अमेरिकेचा व्हिसा काढला त्याची एक टर्म (१० वर्ष) उलटून व्हिसा रिन्यूही झाला पण जायचा योग काही आला नव्हता. जाईन तेव्हा पानगळीच्या ऋतूत जाईन म्हणजे भरपूर फोटो काढता येतील असा माझा प्लॅन काही प्रत्यक्षात उतरला नव्हता. पण या वर्षी अचानक काही कारणाने ३ आठवड्यांसाठी जायचा योग आला.
त्याचं असं झालं की सायोची लिगामेंटची सर्जरी ठरली होती. तोवर डोक्यात काही विचार नव्हते पण एकदम तिच्या सर्जरीनंतर ती घरातलं सगळं कसं करणार? भारतात सगळ्या कामाला बाईची मदत मिळू शकते पण तिथे मिळालं तरी पूर्ण मदत नसेल हा विचार डोक्यातून जायचं नाव घेईना. बहिणींशी व सायोच्या नवऱ्याशी हे शेअर केल्यावर असं मत पडलं की कोणी गेलं मदतीला तर जरा बरं पडेल. व्हिसा होताच त्यामुळे फक्त तिकीट काढायचं होतं. त्याप्रमाणे तो ही सोपस्कार पार पडला. तिथे खूप थंडी होतीच आणि नंतर कळलं की ज्या दिवशी मी पोचणार होते त्याच दिवशी तिथे मोठं स्नो-स्टॅार्म येणार होतं. भारतातून माझी फ्लाईट रात्रीची होती. दुपारी काही कामासाठी लॅपटॅाप चालू करून मेल्स बघितल्या तर फ्लाईट कॅन्सल झाल्याची मेल आली होती. 🤦🏻♀️ बऱ्याच विचारांती ४-५ दिवसांनंतरची फ्लाईट बुक केली.
मला थंडी फार आवडते त्यामुळे थंडीच्या दिवसात जायची एक्साईटमेंट होती (कोकातकोका). आधीची फ्लाईट जी कॅन्सल झाली ती डायरेक्ट होती तर ही नवीन बुक केलेली एअर फ्रान्स होती. भारतातून वेळेत निघून पॅरीसला पोचले. पुढच्या फ्लाईटसाठी मधे दोन तास होते. पॅरीसला विमान पोचून उतरून बाहेर येईपर्यंत त्यातला एक तास गेला होता. सिक्युरिटी वगैरे सोपस्कार उरकून पुढच्या गेटवर पोचता पोचताच पॅरीस-नुवर्क फ्लाईट कॅन्सल झाल्याची शुभवार्ता कळली. मग इथे जा तिथे जा अशी बरीच टोलवाटोलवी करून झाल्यावर पुढच्या डेल्टाच्या फ्लाईटला बुक केल्याचा मेसेज आला व जीव भांड्यात पडला.
नमनाला घडाभर तेल ओतलंय याची कल्पना आहे. तर सगळं व्यवस्थित पार पडून मी सायोच्या घरी पोचले. जायचं ठरल्यावर मी इतक्या थंडीत पक्षी दिसतात कां याची चाचपणी केली होती. दिसतात तसे असं कळल्यावर माझा कॅमेरा बरोबर घेतला होता. सायोकडे पोचले तेव्हा रात्र झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळीकडे बर्फाने आच्छादलेलं दृश्य बघितलं. थंडी पण मजबूतच होती. संध्याकाळी असंच डेककडे बघत बसले असताना एक छोटा काळसर-पांढरा-ग्रे रंगाचा पक्षी बर्फात काहीतरी शोधून खात असलेला दिसला. आता आठवत नाही पण बहुधा फोटो काढून मर्लिनवर बघितलं असता तो Dark-eyed Junco आहे असं कळलं. मला एकदम हुरूपच आला आणि मग मी आणि आणि माझ्या कॅमेऱ्यानेतिथल्या डायनिंग टेबलवर जे बस्तान बसवलं ते अगदी यायच्या दिवसापर्यंत. सायोकडे नशिबाने पक्षांसाठी टाकायचं खाणं होतं. नंतरच्या दिवशी सकाळी आधी डेकवरचा बर्फ शॅावेल करून जाण्या-येण्यासाठी पायवाट केली व डेकच्या रेलिंगवर, बर्फात खाणं पसरून ठेवलं. मग काय……पक्षांनी हळू हळू हजेरी लावायला सुरूवात केली. माझ्यासाठी सगळेच लाईफर (पहिल्यांदाच बघत असलेले) असल्याने सगळेच स्पेशल होते.

आता पक्षांचे फोटो टाकते. नावं इंग्लिशमध्येच लिहीतेय.
सगळ्यात पहिला दिसलेला हा Dark-eyed Junco

जुन्कोच्या नंतर आला हा Northern Cardinal

नर लगेच आला असला तरी त्याच्या मादीने यायला बरेच दिवस घेतले.
Northern Cardinal Female

Black-capped Chickadee

Blue Jay


ह्याचा अटिट्यूड वेगळाच होता. फुल भाईगिरी करायचा. आला की बाकीच्या छोट्या पक्षांना उडवून लावायचा.
White-throated Sparrow

White-breasted Nuthatch

Carolina Wren

Tufted Titmouse

Northern Flicker

हा सुतारपक्षी फक्त एकदाच दिसला तो ही थोडा लांबच्या झाडावर. खाली काही उतरला नाही त्यामुळे फोटो तसा ओके ओकेच आहे.
गेल्याच्या दोनच दिवसांत लांब झाडावर एक मोठा पक्षी बसलेला दिसला. एक रेकॅार्ड शॅाट काढला पण चांगला फोटो काही मिळाला नाही.
Red-tailed Hawk

जगाच्या पाठीवर कुठेही जा, खार ही अशीच असते. दिवसभर उचापत्या करत राहायच्या नि खा खा खायचं. सायोकडे एक फीडर होता, त्यात पक्षांसाठी केक ठेवला व तो फीडर एका फांदीवर अडकवला. त्यावर पक्षीही येत होते. दुसऱ्या दिवशी बघितलं तर फीडर दिसेना. खाली जाऊन बघितलं तर फीडर बर्फात पडलेला आणि आतला केक गायब.
Eastern Gray Squirrel


Northern Mockingbird

Downy Woodpecker

Red-bellied Woodpecker

सुरूवातीला जे पक्षांचं खाणं होतं त्यात ड्रायफ्रूट्स होती. ते टाकल्यावर येणाऱ्या पक्षांची संख्या जास्त होती. ते खाणं बदलल्यावर आधी आलेल्या पक्षांमधले काही पक्षी येईनासे झाले.
अमेरिकेला गेल्यावर लगेच दोन दिवसांतच एका लेकवर गेलो. थंडीमुळे लेक पूर्ण गोठला होता. कायच्या काय थंडी होती. तापमान -१४ होतं आणि त्यात वारा. अंगावर कपड्यांचे ४ लेअर होते तरी थंडी मी म्हणत होती. हात हलवत राहिले नाही तर कडक होत होते आणि अशात आम्ही पक्षी बघायला बाहेर पडलेलो. पण वॅाक करणारी व रनिंग करणारी मंडळीही दिसत होती. त्या कोर्सवर दोन इंडियन बायका भेटल्या, हिमाचल प्रदेशातल्या होत्या. इथे मला तीन पक्षी दिसले. एक तर झाडाच्या खोडाशी इतका एकरूप झाला होता की पटकन लक्षातही येत नव्हता.

Song Sparrow

Brown Creeper

Ring-billed Gull

Red-shouldered Hawk

मला पक्षीनिरीक्षणाची आवड आहे हे कळल्यावर एक दिवस सायोची मैत्रिण दुपारी मला एका पार्कमध्ये घेऊन गेली. तिलाही तिथे कधीपासून जायचं होतं. सायोला बर्फात चालणं शक्य नसल्याने ती गाडीत बसून राहिली व आम्ही ट्रेलवर गेलो. सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली होती. आम्ही त्यातच चालत जरा कोणी दिसतंय कां बघत होतो.
तिथे एका फांदीवर House Finch बसला होता. बाकी नेहमीचे (?) दिसणारे पक्षी होते झाडांमध्ये. लांबून कॅनडा गूजचा थवा उडत जाताना बघितला. फोटो मिळणं काही शक्य नव्हतं. तिथे Northern Flicker चा एक फोटो मिळाला व अमेरिकेत सहज दिसणारा American Robin ही दिसला.
House Finch

American Robin

सकाळच्या कामांचा अंदाज घेऊन मी सायोच्या नेबरहूडमध्ये कॅमेरा घेऊन चक्कर मारायला बाहेर पडायचे, घराच्या आजूबाजूला येणाऱ्या पक्षांव्यतिरिक्त अजून कोणी दिसतंय कां हे बघायला. एक साधारण अर्धा तास वगैरे जायचा. सुरूवातीच्या एक-दोन दिवसांत मला ‘युरोपियन स्टार्लिंग्ज’ दिसले. पण जवळ जावं तर उडून जायचे. उंच झाडावर बसलेले फोटो काढले. निघायच्या दोन-तीन दिवस आधी चक्क डेकवर येऊन मला फोटो काढायची संधी दिली.
European Starling

असंच निघायच्या ४-५ दिवस आधी ‘Mourning Dove’ ही डेकवर भेटीला आली.
Mourning Dove

Turkey Vulture

अशा रितीने सायोच्या व पक्षांच्या सहवासातले ते रम्य तीन आठवडे कसे संपले ते कळलंच नाही पण खूप मजा आली.

ता.क.- फोटो डाऊनलोड करून जेव्हा लॅपटॅापवर पाहिले तेव्हा ते हलल्यासारखे वाटत होते व म्हणावे तितके शार्पही नव्हते. विचार केल्यावर असं वाटलं की थंडी व जोडीला वाराही असल्याने पक्षांची पिसंही हलत असणार व बहुधा मी ही हलत होते.
त्यामुळे कृपया चालवून घ्या.
