भारतात पक्षांच्या साधारणपणे १३०० ते १४०० प्रजाती आढळतात. त्यामुळे ऋतू कोणताही असो, पक्षीनिरिक्षक किंवा ती फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी वर्षभर काही ना काही संधी असतातच. महाराष्ट्रातच नाही तर भारतभर कुठे ना कुठे पक्षीनिरीक्षणाचा योग्य काळ असतोच.
आजकाल तर बऱ्याच जणांनी हाईड केल्या आहेत त्यामुळे अगदी कुठेच नाही आणि तिथे जरी गेलात तर काहीतरी मिळतंच. पुण्याजवळच्या सासवडच्या इथे असंच एकाने आपल्या शेताचा काही भाग पक्षांसाठी राखीव ठेवलाय. त्यावर तो कोणतीही किटकनाशकं वापरत नाही. बाजरीच्या हंगामात ती कोवळी कणसं खायला पक्षी येतात. बाकीही पक्षी असतात पण तिथलं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे ‘पिचु/भुंडा पोपट अर्थात Vernal Hanging Parrot’. भारतात दिसणारी एकमेव पॅरटची जात. मराठीत आपण सरसकट पोपट म्हणतो पण इंग्लिशमध्ये बाकीच्या सगळ्यांना पॅरॅकिट्स म्हणतात.
सगळे पॅरॅकिट्स हे पॅरट असतात पण सगळे पॅरट्स हे पॅरॅकिट्स नसतात. आता म्हणजे काय? तर भारतात दिसणाऱ्या पोपटांच्या बाकीच्या ज्या प्रजाती आहेत त्या सगळ्या पॅरॅकिट्स म्हणून ओळखल्या जातात. उदा- Rose-ringed Parakeet, Plum-headed Parakeet, Slaty-headed Parakeet, Alexandrine Parakeet इ. पॅरॅकिट्सनां रिबीनीसारखी लांब शेपटी असते तर पॅरट्स हे छोटी शेपटी असलेले व आकाराने छोटे असतात.
तर हा पिचु/भुंडा पोपट आकाराने अगदी १४-१५ सेंटिमीटर इतकाच असतो. खाताना त्याच्या उलटं लटकून खाण्याच्या लकबीमुळे त्याला हे नाव पडलं आहे. हिरवट पिवळसर रंगाच्या ह्या पक्षाच्या पंखाच्या अगदी खालची पिसं ही निळ्या रंगाची असतात. तसंच पाठीवर जिथे पंख मिटतात तिथे एक लाल रंगाचा भाग असतो. पंखाच्या आतल्या बाजूलाही निळसर झाक असते. नराच्या चोचीखाली एक निळ्या रंगाचा पॅच असतो. मादीमध्ये तो दिसून येत नाही. बाकीचे पोपट हे फळं किंवा बिया खाणारे असतात पण हे पोपट मात्र फुलांमधील मध, पराग व मऊ फळं खातात. त्यांची जीभ ही ब्रशच्या टोकासारखी असते ज्यामुळे त्यांना अनेक फुलांमधील मध घेता येतो.
ह्या पोपटांना बघण्याची आमची ही काही पहिली वेळ नव्हती. सप्टेंबर २०१८ साली एका मैत्रिणीच्या गावी कोकणात गेलो होतो. चांगला ४-५ दिवस रहायचा प्लॅन होता पण काहीच पक्षी दिसेनात म्हटल्यावर निराश होऊन परत जाऊया असं म्हणून ट्रेनचं बुकिंग बदललं. संध्याकाळी गावात एका ठिकाणी गेलो तिथे बाजरी लावली होती व त्या कणसांवर हे व्हर्नल हॅंगिंग व ठिपकेदार मुनिया (Scaly-breasted Munia) बागडत होत्या.
पहिल्यांदा या सासवडला गेलो ते २०२३ च्या ॲाक्टोबर महिन्यात. या पोपटांना बघायचा योग्य काळ हा जुलै ते सप्टेंबर आहे. त्यावर्षी आम्हांला जरी उशीर झाला तरी हे पोपट नाही तरी ‘युवराज/तुरेवाला भारीट’ (Crested Bunting) बघायला मिळाला. त्यांचे पिल्लांना खाणं भरवतानाचे फोटो मिळाले तसेच सुगरण (Baya Weaver) पक्षीही बघायला मिळाला. फेरी अगदीच फुकट नाही गेली.
युवराज/तुरेवाला भारीट (नर)

युवराज/तुरेवाला भारीट (मादी व पिल्लू)


सुगरण (नर, मादी व पिल्लू)


वेडा राघू (Green Bee Eater)

मागे एका ठिकाणी पक्षीनिरीक्षण करायला गेलो असताना अशीच एकीची ओळख झाली होती, गेल्या वर्षी ती भारतात आली असताना आग्रह केला म्हणून परत एकदा सासवडला ह्या पोपटांसाठी गेलो. मुंबईहून एका दिवसात जाऊन येणं फारच लांब पडतं. पहाटे ३ वाजता वगैरे आम्ही निघालो कारण ७.३० च्या आसपास पोचायचं होतं. पोचलो तेव्हा ॲक्टिव्हिटी सुरू झालीच होती. यावेळेचा शेताचा तुकडा मागच्या वेळेपेक्षा छोटाही होता आणि जागाही वेगळी होती. साधारण १० वाजेपर्यंत जमतील तसे फोटो काढले. अधेमधे पाऊसही हजेरी लावून जात होता. पिचु पोपटाखेरीज पांढऱ्या कंठाची मनोली किंवा माळमुनिया (Indian Silverbill), राखी वटवट्या(Ashy Prinia), सुगरण, पांढऱ्या ठिपक्यांचा नाचण (White-spotted Fantail) हे ही दिसले.





राखी वटवट्या(Ashy Prinia)

पांढऱ्या कंठाची मनोली किंवा माळमुनिया (Indian Silverbill)

पांढऱ्या ठिपक्यांचा नाचण (White-spotted Fantail)

उत्साहात फोटो जरा जास्तच टाकले गेले आहेत. तेवढं चालवून घ्या.
