तसं बर्याच दिवसांनी नाटक पाहायला गेले होते. खरं तर मी नाटक सिनेमा कितीही पाहिले तरी त्याबद्दल फारसं लिहित नाही, पण ह्या नाटकाबद्दल जरा खासच वाटतय म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं.
"कुछ मिठा हो जाये" ह्या नाटकाने सुरुवात एका अभिनव जाहिरातीने केली. नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीत नेहमी अभिनेत्यांचे फोटो असतात पण ह्या नाटकाच्या पहिल्या काही जाहिरातींमध्ये त्यांनी नाटकाच्या लेखकांचे फोटो छापले. आणि ह्या संकल्पनेचं श्रेय निर्मात्याचं. निर्माता संतोष काणेकर आणि सहनिर्माती मोनिका धारणकर ह्यांचे समस्त लेखक मंडळींकडून आभार. त्यांनी लेखकांचा चेहरा पुढे आणला. मला वाटतं मराठी रंगभूमीवरचं, कदाचित भारतीय रंगभूमीवरचंही, हे पहिलंच नाटक असेल ज्याच्या पहिल्या काही जाहिरातींमध्ये केवळ लेखकांचे फोटो होते आणि हो, लेखकाचे नव्हे तर लेखकांचे.. ह्या नाटकाचे पाच लेखक आहेत.
पाच वेगवेगळ्या जॉनरच्या लेखकांनी एकत्र येऊन व्यवस्थित ठरवून मगच प्रेम ह्या संकल्पनेवर आधारित पाच नाट्यप्रवेश लिहिले आणि ह्या नाटकाद्वारे पुढे आणले आहे. असा हा प्रयोगही मला वाटतं मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला आहे. गणेश पंडित, शिरिष लाटकर, अंबर हडप, आशिष पाथरे आणि अभिजीत गुरु हे पाचही लेखक वेगवेगळ्या वयोगटामधलं, वेगवेगळ्या टप्प्यावरचं प्रेम अगदी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवतात.
ह्या पाचही नाट्यप्रवेशांना एकमेकांशी आणि प्रेक्षकांशी बांधून ठेवण्यासाठी दिग्दर्शक गणेश पंडित ह्यांनी फ्री फॉर्म वापरलाय. नाटकातले इन मिन चार कलाकार चिन्मय उद्गीरकर, केतकी चितळे, पूर्णिमा तळवलकर आणि अभिजीत चव्हाण प्रेक्षकांशी खूप सहजपणे संवाद साधत, ब्लॅक आऊट्स टाळत, पाचही नाट्यप्रवेशांना एकमेकांशी खूप छान जोडत नाटकाला पुढे घेऊन जातात. नाटकातले काही प्रसंग तर अरे, हे तर माझ्याही सोबत झालय अस्से गोडगोड.
ह्या नाटकातले संगीताचे तुकडे गोडगोड आणि आपणही थिरकावं अशी वाटणारी छोटी छोटी नृत्य गोडगोड आणि त्यासोबत प्रेम ह्या गोडव्याला हवं असणारं ताजंतवानं नेपथ्य आणि प्रकाशयोजना.
मुळात नाटक आहे प्रेम ह्या विषयावर आणि नाटकाचं नावही आहे कुछ मिठा हो जाये, पण ह्या गोडव्याची विटी नाही येत तोंडाला.
एखाद्या सुगरणीने मैदा, तूप, साखर, दूध आणि खायचा रंग अगदी योग्य प्रमाणात घेऊन आपल्या कुशल हातांनी गुलाबाचे चिरोटे बनवावेत आणि ते योग्य तापमानावर तापलेल्या तेलात तळावेत आणि त्यावर बदाम पिस्ता काजू किसून घालावेत तसं हे नाटक. चिरोटा मोडून खाताना त्याचा खुसखुशीतपणा आवडावा आणि त्या चिरोट्याचा एक एक पदर जिभेवर विरघळताना त्यातला हलका गोडवा जाणवावा आणि बदाम पिस्ता काजूने एक श्रीमंती थाट यावा तसं हे नाटक. लेखकांची परफेक्ट रेसिपी, दिग्दर्शकाने घेतलेली तळण्याची मेह्नत आणि संगीत नृत्य नेपथ्य आणि प्रकाशयोजना ह्यांचा ड्रायफ्रुट्सवाला श्रीमंती बाज.
हा चिरोटा खाल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला त्यातली गम्मत. तो चलो, कुछ मिठा हो जाये...