेल

मग जनरेटिव्ह एआय कशी वापरायची? GenAI (chatGPT किंवा genini वगैरे) आपल्यासाठी काय करू शकतात?

सोप्या शब्दात सांगायचं तर chatgpt/gemini हे जनरेटिव्ह ए आय वापरण्याचे सोपे प्रकार आहेत

1- आपल्या प्रश्नांची उत्तर देणे - आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे शोधायला chatGPT/gemini मदत करू शकतात - आता यात कोणताही प्रश्न असू शकतो - मुंबईतून दिल्लीला जायला किती फ्लाईट उपलब्ध आहेत/ आज मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे का/ महाराष्ट्रात नऊवारी साडी नेसण्याची प्रथा कधी सुरू झाली/ सध्या इजिप्तला फिरणं सुरक्षित आहे का असल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक कोणत्याही प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत होऊ शकते

2- नवीन मजकूर तयार करणे - हव्या असलेल्या विषयावर निबंध किंवा लेख लिहिणे / निबंध किंवा लेख लिहायला कोणते मुद्दे वापरावेत याचा आराखडा तयार करणे/ अमुक ठिकाणी फिरायचं आहे तर फिरण्यासाठी छानसा बेत बनवून देणे अशा प्रकारचा कोणताही मजकूर तयार होऊ शकतो

3- भाषांतर करणे
एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे - मात्र भाषांतराची कला अजून पूर्ण विकसित झालेली नाही अनेकदा गमतीजमती होतात त्यामुळे प्रत्येक शब्द तपासून बघणं गरजेचं आहे

4- माहितीचा सारांश किंवा गोषवारा सांगणे
एखाद्या मोठ्या कागदपत्रातला मजकूर समजावून घेऊन सारांश तयार करणे / आज काल मीटिंग झूम वर होतात - अशा मीटिंगचा ऑडिओ ट्रान्सस्क्रिप्ट किंवा चॅट ट्रान्सस्क्रिप्ट AI ला भरवला तर मीटिंगमध्ये बोलले गेलेले महत्त्वाचे मुद्दे संकलित करून Minutes of meeting तयार करणे

5- नवीन संकल्पना समजावून सांगायला मदत करणे - उदाहरण द्यायचं तर सध्या मी काही कारणाने JIRA टूल वापरायला शिकते आहे हे टूल कसं वापरायचं हे मी chatGPT च्या मदतीने शिकले - माझी लेख सध्या एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देणार आहे तिचा अभ्यास करताना डोळ्याच्या स्नायूंची रचना लक्षात राहण्यासाठी सोप्या शब्दात माहिती सांग अशा पद्धतीच्या सूचना चॅट जीपीटीला देते

AI च्या बाबतीतला एक मोठा धोका

AI च्या बाबतीतला एक मोठा धोका म्हणजे AI काही वेळेला धडधडीत चुका करतो -त्याला hallucinations असं म्हटलं जातं
त्यामुळे कुठच्याही बाबतीत AI वर शंभर टक्के अवलंबून राहता येईल एवढ्या प्रमाणात हे तंत्रज्ञान अजून विकसित झालेले नाही त्यामुळे AI ने दिलेली माहिती स्वतः वाचून विचार करून योग्य आहे की नाही ठरवणे हे माणसाचे काम आहे मशीनचे किंवा संगणकाचे नाही

सर्वसामान्य माणसाने जनरेटिव्ह एआय कशी वापरावी?

अनेकदा आपल्याला AI एखादी सूचना कशी द्यायची हे नीटपणे जमत नाही आणि त्यामुळे आपल्याला चुकीचं अयोग्य अपूर्ण किंवा गरजेपेक्षा जास्ती तपशील असलेलं उत्तर येतं

AI कडून हवे तसे आणि चांगल्या दर्जाचे उत्तर मिळण्यासाठी त्याला योग्य पद्धतीने प्रश्न किंवा सूचना देण्याची कला आणि शास्त्र यालाच prompt engineering म्हणतात
एक सोपं उदाहरण

समजा तुम्ही एका स्वयंपाक्याला फक्त एवढंच म्हणालात:
"बटाट्याची भाजी कशी बनवायची रेसिपी सांगा"

आता बटाट्याची कोणती भाजी - कितपत मसालेदार ? तिखट की कमी तिखट? किती जणांसाठी? काहीच स्पष्ट नाही.

पण जर तुम्ही म्हणालात:

"चार जणांसाठी कमी तिखट मराठी पद्धतीची बटाट्याची भाजी बनवायची आहे. कांदा-लसूण नको. ३० मिनिटांत तयार होईल अशी रेसिपी सांगा. काय घटक वापरू आणि काय पूर्वतयारी करायला लागेल ते स्पष्टपणे सांगा"

आता त्याला नेमकं काय हवं आहे ते समजेल आणि तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे उत्तर येईल

चांगल्या Prompt चे ५ भाग

1- भूमिका (Role) – AI ने कोणाच्या भूमिकेतून उत्तर द्यावे?
"तू उत्तम मराठी स्वयंपाक करणारी एक सुगरण बाई आहेस असा विचार करून पुढच्या प्रश्नाचे उत्तर दे."

2- काम (Task) – नेमकं काय करायचं?
"चार लोकांना पुरेल एवढी कमी तिखट विना कांदा लसूण अशी रेसिपी सांगा"

3- पार्श्वभूमी (Context) – कोणासाठी?
"स्वयंपाक करणारी व्यक्ती नवशिकी आहे तिला अनुभव नाही असं लक्षात घेऊन प्रत्येक पायरी विस्ताराने लिही"

3- स्वरूप (Format) – उत्तर कसं हवं?
"एकेक पायरी एकेका बुलेट पॉईंट मध्ये वेगळी लिही"

4- मर्यादा (Constraints) – काय टाळायचं?
"फार तांत्रिक शब्द वापरू नको. अंदाजाने जरा एवढं असे ढोबळ अंदाज नकोत प्रमाण अचूक लिही"

AI कुठे कुठे पसरणार आहे?

या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर सगळ्या क्षेत्रात असं आहे -अगदी खरं सांगायचं तर आपण या आधीपासूनच वापरत आहोत

सध्या आपण AI कुठे वापरतो

  • नेटफ्लिक्स आपल्याला यानंतर काय पाहायचं त्याची रेकमेंडेशन देते
  • घराच्या बाहेर असताना आपण स्मार्ट होम वापरून वॉशिंग मशीन सुरू करू शकतो
  • गुगल होम किंवा अलेक्सा बरीच काम सुकर करतात
  • एखाद्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम असेल तर गुगल मॅप पर्यायी रस्ता सुचवतो
  • आपला फोन वाजला की ज्याच्याकडून फोन येतोय तो spam नंबर असू शकतो असा अलर्ट जिओ देतो
  • एखादं नेहमीपेक्षा वेगळा खर्च क्रेडिट कार्डवर केला तर बँकेकडून खात्री करून घ्यायला फोन येतो

ही सगळी AI चीच उदाहरणं आहेत

तरीही केवळ वानगीदाखल खाली AI कोणत्या क्षेत्रात येऊ शकते याची काही उदाहरणे देते आहे -जवळपास कोणत्याही क्षेत्रात AI येणारच आहे याची खात्री पटवून देण्यासाठी ही उदाहरणे देते आहे

AI वापराच्या काही शक्यता

1. ऑफिसचे काम

ईमेल लिहिणे
PPT तयार करणे
Excel data विश्लेषण
Meeting notes बनवणे
रिपोर्ट तयार करणे
ही काम करण्यासाठी तासंतास लागत असत आता केवळ काही मिनिटात या गोष्टींचा बेसिक ड्राफ्ट किंवा आराखडा मिळतो मग आपण तो तपासून पुढे पाठवू शकतो

2. शिक्षण क्षेत्र

-नवीन संकल्पना समजावून सांगायला मदत करणे
-परीक्षेची तयारी करायला मदत करणं - अभ्यासक्रमानुसार काय प्रश्न येऊ शकतील असे प्रश्न तयार करून देणे आपण दिलेली उत्तर तपासून देणे
इतर भाषांमध्ये शैक्षणिक साहित्य आपल्या भाषेत भाषांतर करून आणणे
परीक्षेच्या काळात पटकन रिविजन व्हावी यासाठी नोट्स तयार करणे

3. वैद्यकीय क्षेत्र

AI डॉक्टरची जागा घेणार नाही.
पण
X-Ray पाहणे
MRI विश्लेषण
औषधांची माहिती
रोगाचा धोका ओळखणे

यात मोठी मदत करेल.

4. बँक

Fraud ओळखणे
Loan Risk assessment
Customer Service
गुंतवणुकीचे विश्लेषण

5. शेती

पाऊस अंदाज
पिकावरचे रोग ओळखणे/बदलत्या हवामानानुसार कोणत्या पिकांसाठी कोणत्या आजारांसाठी तयार राहायला हवं याचा अंदाज वर्तवणे
खत किती द्यायचे
उत्पादनाचा अंदाज

6. उद्योग

कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या मशीन चा डेटा अभ्यास करून मशीन कधी बंद पडेल/ मशीनची रेग्युलर मला पट्टी कधी करायला हवी याचा अंदाज दाखवणे?
Quality Check of factory produce
Robot Automatio

एजंटिक AI म्हणजे काय

आत्तापर्यंत आपण genAI किंवा जनरेटिक AI विषयी बोललो -अजून एक गोष्ट बोलली जाते ती म्हणजे एजंटिक AI - AI चे एजंट तयार करणे

हा प्रकार बहुदा थोडीफार तरी टेक्नॉलॉजी समजणाऱ्या इंजिनियर्स साठी असतो - अगदी नॉनटेकी लोकं हे काम करत नाहीत पण AI मुळे इंजिनियर्सच्या नोकरीवर का गदा येते आहे असा एक प्रश्न वारंवार विचारला जातो त्यासाठी हा भाग

जनरेटिव्ह AI केवळ माहिती तयार करते -वर दिलेल्या उदाहरणात आपण बॉसला उत्तर देण्यासाठी एक खरमरीत तरी संयमित ई-मेल लिहून घेतली होती -जनरेटिव्ह ए आय अशा ई-मेलचा मजकूर आपल्याला देऊन शांत बसेल

एजंटिक ए आय मात्र आपलं ईमेल उघडून बॉसची इमेल शोधून ती ईमेल पाठवून सुद्धा देऊ शकतो!

Agentic AI म्हणजे असे AI जे फक्त उत्तर देत नाही, तर एखादे उद्दिष्ट (Goal) दिल्यावर ते पूर्ण करण्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये स्वतः नियोजन करून कृती करू शकते.

म्हणजे तो विचार करतो → योजना बनवतो → आवश्यक कामे करतो → परिणाम तपासतो → गरज पडल्यास सुधारणा करतो.
उतू जाऊद्या धाग्यावर आऊटडोअरस (हे आत्ता लिहिता येत नाहीये) ने ॲमेझॉन वरच्या हेल्पचं उदाहरण दिलं आहे ते एजंटिक AI क्षेत्रात मोडेल

पूर्वी अशा पद्धतीचे प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर तयार करणं फारच गुंतागुंतीचं होतं - आता AI वापरून असे प्रोग्राम करणं तुलनात्मक दृष्ट्या सोपं होतं आहे -त्यामुळे रुटीन धबडशा काम करणाऱ्या एव्हरेज इंजिनियर्सच्या नोकरीवर गदा येते आहे मात्र AI विचार करून वापरू शकणाऱ्या इंजिनियर्स ची मागणी वाढत जाते

सामान्य माणसाने AI कडे कसे बघावे?

AI ला घाबरू नका.

त्याकडे Calculator किंवा Google सारखे नवीन साधन म्हणून बघा.

कॅल्क्युलेटर वापरल्यामुळे गणिताचे महत्त्व बदललं नाही पण गणिताचा अभ्यास करायची पद्धत नक्की बदलली

काही नोकऱ्या कालाबाद झाल्या पण काही नोकऱ्या नवीन निर्माण झाल्या

त्याचप्रमाणे AI वापरणं हा आपण आपली विचारक्षमता बंद ठेवायचा परवाना नाही तर AI वापरून आपण सध्या करत असलेलं काम जास्ती जलद जास्ती अचूक जास्ती चांगलं कसं करता येईल याचा विचार जे करतील त्यांच्या नोकऱ्या टिकतील... केवळ रुटीन पाट्या टाकणाऱ्या लोकांच्या नोकरी वर मात्र गदा येऊ शकते

सर्वसामान्य माणसाने काय कराव

रोज आवर्जून genAI वापरायला सुरुवात करा.

प्रत्येक दिवशी तुमच्या दैनंदिन वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यातील एक तरी प्रश्न genAI ला विचारा.
उदा.
1- माझ्यावर बॉसने काही चुकीची चिडचिड केली होती त्याची पार्श्वभूमी अमुक तमुक - मला बॉसला xyz हे उत्तर द्यायचं आहे - एक शांत संयमित तरीही थोडी खरमरीत अशी भाषा वापरून ईमेल ड्राफ्ट करून दे

2- पन्नाशीच्या घरातल्या दहा हजार पावलं चालू शकणाऱ्या दोन बायकांसाठी पाच रात्रीची हम्पी ट्रिप प्लॅन कर.

3- आमका तमका Excel Formula समजाव.

4- पाचवीतल्या मुलाला चक्रवाढ व्याज समजावून सांगायचं आहे - कसं सांगता येईल काही टिप्स दे

AI ला मदतनीस समजा.- निर्णय घेण्याचा अधिकार AI ला देऊ नका

AI अजून विकसित होते आहे, शिवाय AI हे मशीन आहे माणूस नाही - कोणताही निर्णय घेताना तुम्ही AI वापरला तरी निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे तुमची असते - कोणताही निर्णय घेताना ए आईने दिलेल्या सूचना किंवा निष्कर्षांवर विचार करून तारतम्य बाळगून त्यातल्या तपशिलांची खात्री करून घेऊन मग तुमचा ठाम निर्णय घेणं हे तुमचं काम आहे. AI वर डोळे झाकून निर्णय ठेवू नका

AI ला प्रश्न विचारायला शिका.

AI ची गुणवत्ता बऱ्याच प्रमाणात आपण किती स्पष्ट प्रश्न विचारतो यावर अवलंबून असते. त्यामुळे यायला चांगले प्रश्न विचारायची कला आणि शास्त्र अर्थात prompt engineering शिकून घ्या - यात नावात जरी इंजीनियरिंग असलं तरी कोणत्याही टेक्नॉलॉजीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे आवर्जून लक्षात ठेवा - prompt engineering कुणालाही उत्तमरित्या शिकता येतं

नवीन साधने शिकत रहा.

आज ChatGPT/Gemini आहे.उद्या आणखी नवी साधने येतील.शिकण्याची सवय महत्त्वाची. ती सोडू नका

AI आणि गैरव्यवहार

AI वापरून अनेक गैरवहार होतात हे लक्षात ठेवा - अनेकदा AI वापरून आपल्या जवळच्या माणसाच्या आवाजात फोन केला जाऊ शकतो किंवा काही पूर्ण चुकीचा व्हिडिओ दाखवला जाऊ शकतो -असा काही ऑडिओ किंवा व्हिडिओ आपल्याकडे आला तर त्याची आधी खात्री तपासून घ्या - बँकेचे पासवर्ड ओटीपी वगैरे कोणालाही द्यायचे नसतात हे सर्वसामान्य इंटरनेट ज्ञान इथेही अपेक्षित आहेच

AI इंटरनेटवर आहे

कोणतीही माहिती जेव्हा आपण chatgpt किंवा gemini ला देतो तेव्हा ती इंटरनेटवर चुकून पसरण्याची शक्यता असतेच त्यामुळे आपली कोणती माहिती आपल्याला जगाला सांगायचे आहे आणि कोणती गोपनीय ठेवायची आहे याचं भान प्रश्न विचारताना ठेवायला हवं

कोणतीही माहिती खास करून व्यावसायिक माहिती देताना गोपनीयता कायदे compliance यांचा पूर्ण विचार करा

ता. क
हे चित्र मी chatgpt वापरून काढलं आहे -
हम्पीची देवळं समुद्रकिनाऱ्यावर आहेत असा विचार करून हम्पीच्या देवळात शेजारी समुद्रकिनाऱ्यावर राधा आणि कृष्ण फुटबॉल खेळत आहेत अशी कल्पना करून चित्र काढ - चित्र रेखाचित्र या स्वरूपात असू देत रेषा निळ्या रंगाच्या वापर

त्यासाठी असा prompt दिला होता - अर्थात मी काढलेलं चित्र असल्यामुळे त्याचे अधिकार माझ्याकडेच आहेत

वर
0 users have voted.