आरती - संत वॅलेंतिनची

आज एक जागतिक सण साजरा केला जातो. भारतातल्या लोकांनी या सणाचा वसा उशीरा का होईना मनोभावे घेतला आहे आणि तो दरवर्षी यथाशक्ती पार पाडत आहेत. या सणाचा देव, संत वॅलेंतिन याच्या आराधनेकरता खालील आरती तयार केली आहे. भक्तांनी / इच्छुकांनी या आरतीचा आनंद घ्यावा ही विनंती. आरतीतल्या चुका माझ्या, मात्र आरतीचा कर्ताकरविता तो संत वॅलेंतिन आहे याची मला नम्र जाणीव आहे.

जय देव, जय देव, वॅलेंतिनी संता, हो प्रेमाच्या संता
कृपा जगावरी आदि पासूनी अंता, जय देव जय देव ||

येता फेब्रुवारी १४ तारीख, जरी महिना बारीक
भेटवस्तूंचा हा वाहे महापूर
खास व्यक्तींकरता याद्याही होत अन खरेद्या होत
प्रेमीजनांनी भरले बाजार
जय देव जय देव ....||

लाल रंगावरी विशेष लोभ, हा कसला लोभ
लाल गुलाब अन लालच ड्रेस
लाल्या अन लालीचे ठरती बेत, डिटेलमध्ये नीट
सिनेमा, खाणे अन वरळी सी फेस
जय देव जय देव ....||

दैत्य काही जरी नाके मुरडिती, भक्तां हिणविती
तुमच्या कृपेने परि भक्त तरिती
तुमची आराधना देई अपार शक्ती, सुचवी युक्ती
प्रेमाचे प्रवासी ना कशास भिती
जय देव जय देव ....||

शाळा-कॉलेजांतूनी घेऊन सुट्टी किंवा मारूनी बुट्टी
जोड्याजोड्यांनी करती भटकंती
जन्मोजन्मींच्या शपथा घेती, वचने देती
तुम्हीच जाणे कितीजण ती निभविती
जय देव जय देव ....||

संचार तुमचा सर्वत्र असे, पवित्र असे
प्रेमापेक्षा थोर भावना नसे
प्रेमामुळे जगी सुखही लाभे अन शांतीही लाभे
मैत्री, विश्वासाचे विणले धागे
जय देव जय देव ....||

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle