आईची पैठणी !

माझ्या आईकडे अनेक वर्षे पैठणी नव्हती. तिला नेहमी वाटायचे  की आपल्याकडेही एक छानशी पैठणी असावी. तेव्हा सेमी-पैठण्या वगैरे बाजारात आल्या असल्या तरी पैठणीच्या पर्सेस, पिशव्या, ड्रेसेस, जाकिटे वगैरे सर्व कल्पनेपलीकडचे होते. पैठणी ही साडीच होती! तिला एक वेगळंच वलय होते. चांगल्या पैठण्या मध्यमवर्गीय कुटुंबांना अतिशय महाग वाटायच्या. अगदी आयुष्यात एकदाच घ्यायची, जपून ठेवायची, खास प्रसंगीच नेसायची आणि एखाद्या दागिन्यासारखी वारसा  म्हणून पुढच्या पिढीकडे सोपवायची, अशी ती साडी होती. पैठणी घेणे म्हणजे त्यासाठी खास तरतूद करणे, इतर खर्चांतून पैसे वाचवणे आणि मनातलं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट पाहणे होते.

मी लहान असल्यामुळे पैठणीचं महत्त्व, तिच्यामागची परंपरा किंवा तिचं सौंदर्य यांची मला फारशी जाणीव नव्हती. पण एक गोष्ट मात्र कळत होती — ही एक खूप महाग साडी आहे, ती आपल्या आईकडे नाही आणि अनेक वर्षांपासून तिला ती हवी आहे. एखादी गोष्ट आपल्याला हवी असणे आणि ती लगेच मिळू शकणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्या वयात समजत नव्हतं. तरीही त्यामुळे आईच्या मनात पैठणीविषयी असलेली ओढ मला जाणवत होती.

माझे आई-वडील दोघेही शिक्षक होते. घरात गरिबी नव्हती, पण अतिश्रीमंतीसुद्धा नव्हती. अशा परिस्थितीत स्वतःसाठी एखादी महागडी वस्तू घेण्याचा निर्णय सहज त्या काळात घेता येत नव्हता. त्यामुळे आईचे पैठणीचे स्वप्न बराच काळ अपूर्ण राहिले. पुढे मी साधारण आठवी-नववीत असताना भारत सरकारचा पाचवा वेतन आयोग लागू झाला आणि आई-वडिलांचे पगार बऱ्यापैकी वाढले. तेव्हा आईने बहुधा मनाशी ठरविले असावे की आता मात्र स्वतःसाठी एक चांगली पैठणी घ्यायचीच! मला नक्की माहीत नाही, पण तिने त्यासाठी बरेच दिवस थोडे थोडे पैसे बाजूला ठेवले असावेत.

त्यानंतरचा एक प्रसंग मला आजही आठवतो. येवल्यावरून एक विणकर घरी आले होते. त्यांच्याकडे निरनिराळ्या रंगांच्या आणि डिझाईन्सच्या पैठण्या होत्या. त्या सगळ्या साड्यांमधून आईने बैंगणी रंगाची, पदरावर मोर असलेली पैठणी निवडली. मला मात्र बैंगणी रंग अजिबात आवडत नव्हता. खरं तर वांगेच मुळी मला आवडत नसल्यामुळे त्या रंगाविषयीही माझ्या मनात काही विशेष प्रेम नव्हते! त्यामुळे इतके सुंदर रंग उपलब्ध असताना आईने हाच रंग का निवडला, हे मला काही केल्या समजत नव्हते. मी तिला विचारलंही, “आई, इतके छान रंग आहेत, मग तू हाच रंग का निवडलास?” तेव्हा तिने अगदी सहजपणे सांगितलं, “अगं, हाच पैठणीचा खरा रंग आहे आणि पदरावर मोर असणे हेसुद्धा अगदी पारंपरिक पैठणीचे लक्षण आहे”. साडी घेतानासुद्धा ती अगदी विचारपूर्वक घेत होती ह्याची जाणीव मला तेव्हा झाली. हळूहळू माझा त्या रंगाबद्दलचा आकससुद्धा कमी झाला. 

मध्यंतरी एकदा आई मला म्हणाली की तिच्या मागे तिच्या सगळ्या साड्या मी आणि माझ्या वाहिनीने वाटून घ्याव्यात. तेव्हा मी तिला सांगितलं, “मला तुझी एकही साडी नको. मला फक्त ही बैंगणी रंगाची पैठणी हवी आहे". माझ्याकडे माझ्या साखरपुड्याची हिरवी पैठणी आहे, भावाच्या लग्नातली निळी बांगडीमोर पैठणी आहे. प्रत्येक साडीला तिची स्वतःची आठवण आहे; पण आईच्या या पैठणीशी जोडलेली गोष्ट वेगळी आहे. ती माझ्या आयुष्यातील एखाद्या सोहळ्याची आठवण नाही, तर माझ्या आईच्या आयुष्यातील एका अपूर्ण इच्छेचं स्वप्नपूर्तीमध्ये झालेलं रूपांतर आहे.

माझ्या बोलण्यावर आई म्हणाली, “आत्ताच घेऊन जा!” ही पैठणी तिने बरीच वर्षं नेसली आहे. आता ती पूर्वीसारख्या भरजरी साड्या फारशा नेसत नाही. आईने बराच आग्रह केला म्हणून यंदाच्या भारतभेटीत मी ती पैठणी माझ्यासोबत घेऊन आले. इतकी वर्षं स्वतःजवळ जपलेली साडी सहजपणे मुलीला देताना तिच्या मनात काय भावना असतील, कोणास ठाऊक!! कदाचित तिलाही त्या साडीत स्वतःच्या आयुष्याचा एक भाग दिसत असेल. कदाचित आपल्या आवडत्या साडीला आपल्या लेकीच्या अंगावर पाहण्यात तिला एक वेगळंच समाधान मिळणार असेल. एकेकाळी स्वतःसाठी अनेक दिवस पैसे साठवून घेतलेली साडी आता आपल्या मुलीच्या आयुष्यातही तितकंच महत्त्वाचं स्थान मिळवते आहे, ही भावना तिच्यासाठीही खास असेल कदाचित. आईला खात्री आहे की मी तिची ही लाडकी साडी जपून वापरेन. तिचं रूप बदलून तिचा ड्रेस वगैरे शिवणार नाही! 

ही साडी माझ्या कपाटात ठेवताना मला केवळ एक सुंदर पैठणी मिळाल्याचा आनंद नव्हता. तर माझ्या आईच्या आयुष्यातील एक छोटासा, पण महत्त्वाचा भाग माझ्याकडे आला होता. तिच्या हातांनी निवडलेली, तिने अनेक वर्षं नेसलेली आणि तिच्या मनात विशेष स्थान असलेली ही साडी आता माझ्याकडे होती. तिच्या अंगावर शोभलेली साडी माझ्या अंगावरही तशीच शोभेल की नाही, हा प्रश्न माझ्या मनात नव्हता. कारण ह्या साडीचं सौंदर्य केवळ तिच्या रंगात किंवा नक्षीत नव्हतं तर ते तिच्याशी जोडलेल्या आठवणींत होतं.

लग्नाआधी मी ही साडी एकदा नेसले होती. पण यंदा दिवाळीच्या निमित्ताने ती नेसले, तेव्हा एक विलक्षण भावना मनात दाटून आली. क्षणभर असं वाटलं की मी पुन्हा लहान झाले आहे आणि आईच्या कुशीत जाऊन विसावले आहे. मी ही पैठणी नेसून आईला दाखवली, तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. तिच्यासाठी ही एक साडी असली तरी माझ्यासाठी मात्र ती आईच्या स्वप्नांची, कष्टांची आणि प्रेमाची ठेव आहे.

माझी आई अतिशय कष्टाळू, चिकाटीची, धडाडीची आणि सकारात्मक वृत्तीची स्त्री आहे. कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही तरी खचून न जाता ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणं, परिस्थितीचा स्वीकार करूनही आशावादी राहणं आणि योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं, हे गुण मी तिच्यात नेहमी पाहिले आहेत. आईने मला हे कदाचित कधी स्वतंत्रपणे शिकवलं नसेल; पण तिच्या जगण्यातून ती शिकवण मला मिळाली. आईच्या या सगळ्या गुणांपैकी एक दशांश गुण जरी माझ्यात आले, तरी मी स्वतःला धन्य मानेन!!

आईची बैंगणी पैठणी आता माझ्याकडे आहे, आणि तिच्याकडे पाहिलं मला आठवेल ती माझी आई!!!! माझ्यासाठी ही पैठणी म्हणजे आईच्या स्वप्नांचा वारसा आहे — आणि तो वारसा मी आयुष्यभर जपून ठेवू शकेन हीच इच्छा आहे.

Keywords: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.