मी चुकून तानसेनांच्या घरात आलेली मुलगी! :) माझी आई सही गाते! आणि तिला गाणं प्रचंड आवडते.. आमच्या घरातला ती रेडीओ आहे! :) इतका सतत चालू असतो तो, की मला बोलणं मुश्किल व्हायचे.. एखादा शब्द उच्चारला तरी आई त्यावरून गाणी आठवून म्हणू शकायची!
हाहा.. मी तिला नेहेमी चिडवते... "सारखी सांगत असतेस, तुमच्या लहानपणी टीव्ही, रेडीओ काही नसायचे.. कॉलेज होईपर्यंत पिक्चर बघितला नाही तुम्ही थेटरात! मग इतकी गाणी कशी माहीत, आणि ती पण तोंडपाठ!? "
आईचे उत्तर असायचे... "आमच्याकडे नव्हताच रेडीओ, समोरच्यांकडे होता !!" :)))
बाबांचाही आवाज अतिशय गोड! :) पण अर्थात त्यांना ताला-बिलात गायची कधी गरज वाटली नाही! :) तरीही मस्त वाटते बाबांचे गाणे ऐकायला.. बाबांच्या तोंडून "स्वरगंगेच्या काठावर.." किंवा " सुहानी रात.. ढल चुकी.. " वगैरे गाणी ऐकायला मस्त वाटते.. मी तर असं ऐकले होते.. की बालगंधर्व हे माझे लांबचे आजोबा का कोणीतरी लागतात.. तेव्हा ते गाणं थोडंफार आलं असावं त्यांच्या गळ्यात !
नवराही उत्तम गातो! म्हणजे शिकला वगैरे नसला तरी अचानक अमेरिकेत शिकायला आल्यावर त्याने युनिव्हर्सिटीमधे आयुष्यातलं पहीलं गाणं म्हटलं.. "कैसी है ये रुत.. " !! काहीतरी काय अरे? कधी गाणं शिकले वगैरे नसताना हे गाणं म्हणायचे? आणि ते ही भन्नाट सही?? हेहे.. सगळ्यांनी त्याला मग डोक्यावर घेतले.. आणि मग काय दर वर्षी दिवाळीत वगैरे युनि मधे याचे गाणं होणारच!
तर सांगायचा मुद्दा.. अशी परिस्थिती आणि अशी माणसं आसपास असताना मी अजुन एकदाही धड गाऊ शकले नाहीये... एकदाच... फक्त एकदाच नवर्याने आग्रह केला म्हणून गायले.. नंतर त्याने कधीच नाव काढले नाही! :)))
त्यामुळे मी तानसेन कधीच होऊ शकत नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे! :) पण कानसेन मात्र झाले...
परवा असंच आठवत होते.. की नक्की कधी पासून मी गाणी ऐकू लागले? आठवेचना!! म्हणजे इतका अविभाज्य भाग झाला की काय हा माझ्या आयुष्याचा? काय ते माहीत नाही ब्वॉ.. पण खूप लहानपणापासून ऐकतेय गाणी इतकं नक्की....
अगदी लहान... शाळेत असताना रंगोली,छायागीत वगैरेच्या कृपेने हिंदी गाणी कानावर पडतच होती! अर्थात, ती कानावर पडत होती.. मला ’काय’ ऐकू यायचे हा एक चिंतनीय विषय आहे! :))) (आता सांगायला हरकत नाही, मला अजुनही धड हिंदी येत नाही!! समोरचा हिंदी बोलू लागला की मी लिटरली ततपप करायला लागते! बम्बैया हिंदीही नाही हो! म्हणजे काय म्हणायचे आता... असो..) तर लहानपणी माझी फार मजा व्हायची! मला साधे साधे शब्दही कळायचे नाहीत... मी निरागसपणे विचारायचे, "मतलब, म्हणजे काय हो??"
बाकी ते हिंदी कम उर्दु शब्दांची तर बातच न्यारी !! मी लहानपणी काय पद्धतीने पिक्चर्स पाहीलेत मलाच माहीत.. एक वाक्य कळेल तर शप्पथ! :) गाणी पण मग असंच काहीतरी मनचं टाकून म्हणायची! लाला लिलि ला करत...
एकीकडे आई तिची आवडीची गाणी लावायचीच.. उदाहरणार्थ, खेड्यामधले घर कौलारू, घननीळा लडीवाळा, धुंद मधुमती किंवा एकदम शास्त्रीय नाहीतर नाट्य संगीत !! हे नाट्यसंगीताचे काय कळत नाही बुआ आपल्याला... त्याकाळी कोणी चांगला गीतकार मिळत नाही म्हणून हा संगीतप्रकार उदयास आला का?
नाही, एकच ओळ १७६० वेळा म्हणतात म्हणून हा प्रश्न... मला तर पुढची वेगळी ओळ ऐकू आली की मी टाळ्याच वाजवायचे..
एकदा आईनी मला आणि बाबांना संगीत मत्स्यगंधा या नाटकाला नेले... तसा बाबांना काय फरक नाही पडत.. खूष असतात ते अशा ठिकाणी यायला.. मस्त ३-४ तास एसी मधे झोप होते.. मधे बटाटावडा आणि चहा मिळतो.. अजुन काय पाहीजे ? त्यामुळे ते आले आनंदाने.. मी?? आधी जरा आईच्या धाकाने मन लावून पाहायला लागले नाटक... पुढच्या अर्ध्या तासात मी ही सहन न होऊन झोपून गेले..
इतके गंमतशीर प्रकार होत असताना.. हे सगळं कमी की काय, म्हणून मी दादाकडे मोर्चा वळवला... त्याच्यात-माझ्यात तसं ६-७ वर्षांचे अंतर.. त्यामुळे मी लहान असताना तो बर्यापैकी मोठा होता.. (माहीतीय, हे वाक्य फार कॉमेडी झालेय.. मला असं म्हणायचेय की मी ६-७ वीत असताना तो कॉलेजला होता.. )
तेव्हाच्या त्याच्या सगळ्या कॅसेट्स काहीतरी अगम्य गाण्यांनी भरून गेलेल्या असायच्या..
नंतर कळले की ती गाणी इंग्रजी या भाषेत आहेत ! तेव्हा मी अवाक झाले होते ! असं असतं इंग्लिश? मग मी काय शिकतेय शाळेत? ते इंग्लिश वापरून मी कधी या गाण्यांमधे काय म्हण्तायत ते ओळखू शकणार? ह्म... यालाही कारण आहे.. तेव्हा दादा नेमका मायकेल जॅक्सनचा फॅन होता ! एकच उदा: सांगते.. जॅम या त्याच्या गाण्याचे मी केलेले भाषांतर... " जॅम.. घे घे.. तू घे तू घे... घे... तू... , मला दे थोडा .. जॅम ! " LOL
पण कळत नसूनही मी त्या संगीताने खूप ओढले गेले त्या गाण्यांकडे.. तेव्हापासून अजुनही मी MJ ची मोठ्ठी फॅन आहे ! रादर असं म्हणेन की Mj च्या गाण्यांची फॅन आहे... बाकी तो , त्याचे पर्सनल लाईफ, आरोप गेले खड्ड्यात! गाणी, म्युझिक, बीट्स, काही गाण्यांचे शब्द, अफलातून आहेत !!
मग काय त्या कॅसेट्सची पारायणे करणे सुरूच झाले.. असंख्य वेळेला ऐकली ती सर्व गाणी.. पुढे शाळेत मानसी भेटली.. तेव्हा जॅक्सनच्या हेट क्लब मधेच भर असायची.. कोणी सापडायचेच नाही जॅक्सनची गाणी आवडणारा.. मात्र मानसीशी(माझ्या अतिशय जवळच्या स्पेशल मैत्रीणीशी) मैत्री झाली तीच जॅक्सनमुळे... (thanks MJ! )एकमेकींच्या कलेक्शन मुळे ती आवड निवड अजुनच वाढत गेली! डेंजरस, हिस्टरी, बॅड, थ्रिलर वगैरे... सगळ्या मैत्रिणींमधे आमचे वेगळं विश्व होतं!
८-९वी पर्यंत मग समजू लागले.. की आपल्याला गाणी ऐकायला भयंकर आवडतात.. मग तर सतत एम टीव्ही, व्ही टीव्ही , घरातल्या कॅसेट्स, इत्यादी चालूच असायचे.. आईबाबांमुळे अधुन मधुन जुनीही गाणी ऐकली.. पण तो काळ म्हणजे Teenager असल्याने आवडूनही न आवडल्यासारखे दाखवण्यातच वेळ जायचा!
तेव्हापासून असंख्य गाणी ऐकली.. शब्दांपेक्षा मी संगीतावर खूप प्रेम करते... मला अजुनही गाण्यात शब्दांपेक्षा त्यातील बीट्स, रिदम, किंवा एखादा सिंथ, गिटार किंवा तबल्याचा पीस जास्त आवडतो.. केवळ एखाद्या अशा पीस साठी मी ते आख्खं गाण कैक वेळा ऐकलंय... म्हणजे न आवडणारं गाणं असेल, मात्र तसा एखादा पीस असला की मी गाणं ऐकायचेच.. आणि तो विवक्षित(बरोबरे का हा शब्द! :O ) तुकडा वाजला की मला काय समाधान मिळायचे!
एनिग्माचे माझे प्रेम याचमुळे... वेड लावणारे अनेक तुकडे असतात त्यांच्या गाण्यात ! जगातील वेग वेगळ्या भागांतील संगीत, वाद्यं घेऊन संगीत तयार करणारा तो म्युझिकल ग्रुप ! का नाही आवड्णार ? टीएन्टी फॉर द ब्रेन अशा विचित्र नावाच्या गाण्यातला तबला वेड लावतो.. २०,००० माईल्स ओव्हर द सी या गाण्यातला एकन एक पीस... इन्व्हीझिबल लव्ह.. बियॉंड द इन्विझिबल... जाऊदे... त्यांची सगळीच गाणी...
अर्थात... सगळं गाणं त्यातल्या प्रत्येक वाद्याच्या तुकड्यासकट पाठ झालं की मग नक्कीच माझं लक्ष त्यातल्या शब्दांकडे जाते... :) अशी अर्थपूर्ण गाणीही आवडतात मला... पण तो प्रेफरंस नंतरचा! कानाला कसं वाटतंय़? ते पहीलं.... !
नक्की कशामुळे ठाऊक नाही... पण गेल्या ४-५ वर्षांत मी शास्त्रीय, नाट्य संगीतही एन्जॉय करू शकते.. रादर काही काही गाणी, राग मला फार आवडतात... जसराजांचा दरबारी कानडा मी ऐकला, आणि ऐकतच राहीले... त्यातले ते शिवानंद रूपम शिवोहम शिवोहम ऐकलं की इतकं प्रसन्न वाटते... तसेच नाट्य संगीतही... लाईव्ह ऐकले आणि जास्त आवडले... (या प्रांतात मात्र मला फार ऐकायचे आहे.. अजुन मी बालवाडीतही नाही आले.. )
मी हे सगळं असंबद्ध का लिहीत आहे माहीत नाही... पण अनेक दिवसांपासून माझं गाण्याचे वेड जरा कमी झाले आहे... कशाने कल्पना नाही, पण आजकाल पूर्वीइतकी प्रचंड प्रमाणात गाणीच ऐकली नाही जात आहेत.. ते पूर्वीचे मंतरलेले दिवस आठवून जरा बरं वाटलं! :) होपफुली परत तेव्हढ्याच दमाने मी गाणी ऐकू लागेन! :) किती सुंदर संगीत करून ठेवलंय जगात लोकांनी!? कधी होणार ऐकून काय माहीत !! :)